‘ह.भ.प. राहुलबाबा’ हा अग्रलेख (५ एप्रिल) व त्याला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे उत्तर (१२ एप्रिल) वाचले. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासारखे पंतप्रधान बळी गेले ते वाईट व निषेधार्ह आहेच, परंतु सर्वसामान्य जनता नक्कीच याला दोषी नाही. त्यामागील कारणे कटू आहेत. नेहमी काँग्रेसमध्ये गांधी घराण्याला केंद्रस्थानी ठेवले की मग इतर नेते काहीही करायला मोकळे होतात. राजीव गांधींची हत्या व सोनियांचा राजकारण प्रवेश या कालावधीमध्ये काँग्रेसची अवस्था कशी होती ते जनतेने पाहिलेले आहेच. त्याच अवस्थेमुळे सोनिया गांधींनी राजकारण प्रवेश करावा म्हणून अर्जुन सिंगापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वानी उंबरठे झिजविले हे जनता विसरेल कशी? सांप्रदायिक शक्तींचा प्रभाव रोखण्याकरिता सोनियाजींनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून पद स्वीकारले, पंतप्रधान होण्याच्या इच्छेने नव्हे, ही एक काँग्रेसची लोणकढी थाप आहे हे जनता जाणतेच. ‘सांप्रदायिक शक्ती’ हा शब्द आता खूप जुनाट व बुळबुळीत झाला आहे. तसे असते तर काँग्रेसने ‘एक भारत एकच कायदा’ या अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेला विरोध केलाच नसता. म्हणून ‘जात’ हा शब्द काँग्रेस स्वातंत्र्योत्तर काळात दोन-तीन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेवर असूनही हद्दपार करूच शकली नाही. उलट यावर आपली पोळी मात्र वेळोवेळी भाजूनच घेतली. लालबहादूर शास्त्रीजी सोडल्यास कुठलाही काँग्रेसी नेता अतिशय अल्प संपत्ती बाळगून आहे असे आढळत नाही. सचिन सावंत यांच्या मते स्वातंत्र्योत्तर काळात भारताची झालेली सर्वागीण प्रगती, भारतातील लोकशाही व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे स्थान याची तुलना केल्यास यातील गांधी घराण्याचे योगदान कसे नाकारता येऊ शकते? असे जर असेल तर मग ‘काँग्रेसी नेता आपल्या झोळीत मोहरा ओरबाडून ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. असे करत असताना जर त्याच्या हातून कायद्याचा भंग झाला तर मग अटकपूर्व जामिनासाठी अर्ज भूमिगत राहून करतो. मग त्यास अपयश आले तर मग वाजतगाजत आपल्या समर्थकांच्या समवेत पोलीस स्टेशनमध्ये हजर राहतो. लगेच तुरुंगात गेलाच तर मग त्याच्या छातीत दुखू लागते, त्यामुळे त्याची रवानगी इस्पितळात होते व काही दिवसांनी त्याला जामीन मिळतो व मग त्याच्या मोहरा ओरबाडण्याचा उद्योग पुन्हा सुरू होतो. निवडणुका पुन्हा जाहीर होताच सर्व काही जनता विसरून जाते, कारण रात्रीच पुन्हा मतदारराजाच्या घरात मोहरांचा पाऊस पडतो व पुन्हा त्या नेत्याची मार्गक्रमणा चालू राहते. एक दिवस तो राजकारणात वरवरच्या जागा पटकावत जातो.’ हे सर्व काँग्रेस पक्षाने भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्रजांकडून शिकून घेतले काय? कारण आपला पक्ष तेव्हाही सत्तेत होता व आजही सत्तेत आहे. त्यामुळे या आपल्या अधोगतीचीही जबाबदारी काँग्रेसचे पुढील नेते राहुल गांधी घेतील काय?
– प्रवीण आंबेसकर, ठाणे

दादांचा अनुकरणीय ‘आत्मक्लेश’
शरद पवार साहेबांनी ठाण्यातील परवाची पत्रकार परिषद इतर अनेक विषय होते तरी केवळ आणि केवळ अजित पवारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठीच घेतली असावी असेच वाटते. साधारणपणे असे मानले जाते की, विधिमंडळातील नेता त्या त्या पक्षाचे आमदार निवडतात. त्या दृष्टीने अजित पवारांचे, राजीनामा देण्याबाबत आमदारांशी बोलेन, हे वक्तव्य योग्यच होते. पण मग आदिलशाही निर्माण होते ना! दिल्लीचा बादशहा नामधारी होतो म्हणूनच हा पत्रकार परिषदप्रपंच! यावरून एक लक्षात यावे की, आमदारांवर दादांची हुकमत मजबूत आहे. पण ‘हाय कमांड’चे काय?
अजितदादा प्रायश्चित्त घ्यायला कराडला गेले आणि दिवसभर शिळोप्याच्या गप्पा मारून परतले. निदान अण्णांसारखं लोकांना भजन तरी म्हणायला लावायचं आणि आपण अर्धवट डोळे मिटून किती गर्दी जमा झाली यावर ‘नजर’ ठेवायची. तेवढंच चॅनेलवाल्यांनाही बरं वाटतं.
पूर्वी प्रायश्चित्त म्हणजे राजीनामा! पण आत्ताच कोठे दादा ७२ दिवसांच्या दुष्काळातून बाहेर आले आहेत आणि पुन्हा.. नुसत्या विचाराने घाम फुटत असेल. एका बाबतीत दादांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी यशवंतरावांचे समाधीस्थळ निवडले म्हणून. कारण त्यामुळे काँग्रेसवाल्यांचीही सोय झाली. त्यांनाही प्रायश्चित्त घ्यायला दुसरे स्थळ शोधायला नको. एक सूचना करावीशी वाटते. शिवसेना व भाजपनेही आपले स्थळ निश्चित करावे. शिवाजी पार्क सुचवावेसे वाटते. मुंडेंच्याही सोयीचे.
म्हणजे मग विधानसभेत ठराव मांडून दोन्ही ठिकाणी कायमस्वरूपी मंडप बांधावेत व ते वातानुकूलित करावेत. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचीही सोय करावी. चमच्यांसाठी खान-पान तर हवेच. बांधकाम अधिकृत की अनधिकृत याची काळजी करू नये. असा सगळा जामानिमा झाला की बघा ‘आत्मक्लेश’ करणारे वाढतील व बापूजींच्या स्वप्नातले ‘सुराज्य’ महाराष्ट्रदेशी तरी नक्कीच अवतरेल याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. अजितदादांनी याीिनमित्ताने केवढा मोठा आदर्श घालून दिला आहे!
दुष्काळ काय दोन्ही हातांनी ओरपणारे राज्यकर्ते आहेत तोपर्यंत येतच राहणार.
– सुहास शिवलकर, पुणे</strong>

Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

देव आणि भ्रष्टाचार
मुंबईचे पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंह यांनी मुंबईतील पोलीस ठाण्यात देवी-देवतांची चित्रे वा मूर्ती ठेवून त्यांची पूजा करण्यास बंदी घातली आहे. याबद्दल पोलीस आयुक्तांनी परिपत्रक काढले असून मुंबईतील ९३ पोलीस ठाण्यांत आदेश तातडीने पोहोचवण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे पाठवला आहे. सत्यपालसिंह यांचे हार्दकि अभिनंदन! पण मला एक भीती वाटते, पोलीस खात्यातील भ्रष्टाचार सध्या मोठय़ा प्रमाणावर बाहेर येत आहे. अनेक पोलीस हप्ते घेताना कॅमेरात स्थानबद्ध होत आहेत. पोलिसांना कोणताही आणि कोणाचाही धाक आहे असे दिसत नाही. कदाचित थोडा फार धाक असेल तर तो परमेश्वराचा असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या दृष्टीने परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे एकमेव साधन म्हणजे मूर्तीची पूजा, सत्यनारायण पूजा. आता तीही बंद केली तर ज्यांच्या मनात पाप ही संकल्पना आहे तेही बेदरकार होतील. परमेश्वर आणि विवेक यांचे थेट नाते अनेकांच्या मनात वसत असते. पूजा-अर्चा यानिमित्ताने ते थोडे सहिष्णू होतात. आता तोही मार्ग बंद झाला तर सध्याचे जंगलराज आणखी फोफावले तर आश्चर्य वाटायला नको. (आदरणीय डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची क्षमा मागून )
– अनघा गोखले, मुंबई</strong>

म्हणे वकिलांनी राजकारणात यावे
वकिलांनी राजकारणात यावे, असे शरद पवार यांनी ठाणे येथे वकिलांच्या परिषदेत बोलताना शनिवारी सांगितले. पवारसाहेब योग्यच बोलले मात्र, सवाल असा आहे की, त्यांच्या पक्षात किती वकील आहेत? त्यापकी किती वकिलांना त्यांनी उमेदवारी दिली? लोकसभा, विधानसभा हे क्षेत्र असे आहे की, तेथे चर्चा करताना कायदा काय म्हणतो हे महत्त्वाचे असते. आज अशाच ठिकाणी विधिज्ञ लोकप्रतिनिधींची म्हणून वानवा आहे. ज्यांना कायद्याचे ज्ञान नाही ते मग चच्रेऐवजी हमरीतुमरीवर येतात. १९८० पर्यंत बहुतेक मंत्री वकील असत. आताच्या मंत्रिमंडळात किती मंत्री वकिलीची पदवी असलेले आहेत, याची माहिती पवारांनी द्यावी. किंबहुना कायदे जाणणाऱ्या वकिलांना लोकप्रतिनिधी गृहात पाठविण्यासाठी त्यांनी आजवर किती प्रयत्न केले?  मंत्रिमंडळात वकील आला म्हणजे तो कायद्याचा मुद्दा मांडणारच, तेव्हा ही मंडळी तेथे नको असा विचार या राज्यात पवारांनीच रुजवला. तेव्हा पवार बोलतात एक व करतात दुसरेच हा अनुभव पुन्हा एकदा आपल्याला येईल.
    प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी या समारंभात सत्कार स्वीकारला नसता तर बरे झाले असते. वसईपुरते बोलावयाचे तर वर्तक ते वर्टी हे नामांकित कायदेतज्ज्ञ होते. आज ती परंपरा ठाणे जिल्ह्यात दिसत नाही.
– मार्कुस डाबरे, पापडी, वसई.

दादांचे प्रायश्चित्त झाले, आता जनतेनेही घ्यावे
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या पायाशी अजितदादा प्रायश्चित्त घेण्यासाठी बसले हे त्यांनी मनापासून केले आहे असे आपण समजू या, पण याला प्रायश्चित्त म्हणता येईल का? हा खरा प्रश्न आहे. एक तर त्यांची चूक एवढी मोठी आहे की, त्याचे परिमार्जन होणारच नाही. समाधीपाशी बसल्यानंतर ते म्हणतात, जो काम करतो त्याच्याकडून चूक होते. आता हे उदाहरण त्यांच्या बेलगाम भाषेच्या संदर्भात पूर्णपणे चुकीचे आहे. काम करण्याचा आणि बेमुर्वतखोर बोलण्याचा संबंधच कोठे येतो? आणि एक दिवस या समाधीपाशी घालवून दुष्काळग्रस्त जनतेला त्याचा काय उपयोग आहे?  हा दिवस त्यांनी या जनतेच्या सुखदु:खाशी समरस होण्यात घालवला असता तर अधिक योग्य ठरले असते. दादांचा राजीनामा मागणे हीसुद्धा विरोधकांची चूक आहे. जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आहे, त्यांचा अपमान आपण करू शकत नाही. त्यांना निवडून देण्यात आपली चूक झाली असे जनतेला वाटत असेल तर येत्या निवडणुकीमध्ये अजितदादा यांना पराभूत करावे आणि तोपर्यंत आपण निवडून दिलेला फाटक्या तोंडाचा प्रतिनिधी सहन करावा हेच जनतेचेही प्रायश्चित्त ठरेल.
– सौमित्र राणे, पुणे