पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाच भारतीय जवानांचा मृत्यू झाला. कोणाही भारतीयाला चीड यावी अशीच ही घटना. ही चीड केवळ पाकिस्तानच्या कुरापतींबद्दल नाही. आतापावेतो सगळेच समजून चुकलेले आहेत की, पाकिस्तानी लष्कर तसेच वागणार. ती त्यांची गरज आहे. त्या गरजेला जशी भारतद्वेषी राजकारणाची किनार आहे, तशीच ती लष्कर आणि नागरी प्रशासन यांच्या संघर्षांचीही आहे. आताही तेथे हेच घडते आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सत्तेवर आल्यापासून भारतप्रेमाचे भरते आले आहे. ते पाक लष्करातील काही गटांना आणि दहशतवादी संघटनांना पसंत नाही. शरीफ यांनी चच्रेसाठी पाऊल उचलताच पाकिस्तानी लष्कराने उचल खाल्ली. या सर्व घटनांमुळे भारतीयांची मने संतापाने पेटून उठली आहेत आणि हा संताप, ही चीड जितकी पाकिस्तानबद्दल आहे, तितकीच ती स्वत:कडे भावी महासत्ता म्हणून पाहणाऱ्या भारताच्या हतबलतेविषयीही आहे. पाकिस्तानने प्रत्येक वेळी आगळीक करावी आणि भारताने ते सहन करावे, हे कुठवर चालणार? प्रत्येक वेळी निषेधाचे कडक खलिते पाठविण्याऐवजी आपले सरकार काही ठोस कारवाई का करीत नाही? असे काही सवाल येथील सर्वच नागरिकांच्या मनात आहेत. याबद्दल याआधी काँग्रेसला धोरणांना जबाबदार धरता येत होते. परंतु केंद्रात भाजपप्रणीत सरकार होते, त्या कालखंडातही पाकबाबतचे भारताचे धोरण तसेच राहिले होते. हे अनुभवले असल्याने तर या हतबल भावनेची तीव्रता अधिकच वाढलेली आहे. पाकिस्तानला धरले तरी चावते आणि सोडले तरी चावते अशीच     परिस्थिती असल्याने पाकिस्तानला तत्कालीन स्वरूपाच्या प्रतिक्रिया देणे एवढेच आपल्या राज्यकर्त्यांच्या हातात असल्याचे दिसते. लंडनमधील किंग्ज महाविद्यालयातील संरक्षणविषयक तज्ज्ञ हर्ष पंत यांनी आपल्या एका लेखात यावर नेमके बोट ठेवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका नेहमीच या भागात ठाण मांडून बसलेली असेल आणि त्यामुळे आपोआपच भारताच्या हितसंबंधांचे संरक्षण होईल, असे जे भारतीय धोरणकर्त्यांना वाटत आहे, तेही अयोग्य आहे. अमेरिकी फौजा अफगाणिस्तानातून गेल्यानंतर पाक लष्कराच्या आणि दहशतवाद्यांना ‘निर्वघ्नि’पणे पंजाब-काश्मीरकडे लक्ष देता येईल, हे भय मुळीच अवास्तव नाही. त्याचा प्रत्यय आतापासूनच येऊ लागलेला आहे. यावर उपाय काय? ‘आर या पार’ लढाई? ते शक्य आहे, पण महाग आहे. त्यातून जनमानसाची भावनिक शांती होईल, पण मूळ प्रश्न मिटणार नाही. उलट चिघळेल. आजवरच्या भारत-पाक युद्धांनी आपल्याला हा धडा दिलेला आहेच. मग यावर उत्तर काय? लष्करप्रमुख जन. विक्रमसिंग यांनी काही दिवसांपूर्वीच हे उत्तर दिले आहे आणि ते लष्करी बळाचा वापर हेच आहे. पाकिस्तानच्या कारवायांना आळा घालायचा असेल, तर लष्कराने घुसखोरांबाबत अधिक जागरूक आणि आक्रमक राहिले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याच्या बातम्या आहेत. पाकी घुसखोर भारतीय सीमेत  येतात. दबा धरून बसतात आणि भारतीय जवानांची हत्या करतात, ही गोष्टच अविश्वसनीय आहे. परंतु तसे घडलेले आहे. सीमेपलीकडून होणारी    घुसखोरी काही आजची नाही. तरीही हे घडले. भविष्यात तसे होऊ देता कामा नये. किमान त्यात तरी काही राजकीय अडचण नाही. तेव्हा आपल्या सीमांचा पक्का बंदोबस्त करणे आणि त्याचबरोबर प्रतिक्रियावादी असण्याऐवजी, अन्य कुणाच्या तोंडाकडे पाहण्याऐवजी अग्रसक्रिय असणे हेच भारताचे धोरण असले पाहिजे. तसे ते नाही, म्हणूनच पाकी लष्कराचे फावते आहे.