आमूलाग्र बदलण्याच्या प्रयत्नात चक्रमपणा सोडल्याची चिन्हे दाखविणारा आम आदमी पक्ष दिल्लीत जिंकला. या विजयाने नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वशैलीस इशारा मिळाला आहे, हे निश्चित..  
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ होता. त्यामागील अनेक कारणांपकी एक प्रमुख कारण म्हणजे गेले नऊ महिने सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारची केवळ भाषणबाजी. मोदी यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेले राजकीय यश अपूर्व होते हे मान्य. परंतु पुढील काळात त्या विजयाला एक दर्प येऊ लागला आणि आपण म्हणजे कोणी देशाचे आणि भाजपचे उद्धारकत्रे आहोत अशी मिजास मोदी यांच्या वागण्यातून दिसू लागली. ही धोक्याची घंटा होती. परंतु मोदीप्रेमाने आंधळे झालेल्या माध्यमांना, त्यांच्या चाहत्यांना आणि भाजपला या धोक्याच्या घंटेचे ना वाजणे समजले ना ते कानी आले. अशा परिस्थितीत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांत भाजपला फटका बसणार हे उघड होते. आपणास निवडणुकीच्या राजकारणाचे मर्म समजले असून आपली केवळ उपस्थितीच विजयी होण्यासाठी पुरेशी आहे हा मोदी यांचा भ्रम या निकालामुळे उतरेल. या निवडणुकीत जे काही झाले ते सर्व प्रचलित राजकीय पक्षांच्या डोळ्यासमोर काजवे चमकावण्यास पुरेसे असून त्याचमुळे या निकालाचा सम्यक आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.
या निकालातून ठसठशीतपणे समोर येणारी सर्वात मोठी बाब म्हणजे ‘आप’च्या विजयाचा आकार. गेल्या विधानसभा निकालानंतर अत्यंत चक्रमपणे वागणाऱ्या या आम आदमी पक्षाने दरम्यानच्या काळात आमूलाग्र बदल केला. आंदोलनीय राजकारण हे लोकप्रियता मिळवून देते. परंतु सत्ताकारण करावयाचे असेल तर त्यास अधिक गांभीर्य लागते. याची उणीव ‘आप’च्या पहिल्या अवतारात होती. त्या पक्षाचे अरिवद केजरीवाल यांचा आक्रस्ताळीपणा त्यांच्या केवळ अपरिपक्वतेचा निदर्शक होता. आपण म्हणजे कोणी अभ्रष्टांचे मेरुमणी असून बाकी सर्वच भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत, असे त्यांचे वागणे असे. या नतिक गंडातूनच त्यांनी आधी आपण काँग्रेस, भाजप यापकी कोणाचाही पािठबा घेणार नाही अशी भूमिका घेतली आणि नंतर भाजपपेक्षा काँग्रेस बरी असे म्हणत त्या पक्षाच्या पािठब्यावर सरकार बनवले. पण पुढे तेही सोडले. तेव्हा या असल्या बालिश राजकारणातून केजरीवाल यांनी ‘आप’ला यशस्वीपणे बाहेर काढले आणि दिल्लीकरांचा आशीर्वाद मिळवला याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र ठरतात. या त्यांच्या यशामागे एक महत्त्वाचे कारण आहे.
ते म्हणजे केंद्रात सत्तेवर असलेला भाजप. मोदी यांच्या विकासनीतीकडे पाहून जनतेने या पक्षाकडे सत्ता दिली. त्याआधी सत्ता सांभाळणाऱ्या काँग्रेसप्रणीत पुरोगामी आघाडीच्या निष्क्रियतेस जनता विटली होती. अद्वातद्वा बोलणारे राहुल गांधी आणि त्यावर एखाद्या मेणाच्या पुतळ्याने प्रतिक्रिया द्यावी तसे प्रतिसाद देणारे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे जनतेस नकोसे झाले होते. त्यांच्या तुलनेत आपली धोरणे ठामपणे मांडणारे, आपण काय करू इच्छितो हे जनतेस स्पष्टपणे सांगणारे नरेंद्र मोदी हे जनतेस आश्वासक वाटले. खेरीज, त्यांचे गुजरातचे प्रारूप हा आकर्षणाचा विषय होताच. त्यामुळे मोदी यांना सहज सत्ता मिळाली. त्यानंतर जनतेची अपेक्षा ही की मोदी यांनी काही करून दाखवावे. परंतु हे काही करून दाखवणे मोदी यांनी कामकाज पत्रिकेवर मागे टाकले आणि केवळ देदीप्यमान सोहळ्यातच आनंद मानणे त्यांनी सुरू केले. मग तो सोहळा न्यूयॉर्कमधील त्यांच्या दौऱ्यांचा असो किंवा चीनचे अध्यक्ष जिनिपग वा अमेरिकेचे बराक ओबामा यांच्या भेटीचा असो. डोळे दिपवणारे साजरीकरण आणि त्यास चटकदार भाषेतील शब्दमालांची जोड हेच मोदी यांचे आतापर्यंतचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. एखाद्या दुकानाने बाहेरून दिलखेचक रोषणाई करावी परंतु तिला भुलून कोणी आत गेलाच तर त्यास दुकानातील रिकामपण लक्षात यावे असे मोदी यांचे झाले आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. करण्यासारखे उदंड असताना मोदी केवळ भाषणबाजीतच अडकल्यामुळे हे असे झाले. त्यात पुन्हा जे काही करावयाचे ते केवळ मी आणि मीच करणार हा दुराग्रह. भारतासारख्या गुंतागुंतीच्या आणि आकाराने खंडप्राय देशाचे नेतृत्व करावयाचे तर अधिकाराच्या विकेंद्रीकरणास पर्याय नाही. परंतु एकहाती आणि एकमुठी गुजरात चालवणाऱ्या मोदी यांना ते मंजूर नाही. त्यामुळे मुद्दा राजकीय असो वा प्रशासकीय जे काही करावयाचे ते आपण करणार असा त्यांचा अट्टहास. दिल्ली निवडणुकीच्या निकालाने तो अंगाशी आला. सत्तेवर आल्यानंतरची प्रत्येक निवडणूक मोदी यांनी स्वत:च्या प्रतिष्ठेची केली. महाराष्ट्र, झारखंड या राज्यांत त्यांना यश मिळाले. जम्मू-काश्मीर आणि आता दिल्ली या निवडणुकांत नाही. याचे कारण यशस्वी ठरलेल्या राज्यांत भाजपकडे स्थानिक चेहरा होता. पक्ष म्हणून एक यंत्रणा अस्तित्वात होती. तेव्हा भाजपचे या राज्यांतील यशाचे श्रेय मोदी यांच्या प्रतिमेस जितके जाते तितकेच ते स्थानिक पक्ष संघटनेकडेही जाते. दिल्लीत याचा अभाव होता. दिल्ली राज्य भाजपला पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मोदी यांनी काडीचीही किंमत दिली नाही. ही निवडणूक जणू दिल्लीकर हे मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहून लढतील आणि भाजपला मतदान करतील, असा त्यांचा समज होता. तो मतदारांनी उत्तमपणे धुळीस मिळवला. त्याची गरज होती. कारण पक्ष हा अनेकांच्या प्रेरणा आणि प्रतिष्ठा, भावनांनी बनलेला असतो. त्याची काहीही फिकीर न करता जेव्हा केंद्रीय नेतृत्व किरण बेदी यांच्यासारखा कर्कश उमेदवार वरून लादते तेव्हा त्याविरोधात प्रतिक्रिया उमटणारच. आपण पक्षाला विजय मिळवून देतो म्हणून पक्षाने आपण म्हणू ते ऐकावे ही मोदी-शहा यांची अरेरावी होती. त्याविरोधात वरकरणी कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तरी बेदीबाईंच्या विरोधात पक्षातच मोठी नाराजी होती. तेव्हा भाजपवासीयांनीच ‘आप’च्या बाजूने मतदान केले नसेल असे म्हणता येणार नाही. खेरीज बेदीबाईंना घोडय़ावर बसवल्यामुळे भाजपचा आणखी एक तोटा झाला. तो म्हणजे केजरीवाल आणि बेदी यांची थेट तुलना मतदारांनी सुरू केली. इतके दिवस या बाई केजरीवाल आणि कंपूच्याच कळपात होत्या. त्या वेळी केजरीवाल यांचे राजकारण जितके बालिश आणि कर्णकटू होते तितकेच बालिश आणि नौटंकीपूर्ण या बाईंचे वागणे-बोलणे होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपला दुहेरी नाराजीस सामोरे जावे लागले. पक्षांतर्गत आणि विचारी मध्यमवर्गीय. अखेर या दोघांनीही भाजपस सणसणीतपणे झिडकारले आणि ‘आप’ला पुन्हा संधी दिली. ‘आप’च्या या विजयापेक्षा भाजपच्या पराभवास आणखी एक किनार आहे.
ती म्हणजे मोदी यांच्या कारकीर्दीत मोकाट सुटलेल्या साधू आणि साध्वी यांची. देशातील बहुसंख्यांनी मोदी यांना पािठबा दिला तो काही या कोणा टिनपाट साक्षी महाराज वा साध्वी यांच्या माकडचेष्टांकडे पाहून नाही. या बेजबाबदारांच्या हुच्चपणामुळे मोदी यांच्या विकासनीतीस मोठी आडकाठी तयार होत होती. परंतु तरीही त्यांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न मोदी करताना दिसले नाहीत. उलट घरवापसीसारख्या कार्यक्रमांतून या असल्या आचरटांना उत्तेजनच मिळत गेले. त्याचाही फटका मोदी यांना या निवडणुकीत मतदारांनी दिला. तेव्हा आता या असल्या साधू आणि साध्वींना पुन्हा जप करण्यासाठी पाठवण्याचे पुण्यकर्म मोदी यांना करावे लागेल. नपेक्षा ही मंडळी भाजपचे अधिकच नुकसान करतील.
भाजपइतकीच, किंबहुना अधिकच, लाजिरवाणी अवस्था झाली आहे ती काँग्रेसची. त्या पक्षाची घसरगुंडी थांबण्याची काही चिन्हे नाहीत आणि ती थांबवण्याची क्षमता काही राहुल गांधी यांच्यात नाही. आज काँग्रेस रसातळाला जात असताना मागणी होत होती ती प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवण्याची. त्यावरून दिसते ते हेच की काँग्रेस काही पराभवातून शिकण्यास आणि गांधी घराण्याचा पदर सोडण्यास तयार नाही. तेव्हा त्या पक्षाचा भाग्योदय इतक्यात होणे असंभव.
तेव्हा अशा तऱ्हेने दिल्लीतील मतदारांनी सर्वानाच जमिनीवर आणले. अशा वेळी आपले काय चुकले याचा प्रामाणिक विचार मोदी यांना करावा लागेल आणि पावले उचलावी लागतील. नपेक्षा समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे..
अवघेकडची नासती। लोकांची मने भंगती
कोठे चुकती युक्ती। काही कळेना
अशी भाजपची गत होईल.