मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या महानगरपालिकांनी बेकायदा बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. लगेच आंदोलने, बंद करून त्यात मोडता घालण्यात येत आहे. बेकायदा इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत ही बांधकामे पाडू नयेत, अशी मागणी होत आहे. कोण करणार पुनर्वसन? कुणाच्या पशातून ते होणार? बेकायदा इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन करदात्यांच्या पशातून का म्हणून व्हावे? यापुढे बेकायदा बांधकाम होणारच नाही याची महानगरपालिका, आमदार, नगरसेवक, पोलीस, बिल्डर, भूखंडमाफिया हे सर्व खात्री देणार का? आमदार, नगरसेवक यांनी स्वत:च्या पशातून, जे लोक या बांधकामात सहभागी आहेत त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणून त्या पशातून आणि बेकायदा इमारतीतील रहिवाशांच्या पशातून पुनर्वसन करावे.
सरकारी पुनर्वसन म्हणजे नवीन घोटाळ्याला आमंत्रण आहे. बेकायदा इमारतीत घर घ्या आणि त्या बदल्यात कायदेशीर हक्काचे घर मिळवा अशी आयती योजना समाजकंटकांना शासन उपलब्ध करून देईल.
पुनर्वसन करायचेच झाले तर ते त्याच भागात न करता लांब म्हणजे सद्य आमदार, नगरसेवक, खासदार यांच्या निवडणूक क्षेत्राबाहेर करावे, कारण आपले मतदार वाढावेत म्हणूनही या बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन दिले जाते.
राजन महाजन, ठाणे

‘अनधिकृत’ आशीर्वाद नेमके कोणाचे?
ठाण्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासंबंधी  शरद पवार यांचे वक्तव्य वाचले. व्होट बँक सुरक्षित करण्यासाठी असे करणे जरुरी असते हे मान्य, पण हे करण्याआधी शहरात निम्म्याहून अधिक इमारती अनधिकृतपणे कशा उभ्या राहिल्या, कोणाच्या आशीर्वादाने उभ्या राहिल्या हे जाणण्यासाठी एक विशेष समिती नेमणे आवश्यक आहे. ही समिती असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजनाही सुचवू शकेल. या उपाययोजनांवर अंमलबजावणी करणे तसेच या अनधिकृत बांधकामासंबंधी जबाबदारी निश्चित करून सर्वसंबंधित अर्थात बिल्डर, राजकारणी, प्रशासन आणि अन्य यांना कठोर शिक्षा करणे हे खरेतर लोककल्याणकारी राज्याचे ब्रीद आहे. महाराष्ट्रासारखे प्रगतिशील राज्य हा नवा पायंडा पाडेल, अशी अपेक्षा आहे.
हेमंत सदानंद पाटील, सांताक्रूझ (प.)

आश्रयदाते आहात, घरीच आश्रय द्या!
‘बेकायदा बांधकामांचे पवारांकडून समर्थन’ ही मुख्य बातमी (लोकसत्ता, १४ एप्रिल) वाचली. मुंब्रा परिसरातील ४० ते ६० टक्के बांधकामे अनधिकृत असल्यामुळे ती एकदम तोडल्यास त्यातील रहिवासी कोठे जाणार, हा खरोखरच मोठा प्रश्न आहे. परंतु यावर एक उत्तम तोडगा म्हणजे या सर्व जनतेच्या मागे ठामपणे उभे असलेले जितेंद्र आव्हाड आणि इतर लोकप्रतिनिधींनी या सर्व लोकांची सोय स्वत:च्या अधिकृत किंवा अनधिकृत घरांमध्ये करावी, जेणेकरून जनतेचा त्यांच्यावरील असलेला विश्वास दृढ होईल आणि पुढील निवडणुकीचा मार्गही सुकर होईल.
डॉ. सुप्रिया तडकोड, बोरिवली

फरक शब्दांपुरता!
नेते मंडळींची अनधिकृत बांधकामे प्रथम पाडा, असे आश्वासक शब्द सांगणाऱ्या शरद पवारांनी भूखंडाचे श्रीखंड केले होते. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अनधिकृत बांधकामातून अफाट पसा मिळवून स्वत:ची दहशत निर्माण करणाऱ्या पप्पू कलानी आणि भाई ठाकूर यांना आमदार बनवून राजकारणात प्रस्थापित केले. काका आणि पुतण्या दोघेही सारखेच ‘जाणते’ आहेत. फरक आहे तो फक्त त्यांच्या शब्दांत!
दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

देव असूनही भ्रष्टाचार हीच प्रवृत्ती
‘देव आणि भ्रष्टाचार’ हे अनघा गोखलेंचे पत्र (लोकमानस, १५ एप्रिल) वाचले. डॉ. सत्यपाल सिंह यांचे देवदेवतांविषयीचे परिपत्रक अभिनंदनीय खरेच; परंतु अंमलबजावणी होण्याविषयी साशंकताच आहे. काही ठाण्यांतून मंदिरेच उभारलेली असल्यास त्यांचे काय? हा प्रश्न आहेच.
गोखले यांना खाबू पोलिसांना थोडाफार धाक असलाच तर तो परमेश्वराचा असण्याची शक्यता वाटणे, ज्यांच्या मनात पाप ही संकल्पना आहे तेही बेदरकार होतील असे वाटणे तसेच पूजेअच्रेच्या निमित्ताने ही मंडळी थोडी सहिष्णू होतील असे वाटणे मात्र तद्दन निर्थक ठरते आहे.. या निर्लज्ज अन कोडग्या मंडळींची कातडी एवढी घट्ट आहे की रोज देवाचे नाव घेत अन् देवदेवता अन् पूजेच्या नावाने लूटमार करायलाही यांना काहीच वाटेनासे झाले आहे.
हीच स्थिती अन् प्रवृत्ती विविध सरकारी, सार्वजनिक संस्था, खासगी उद्योग अन् सर्वसामान्य जनतेतही मुरलेली आहे.
श्री. वि. आगाशे

‘उन्हाळी राजभवने’ आज कितपत उपयुक्त?
आपल्याकडे राज्यपालांच्या निवासासाठी मुंबईत राजभवन आहे. त्याशिवाय त्यांच्या उन्हाळ्यातील वास्तव्यासाठी पुणे आणि महाबळेश्वर येथे मोठय़ा क्षेत्रांत वसलेली मोठी निवासस्थाने आहेत. वास्तविक वातानुकूलन यंत्रणेची सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यापासून राज्यपालांनी पुणे अथवा महाबळेश्वर येथे जाण्याची गरज कालबाह्य़ झाली आहे. मुंबईतच हवा तेवढा गारवा निर्माण करता येतो. जागेच्या टंचाईच्या काळात अशा जागा त्यांच्यासाठी अडवून ठेवणे योग्य वाटत नाही.
लोकशाहीमध्ये ही राजेशाही कशासाठी? आपल्यासारख्या गरीब देशाला ही चन परवडणारी नाही. पुणे, महाबळेश्वर येथील त्या निवासस्थानांच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी नियुक्त असून त्यांची ‘डय़ुटी’ वर्षभर, परंतु काम महिनाभरच असते. शिवाय राज्यपालांच्या खर्चाला ऑडिट नसते, हे सर्वश्रुत आहेच.
तेव्हा पुणे, महाबळेश्वर येथील सदर जागा शासकीय/ निमशासकीय कार्यालयांसाठी हस्तांतरित करणे योग्य ठरेल. पुणे येथील राजभवन परिसरात यशदा इ. कार्यालये आहेतच. उर्वरित संपूर्ण जागादेखील अशा कार्यालयांना देणे योग्य ठरेल.
मा. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तेव्हा याबाबतीत त्यांनीच पुढाकार घेऊन कार्यवाही केल्यास ते एक चांगले उदाहरण ठरेल आणि इतर राज्यांतील राज्यपालांपुढेही त्यांचा आदर्श राहील. यातून शासकीय स्थावर मालमत्तेचा जास्तीतजास्त सदुपयोग करणे आणि आम जनतेने सरकारी तिजोरीत भरलेल्या करांचा अपव्यय टाळणे साध्य होईल, असे वाटते.
अविनाश वाघ, ठाणे</strong>

पालखीचे तरी बाजारीकरण नको..
गुढीपाडव्याच्या दोन दिवस अगोदर मुंबईहून ठाण्याला येताना प्रचंड ट्राफिक जॅम होता. कारण समजेना, परंतु ऐरोली फ्लायओवरजवळ आल्यावर काही साई भक्त चालताना दिसले. कौतुक वाटलं. तरीही ‘जॅम’ काही सरेना. ऐरोली ते मुलुंड हे जेमतेम दहा मिनिटांचे अंतर पार करायला तासभर लागला. एसी बसमध्येदेखील घालमेल होऊ लागली. तरीही साईची पालखी असल्याने लोक  समजुतीने बसले होते.
मुलुंड पार करायला अजून वेळ लागला. आता मात्र संयम संपला होता. कौतुकाची जागा चिडचिडीने घेतली होती. बाहेर साईभक्त एकमेकांना वडापाव आणि पाणी वाटत होते. ऑफिसवरून परतणारे आम्ही धार्मिक भावनेचा अनादर नको म्हणून शांत बसून होतो. गाडीने मुलुंड चेक नाका पार केला आणि ट्राफिक जॅमचे मूळ कारण कळले. तेथे प्रचंड कर्कश आवाजात आणि एलईडी लाइटच्या झोतात एक डीजे आपली कला पेश करत होता. शेकडो तरुण-तरुणी त्या गाण्यांवर थिरकत होते. हे साईभक्त? ही साईंची पालखी? हे भक्तीचे आणि गुरुपरंपरेचे बीभत्स दर्शन पाहून वाईट वाटले. गुरू आपल्या घरी वाजतगाजत येऊ शकेलही, परंतु भक्ताने नम्रपणे आणि नामस्मरणाच्या गजरात गुरूकडे जावे की आडवेतिडवे नाचत?
ती जर फक्त साईंची पालखी असती तर हा पत्रप्रपंच बिलकूल केला नसता. साईबाबा हे जगन्मान्य आहेत. गुरूच्या ओढीने एवढं अंतर पायी पार पाडणे हे नक्कीच असामान्य आहे. त्या भक्तिभावामुळेच बसमधील कुठल्याही प्रवाशांनी ब्रदेखील काढला नाही. परंतु ज्या वेळेस तो डीजे प्रकार पाहिला तेव्हा मात्र राहवेना. आपण आपल्या सणांचे बाजारीकरण होताना पाहिले. गणपती, गोविंदा हे सण तर फक्त प्रायोजकांच्या जीवावर साजरे होताना दिसताहेत (अपवाद आहेत आणि असतील). परंतु त्या बाजारीकरणात कृपा करून पालखीला ओढू नका. कारण पालखी हा सण नव्हे, तर साईभक्तांचा आपल्या गुरूशी एक भावनिक संवाद आहे.
– पंकज सावर्डेकर