‘कुठला परदेशी पसा’ हे श्री. वि. आगाशे यांचे पत्र वाचले. ‘पारदर्शकपणा’बद्दल वस्तुस्थिती अशी आहे की, आठ वष्रे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपला जमाखर्चच धर्मादाय आयुक्तांना दिला नाही. याविषयी असंख्य तक्रारी झाल्यावर एकगठ्ठा जमाखर्च सादर झाला. त्यावर आक्षेप घेणारी निवेदने तसेच याचिका प्रलंबित असल्याने अद्याप या जमाखर्चास स्वीकृत केलेले नाही. एकूण किती देणग्या घेतल्या व त्या कशा खर्च झाल्या हा विषय याप्रकारे न्यायप्रविष्ट आहे.
वृत्तपत्रे अगर नियतकालिके चालविणाऱ्या संस्थांनी परदेशी देणगी घेणे हा गुन्हा आहे. इतर कोणी संस्था अशी देणगी घेत असेल तर त्यासाठी केंद्रीय गृह खात्याकडे नोंदणी करावी लागते. या तरतुदींचा भंग झाल्याच्या तक्रारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीविरोधात दाखल करण्यात आल्या आहेत.
 अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काही पसे परदेशातून येतात का याची विचारणा विधिमंडळात झाली. सरकारने संबंधित जिल्हा प्रशासनाला चौकशी करायला सांगितले. ‘आम्ही समितीकडे चौकशी केली असता परदेशातून देणग्या येत नाहीत असे समजते,’ असा अहवाल प्रशासनाने पाठविला. पुढे देणग्या प्रत्यक्ष आल्याचे उघडकीस आल्यावर संबंधित आमदारांनी याप्रकरणी हक्कभंग झाल्याची तक्रार केली आहे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. हाही विषय विधिमंडळापुढे प्रलंबित आहे.
जिल्हा प्रशासन कुणाच्या दबावाखाली वागले याची योग्य वेळी चौकशी होईलच. या पाश्र्वभूमीवर देणग्या केवळ महाराष्ट्र फौन्डेशनकडून येतात हा डॉ. दाभोलकर याचा खुलासा सत्य मानावा ही आगाशे यांची अपेक्षा गरवाजवी आहे. त्याचा संबंध अंधश्रद्धाविरोधी विधेयकाशी जोडणे हा तर सरळ सरळ कांगावा आहे.
संजीव पुनाळेकर

‘उर्दू कवितांनंतरच्या प्रश्नां’ना उत्तरे..
‘सावरकरांच्या उर्दू कवितांनंतर पडलेले प्रश्न’ या पत्रातील (लोकमानस, ३० जुलै) प्रश्नांना उत्तरे –
१) ‘त्यांनी (सावरकरांनी) या काव्यरचनेनंतर उर्दूतून साहित्य का निर्माण केले नाही?’ : साहित्य, कला या साच्यातून निघत नसतात. ते स्फुरण्यासाठी आसपासची परिस्थितीदेखील साहाय्यभूत होते. दुसरी गोष्ट म्हणजे सावरकर १९२४  ते १९६६ (मृत्यू) पर्यंत ४२ वर्षे बव्हंशी काळ महाराष्ट्रातच राहिले. त्यामुळे त्यांचे पुढील काळातील साहित्य हे मराठीतूनच आहे. सुरुवातीला १९०६- ०८ साली लिहिलेले ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे मूळ इंग्रजीतून आहे (याचेच प्रकाशन हा बाबारावांवरचा एक महत्त्वाचा आरोप होता.)
२) इतकी वष्रे हे कागद कोठे होते आणि आत्ताच ते बाहेर का आले? : आधी ‘आत्ताच ते बाहेर का आले’ याबद्दल. ऐतिहासिक दस्तऐवजांचा किंवा साहित्याचा ठेवा बाहेर यायची काही ठरावीक काळ-वेळ निश्चित केली असते असे नाही. आडबाजूला पडून असताना, शोधाशोधीमध्ये अशा स्वरूपाचा खजिना सापडू शकतो.
आता, ‘इतकी वष्रे हे कागद कोठे होते’ आणि चौथ्या प्रश्नात विचारल्याप्रमाणे ‘१९२१ साली अंदमानचा तुरुंग इंग्रजांकडेच होता आणि तेथील कैद्यांच्या कोणत्याही वस्तूची किंवा लिखाणाची तपासणी केल्याशिवाय ती वस्तू किंवा लिखाण नातेवाईकाकडे सुपूर्द केले जात नसे.. हे सुरक्षाकडे भेदून ‘ती’ वही गोखले यांच्या हातात कशी आली?’  हे प्रश्न. लोकसत्ताच्या या बातमीतच स्पष्टपणे म्हटले आहे की, या सर्व गजलांचे लेखन १९२१ मध्ये झालेले असून सावरकरांनी ‘ती’ वही त्या वेळी कारागृहाचे लिपिक प्यारेलाल यांना दिली होती. प्यारेलाल यांनी ती ‘नंतर’ सावरकरांचे सहकारी श्री. पु. गोखले यांना दिली. गोखले यांच्या पश्चात ती वही गोखले यांच्या कन्या मंजिरी मराठे यांना मिळाली.’ (मिळाली हे महत्त्वाचे) यात वही सावरकरांच्या नातेवाईकांकडे जाण्याचा प्रश्न कोठे येतो?
३) पत्रलेखकाने सुरुवातीला म्हटले आहे की, ‘अंदमानात कैद्यांना पेन व कागद दिले गेले नाहीत म्हणून सावरकरांनी िभतीवर कोरून काव्य केले’ हि ‘आख्यायिका’ प्रचलित असताना त्यांनी अंदमानातच उर्दूतून कागदावर-वहीवर काव्य केले (‘हे कसे?’ हा प्रश्न या वाकडय़ा सुरुवातीमध्ये अभिप्रेत). सर्वप्रथम ‘आख्यायिका’ शब्द वापरण्यातून लेखकाचे सावरकरांबद्दलचे अपुरे ज्ञान, अपुरा अभ्यास आणि अपुरे वाचन दिसते. कारण ही आख्यायिका नसून ‘कमला’ या महाकाव्याच्या निर्मितीच्या वेळचे सत्य आहे. दुसरे म्हणजे ही घटना सुरुवातीच्या काळातील आहे, जेव्हा सावरकरांना कागद, पेन/पेन्सिल यांची सवलत नव्हती. (संदर्भ : माझी जन्मठेप, पूर्वार्ध, प्रकरण ८, कोठडीतील पहिला आठवडा, अनुष्टुप छंद, पृष्ठक्रमांक ७६/७७, सर्व पृष्ठक्रमांक पंधराव्या आवृत्तीनुसार) लोकसत्ताने दिलेल्या बातमीमध्ये या गजला १९२१ साली रचल्याचे म्हटले आहे. सावरकर अंदमान वास्तव्य ४ जुल १९११ ते २ मे १९२१. ‘माझी जन्मठेप’च्या उत्तरार्ध, प्रकरण ८, राजबंदिवानांतील शेकडो बंदींची मुक्तता, पृष्ठ क्रमांक ४०४ वर सावरकरांनी लिहिले आहे. ‘या अन्यायाचे रडगाणे गाता गाता पुन्हा एकदा लेख्यालयाचे दाराशी आम्ही पोहोचलो आणि शेवटी लेख्यालयात पाऊल टाकता आले, पण पाऊलच’, आणि ‘(१४ जुल १९२० नंतर) येथून पुढे गच्चीमध्ये लेखनिकाचे काम करण्याची अनुज्ञा देण्यात आली’ (परिशिष्ट पहिले, इतिहासदíशका, पृष्ठ क्रमांक ४८४, पंधरावी आवृत्ती).  
४) ‘सावरकरांनी आपल्याला उर्दू भाषा येते, असे कोठेही नमूद केले नाही..’  हे विधान लेखकाचा अपुरा अभ्यास आणि अपुरे वाचन सिद्ध करणारे आहे. कारण ( संदर्भ : ‘माझी जन्मठेप’, उत्तरार्ध, प्रकरण नऊ, अंदमानात िहदीचा प्रसार, शेवटून तिसऱ्या परिच्छेदाची सुरुवात, पृष्ठ ४१६)  सावरकर लिहितात, ‘माझी ही चळवळ उर्दूच्या द्वेषाची नव्हती. कारण मी स्वत: उर्दू शिकत आणि वाचीत असे.’  
५) ‘त्या कागदावरचे हस्ताक्षर सावरकरांचेच आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झालेय का?’, याच्याशी मात्र मी सहमत आहे. अर्थात संबंधितांनी याची तपासणी अगोदर करण्याची काळजी घेतली असेलच. तथापि अशी तपासणी करणे अवघड नाही.
 शेवटी वैचारिक मतभेद असले तरी सावरकरांसारख्या महापुरुषाला कार्य आणि गुणवत्ता यांसाठी स्वीकारायचे की फक्त शंकाच उपस्थित करायच्या आणि टीका करायची हे ज्याचे त्याने ठरवावे.    
संकेत शशिकांत देशपांडे

तर्काची वेसण येथे गैरलागू
‘मोदी यांचे तर्कशास्त्र’ हा गौरी भागवतांचा लेख (३० जुलै) वाचला. त्यातला युक्तिवाद बिनतोड आहे. ‘मी काळा आहे आणि पसेवाला आहे म्हणून मी काळा पसेवाला’ हे उदाहरण तर मुँहतोड आहे. पण मोदींच्या वक्तव्याचा प्रतिवाद युक्तिवाद करून करणे अप्रस्तुत वाटते. मोदींनी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते युक्तिवाद करायला बसले नव्हते. आपला प्रचार करण्याची आयती संधी त्यांनी साधली इतकेच. रॉयटर्सच्या प्रतिनिधीने जरी प्रश्न विचारला असला तरी उत्तर भारतीय मतदारांसाठीच दिलेले होते. निवडणूक प्रचारार्थ किंवा राजकीय हेतूने केलेल्या भाषणाला तर्कशास्त्राची कसोटी लावता येते? मुळात राजकीय वक्तव्य की जे भावनांना आवाहन करण्याच्या उद्देशानेच केलेले असते, (ऱ्हेटोरिक असते) त्याला युक्तिवादाच्या कसोटय़ा लावणे हेच अतक्र्य तर्कशास्त्र आहे.
मोदी यांच्या भरधाव राज्यशकटाखाली आजही अल्पसंख्याक भरडले जाताहेत का? की अजून आपण त्यांचे शकट भरधाव धावायच्या सुरुवातीच्याच गोष्टी उगाळत आहोत? आपण त्याच त्या गोष्टी उगाळत आहोत आणि  मोदी पुन्हा पुन्हा  निवडून येताहेत. आणि अशाने अधिकाधिक आक्रमक होत आहेत. भावनांना आवाहन करूनच निवडून येता येते हे वास्तव असताना तर्काची वेसण काय कामाची?
डॉ. अजय ब्रह्मनाळकर

भाषावार प्रांतरचनाच सदोष
विचार न करता केलेली भाषावार प्रांतरचना आता राष्ट्राच्या मानगुटीवर बसली आहे. मुळात भाषावार प्रांतरचनेची गरजच काय होती? व्यवस्थापनाच्या दृष्टीने देशाचे सुटसुटीत भाग इतर अनेक पद्धतीने करता आले असते. अशा तऱ्हेने भाषेच्या दुराग्रहाने निर्माण होणारी कटुता टळली असती. भाषावार  प्रांतरचना करून भाषेची अस्मिता तर जपली गेलीच नाही पण नसलेला विद्वेष मात्र निर्माण झाला.
 एवढे करूनही, उदाहरणार्थ वऱ्हाडी मंडळी भाषा एकच असूनही महाराष्ट्राशी समरस झालेली नाहीत. आंध्रच्या पाठोपाठ विदर्भाचा प्रश्न पुन्हा तापू लागेल यात शंकाच नाही. एकच भाषा असूनही उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांचे तुकडे करायची वेळ आली तरीही नेहरूंच्या काळात निर्माण केली गेलेली भाषावार प्रांतरचना ही मोठी घोडचूक होती हे काँग्रेस अजूनही कबूल करत नाही. मुंबई, मद्रास, कोलकत्ता असा नामनिर्देश असलेली ब्रिटिशकालीन राज्यव्यवस्थाच बरी होती असे आता वाटते.  
राजीव  मुळ्ये,  दादर, मुंबई

रस्त्यांसाठी हमी हवी
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराकडून प्रतिज्ञापत्रावर त्या रस्त्याच्या हमीबद्दलचे प्रमाणपत्र घेण्यात यावे व अशी हमी १० वर्षे, २० वर्षे अशा स्वरूपात घेण्यात यावी जेणेकरून रस्ता खराब झाल्यास संबंधित, कंत्राटदारावर योग्य तो गुन्हा दाखल करता येऊ शकेल. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये गुणवत्तेबद्दलची हमी घेण्यात येत होती असे ऐकले आहे.
 – संजय बरबडे