‘स्लॅशर’ हा खुनी भयप्रकार चित्रपटांमध्ये अगदी क्रूर पातळीवर राबविला दक्षिण कोरियाई सिनेमाने. मात्र चित्रपटांमध्ये त्याचा प्रभावी वापर करण्याचे श्रेय जाते हॉलीवूडला कर्मभूमी मानणाऱ्या वेस क्रेव्हन या दिग्दर्शकाकडे. हॉलीवूडमध्ये जॉर्ज रोमरो यांचे झोम्बी-पट स्थिरावले असताना आणि जॉन कार्पेटर यांच्या विज्ञान-भयसिनेमांचा सुळसुळाट असताना वेस क्रेव्हन यांच्या सिनेमाने भीतीचा विचित्र अन् भीषण अनुभव देण्यास सुरुवात केली होती. ‘भय एके भय’ देणाऱ्या दिग्दर्शकांपासून आपली वाट कायम वेगळी ठेवणाऱ्या या दिग्दर्शकाचा सिनेमा, ही एकदा अनुभवणाऱ्यास कदापि विसरता येणारी गोष्ट नाही.
इंगमार बर्गमनच्या स्वीडिश सिनेमाच्या प्रभावातून बनलेला या दिग्दर्शकाचा पहिला सिनेमा ‘द लास्ट हाऊस ऑन द लेफ्ट’ (१९७२) तिकीटबारीवर कोसळला. पण रॉजर एबर्टसारख्या थोर समीक्षकाने या चित्रपटाद्वारे येऊ पाहणाऱ्या नव-भयपट प्रकाराचा पुरस्कार केला. एबर्टचे कौतुक फोल ठरले नाही, अशीच निर्मिती पुढे क्रेव्हन यांच्याकडून होत राहिली. पुढे तमाम भयसिनेप्रेमींना आणि भयपटकारांना आदर्श ठरणारा सिनेमा त्यांनी बनविला. ‘नाइटमेअर इन इल्म स्ट्रीट’ या भयपटाद्वारे त्यांनी जॉनी डेप या आजही आघाडीवरच्या अभिनेत्याला मोठय़ा पडद्यावर आणले. भीतिदायक व्यक्तिरेखा (नाइटमेअर..) आणि भीतीचा चेहरा (स्क्रीम मालिका) आपल्या चित्रपटांमधून त्यांनी लोकप्रिय केल्या. १९६०-७०च्या दशकात भाषेची प्राध्यापकी करणाऱ्या या अवलियाने टोपण नावाने पोर्नोग्राफीद्वारे आपल्या सिनेकारकीर्दीची सुरुवात केली. तेथून सिनेमातील ध्वनिसंकलनापासून इतर सर्व अंगांचा बारकाईने अभ्यास करीत अमेरिकी मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये पाऊल टाकले. संधी मिळताच आपल्या मनातील भयकल्पनांना पडद्यावर आविष्कृत केले. ‘हिल्स हॅव आइज’ (१९७७), ‘रेड आय’ (२००५) या ‘स्क्रीम’ व ‘नाइटमेअर..’ चित्रपट मालिकांच्या व्यतिरिक्त त्यांचे सिनेमा आपल्याकडच्या चित्रवाहिन्यांवर अद्याप लोकप्रिय आहेत. मेरिल स्ट्रिप यांच्या अभिनयाने सजलेला ‘म्युझिक ऑफ द हार्ट’ (१९९९) हा भयवजा सिनेमा पाहणाऱ्याला त्यांच्या दिग्दर्शकत्वाची ताकद लक्षात येऊ शकेल. १९९९ साली आलेल्या ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’ने अमेरिकीच नाही तर जगातल्या सर्वच भयचित्र प्रकारात बदल घडविले. पडद्यावर भयावह गोष्टी न दाखविता भय निर्माण करणारी चलाखी स्थिरावली. तरीही क्रेव्हन यांचे दार्शनिक भय आणि भूतक्रौर्याची दहशत सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कायम राहिली आहे. त्यांच्या ३० ऑगस्ट रोजी झालेल्या मृत्यूनंतरही अभिजात भयपटकारांच्या नावांत त्यांच्या सिनेमांची गर्दी कायम राहणार आहे.