रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सलमामा यांच्या भाच्याने केलेल्या पराक्रमामुळे एक झाले, की प्रसारमाध्यमांना ताजे ताजे चमचमीत खाद्य मिळाले. असा एखादा विषय समोर आला नसता, तर सरबजित सिंग यांच्या मृत्यूचा विषयच लावून धरण्याची पाळी आपल्या वृत्तवाहिन्यांवर आली असती! बन्सलमामांमुळे ही बला टळली. परंतु प्रसारमाध्यमांतून एखादा विषय गाजत नसला, म्हणजे सर्वसामान्यांना त्याचे काहीच देणे-घेणे नसते अशातला भाग नाही. शिवाय सध्या आपल्याकडे सार्वत्रिक निवडणुकांची उलट गणना सुरू झालेली आहे. तशातच सनाऊल्ला हक या पाकिस्तानी कैद्यावर हल्ला झालेला असून, तो सध्या कोमामध्ये आहे. त्यात तो पगंबरवासी झाला तर पाकिस्तान त्याला शहिदाचा दर्जा देणार, हे ओघाने आलेच. आताच त्याच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्याची लाट पाकिस्तानात आलेली आहे. हे सर्व पाहता सरबजित सिंग हा विषय काही एवढय़ात मागे पडणार नाही. सरबजित सिंग यांच्या मृत्युमुळे राष्ट्रप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे, हे तर प्रत्यही दिसतेच आहे. ही चीड अर्थातच केंद्र सरकारच्या या संदर्भातील दुबळ्या धोरणांबद्दल आहे. सरबजित सिंगची फाशीची शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यास पाकिस्तान सरकारला भाग पाडण्यात आले होते, हे विसरून केंद्र सरकारने याबाबतीत काहीच केले नाही, असा आरोप केला जात आहे. पण आपले अतिराष्ट्रवादी खरे चिडले आहेत ते या घटनेचा संबंध पाकिस्तान या शत्रूराष्ट्राशी आहे यामुळे (इटलीच्या दोन नौसनिकांनी दोन भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालून ठार मारले. त्या वेळी एक राष्ट्र म्हणून आपली प्रतिक्रिया काय होती, हे येथे लक्षात घेता येईल.). तेव्हा एका भारतीयाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या शत्रूराष्ट्राला चांगलाच धडा शिकविला पाहिजे, असे सर्वाचेच म्हणणे दिसते. यात समस्या एकच आहे, की तो नेमका कसा शिकवायचा हे मात्र कोणीच थेट सांगत नाही. ना विरोधी पक्ष, ना अतिराष्ट्रवादी तज्ज्ञमंडळी. म्हणजे पाकिस्तानवर हल्ला करायचा का? पाकिस्तानवर आíथक र्निबध लादायचे काय? तर तसे कोणीही म्हणत नाही आणि तसे करायचे झाल्यास मग चीनचे  काय करायचे?  चीनने केलेल्या ताज्या अतिक्रमणानंतरही आपल्या भावनांचा उद्रेक वगरे झाल्याचे कोठे दिसून आलेले नाही. शरद जोशी यांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची हाक दिली होती. आपण ती कानाआडच केली. एकंदर पाकिस्तानबाबतच आपण अतिशय हळवे आहोत हेच खरे आणि त्यामुळेच पाकिस्तानशी नेमके कसे वागायचे हे आपणास समजेनासे झालेले आहे. देशाचे परराष्ट्र धोरण खलबतखान्यांमध्ये ठरत असले तरी ते जनभावनांनी घडत असते. कधी मुशर्रफ यांच्या प्रेमाने सद्गदित व्हायचे आणि कधी सद्भावनांना बॉम्बस्फोटाने उडवायचे असे हेलकावे घेणाऱ्या देशाचे परराष्ट्र धोरणही अखेर तसेच दोलायमान राहणार. तेव्हा पाकिस्तानबाबतचा धर्माधिष्ठित हळवेपणा बाजूला ठेवून त्याचे काय करायचे, याचा विचार कठोर कोरडय़ा राष्ट्रस्वार्थप्रेरणेने करण्याची आवश्यकता आहे. तसे न केल्यास मग काय, पाकिस्तानबरोबर आपले नळावरचे भांडण कायमच सुरू राहील. तेही असे भांडण, की ज्याचा लाभ होतो तो फक्त दोन्हींकडील धर्मवादी राजकारण्यांनाच.