27 November 2020

News Flash

महिला रमल्यात फॅण्टसीत

‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ आणि ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ या प्रणयरम्य, फॅण्टसीमय त्रिखंडात्मक कादंबऱ्यांमुळे अटलांटिकच्या दोन्ही बाजूंच्या घराघरांत पोहोचलेली यशस्वी लेखिका म्हणजे ई.

| April 27, 2013 12:32 pm

‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ आणि ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ या प्रणयरम्य, फॅण्टसीमय त्रिखंडात्मक कादंबऱ्यांमुळे अटलांटिकच्या दोन्ही बाजूंच्या घराघरांत पोहोचलेली यशस्वी लेखिका म्हणजे ई. एल. जेम्स. पण हे काही तिचं खरं नाव नाही. ते केवळ लेखनासाठी तिनं धारण केलं आहे. तिचं मूळ नाव आहे एरिका मिशेल.
जेम्सच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, त्याची गोष्ट मनोरंजक आहे. टीव्ही एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असताना सबवेच्या रोजच्या कंटाळवाण्या प्रवासात विरंगुळा म्हणून तिने प्रणयरम्य कादंबऱ्या वाचण्याचा धडाका लावला. थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल ८०० कादंबऱ्या वाचून काढल्या. स्टेफनी मेयरच्या गाजलेल्या ट्वायलाईट सागांच्या ‘स्नोक्विन्स आइसड्रॅगॉन’ने तिला लेखनाची प्रेरणा मिळाली.
सर्वप्रथम ई-बुकच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेल्या ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’मुळे प्रकाशकांकडून ती पेपरबॅक स्वरूपात प्रकाशित करण्याचे प्रस्ताव आले आणि तिन्ही कादंबऱ्यांच्या एकत्रित खपाने तब्बल साडेतीन कोटी प्रतींचा उच्चांक गाठला, तर जगभरातला खप साडेसहा कोटींच्या घरात पोहोचला.
‘फिफ्टी शेड्स’ची नायिका अ‍ॅनास्टॅशिया स्टील इंग्रजी साहित्याची विद्यार्थिनी आहे. केट ही तिची मैत्रीण फ्ल्यूने आजारी पडल्याने तिला सीअ‍ॅटलला कॉलेजच्या विद्यार्थी वृत्तपत्रासाठी ख्रिश्चन ग्रेची मुलाखत घ्यायला जाण्याचा योग येतो. तोवर साधंसुधं, चारचौघासारखं आयुष्य जगणाऱ्या अ‍ॅनाच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडून येते. अतिशय देखणा, श्रीमंत, ग्रे एंटरप्रायजेस या बिझनेस एम्पायरचा सीईओ असलेल्या ख्रिश्चन ग्रेची मोहिनी अ‍ॅनाला एवढी भारून टाकते की, ध्यानीमनी तिला तोच दिसू लागतो. ख्रिश्चनलाही अ‍ॅना आवडते. ब्लॅकबेरीपासून ते अ‍ॅपल लॅपटॉप, दुर्मीळ पुस्तकांच्या संचापासून नवीन गाडीपर्यंत विविध वस्तूंची खैरात तो अ‍ॅनावर करतो. पण वरवर साध्यासुध्या भासणाऱ्या या कथावस्तूला एक काळी किनार आहे, ती नायकाच्या गडद भूतकाळाची. तो डॉमिनंट आहे आणि त्याला अ‍ॅनाकडून सबमिसिव्ह भूमिकेची अपेक्षा असते.

म्हणूनच जेम्सने या ट्रियॉलॉजीचा ‘मिडलाइफ क्रायसिस आणि त्या अनुषंगाने फँटसी’ असा उल्लेख केला आहे; तर ‘डेली मेल’ने म्हटले, ‘‘आता मिल्स अँड बून्स विसरा. उघड उत्तेजक प्रणयरम्य कादंबऱ्या हा साहित्याचा नवीन प्रवाह आहे. ज्यांचा रोख आहे मध्यमवयीन विवाहित महिला आणि शिळे होत गेलेले त्यांचे विवाह.’’ म्हणूनच विशेषत: महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिलेल्या ‘फिफ्टी शेड्स’ला समीक्षकांनी गमतीने ‘मम्मी पॉर्न’ असं नामाभिधान दिलं.
डॉमिनंट-सबमिसिव्ह संबंध प्रस्थापित करताना त्यासंबंधीचा तपशीलवार करारनामा प्रौढ स्त्री-पुरुषांनी करणं आणि ‘फिफ्टी शेड्स’मधली अगदी ‘रेड रूम ऑफ पेन’ नसली तरी यातनेतून सुख देणारी ब्लाइंडफोल्ड, हंडकफ्स, पॅडलर इ. साधनं वापरणं, याचं आकर्षण विवाहित स्त्री-पुरुषांना एवढं वाटलं की, या साधनांचा उपयोग कसा करावा याचे काहींनी अमेरिकेत प्रात्यक्षिकांसह वर्ग घेतले.
जेम्सला आलेल्या फॅनमेलमध्ये काहींनी त्यांचे विवाह वाचवल्याबद्दल तिला धन्यवाद दिले आहेत. एकाने म्हटलंय, ‘‘तुम्ही माझ्या विवाहात मसालेदारपणा आणलात. माझा नवरादेखील तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो.’’
या अनपेक्षित यशाने भारावून गेलेली जेम्स म्हणते, ‘‘लोक जेव्हा प्रेमात असतात तेव्हा ते सेक्सदेखील करतात.. आणि मला एक ज्याच्यात भरपूर सेक्स आहे अशी प्रेमकहाणी सांगायची होती.’’
तसं पाहिलं तर या प्रणयकथेत जगावेगळं असं काहीच नाही. पण जेम्सने ज्या प्रकारे जुन्या पद्धतीच्या रोमान्सला ‘इरॉटिक पॉवर प्ले’ची फोडणी दिलीय, त्यामुळे विशेषत: स्त्रीवाचकवर्गाची नस नेमकी पकडण्यात ती यशस्वी झाली. ‘डायमंड्स डॉट कॉम’ या अमेरिकेच्या सोशल नेटवर्किंग साइटने ‘फिफ्टी शेड्स’चं वर्णन- ‘बॅन्ड-एड फॉर मॅरेजेस, गेटिंग स्टेल’ असं केलंय.
जेम्सने तिच्या पुस्तकाला ‘गिल्टी प्लेझर’ असंही म्हटलंय. पुस्तकाची शैली प्रथमपुरुषी, काव्यमय आहे. अश्लील भाषेचा वापर तिने टाळलाय. पुस्तकाची मुखपृष्ठंदेखील उत्तेजक नाहीत तर गडद पाश्र्वभूमीवर एका सिल्क टायचं चित्र पहिल्या कादंबरीवर आहे, तर नंतरच्या दोन कादंबऱ्यांची मुखपृष्ठंदेखील ओशाळवाणं वाटू नये अशीच आहेत.
युनिव्हर्सल पिक्चर्सने ‘फिफ्टी शेड्स’वर चित्रपट काढण्याचे हक्कदेखील काही मिलियन डॉलर्सना घेतल्याची ताजी बातमी आहे.
डॉमिनंट-सबमिसिव्ह रिलेशनशिपचा जेम्सने वाचन, इंटरनेट या माध्यमांतून सखोल अभ्यास केला आणि मगच त्याचा कादंबरीसाठी उपयोग केला.
ही ट्रियॉलॉजी लवकरच मराठीतदेखील वाचायला मिळणार आहे. अमेरिकेत एकदा फुटबॉलचा सामना रंगात आलेला असताना ट्विटरवर एकाने एक गमतीदार ट्विट केलं होतं, ‘जेव्हा पुरुष सामना पाहण्यात गुंग होते, स्त्रिया ‘फिफ्टी शेड्स’ वाचण्यात रमल्या होत्या.’ तेव्हा उद्या आपल्याकडेही पुरुष आयपीएलमध्ये गुंतले आहेत आणि स्त्रिया ‘फिफ्टी शेड्स’मध्ये हरवून गेल्या आहेत, अशी परिस्थिती निर्माण व्हायला अडचण नसावी.
फिफ्टी शेडस ऑफ ग्रे : ई. एल. जेम्स,
प्रकाशक : बॉक्स ट्री
पाने : ३३०, किंमत : ३५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 12:32 pm

Web Title: women involved in fantasy
Next Stories
1 सुरस व चमत्कारिक वीस गोष्टी
2 लढवय्या युवीची प्रेरक खेळी !
3 पूर्वेचा प्रवास पश्चिमेकडे
Just Now!
X