महिला लढाऊ विमान उडवू शकतात का? हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांच्या मते, नाही! लढाऊ विमाने उडविणे हे आव्हानात्मक काम असून, जास्त काळासाठी हे विमान उडविण्यास महिला नैसर्गिकदृष्टय़ाच अक्षम असतात. गर्भवती किंवा अन्य काही शारीरिक समस्या असताना तर महिलांना लढाऊ विमान उडविणे शक्यच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंतच्या लष्करात गेल्या कित्येक वर्षांपासून महिला लढाऊ विमाने उडवीत आहेत. युद्धनौका असोत की पाणबुडय़ा, रणगाडे असोत की कमांडो दल, लष्करातील प्रत्येक क्षेत्रात आज महिला काम करू शकत आहेत, करीत आहेत. असे असताना हवाई दलप्रमुखांनी असे वक्तव्य करावे, ही गोष्ट केवळ धक्कादायकच नाही, तर ती भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या पुरुषी मानसिकतेवर झगझगीत प्रकाश टाकणारी आहे. पाच दिवसांपूर्वीच आपण मोठय़ा उत्साहाने जागतिक महिला दिन साजरा केला. त्या वेळी अनेकांच्या मनात या दिनाच्या उत्सवी स्वरूपाबद्दल, त्याच्या कालसुसंगततेबद्दल शंका आल्या असतील. आज सर्वच क्षेत्रांत महिलांना सुलभ प्रवेश मिळतो. एवढेच नव्हे तर अनेक क्षेत्रांत त्या आघाडीवर आहेत. असे असताना आजच्या काळात हा दिन साजरा करण्याचे औचित्य काय, असे अनेकांना वाटून गेले असेल. त्या सर्व शंका-कुशंकांना गाडून टाकण्यासाठीच जणू हवाई दलप्रमुखांनी हे विधान केले असावे! त्यांच्या या विचारांतील एक भाग कोणालाही मान्य होईल.. गरोदरपणात, शारीरिक समस्या असताना महिला लढाऊ विमान चालवू शकणार नाहीत, हे खरेच. पण या अवस्थेत तशा त्या शारीरिक क्षमतांचा कस पाहणारे अन्य एखादे कामदेखील योग्य पद्धतीने करू शकणार नाहीत, असे गृहीत धरण्यात येते. त्यावर कट्टर स्त्रीवादीही आक्षेप घेणार नाहीत. आक्षेप आहे तो अशा मतांच्या आडून व्यक्त होत असलेल्या पुरुषी भावनांना. भारतीय लष्करी सेवेतील उच्चाधिकाऱ्यांमध्ये तर या भावनेचे अधिकच प्राबल्य असावे. इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ मुख्यालयाने २००६ मध्ये आणि सैन्याच्या तिन्ही सेवांच्या एका उच्चस्तरीय समितीने २०११ मध्ये मांडलेला अहवाल या संदर्भात पाहण्यासारखा आहे. या दोन्ही अहवालांनी महिलांना प्रत्यक्ष युद्धकामावर पाठविण्यास विरोध दर्शविला आहे. महिलांना प्रत्यक्ष लढाईवर पाठविले आणि त्या शत्रुसैन्याच्या तावडीत सापडल्या तर काय? युद्धनौकेवर महिलांसाठी राहण्याची वेगळी व्यवस्था, स्वतंत्र न्हाणीघर नसते, तेव्हा त्यांना तेथे कसे पाठवायचे? असे काही व्यावहारिक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. खरे तर या प्रश्नांनाही पुरुषवर्चस्ववादाचाच वास आहे. अमेरिकेने इराक, अफगाणिस्तानात पाठविलेल्या फौजांमध्ये महिला सैनिकांचा समावेश होता, हे दूरचित्रवाणीवरून आपण पाहिलेले आहे. पण एकदा लष्करात महिला नकोच असे म्हटले, की असे अनेक प्रश्न उपस्थित करता येतील आणि हे केवळ लष्कराबाबतच नाही, तर कोणत्याही क्षेत्राबाबत विचारता येतील. भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांवरील प्रवेशबंदी उठून आता पाव शतकाहून अधिक काळ लोटला आहे. पण आजही लष्करातील त्यांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. भारताच्या १ कोटी ३० लाख एवढय़ा सैन्यात ५९ हजार ४०० अधिकारी आहेत. आणि त्यातील महिलांची संख्या अवघी २९६० एवढी आहे. तेथेही त्यांना, पोलिसी भाषेत सांगायचे, तर ‘साइड ब्रँच’च मिळते. ही तक्रार जुनीच आहे आणि एअर चीफ मार्शल अरूप राहा यांच्यासारखीच सगळ्या सेना दलांची भावना असेल, तर ती एवढय़ात दूर होणारही नाही. महिलांना लढाईसाठीही, सबलत्व सिद्ध करण्यासाठी केवढी लढाई करावी लागणार आहे, हेच या घटनेतून दिसत आहे.