‘सत्यार्थ आणि सत्यार्थी’ हा अग्रलेख (१३ ऑक्टोबर) सहसा न चर्चिल्या जाणाऱ्या विषयावर प्रकाश टाकतो, हे प्रशंसनीय आहे. नोबेल शांतता पारितोषिकामागे कोणकोणते हिशेब असू शकतात, याबद्दल या अग्रलेखात मांडल्या गेलेल्या दृष्टिकोनाशी मी सहमत आहे. मलालाच्या बाबतीत तर, भांडवलशाही देशांचा ‘छुपा अजेंडा’ गेली कैक वर्षे स्पष्टच दिसतो, असे मला वाटते. या देशांनी फौजांद्वारे अथवा ड्रोनद्वारे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात निरपराधांचा संहार केलेला आहे आणि आता त्यांना या संहाराच्या आरोपांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी ढाल म्हणून काहीतरी हवेच आहे. मलाला हिच्यावर गोळीबार झाल्यावर आयतीच ढाल पाश्चात्त्य देशांना सापडली. मग तिला संयुक्त राष्ट्रांत भाषणाचे निमंत्रण, तिला सुरक्षा, प्रमुख दैनिकांत तिच्या मुलाखती, यांतून पाश्चात्त्य देश हे ‘गुंतागुंतीच्या’ देशांबाबत कशी ‘काळजी’ घेत असतात, हे दाखविण्याची व्यूहरचनाच सुरू झालेली दिसली.
या तुलनेत, कैलाश सत्यार्थी हे नोबेल शांतता पारितोषिकाच्या घोषणेपूर्वी सामान्य माणसाच्या नजरेसमोर नव्हते. त्यांचे काम नक्कीच मोठे आहे. मात्र मी व्यक्तिगतरीत्या अनेक अशा व्यक्तींना ओळखतो, ज्या भारताच्या दुर्गम भागांत बालमजुरीविरोधी काम करीत आहेत. त्यामुळे मला हा नोबेल शांतता पारितोषिकाच्या निकषांचा प्रश्न वाटतो. दुसरीकडे, मानवतावादी काम करणारे बहुतेक जण कोणत्याही पुरस्कार वा मान्यतेसाठी काम करीत नाहीत, हेही दिसते.
नोबेल शांतता पारितोषिकांमागच्या राजकीय हेतूंचा शोधक धांडोळा घेणे अन्य काही प्रसारमाध्यमांनीही सुरू केले आहे. ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकाचे संपादकीय सहायक एलियास ग्रोल यांनी त्यांच्या लेखात, या पारितोषिकानंतरही तळागाळाच्या स्तरावर ज्या उद्दिष्टांसाठी या दोघांचे काम सुरू आहे ती उद्दिष्टे साध्य होतीलच याची शाश्वती नसल्याचे म्हटले आहे. तर ‘स्क्रोल’मध्ये रोहन वेंकटरामकृष्णन् यांनी नोबेल शांतता पुरस्काराचा पाश्चात्त्य जगाकडून राजकीय हत्यार म्हणून वापर झाल्याचे आरोप यापूर्वीही कसकसे झाले आहेत, याची आठवण विविध उदाहरणांनी करून दिली आहे. नोबेल समितीने पुरस्काराची घोषणा करताना (मलालाच्या) धर्माचा उल्लेख करणे हे माझ्या मते केवळ दुर्दैवीच नव्हे तर अजिबात खपवून घेऊ नये असेच आहे.
माझ्या मते नोबेल शांतता पारितोषिकाच्या निवड समितीचा हा लहरीपणा सुरू आहे. ओबामा वा अल् गोर यांना हे शांतता पारितोषिक देण्याची संभावना तर ‘होपलेस’ अशा शब्दांत झाली होती. शिवाय सारे विश्व ज्यांना शांततेचे महान दूत म्हणून ओळखते, त्या महात्मा गांधीजींना नोबेल शांतता पारितोषिक मिळालेच नव्हते.
हे असे पारितोषिक भारत आणि पाकिस्तानला विभागून का देण्यात आले, याची खरी कारणे कदाचित आपल्या बुद्धी वा कल्पनेच्याही पलीकडली असू शकतात. एक भारतीय म्हणून मला एवढेच वाटते की, भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार देण्यासाठी काही ‘डील’ (छुपा करार) झालेले नसावे अशी आशा करू या.  
असो. अग्रलेख विचारप्रवर्तक होता,हे नक्की.

अर्धवट उल्लेखाने गैरसमज वाढतात
‘सत्यार्थ आणि सत्यार्थी’ (१३ ऑक्टो.) हा अग्रलेख सुरुवातीस ठीक वाटला, पण शेवट फारच खटकला. सत्यार्थी यांचा दिल्लीमध्ये आलिशान भागात तीन मजली इमला आहे हा उल्लेख अशा प्रकारे केला आहे की जणू काही सामाजिक कार्यकर्त्यांने व्यक्तिगत जीवनात आíथकदृष्टय़ा ठीक असणे म्हणजे आक्षेपार्ह आहे. ‘सगळे सामाजिक कार्यकत्रे गरीब असतात, जुनाट, साध्या, डबघाईला आलेल्या घरात राहतात,’ असा हास्यास्पद समज तर या टीकेमागे नाही ना? असले हे नमुनेदार समज फक्त बॉलीवूड चित्रपटांत शोभतात.
आणि जर त्यांचा हा इमला इतका खटकत असेल, तर अग्रलेखात संशयाच्या सुरात उल्लेख करण्याआधी त्याबद्दल संबंधित पुरेशी माहिती वाचकांनाही द्यायला हवी होती. शिवाय ‘ते राष्ट्रीय सल्लागार समितीमध्ये होते,’ ही गोष्ट आंतरराष्ट्रीय ख्यातीचा व मान्यतेचा नोबेल शांतता पुरस्कार मिळण्यासाठी, त्यांच्या कामाच्या तुलनेत किती महत्त्वाची आहे याचादेखील तिथेच उल्लेख केला असता तर अग्रलेख सत्यार्थीबद्दल पूर्वग्रहातून लिहिला गेला नाही, असे समजण्यास जागा होती. कारण हा पुरस्कार काही पद्मश्री अथवा पद्मभूषण नाही. नुसताच अर्धवट उल्लेख करून वाचकांमध्ये गरसमज अथवा अर्धसत्य पसरणार नाही याची किमान लोकसत्ताने तरी काळजी घ्यावी.
प्रज्योत जाधव, पुणे</strong>

शोषणाचा दुर्गुण कमी करणारे राज्यकर्ते कमी, म्हणून अर्थतज्ज्ञ हवे!   
‘भांडवलशाही वठणीवर हवी, पण..’ या  ‘अन्वयार्थ ’ मधील (१५ ऑक्टो) विचार आपल्या वृत्तपत्राच्या संतुलित आणि स्पष्ट विचारसरणीचे प्रतििबब आहेत.
 कालबाह्य ठरलेल्या परंतु मानवतेला जवळच्या वाटणाऱ्या ‘समाजवादी व्यवस्थे’ला पर्याय म्हणजे ‘शोषणरहित भांडवलशाही अर्थव्यवस्था’ ! .. परंतु कोणतीही व्यवस्था पुस्तकात किंवा तत्त्वज्ञान म्हणून कितीही गोंडस असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात ती निर्दोष असेलच असे नाही. किंबहुना ती तशी नसतेच.  ‘शोषणरहित अर्थव्यवस्था ’ ही संकल्पना तशीच. शोषण हा भांडवलशाहीचा एक अंगभूत दुर्गुणच असतो. वेगवेगळ्या क्ऌप्त्या करून भांडवलदार मंडळी आपापले हितसंबंध अबाधित राखत असतात.
ते करीत असताना त्यांच्यावर राज्यकर्त्यांचे योग्य नियंत्रण असेल तरच सर्वसामान्य जनतेचे हित जपले जाते. परंतु असे नियंत्रण असण्यासाठी राज्यकत्रे निस्पृह, निर्भीड आणि निरपेक्ष असायला हवेत (जी शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे). अन्यथा सर्व सामान्य जनतेची अवस्था बिकट होते–तिची ससेहोलपट होते .
कालबाह्य साम्यवादी किंवा समाजवादी व्यवस्था आणि पूर्ण नियंत्रणमुक्त  भांडवलशाही अर्थव्यवस्था (म्हणजेच बळी तो कान पिळी) या दोहोंमध्ये सुवर्णमध्य साधण्यासाठी ज्याँ तीरोल यांच्यासारखे विचारवंत–अर्थतज्ज्ञ निश्चितपणे साह्यभूत ठरू शकतात. त्यांच्या कार्याचा आणि त्यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचा स्पष्ट केलेला ‘अन्वयार्थ’ अभिनंदनीय आहे.
– दीपक देशपांडे , पुणे
 
जब्बार यांची कामगिरी मोठीच!
‘जब्बार यांची कामगिरी काय ?’ अशी विचारणा करणारे पत्र (लोकमानस, १४ ऑक्टोबर) वाचून अतिशय खेद वाटला. डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या सव्यसाची, बुद्धिमान, सुसंकृत आणि असामान्य प्रतिभेच्या व्यक्तिमत्वाबद्दल एवढे असहिष्णू, असंवेदनशील मत कोणी व्यक्त करील असे कधी वाटले नव्हते. आणि ते सुद्धा ‘विष्णुदास भावे’  पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल! कलाकृतीच्या एकूण संख्येवरून कलाकाराचा मोठेपणा जोखणेही योग्य नव्हेच. परंतु माणूस नावाचे बेट, अशी पाखरे येती, खून पहावा करून, घाशीराम कोतवाल या नाटकांतील त्यांचा सहभाग लक्षात घेता व जैत रे जैत, सिंहासन, एक होता विदूषक, सामना, मुक्ता, उंबरठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक संदर्भ असलेले अविस्मरणीय चित्रपट सादर करणाऱ्या या  दिग्दर्शकाला, ‘सरकारी दिग्दर्शक’ म्हणून हिणवल्याने डॉ. जब्बार पटेल यांच्या कलाक्षेत्रातील अढळपदालाअजिबात धक्का बसणार नाही.
– अनिल रेगे, अंधेरी पूर्व (मुंबई)

‘तोडणारच’, मग प्रयत्न कसले?
‘शिवसेनेला कंटाळलो होतो!’ ही बातमी (लोकसत्ता, १४ ऑक्टो.) वाचली आणि भाजपनेत्यांबद्दल प्रश्न पडले.  युती तुटण्याच्या आधी काही दिवस बहुतांश जनतेला युती होणार की नाही याची उत्सुकता लागली होती;  परंतु भाजपचे नेते या काळात ‘आम्ही खूप मनापासून प्रयत्न केले’, ‘युती तोडताना आम्हालाही खूप दु:ख होत आहे’ अशा स्वरूपाची विधाने करत होते. पण आताच्या बातमीत रुडी यांनी ‘आम्ही युती तोडणारच होतो’ हा गौप्यस्फोट केल्याने युतीची चर्चा म्हणजे एक मोठे राजकीय नाटक होते, असे खेदाने म्हणावेसे वाटते. आधीच आपल्याकडे राजकारण्यांची विश्वासार्हता कमी आहे. या नाटकामुळे ती विश्वासार्हता अगदीच रसातळाला जाईल असे मला वाटते.
– कुशल जगताप, ठाणे ‘शिवसेनेला कंटाळलो होतो!’ ही बातमी (लोकसत्ता, १४ ऑक्टो.) वाचली आणि भाजपनेत्यांबद्दल प्रश्न पडले.  युती तुटण्याच्या आधी काही दिवस बहुतांश जनतेला युती होणार की नाही याची उत्सुकता लागली होती;  परंतु भाजपचे नेते या काळात ‘आम्ही खूप मनापासून प्रयत्न केले’, ‘युती तोडताना आम्हालाही खूप दु:ख होत आहे’ अशा स्वरूपाची विधाने करत होते. पण आताच्या बातमीत रुडी यांनी ‘आम्ही युती तोडणारच होतो’ हा गौप्यस्फोट केल्याने युतीची चर्चा म्हणजे एक मोठे राजकीय नाटक होते, असे खेदाने म्हणावेसे वाटते. आधीच आपल्याकडे राजकारण्यांची विश्वासार्हता कमी आहे. या नाटकामुळे ती विश्वासार्हता अगदीच रसातळाला जाईल असे मला वाटते.
– कुशल जगताप, ठाणे