नेहमीच आक्रमक भाष्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना साध्वीच्या वक्तव्यावर  मात्र फारच संयमाने बोलावे लागले. देशासाठी अनेक चांगले व धाडसी निर्णय झटपट घेणाऱ्या नरेंद्र मोदींना साध्वीच्या वक्तव्यावर भाष्य करण्यास जो विलंब लागला त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. भारतीय संविधानाला डावलू पाहणाऱ्या नेत्यांना कोणती शिक्षा द्यावी, हे पंतप्रधानांना नक्कीच ठाऊक असेल. ढोंगी लोकांना मंत्रिपद देणे तसेच ढोंगी लोकांच्या बेशिस्त वागणुकीवर पांघरूण घालणे यावरून जनतेने कोणता बोध घ्यायचा? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नाडय़ा दुसऱ्याच्या हाती आहेत, असे म्हटले जायचे. मोदी गप्प आहेत ते कोणाच्या दबावामुळे?

भाजपकडून मित्रपक्षांची उपेक्षा
भाजपने बहुजन समाजातील घटकांना सामावून घेण्यासाठी महादेव जानकर (रासप), रामदास आठवले (रिपाइं), राजू शेट्टी (स्वा. शे. संघटना) आणि विनायक मेटे (शिवसंग्राम) यांच्याशी निवडणूकपूर्व युती केली. हे घटकपक्ष छोटे असले तरी त्यांची एक ठरावीक ‘व्होट बँक’ आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने या पक्ष/संघटनांना सोबत घेतले.  
 रासपला एक जागा (दौंड) वगळता मित्रपक्षांचा कुणी उमेदवार निवडून आला नाही; परंतु त्यांच्या सहभागाचा भाजपला चांगलाच फायदा झाला आणि हे भाजपलाही मान्य असावे. युती करताना भाजपने मित्रपक्षांना सत्तेत योग्य वाटा देऊन सन्मानपूर्वक सामावून घेण्याचा शब्द दिला होता; परंतु नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांच्या पदरात उपेक्षाच आली.
भाजपने याबाबतीत काँग्रेसचा आदर्श घेतलेला  दिसतोय. त्यामुळे भाजपचे ‘वापरा आणि फेकून द्या’ हे धोरण दिसून आले.
 – प्रकाश ला. पोळ, ओंड, ता. कराड, जि. सातारा

दार उघड, बये दार उघड!
सकारात्मक चच्रेच्या गुऱ्हाळानंतर आणि ७० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाजपने सेनेकरिता सत्तेचे दार उघडले आहे. सेनेच्या (होम) मिनिस्टरांनी सन्मानाने सत्ताप्रवेश (गृहप्रवेश) केला. अल्पमतातील भाजप सरकारवर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी राज्यपालांकडे केली होती. त्याच सरकारमध्ये मानापमानाच्या नाटय़ानंतर बिनशर्त सामील होण्याची वेळ सेनेवर आली आहे.
 जागावाटपाच्या वेळी भाजपचा फॉम्र्युला सेनेने स्वीकारला असता, तर आता उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पदांसह इतर अनेक महत्त्वाची खाती सेनेला मिळविता आली असती. ६३ आमदारांच्या बळावर जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता सक्षम विरोधी पक्षाचे काम सेनेने केले असते, तर पुढील निवडणुकीत स्वबळावर सेनेची सत्ता आणण्याची संधी मिळाली असती. आम्हाला सत्तेची लालसा नाही, असे म्हणत सत्तापदावर आरूढ व्हायचे. हाच का स्वाभिमान? आता सत्तेमध्ये सहभाग म्हणजे कमळाबाईसोबत सत्यनारायणाच्या पूजेला बसून तिच्या हाताला हात लावून मम म्हणायचे सत्कार्य सेनेला करावे लागणार आहे. एक मात्र नक्की सत्तेचा प्रसाद सर्व जण गोड मानून वाटून घेतील, जनतेपर्यंत तो पोहोचणार नाही. पर्यायाने पुढच्या वेळी पूजेला बसायची वेळच येणार नाही.
     – प्रवीण हिल्रेकर, डोंगरी, मुंबई

आंदोलन करण्यापूर्वी माहिती घ्यावी
‘जवखेडे हत्याकांड कौटुंबिक वादातूनच’ ही बातमी (लोकसत्ता, ५ डिसेंबर) वाचली. यावरून असे स्पष्ट झाले की, हा वाद घरगुती होता व त्यामुळे तिघांची हत्या झाली; परंतु या हत्याकांडाचे परिणाम पूर्ण महाराष्ट्राला सोसावे लागले आणि यामागे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांचा सहभाग होता हे स्पष्ट आहे.
   मला या जातीय पक्षांना इतकेच सांगायचे आहे की, त्यांनी घटनेची पाश्र्वभूमी ओळखून व पूर्ण माहिती घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. म्हणजे आंदोलनाचा कोणालाही त्रास होणार नाही व कुणाचे हसेही होणार नाही.
– निखिल बेल्लाळे, लातूर

बेटा, खुद को पहचान!
‘स्वाभिमानाची डुलकी’ हे संपादकीय (५ डिसेंबर) वाचले. त्यातील ‘देशाच्या राजकारणात एकच – नरेंद्र मोदी यांचे नाणे चलनी होते’ हे अप्रिय वास्तव शिवसेनेला अजिबात म्हणजे अजिबातच  समजले नाही हे दुर्दैवी सत्य आहे. लोकसभेच्या निकालानंतरच हे सत्य साऱ्या जनतेला कळून चुकले  होते; परंतु जागावाटपापासूनच शिवसेनेच्या ‘गादीवर  बसलेल्या’ नेतृत्वाने स्वत:ची क्षमता (किंवा  क्षमतेचा  अभाव) लक्षातच न घेता ‘दादागिरी’ सुरू केली! काहीही झाले तरी आपल्यात बाळासाहेबांचे  रक्त  आहे, तेव्हा आपण महाराष्ट्राचे अघोषित राजे होणार, अशा निर्बुद्ध गरसमजातून ही घमेंड आली असणार. राहुल गांधी जसे खंदे राजकारणी  होण्याच्या  लायकीचेच  नाहीत, तसेच  हे  शिवसेनेचे ‘नेतृत्व!’ मनोहर जोशी कटू सत्य बोलले ते यांना कसे झोंबले  ते आपण सगळ्यांनीच पाहिले. एखाद्याचे वडील अतिशय यशस्वी डॉक्टर होते याचाअर्थ त्यालाही डॉक्टरकीत नपुण्य असेल, असा मुळीच नाही आणि उत्तम छायाचित्रकार म्हणून यश मिळणे वेगळे आणि ‘सत्ता’वेगळी! असो. आता यांनी ‘स्वाभिमान’,‘मराठी अस्मिता’वगरे शब्द उशाखाली ठेवून गपगुमान राहावे, हे बरे! राष्ट्रभाषेत म्हणतात  ना,‘‘बेटा, खुद को पहचान!’’
 – डॉ. राजीव  देवधर, पुणे  

तो हिंमत करणार नाही; पण तुम्ही धैर्य दाखवणार?
‘चपराक कोणाला बसेल?’ हा अन्वयार्थ (२ डिसेंबर) वाचला. पुण्यासारख्या सांस्कृतिक(?) शहरात असे प्रसंग माझ्यावरही अनेक वेळा आले अन् प्रत्येक वेळी मी माझ्यापरीने (शाब्दिक/ शारीरिक) प्रतिकारही केला. अशीच एक घटना २६ सप्टेंबरची. फरक इतकाच की वेळ रात्री साडेनऊची अन् प्रतिकार करणारी मी एकटीच. खचाखच भरलेल्या पीएमटी बसमध्ये मी त्या नतद्रष्टाला मारत असताना सर्वच वयोगटांतील व समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील स्त्री-पुरुष फक्त बघ्याच्या भूमिकेतून डोळे विस्फारून या प्रसंगाची मजा(?) घेत होते. तो तरुण उतरून पळूनही गेला तरीही सर्वजण तटस्थच!
 दोन महिने उलटून गेले तरीही त्या प्रसंगाचे ओरखडे माझ्या मनावर अजूनही ताजे आहेत. त्याने केलेल्या छेडछाडीपेक्षाही मला समाजाची मुर्दाड मानसिकता जास्त अस्वस्थ करून गेली.
प्रत्येक मुलीची ‘निर्भया’ झाल्यावरच आपण मेणबत्ती लावून दखल घेणार आहोत का? आपल्या या बघ्याच्या भूमिकेमुळे अशा समाजकंटकांचे उत्तेजन अन् मुलींचे मानसिक खच्चीकरण करत आहोत हे कुणाच्याच लक्षात का येत नाही? ही निर्ढावलेली मुलेच पुढे जाऊन बलात्कारासारखे गंभीर गुन्हे करत नसतील कशावरून?
मला आज खात्री अन् समाधान आहे की तो तरुण परत कुणालाही छेडण्याची हिंमत करणार नाही, परंतु त्याच वेळेस ही लढाई माझ्यासारख्या अनेकींना एकाकीच लढावी लागणार हे कटू सत्यही पचवावे लागते याचे अतोनात दु:खही आहेच.
– सोनाली वाघ, पुणे

भ्रष्टाचाराची वाहतूक-कोंडी!
‘‘वाटण्या’च्या अक्षता’ हे  शनिवारचे संपादकीय (६ डिसेंबर) वाचले. ‘जागतिकीकरण हा खरा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा साम्राज्यवाद’ हे वास्तव असले तरी स्पष्ट शब्दांत ऐकल्यावर बिचकायला होतेच.  भ्रष्टाचाराचा आपल्या राजकीय व्यवस्थेला विळखा इतका घट्ट आहे की, त्याला ‘बायपास’ करून पुढे जाणे अशक्य आहे याचा अनुभव आपण घेतलेला असतो. नाइलाज झाल्यामुळे भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष साहाय्य करणे किंवा पुढे जाण्याचा मनोदय रहित करणे हे दोनच पर्याय सामान्यांपुढे असतात. या ट्रॅफिक-जामवर उपाय शोधण्याच्या अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांनाही म्हणावे तसे यश मिळाले नाहीच आणि अभावग्रस्ततेचा अभाव असतो तिथेही त्याचे प्रमाण लक्षणीय असते. म्हणजे त्याचे प्रमुख कारण भूक हे नसून विधिनिषेधशून्य वखवख हेच आहे. त्याचे निर्मूलन करण्यासाठी कठोर कायद्यांची तिकीच काटेकोर अंमलबजावणी हाच उपचार आहे
– प्रमोद तावडे, डोंबिवली