‘अ‍ॅपल’ आणि ‘गुगल’ या कंपन्या काही कारणास्तव का होईना एकमेकांचे तंत्रज्ञान भागीदार बनतील, असे यापूर्वी कुणी म्हटले असते तर त्याला आपण मूर्खात काढले असते; पण काळाचा महिमा वेगळाच असतो म्हणतात, त्यानुसार हे घडले आहे. गरज ही शोधांची जननी असते असे म्हणतात, पण आजकाल नुसते शोध लावून चालत नाही. कुठलेही उपकरण तयार करताना ते जास्तीत जास्त उपयोगी बनवण्याची गरज असते. त्याच गरजेतून अ‍ॅपलला गुगलच्या तंत्रसामर्थ्यांचा शोध नव्याने लागला आहे. ग्राहकांना तो मुळीच नवीन नव्हता, कारण गुगलची किमान आठ हजार उपयोजने (अ‍ॅप्स) तसेच ‘अँड्रॉइड’सारखे सॉफ्टवेअर (आज्ञावली) यांचा दरारा तंत्रज्ञान क्षेत्रात आहे. दुसरीकडे स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, ज्यांच्या खिशात जरा जास्त पैसे आहेत व उत्तम तंत्रज्ञानाने परिपूर्ण उपकरणे वापरण्याची हौस आहे त्यांना अ‍ॅपलच्या आयफोनशिवाय दुसरा पर्याय दिसत नसतो. असे असले तरी अ‍ॅपलकडे उपयोजनांची म्हणजे अ‍ॅप्सची उणीव होती ती काही भरून काढता येत नव्हती. त्यासाठी नवीन तंत्रज्ञांचा शोध घ्यायचा, त्यांच्याकडून अ‍ॅप्स तयार करून घ्यायची, मग त्याचा भूलभुलैया दाखवायचा असा बराच द्राविडीप्राणायाम करण्यापेक्षा अ‍ॅपलने गुगलकडेच दोस्तीचा हात पुढे केला अन् त्यांनीही तो झिडकारला नाही.  सध्याचा जमानाच सहकार्याचा आहे. एकमेकांशी मैत्री करूनही स्पर्धा करता येते, हेच गुगल व अ‍ॅपल यांच्या दोस्तान्यातून दिसून येते. अ‍ॅपलच्या आयफोनला आता गुगलच्या उपयोजनांचं कोंदण लाभलं आहे. गेल्या आठ महिन्यांत गुगलने त्यांच्या काही इंटरनेट सेवा या आयफोनसाठीच तयार केल्या होत्या, आयफोनसाठी अनेक नवीन उपयोजने त्यांनी विकसित केली होती. आयफोन अ‍ॅपलचा, पण त्यासाठी लागणारी ही उपयोजने  गुगलकडून खरेदी करावी लागत होती. आता ती अ‍ॅपलच्या आयफोनवर आयतीच मिळणार आहेत. गुगलने अ‍ॅपलला जाळ्यात पकडण्यासाठी अलीकडेच त्यांच्या क्रोम वेब ब्राउजरची आयफोन आवृत्ती तयार केली होती, त्यामुळे जी-मेल सेवा आयफोनवर मिळवणे अधिक सुलभ झाले होते. अ‍ॅपलच्या अ‍ॅप्स स्टोअरमध्ये गुगलची आयफोन अ‍ॅप्स व आयपॅडसाठीच्या त्याच्या आवृत्त्या विकल्या जात होत्या. गुगलने उचललेले पाऊल प्रथमदर्शनी आत्मविनाशी वाटत असले तरी त्यांचा त्यामागचा उद्देश आयफोन वापरकर्त्यांपर्यंत मोठय़ा प्रमाणात पोहोचणे हा आहे. त्यासाठी अ‍ॅपलशी दुश्मनी उपयोगाची नव्हती. यातून गुगलला त्यांच्या ऑनलाइन उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक अशी माहिती मिळणार आहे. त्यातून सरतेशेवटी गुगलचाच नफा वाढणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अ‍ॅपलचे दुखणेही असेच होते; त्यांचा आयफोन वापरून लोक गुगलच्या सेवा त्यावर घेत होते, त्यामुळे ऑनलाइन सेवेसाठी उपयुक्त माहिती त्यांना मिळत नव्हती. आयफोनचे डिझाइन व उपयुक्तता हे अ‍ॅपलचे बलस्थान, तर ऑनलाइन सेवा हे गुगलचे बलस्थान. अ‍ॅपलचे ‘मॅप्स अ‍ॅप्स’ फसले तसेच ‘यूटय़ूब अ‍ॅप्स’ काढून घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, पण गुगलचे ‘मॅप अ‍ॅप्स’ १ कोटी लोकांनी डाउनलोड केले, त्यांच्या यूटय़ूब अ‍ॅपलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला, या विरोधाभासामुळे अगोदर अनेक उपयोजने म्हणजे अ‍ॅप्स विकसित करण्याचा चंग बांधलेल्या अ‍ॅपलने आत्मपरीक्षण करून एक पाऊल माघारी घेतले आहे. अ‍ॅपलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोनसाठी कुठलेच अ‍ॅप्स मान्य करायचे नाही असे ठरवले होते, पण आज नेमके त्याउलट घडते आहे. प्रतिस्पर्धी कंपनीकडून अ‍ॅप्स तंत्रज्ञानाची उसनवारी करण्याची वेळ अ‍ॅपलवर आली आहे. असे असले तरी गुरूची विद्या गुरूला म्हणतात त्याप्रमाणे गुगलवर पलटवार होणारच नाही याची हमी देता येत नाही.