ज्याला प्रपंच नाही करता आला। त्याचा परमार्थ ढिला पडला।। हे वाचताच आपल्या मनात जो अर्थ उमटतो तो खरा नाही! प्रपंचालाच केंद्रबिंदू मानून आपण जगत आहोत. त्यामुळे या वाक्यात प्रपंचाचीच थोरवी गायली आहे, असंच आपल्याला वाटतं. जो प्रपंच नीट करू शकत नाही तो परमार्थही करू शकत नाही, असा याचा अर्थ आपल्याला वाटतो. परमार्थासाठी आधी प्रपंच नीट करणं आवश्यक आणि महत्त्वाचं आहे, असंच श्रीगोंदवलेकर महाराजांना सांगायचं आहे, असा आपल्या आवडीचा अर्थ आपण घेतो. प्रत्यक्षात या वाक्याचा अर्थ अधिक खोल आहे. त्याचा मागोवा श्रीमहाराजांच्याच वचनांच्या आधारे घेऊ. या वाक्याच्या गूढार्थावर प्रकाशझोत टाकणारं श्रीमहाराजांचं एक वाक्य आहे. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘परमार्थ ही वृत्ती आहे. प्रपंच ही कृती आहे.’’ (बोधवचने, क्र. ३४१) याचाच अर्थ प्रपंच ही करण्याची गोष्ट आहे. कृती आहे. ती कृती जर योग्य प्रकारे केली नाही तर वृत्ती आटोक्यात राहाणार नाही. ती ढिली पडेल. परमार्थ हा वृत्तीवरच अवलंबून असल्याने जर प्रपंचाची कृती अयोग्य झाली तर परमार्थही ढिला पडेल. आता हे प्रपंच ‘योग्य प्रकारे’ करणं म्हणजे नेमकं काय? प्रपंचाची कृती योग्य कशी ठरवणार? ते जाणण्यासाठी श्रीमहाराजांचंच दुसरं वचन पाहू. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘मनुष्य हौसेनं प्रपंच करील तर तो करायला चोवीस तासही पुरणार नाहीत. पण जो जरुरीपुरता प्रपंच करील त्यास तीन-चार तास पुरतील.’’ (चरित्रातील प्रपंचविषयक बोधवचने/ क्र. ३३) तेव्हा जो चोवीस तास प्रपंचात गुंतला आहे तो ‘प्रपंच करावा नेटाने’ असं मानणारा आहे. जो आटोपशीर प्रपंच करीत आहे तो ‘प्रपंच करावा नेटका’ असं मानणारा आहे. जर मी चोवीस तास प्रपंचातच गुंतलो असेन, माझा प्रपंच चोवीस तास देऊनही पुरा होत नसेल तर मी परमार्थ काय करणार? त्यासाठी प्रपंच सोडा आणि फक्त परमार्थ करा, असंही साधणार नाही. कारण प्रपंच सुटता सुटू शकत नाही आणि तो सोडून सुटत नाही. तेव्हा मला जर परमार्थ करायचा असेल, तो जर ढिला पडू द्यायचा नसेल तर आधी मला प्रपंच योग्य प्रकारे करावा लागेल. या प्रपंचात माझं जे गुंतणं आहे ते शरीरापेक्षा चित्तानं आणि मनानं अधिक आहे. परमार्थासाठी तर हे मन आणि चित्तच मोठं भांडवल असतं. जर मन प्रपंचातच गुंतलं आहे, प्रपंचाच्याच चिंतनात अहोरात्र निमग्न आहे तर त्याच्यात परमार्थाचं चिंतन, मनन ढिलंच पडणार. आपला परमार्थ कसा होतो? श्रीमहाराज म्हणतात, ‘‘एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते, पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याचप्रमाणे आपण परमार्थाला वागवितो.’’ (चरित्रातील परमार्थविषयक बोधवचने / क्र. १७). त्यामुळे नाम घेताना किंवा उपासना करताना, कधी ठरलेला जप एकदाचा ‘करून टाकतो’ आणि दुनियेच्या कामात स्वतला झोकून देतो, हीच तळमळ असते. श्रीमहाराजही म्हणतात, ‘‘जेथे मन असते तेथे मनुष्य राहतो.’’ (बोधवचने, क्र. २५१) परमार्थ करतानाही माझं मन प्रपंचातच असल्यानं परमार्थ ढिलाच पडतो.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री