ज्येष्ठ साहित्यिक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाई फेकण्याचा झालेला प्रयत्न किंवा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना लगावण्यात आलेली थप्पड या घटना गंभीर तर आहेतच, परंतु त्या घटनांनंतर समाजाच्या कोणत्याही स्तरातून निषेधाचे सूर उमटू नयेत, ही त्याहून अधिक गंभीर बाब आहे. याबाबत जणू संपूर्ण समाजाचीच दातखिळी बसली आहे. त्याच वेळी या अशा घटनांची मौज लुटण्याचे उद्योग मात्र समाजमाध्यमांतून जोरात सुरू आहेत. केजरीवाल यांच्यावर गेल्या काही दिवसांत वारंवार हल्ले झाले. त्यांचे सहकारी योगेंद्र यादव यांच्यावर शाईफेक झाली. त्याही आधी शरद पवार यांना चपराक लगावण्यात आली. पी. चिदंबरम यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. या अशा प्रत्येक घटनेनंतर फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आणि व्यंगचित्रे फिरत होती, ती कोणाला विनोदी वगैरे वाटत असतील, तर तो ज्याच्या-त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. पण ती विनोदी खचितच नव्हती. कारण विनोदामध्ये द्वेष आणि तिरस्काराला स्थान नसते. मात्र गेल्या काही वर्षांपासून द्वेष आणि तिरस्कार हीच आपली ‘राष्ट्रीय भावना’ बनल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या काळात तर जणू या भावनांना उकळीच फुटली आहे. कोणी कोणाचे तुकडे-तुकडे करण्याची भाषा करीत आहे, तर कोणी बदला घेण्याचे आवाहन करीत आहे. कोणी मरता मरता मंत्र्यांना मारून मरा, असे सल्ले देत आहे. ही भाषा लोकशाहीची नव्हे. सुसंस्कृत समाजाची तर नव्हेच नव्हे. खरे तर मुद्दय़ाचा प्रतिवाद मुद्दय़ाने करावा, हे वाक्य वापरून वापरून गुळगुळीत झाले आहे. परंतु त्याला पर्याय नाही. मुद्दय़ाला उत्तर गुद्दा असू शकत नाही, विरोधकांना गप्प करणे याचा अर्थ त्यांचा गळा दाबणे असा होत नाही आणि ही केवळ राजकीयच गरज असते असे मानण्याचे कारण नाही. लोकशाहीसाठी ते आवश्यक आहेच. परंतु ती सामाजिक गरजही असते. समाजाच्या निरोगी विकासासाठी खुल्या वातावरणाची आवश्यकता असते. खुलेपणे विचारांचे आदान-प्रदान होण्याची गरज असते. किंबहुना विरोधी विचारांच्या द्वंद्वातूनच नवा विचार जन्मास येत असतो. तेव्हा द्वंद्व विचारांचे हवे. ज्यांनी पुरंदरे यांच्यासारख्या वयोवृद्ध ज्ञानतपस्व्यावर शाई फेकली वा ज्याने केजरीवाल यांच्यासारख्या राजकीय नेत्याला थप्पड मारली, त्यांच्यात ही वैचारिक कुवत नसणारच. काही वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवरून, फेसबुकच्या पानांमधून देशातील ज्येष्ठ, अनुभवी राजकीय नेत्यांना शब्दश: शिव्या दिल्या जातात. मुंबईतील उपनगरी गाडय़ांवर दगड वा घाण पाण्याचे फुगे फेकणारे आणि समाजमाध्यमांतून शिवीगाळ करणारे ‘ट्रोल्स’ यांच्यात तसा फरक नाही. तेव्हा त्या वैचारिक कुवतीचा मुद्दा त्यांना गैरलागूच ठरणार. ते स्पष्टच आहे. पण प्रश्न त्या ब्रिगेडी कार्यकर्त्यांचा वा रिक्षावाल्याचा वा इंटरनेटवरील ‘ट्रोल’भैरवांचा नाहीच. तो आहे त्यांना हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विषाक्त वातावरणाचा. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईहल्ला करण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ब्रिगेडला बाबासाहेबांचा तथाकथित ‘ब्राह्मणी शिवाजी’ मान्य न करण्याचा पुरेपूर अधिकार आहेच. त्यांना ‘खरा’ शिवइतिहास लिहिण्याचाही अधिकार आहे. तो त्यांनी लिहावा. शाईचा वापर तेथे करावा आणि हवे तर बाबासाहेबांचा विचार खोडून खोडून काढावा. परंतु असे काही करण्याऐवजी अशा सर्वच विचारांच्या संघटनांचा कल बिनडोक ‘शाई’स्तेखान तयार करण्याकडे असल्याचे दिसते. हा सरळ सरळ सत्तेचा, राजकीय स्वार्थाचा खेळ आहे. या राजकारणात नुकसान होते ते सामाजिक सहिष्णुतेचे. परंतु भूतकाळात नजर लावून पायाखालचे तेवढेच पाहणारांना समाजाची काय चिंता असणार?