नव्या-कोऱ्या इंग्रजी पुस्तकांचे मर्म मराठीतही थेट पोहोचावे, यासाठी निवडक आणि वेचक भागांच्या यथातथ्य अनुवादांचे नवे सदर
राजीव डोगरा हे भारतीय परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाले. इटली, मोल्दोवा, रूमानिया अशा देशांपेक्षाही कराची येथे आपण भारताचे उच्चायुक्त होतो, हे डोगरा यांना महत्त्वाचे वाटते. पाकिस्तान त्यांनी अनेकदा आणि जवळून पाहिला आहे.
भारत-पाकिस्तानमधील राजनैतिक संबंध नेहमीच असमाधानाकडे का जातात, हा प्रश्न मात्र त्यांच्याहीपुढे आहे.. त्याची उकल करण्यासाठी त्यांनी उपलब्ध राजनैतिक कागदपत्रांच्या आधारे इतिहासाची पुन्हा मांडणी केली आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या निर्मिती-प्रक्रियेपासून सुरुवात करून, सहाव्या प्रकरणात ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत पोहोचतात आणि फाळणीतील संहार, काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराने घुसवलेल्या टोळय़ा, पाणीवाटप वाद, पाकिस्तानने सीमा ओलांडण्याची केलेली दुसाहसे, लालबहादुर शास्त्री यांचा मृत्यू, आयूब खान आणि झुल्फिकार अली भुत्तो, भारतावर पुन्हा हल्ला, त्याला इंदिरा गांधी यांनी दिलेले प्रत्युत्तर, परंतु तहात भुत्तो यांनी केलेली चतुराई, त्यामुळे ‘भुत्तो यांच्याशी हस्तांदोलन भारताला महाग पडले’, पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध व त्याचे पदर, त्यातूनच वाढलेल्या दहशतवादी कारवाया.. अमेरिका-पाकिस्तान यांचे ‘कनेक्शन’, मुशर्रफ यांचे भारतात येणे आणि चर्चेविनाच जाणे, कारगिल युद्ध, ‘भारताला औकात दाखवण्या’चे पाकिस्तानी मनसुबे, कलम ३७०.. अशी प्रकरणे यात आहेत.
तरीही, हा ‘भारत-पाकिस्तान संबंधांचा राजनैतिक इतिहास’ नव्हे. या पुस्तकात लेखकाने जाहीर न केलेली, तरीदेखील पुस्तकभर जाणवत राहणारी एक भूमिका आहे. ती अर्थातच भारताच्या बाजूची आणि पाकिस्तानला खूप पाहिले, अशी!
एका राजनीतिज्ञाने अशी भूमिका घ्यावी का? का घ्यावी? याचे उत्तर देऊ शकणारा भागच पुस्तकातून ‘लोकसत्ता-बुकमार्क’ने निवडला. हा प्रसंग जणू, भारतीय राजनीतीपुढील आजचे प्रश्न उघड करणारा आहे..
‘आपल्या शेजाऱ्याविषयी बोलताना’
( पुस्तकातील प्रकरण क्र. २०) मधून..
बऱ्याच रशियन परीकथांमध्ये, नायक एखाद्या चौकात येतो. तेथे त्याला वेगवेगळे दिशादर्शक फलक दिसतात. त्यांच्यावरील मजकूर सहसा फारसा उत्साहवर्धक नसतो. जर तुम्ही डावीकडे वळाल तर तुम्ही तुमचा घोडा गमावून बसाल, उजवीकडे वळाल तर शिर गमावून बसाल, सरळ पुढे जाल तर काहीही मिळणार नाही, अशा त्या पाटय़ा असतात. अगदी कोडय़ात टाकणारी परिस्थिती असते.
दिल्लीतील शंभरएक हुशार आणि तरुण विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड देत उभा होतो, तेव्हा मला त्याची आठवण झाली. प्रश्न गंभीर (विचारप्रवृत्त करणारे) आणि पटापट येत होते, आणि संयोजकांनी अनेकदा वेळेचे भान राखण्याचे आवाहन करूनही ठरलेल्या वेळेपेक्षा लांबत गेले. अगदी अपवादही न सोडता, प्रश्न व्यवस्थित शब्दरचना केलेले आणि टोकदार होते.
मी इतक्या तरुण गटाकडून राग, अगदी उंचावलेल्या (चढलेल्या) आवाजाची अपेक्षा केली होती. उलट त्यांच्यात नेमकेपणातून आलेला आत्मविश्वास आणि स्वच्छ, नीट विचारलेले प्रश्न होते. आणखी एका गोष्टीचे मला नवल वाटले म्हणजे त्यांच्यातील समान भावना. पाकिस्तानशी वागताना प्रभावशाली प्रतिसाद देण्याची पद्धत ठरवण्यात भारताची जी हतबलता आहे त्याबद्दल ते एकजात गोंधळलेले होते.
एका तरुण महिलेने विचारले, ‘आपल्याकडे पाकिस्तानविषयी धोरण आहे का?’ इतरांनी विचारले, ‘आपण त्यांना आपले सैनिक मारण्यापासून थांबवू का शकत नाही?’, ‘आपण खरेच पाकिस्तानला घाबरतो काय?’, ‘त्यांना २६/११ विषयी सर्व कागदपत्रे देऊन आपल्याला काही मिळाले का?’ आणखी एकाने विचारले. ‘संवाद हाच एकमेव मार्ग आहे का, दुसरा पर्याय नाही?’, ‘पाकिस्तानी व्यवस्थेत भारताने नेमकी कोणाशी बोलणी करायची- आयएसआयशी बोलायचे का दहशतवाद्यांशी?’, ‘जर पाकिस्तानने व्यापलेल्या भागासह काश्मीर आपले आहे, तर आपण त्यांच्याशी काश्मीरवर का बोलतोय?’
सहा दशकांहून अधिक काळ पाकिस्तानशी संबंध ठेवताना, १९७१चा अपवादवगळता एकदाही त्या देशाला आपण समजू शकलो नाही, त्यांच्या स्वभावाचा थांगपत्ता लावू शकलो नाही, याबाबत त्यांच्यात संभ्रम होता. अन्यथा, बहुतेक वेळा, ते भारताला पुढे खेचत असल्यासारखे भासत होते. आणि आपण जणू त्यांचे पुढारपण स्वीकारण्यात समाधानी होतो.
जेव्हा मी म्हणालो की संवादाची प्रक्रिया सुरू ठेवणे तर्कसंगत आहे तेव्हा ते एकदम उसळून उत्तरले, ‘पाकिस्तानसमोर कुठला तर्क चालतो का? नाही. त्यांच्यापुढे काहीही तर्क चालत नाही, कारण पाकिस्तान असमंजस राष्ट्र आहे. जगात सगळे तसेच म्हणतात.’
मी दुसरा पवित्रा आजमावून पाहत म्हटले, ‘पेला अर्धा रिकामा आहे त्याकडे बघायला नको- अंधारातही आशेचा किरण आहे. एक दिवस दहशतवाद थांबेल.’ मी हुशारीने म्हणालो.
माझ्याकडे दयाबुद्धीने पाहत ते म्हणाले : दूरदूरवर अंधारच अंधार दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचा आक्रमकपणा ही अचानक उसळलेली ऊर्मी नाही, अफगाणिस्तानला कमकुवत आणि भारताला अस्थिर ठेवण्यासाठी विचारपूर्वक आखलेले आणि अंगीकारलेले ते धोरण आहे.
‘पण पाकिस्तानमध्ये नागरी समाज आहे,’ मी हटून म्हणालो.
‘हा!’ मी अगदीच अडाणी असल्यासारखा भाव आणून विकट हास्य करीत ते म्हणाले, ‘पाकिस्तानचा प्रश्न हा आहे की तेथे नको तितके प्रशासन आहे आणि पुरेसा समाजच नाहीये.’
‘तसे म्हणणे म्हणजे सामान्यीकरण केल्यासारखे होईल,’ संधी साधत मी प्रतिवाद केला. ‘प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे. समाजाच्या काळजी, प्रश्नांवर विचार करून ते मांडण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठी तेथे मध्यमवर्गाचे अस्तित्वच नाहीये, कारण तेथील प्रजा सुरुवातीपासूनच नेतृत्व स्वीकारण्यात समाधान मानत आली आहे.’
‘चूक!’
 त्यांनी जोराने उत्तर दिले.
‘मध्यमवर्ग असो किंवा नसो, पाकिस्तानी राष्ट्र म्हणजे तेथील राज्यकर्ते आणि लष्कराची खासगी मालमत्ता राहिली आहे. लष्कराची आपली वेगळी गृहनिर्माण सोसायटी आहे. त्याच्या माध्यमातून लष्करी अधिकारी कवडीमोलाने जमिनी घेतात आणि नंतर त्या चढय़ा भावाने विकतात. राजकारणी सरकारी कंत्राटांमधून मलई खातात. तुम्हाला माहीत नसेल तर, पाकिस्तानी लोकांवर जमीनदार, सरंजामदार यांची हुकमत आहे.’
‘तसेच काही नाही..’ अर्धे केस पांढरे झालेली व्यक्ती जास्तीत जास्त जितके गांभीर्य आणू शकते तेवढे आणून मी म्हणालो. ‘अलीकडच्या काही वर्षांत पाकिस्तानही बराच बदलला आहे. न्यायव्यवस्था खंबीर आणि प्रसारमाध्यमे स्वतंत्र झाली आहेत. आता पाकिस्तानमध्ये खरी लोकशाही आहे.’
‘खरंच?’ -त्यांनी पुन्हा माझी चेष्टा करीत म्हटले. ‘पाकिस्तानच्या मुलकी आणि लष्करी राजवटींमध्ये फारसा फरक नाही. तेथील डोंगराएवढय़ा धार्मिक आणि आर्थिक अडचणींनी लोकशाहीला कायमच धोका उत्पन्न केला आहे. जेव्हा दहशतवादी शांत असतात, तेव्हा लष्कर सत्तेतील राजकीय पक्षाला भीती घालते. पाकिस्तानमध्ये लोकशाही म्हणजे एक मोठे नाटक आहे. सलमान तासीर यांच्या बाबतीत काय घडले ते आठवतेय ना, ज्यांना त्यांच्याच अंगरक्षकांनी ठार मारले? आणि कोणाला माहीत की लोकशाहीने माजी पंतप्रधान गिलानी यांच्या मुलाला कोठे नेऊन ठेवले?’
त्यांनी माझ्यावर कडी केली होती यात काही संशय नाही. त्यांना चांगली माहिती होती, बोलण्यात वाकबगार होते आणि त्यांना त्यांच्याकडील माहितीबाबत खात्री होती. आणि त्यांना जे सांगायला पाहिजे असे वाटत होते ते सांगण्यात ते संकोच करीत नव्हते.
भारताच्या अधिकृत धोरणाची री ओढताना मी सावध आणि बचावात्मक होतो. तरीही मी एकदा शेवटचा प्रयत्न करू इच्छित होतो.
आदल्या पिढीतल्या लोकांमध्ये असलेल्या फाळणीच्या पूर्वग्रहांनी मला त्यांची तरुण मने कलुषित करायची नाहीत, असे मी त्यांना सांगितले. त्यामुळे मी त्यांना पाकिस्तानविषयी तार्किक आणि स्वच्छ दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करीत होतो. मला आशा होती की ते आणि पाकिस्तानमधील त्यांच्यासारखी तरुण पिढी यशस्वी होईल, जेथे त्यांची जुनी पिढी असफल ठरली होती.
हे सांगतानाही मला वाटत होते की मी थोडा चुकीचा आहे. स्पष्ट विचार असलेल्या या तरुण मनांना मी पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत होतो. तरीही एखाद्या बुडत्या माणसाप्रमाणे अधीरपणे मी आणखी एक प्रयत्न करीत महात्म्याचा उल्लेख केला. हा प्रयत्न फोल ठरणार नाही, असे मला वाटले. ‘आपल्या देशाची पायाभरणी करणारे (संस्थापक) लोक संतांसारखे होते,’ शक्य तितक्या अधिकारवाणीने म्हटले. ‘आधुनिक भारताची निर्मिती ही महात्मा गांधींच्या भूमीत नैतिक कल्पनाशक्ती आणि आदर्शवादी श्रद्धा यातून झाली आहे. त्यामुळेच आपण शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवू शकलो. जर ते जगातील सर्वात प्रबळ साम्राज्यवाद्यांचे मन वळवू शकले, तर आपण पाकिस्तानचे मन का वळवू शकत नाही?’
ते लगेच काही बोलले नाहीत पण सभागृहात चिंताग्रस्त होऊन केलेली पायांची हालचाल दिसली नाही. तसेच आपल्याऐवजी कोणीतरी दुसरे बोलेल या अपेक्षेने त्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही. नाही, विनम्र होऊन घेतलेला तो विराम नव्हता. त्यांच्यात अजूनही कमालीचा आत्मविश्वास होता. उलट एखाद्या व्याधिग्रस्ताकडे टाकावा तसा कटाक्ष त्यांनी माझ्याकडे टाकला. त्यांना मी काहीही आशा ठेवण्यापलीकडील वाटत होतो.
करारी वाटणारा एक तरुण माणूस सभागृहाच्या अगदी मागून उभा राहिला आणि म्हणाला, ‘सर, वेगळे मत व्यक्त केल्याबद्दल मला माफ करा, पण पाकिस्तान जोसेफ गोबेल्सप्रमाणे वागतो. आठवतंय सर, गोबेल्स म्हणायचा, ‘ओह, तिरस्कार करणं किती छान आहे.’ पाकिस्तानी तसेच आहेत. ते दिवसभरात, चालता-बोलता, प्रत्येक क्षणी आपला तिरस्कार करतात आणि स्वप्नात आपल्या विनाशाचे बेत आखतात.’
एका तरुण महिलेने लगेच म्हटले, ‘जेव्हा १९३३ मध्ये गांधीजी शांततेचे प्रयत्न करीत होते, तेव्हा तिकडे अल्बर्ट आइन्स्टाइनने सिग्मंड फ्रॉइडला पत्रात लिहिले होते की युद्ध टाळण्याचे सर्व प्रयत्न फसले आहेत.. माणसाच्या आतमध्येच तिरस्कार आणि विनाशाची लालसा आहे.’
मला अवसानघाताने सुस्कारा सोडायचा अवधीही न देता एक गंभीर दिसणारा तरुण मूठ हवेत मिरवत उभा राहिला आणि म्हणाला, ‘माझ्या मते पाकिस्तानचे एकमेव यश दहशतवादाची यंत्रणा पक्की करण्यात आहे. एखाद्या अंडी उबवण केंद्राप्रमाणे पाकिस्तान दहशतवादी जन्माला घालते, त्यांना प्रशिक्षण देते, पैसा पुरवते आणि वेगवेगळ्या तुकडय़ांमध्ये बाहेर पाठवते, एक अमेरिकेला, दुसरी अफगाणिस्तानला, पण सर्वात खतरनाक दहशतवादी ते भारतासाठी राखून ठेवते.’
खरे सांगायचे तर कार्यक्रम संपल्यावर मला छातीवरचे ओझे उचलल्यासारखे वाटत होते. मी मनाशी म्हटले, देवा, माझी सत्त्वपरीक्षा संपवल्याबद्दल आभार. मात्र त्यानंतर बरेच दिवस त्या प्रसंगाच्या आठवणी सतावत राहिल्या.  
(या अंश-भाषांतरासाठी, केवळ परवानगीच प्रकाशकांनी दिली आहे)

व्हेअर बॉर्डर्स ब्लीड (अ‍ॅन इन्सायडर्स अकाउंट ऑफ
इंडो-पाक रिलेशन्स)
लेखक : राजीव डोगरा,
प्रकाशक : रूपा पब्लिकेशन्स, दिल्ली
पृष्ठे : २८८, किंमत  : ५०० रु.