आजचा जातिवाद कमी व्हावा असे खरेच वाटत असेल, तर दोन्ही बाजूंमधील अंतर कमी करायचे, दोन्ही बाजूंच्या मध्ये एक दुवा तयार करण्याचे, एखादा सुसंवादरूपी पूल बांधण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. हे करायची इच्छा आमच्या लोकांची आहे का?
माझ्या समवयीन, कॉलेजात शिकणाऱ्या किंवा आयटी/ मार्केटिंगमध्ये नोकरी करणाऱ्या मित्रांजवळ हा विषय काढल्यावर चर्चा भलतीकडेच वळते! ‘‘जर ‘ते’ सावरकर, टिळक, नेहरू, पटेल आदींना मानत नसतील, तर आम्ही का म्हणून आंबेडकरी बनू?’’ असली वाक्ये ऐकायला मिळतात आणि मी हताश होतो. पुढाकार सवर्णानीच घ्यायला हवा, आंबेडकरी चळवळीत विश्वासार्हता कमवायलाच हवी, हे मी पटवून जरी देऊ शकलो (जे अत्यंत अवघड आहे!) तरी ‘त्यांना आम्ही हवे आहोत का?’ असा प्रतिप्रश्न येतो आणि मी निरुत्तर होतो.
 आंबेडकरी चळवळ केवळ दलितांमधून निघून र्सवकष होण्याची वेळ आली आहे. जो दु:खी आहे, जो सिस्टीमने नाडलेला आहे, जो अशक्त आहे, तो आंबेडकरी अशी साधी सरळ मांडणी अस्तित्वात येणे आवश्यक आहे. ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ‘आम्ही आणि ते’ ही भावना जनमानसातून जाणार नाही.

अस्मिता, विकास, स्वाभिमान याचा खरा बोध झाला..
एखाद्या टुकार चित्रपटात शोभेल असा मानापमानाचा, धरसोडगिरीचा, बालिश आणि फडतूस राजकीय तमाशा महाराष्ट्रीय जनतेने गेले महिनाभर अनुभवला. देशभर प्रगल्भ शालीन आणि सकारात्मक राजकारणाचे दिवस इतिहासजमा होत असताना, महाराष्ट्रात अख्खा विरोधी पक्षच सत्तारूढ पक्षात सामील होण्याचा लाजिरवाणा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
 राज्यघटनेला अभिप्रेत पक्ष आणि मतदार यामधील संतुलन, सामंजस्य, आश्वासकता सगळ्याचा पार चक्काचूर झाला आहे. हय़ा ढोंगी मंथनातून व्यवस्थेवरील लोकांच्या विश्वासासंदर्भात कटू आणि भयावह वास्तव समोर आले आहे. नेत्यांच्या निवडणूक प्रचारसभेसाठी उन्हात होरपळणाऱ्या आशाळभूत मतदारांना- आपले नेते किती थापाडे, खोटारडे आणि संधिसाधू आहेत, अर्थपूर्ण राजकारणामुळे मतदारांना मिळणाऱ्या संधीची परिणामकारकता कशी शून्य झाली आहे, अस्मिता, विकास, धर्मनिरपेक्षता, िहदुत्व, स्वाभिमान, पारदर्शकता, स्वच्छ कारभार ह्य़ा सगळ्याच संकल्पना कशा फसव्या आहेत आदीबाबत यथार्थ बोध झाला आहे. यासंदर्भात आपला दिवा (नेता) प्रखरतेने उजळावा म्हणून रात्रंदिवस जळणाऱ्या बिचाऱ्या वातींची (कार्यकर्ता) कणव वाटते. त्यातच सन्मान म्हणजे काय रे भाऊ? मुख्यमंत्री दिल्लीचे ऐकणार का? अशा काही  प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच राहिली आहेत. यापुढे जाऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, भ्रष्टाचार हय़ा प्रश्नांना भिडताना दमछाक झाल्यावर लक्ष इतरत्र वळविण्यासाठी  अस्मिता, स्मारके, राज्याची भौगोलिक अखंडता हे ठेवणीतले भुंगे डोक्यात घालण्याचा प्रकार होणार आहे. हे देखील कमी पडले तर नवीन कायदे, अभ्यासगट,  प्राधिकरण, चौकशी आयोग, नंतर अंमलबजावणी आयोग हे पारंपरिक उपाय आहेतच की!
– सत्यवान पाटील, नाळे (नालासोपारा)

मोदी यांच्या ‘विनंती’नंतरचे प्रश्न
केंद्रीय राज्यमंत्री निरंजन ज्योती यांनी ‘रामजादे विरुद्ध हरामजादे’ असा वाक्प्रचार वापरून संसदेत गोंधळ ओढवून घेतला. अशा घटनांवर कायम मौन बाळगणाऱ्या पंतप्रधानांना नाइलाजाने विनंती करावी लागली, ‘‘निरंजन ज्योती संसदेत नवीन आहेत, त्यांची ‘पाश्र्वभूमी’ आपणा सर्वाना माहीत आहे, त्यांना माफ करावे ’’ अशा नवीन आणि सर्वाना माहीत असणाऱ्या ‘पाश्र्वभूमी’च्या व्यक्तीला मंत्रिपद का बहाल केले,  या प्रश्नाचे उत्तर मोदींना द्यावे लागेल. निरंजन ज्योती यांना २१ नोव्हेंबर २०१३ च्या रॅलीची संपूर्ण माहिती असल्याने कदाचित त्यांना ‘असंसदीय’ शब्द वापरायचे धाडस झाले असेल. वास्तविक शिवराळ भाषा कुठेही वापरल्याने सभ्यता काळवंडतेच. मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी संगीत सोम आणि सुरेश राणा यांचा सत्कार करण्यासाठी भाजपने ‘विजय शंखनाद’ रॅली आयोजिली होती. रॅलीत राम प्रताप चौहान या नेत्याने ‘ही लढाई रामजादे आणि हरामजादे यांच्यातील आहे,’ असे म्हटले होते. त्यांचे भाषण जिज्ञासूंना http://newsclick.in/india/another-ramzada या संकेतस्थळावर ऐकता-पाहता येते. विशेष म्हणजे या रॅलीला तेव्हाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले होते. त्यांनी चौहान यांच्या संदर्भातही  मौन बाळगले होतेच.
 प्रकाश बुरटे, सोलापूर

नाण्याची दुसरी बाजू
‘चलन पूजेपुरते!’ हा अन्वयार्थ (५ डिसें.) वाचला. यापूर्वी संत ज्ञानेश्वर, मदर तेरेसा, दक्षिणेतील बृहदेश्वर मंदिर, गौतम बुद्ध, शिवाजी महाराज तसेच नांदेड येथील     गुरू-ता-गद्दी सोहळ्याच्या निमित्तानेही विशेष नाणी सरकारने काढली होती. तेव्हा मात्र कधीही असा वाद झाला नाही. वैष्णोदेवीचे मंदिर काश्मीर राज्यात असल्यानेच विशिष्ट समूदाय या नाण्यास विरोध करीत असून तेथील काही फुटीर शक्तींची यास फूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 – विशाखा देगलूरकर, पुणे</strong>

आता माध्यमे क्षमा मागणार का?
अखेर जवखेडा हत्याकांडाच्या प्रकरणी मृतांचा पुतण्या प्रशांत जाधव यालाच अटक करण्यात आली. त्यानेच हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. माझा प्रश्न असा की, गेला एक महिन्याहून अधिक काळ वृत्तपत्रे, वाहिन्या व जातीच्या नावावर दुकानदारी करणारे लोक/संघटना या हत्याकांडाला ‘दलित हत्याकांड’ असे संबोधताहेत. त्याद्वारे सवर्णाकडून दलितांवर कसे अत्याचार होतात हे दाखवू पाहताहेत. एकप्रकारे दलित-सवर्ण असा संघर्ष पेटवू पाहताहेत.
 आता जर हत्याकांड मृताच्या पुतण्यानेच केले असेल, तर ते कोणत्या का कारणाने केलेले असेना, जातीच्या कारणावरून खचितच केले नसेल.
मग आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर, कालपर्यंत ज्या वाहिन्या, संघटना आणि लोक या प्रकाराला दलित-सवर्ण संघर्ष भासवत होते, ते सारे श्रोते, प्रेक्षक व वाचकांची बिनशर्त क्षमा मागणार का? अथवा आधी इतक्याच हिरिरीने हा दलित-दलित संघर्ष असल्याचे वा दलितांकडून दलितांवर कसे अत्याचार होतात, हे सांगणार का?
– श्रीकांत वाघ, पाचोरा (जळगाव)