‘रडवणूक की अडवणूक’ गिरधर पाटील यांचा कांद्यावरील अभ्यासपूर्ण लेख (१४ ऑगस्ट) वाचला. माझ्यासारख्या नोकरदार स्त्रीला नेहमी असे प्रश्न पडतात की काही जीवनावश्यक वस्तूंचे भाव दहा रुपये किलोवरून एकदम ६० ते ८०रुपये किलो इतके असंतुलित कसे काय असू शकतात? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे भ्रष्ट्राचारात दडलेली आहेत हे महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांना माहीत नाही असे राजकारण्यांना वाटते काय? बरे, ६० रुपयांतले ४०-५० रुपये शेतकऱ्याला मिळाले तरी आनंद होईल, पण दलालांमुळे तेही शक्य नाही. जास्तीत जास्त राजकारणी मूळचे शेतकरी असून व देशाचे कृषिमंत्री महाराष्ट्रातले असूनसुद्धा ही परिस्थिती आहे.  ते अशावेळी कुठे असतात?
कांदेच काय, आज कुठलीही भाजी ६० रुपये किलोच्या खाली नाही. आलं-मिरच्यांनासुद्धा १००- २०० रुपयांचा भाव आहे. अशा परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी कसे जगायचे हे सरकार सांगेल का? भाज्या, फळे व दूध गरिबांच्या खाण्यातून असे टप्प्याटप्प्याने हद्दपार होत असेल तर प्रजा कुपोषितच होणार? त्यांची प्रतिकारशक्ती कशी वाढणार ? (काँग्रेसचे खासदार म्हणतात त्याप्रमाणे १२ रुपयांत) वडा-पाव खाऊन?
मला तरी वाटते की हे सगळे शेतीक्षेत्राचेही कंपनीकरण करून, तिथेही ‘थेट परकीय गुंतवणुकी’ला (एफडीआय) वाव देणारी पाश्र्वभूमी तयार करण्यासाठी चाललेले आहे. आपण पुन्हा एकदा सरंजामशाही आणि गुलामगिरीकडे चाललो आहोत.
स्मिता मदन, पुणे

दोघीही जिंकतील?
विश्व अजिंक्यपद बँडिमटन स्पध्रेत कांस्य पटकावणाऱ्या सिंधूचे अभिनंदन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या सायना नेहवालनेही करायला हवे होते. तसे झाले नसल्याने दोघींत सुप्त स्पर्धा आहे की काय, अशी शंका आली.
‘आयबीएल’ अर्थात इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायना विरुद्ध सिंधू असा महिला एकेरी सामना रंगेल, तेव्हा कदाचित ‘सर्वोत्तम कोण’ याचा निकाल लागेल, पण तात्पुरताच! चिनी कवच भेदणारी एकमेव भारतीय खेळाडू, अशी ख्याती असलेली सायना नेहवाल अति ‘ग्लॅमरस’ झाल्यामुळे, सायनाचा खेळ संकुचित होत चालला आहे. पण तिचा खेळ पुन्हा सुधारो आणि सिंधूला या ग्लॅमरचा चटका लागू नये अशा अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. त्या पूर्ण झाल्या, तर दोघीही जिंकल्या!
शुभम पुणे, वैजापूर

कुणाला हव्यात मराठी वाहिन्या?
पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी वाहिन्या दाखवाव्यात अशा आदेशवजा सूचना जितेंद्र आव्हाड यांनी दिल्याचे वाचले. मला वाटते अशा प्रकारच्या मागण्या या मराठी भाषेसाठी आणि माणसांसाठी उपयुक्त नाहीत.
एक तर पंचतारांकित हॉटेलचे व्यवस्थापन हे सर्वात पहिला विचार ग्राहकांचा करते; त्यामुळे मराठी वाहिन्या दाखवायला हव्यात अशी एखाद्या ग्राहकाकडून जरी मागणी असती तरी त्यांनी ते केव्हाच केले असते. पंचतारांकित जीवनशैली असणाऱ्या मंडळींनी मराठी संस्कृतीला सोडचिठ्ठी दिल्याचे आपल्याला सहज लक्षात येते, किंबहुना मराठीला रामराम केल्यामुळेच असे श्रीमंती आयुष्य उपभोगता येते, अशीही त्यांची धारणा झालेली असावी. तेव्हा आव्हाड यांनी हे किरकोळ पब्लिसिटी स्टंट बंद करून मराठी शाळा, मराठी माणसाला नोकरीधंद्यात संधी अशा विधायक कामांत लक्ष घालावे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बातमीत राहण्याचा अट्टहास केल्याने हाती काही लागत नाही हे त्यांना अनुभवाने कळेलच.
अनघा गोखले, मुंबई

साखरेचे झाले, तेच वाइनचेही?
‘वाइन-भागीदारी संपवण्याचे कारण पवारांनी स्पष्ट करावे’ हे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांचे पत्र (लोकमानस, १३ ऑगस्ट) वाचले. पवार यांनी वाइन कंपनीतील मालकीतून अंग काढून घेण्याचे कारण महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही कारण महाराष्ट्रातील जनता हे चांगलेच जाणते की पवार हरणाऱ्या घोडय़ावर कधीच पसे लावत नाहीत. असे जर नसते तर त्यांनी कबड्डीसारख्या महाराष्ट्रीय खेळावरील लक्ष क्रिकेटकडे वळविले नसते. सध्या मल्ल्या यांच्या विमान उद्योगाची होत असलेली वाताहत व त्यामुळे त्यांची झालेली आíथक कोंडी हे एक कारण पवार यांच्या नसíगक चौकटीत बसणारे नाही म्हणूनच ही फारकत अपरिहार्य असावी. त्यामुळेच महाराष्ट्रातून आता वाइन उद्योग हा साखर उद्योगाच्या मार्गावर जाणार, हे नक्कीच.
महाराष्ट्रातील ज्यांचा अजेंडा जमिनी बळकावणे, लवासासारखी आलिशान हिलस्टेशन्स बांधणे, कागदावर धरणे बांधणे हाच आहे, त्यांच्या नेत्याला २०१५ मध्ये येणाऱ्या निवडणुकीपूर्वी स्वत:ला अशा प्रकारे स्वच्छ करून घेण्याची गरज नक्कीच नाही. या सर्व किरकोळ गोष्टींची यांच्या पक्षाला आणि आपल्या सध्याच्या निवडणूक प्रक्रियेलाही गरज आहे काय?
प्रवीण आंबेसकर, ठाणे</strong>

वेडय़ा साहसाचेच सारे नमुने
‘साहसाचे वेड आणि वेडे साहस’ हा अन्वयार्थ (१३ ऑगस्ट) वाचला. देशातल्या अनेक घटना पाहता आजचे नवतरुण अशा प्रकारच्या वेडय़ा साहसानेच झपाटल्याचे दिसून येतात. मग ते साहस रात्री-अपरात्री भन्नाट वेगात मोटार सायकल चालवीत ‘स्टंटबाजी’ करण्याचे असो नाही तर मुंबईतल्या धावत्या लोकलच्या टपावरून कसरती करत ‘इम्प्रेशन’ मारत टपोरींचे धावणे अथवा चालणे असो किंवा लोकलच्या दरवाजाबाहेर लटकत कसरती करणे असो. अशाच अनेक प्रकारच्या वेडय़ा साहसात आपल्या जिवाला हकनाक मुकणारी तरुणाई आज कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही, हे वारंवार घडणाऱ्या अशा घटना पाहता आपणास मान्य करावेच लागेल. साहसाचे वेड आणि वेडे साहस यातील सीमारेषा अगोदरच पुसली गेली आहे, हे सद्यस्थितीत मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.
– धनराज मा. खरटमल,   कांजूरमार्ग, मुंबई

चांगल्या कामाबद्दल कृतज्ञता,  ही ‘व्यक्तिपूजा’ ठरू नये..
‘राजकारणाचा जमाखर्च’ या सुहास पळशीकर यांच्या सदरातील अधिकाऱ्यांच्या निलंबनावरचा ताजा लेख (१४ ऑगस्ट) वाचला. त्यांचे सर्वच मुद्दे योग्य आहेत परंतु अधिकाऱ्यांना रोल मॉडेल करण्याबद्दलच्या मुद्दय़ावर जरा वेगळे मत मांडावेसे वाटते. व्यक्तिपूजा आणि त्याचे स्तोम माजवणे वाईट आहेच परंतु कर्तव्य बजावल्याबद्दल गौरव कशाला?’ हा मुद्दा मात्र पटत नाही.
आजच्या समाजात जी काही बजबजपुरी माजलेली आहे त्यात सर्वसामान्य माणसाला दिलासा वाटावा अशा घटना मुळातच दुर्मीळ होत आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली तर लगेच त्याला फैलावर घ्यायला आजकाल सर्वच टपलेले असतात, मग एखाद्या अधिकाऱ्याने प्रतिकूल परिस्थितीत चांगले काम केल्याबद्दल त्याची पाठ थोपटून त्याचा हुरूप वाढवला तर चुकले कोठे?
प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडावे हे जरी अपेक्षितच असले तरीही ते ‘नुसतेच पार पाडण्या’त आणि ‘चांगल्या प्रकारे’ बजावण्यात शेवटी फरक राहतोच.
 आई -वडील, सीमेवरचे सनिक, सामाजिक कार्यकत्रे.. असे सर्वच समाजघटक पळशीकर सरांच्या म्हणण्यानुसार आपापले कर्तव्यच पार पाडत असतात असे म्हणता येईल.. पण एखाद्याच्या चांगल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही तर आपली संस्कृतीच आहे. व्यक्तिपूजेचे स्तोम न माजवता ती व्यक्त करणे यात गर ते काय?
उलट अशी दखल घेतली तर सरांना (आणि लोकांनाही) अपेक्षित असणारे, ‘नियमितपणे कर्तव्यपालन करणारे’ अधिकारी पुरेशा संख्येने निर्माण होण्यात मदतच होईल.
अनिरुद्ध ढगे, उस्मानाबाद</strong>

‘लोकमानस’साठी तुमचे विचार ईमेलने अथवा टपालाद्वारे पाठवताना
नाव आणि आडनाव तसेच (ईमेलवरही) गावाचे/ उपनगराचे नाव असल्यास बरे. एकशब्दी नाव असलेली पत्रे न छापण्याचा दंडक यापुढेही सुरू राहील.
टपाल/ कुरियरसाठी पत्ता : ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई – ४००७०१. फॅक्स : ०२२- २७६३३००८