तज्ज्ञांचे ब्लॉग समजायला कठीणच असतात असं नाही, आपल्या एरवीच्या जगण्याशी तज्ज्ञ काय सांगू पाहताहेत याचा संबंधच नसतो असंही नाही.. आणि जरी समजायला कठीण असले, तरी ज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी हे ब्लॉग असणं महत्त्वाचं असतं.
ब्लॉगवर वेळोवेळी केलेल्या नोंदींची संख्या वाढली, त्या नांेदी काही जणांना आवडताहेत आणि अनेकांना आवडतील असा विश्वास असला की, मग निवडक ब्लॉग-नोंदींचं पुस्तक करण्याचा उत्साह काहींना असतो. हे पुस्तक छापील असतंच असं नाही. इंटरनेटवरचं, डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणारं आणि डाऊनलोड करून वाचता येण्याजोगं ई-पुस्तक काढणं छपाईपेक्षा कमी खर्चिक ठरतं. अर्थातच ब्लॉग > ‘लोकप्रियता’ > ई-पुस्तक असा प्रवास लोकप्रियतावादी ब्लॉगरांना साहजिक वाटतो.
लोकप्रियतावादी हा शब्द खटकेल. लोकप्रिय असणं हा आमचा गुन्हा आहे काय वगैरे बालिश सवालही येतील. त्यांच्यासाठी आगाऊ खुलासा असा की, लोकप्रियतावादी नसलेले ब्लॉगलेखक/ लेखिका कदाचित लोकप्रिय होऊही शकतात. पण मूळ हेतू लिखाणाचा आणि काही तरी सांगण्याचा असतो, तो ते अजिबात सोडत नाहीत. उलट लोकप्रियताच काय पण प्रतिसादसुद्धा कमी असताना लिखाणाचं सातत्य टिकवणारे काही ब्लॉगर आहेत. त्यात अनेकदा आपापल्या क्षेत्रांबद्दल तळमळीनं लिहिणाऱ्यांचा समावेश दिसतो. क्षेत्र म्हणजे फक्त व्यवसाय नव्हे.. अभ्यासक्षेत्रही.  
ज्यांची अभ्यासक्षेत्रं व्यवसायाशी जोडली गेलेली आहेत, ज्यांनी त्या व्यवसायाने केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या मागण्या नेहमी पूर्ण केलेल्या आहेत, अशांना तज्ज्ञ म्हटलं जातं. तज्ज्ञांकडून पुस्तकंलिहून घेण्याइतके मराठी प्रकाशक सजग आहेत (की काय, म्हणूनच बहुधा) मराठीत एखाद्या तज्ज्ञाकडून त्याच्या/तिच्या अभ्यासविषयाचा ब्लॉग चालवला जातोय अशी उदाहरणं सध्या तरी अपवादात्मक आहेत. असे तज्ज्ञ ब्लॉगर मराठीपेक्षा सध्या तरी इंग्रजीतच अधिक आहेत. याचं कारण ज्ञानभाषा म्हणून त्यांना इंग्रजीचा सराव अधिक आहे हेच असावं. उदाहरणार्थ, माणूस मुंबईकर आणि मराठी, अगदी ज्ञानेश्वरी वाचून, आकळून घेऊन त्या अनुभवावर मराठीत त्यानं पुस्तकही लिहिलंय आणि ते आधीच कधीतरी (मराठी ब्लॉगांचा बोलबाला सुरू होण्यापूर्वी) छापलंही गेलंय, असा. पण त्याच्या व्यवसाय-अभ्यास क्षेत्राशी निगडित ब्लॉग आहे, तो मात्र इंग्रजी. विख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते हे या उदाहरणाचे ‘नायक’. किंवा न-नायक. कारण त्यांचा ‘शॉर्ट नोट्स इन प्लास्टिक सर्जरी’ हा ब्लॉग एकापेक्षा जास्त अर्थानी निराळा आहे आणि त्यात स्वत:ऐवजी बरंच काही आहे.
‘शॉर्ट नोटस इन प्लास्टिक सर्जरी’ हा ब्लॉग साकारण्यासाठी रविन थत्ते स्वत: संगणकाचा कळफलक हाताळताहेत, असंही नाही. ते काम दुसरं कुणीतरी करत असेल. पण महाभारत गणपतीनं लिहिलं नाही, तसंच हेही. त्यामुळे आपल्यासाठी ते तपशील महत्त्वाचे नाहीत. महत्त्वाचं हे की, ब्लॉगमाध्यमाची ताकद पुरेपूर ओळखून हा ब्लॉग घडतो आहे आणि त्यातून प्लास्टिक सर्जरीबद्दलचं एक जित्तंजागतं पुस्तक साकारतं आहे.
इथे पुन्हा पुस्तकं आणि मराठी ब्लॉगलेखक या विषयीच्या निरीक्षणांचा संबंध येतो. छापील किंवा ई-पुस्तक काढण्याची रंगीत तालीम, असं या ब्लॉगचंही होणार की काय?  कदाचित नाही. पुस्तक ही इतिकर्तव्यता मानणाऱ्यांपैकी थत्ते नाहीत, असं हा ब्लॉग सांगतो. या ब्लॉगवर ज्या प्रतिक्रिया येतात, त्याही बहुतेकदा प्लास्टिक सर्जरी (सुश्रुताचा शब्द ‘सुघटन शल्यक्रिया’) या विषयात पारंगत असणाऱ्यांच्याच येतात. मग, ‘डॉक्टर अमुक तमुक सेज’ किंवा ‘अकॉर्डिग टू डॉ. अमुक तमुक’ अशा शब्दांत या प्रतिक्रियांना मूळ ब्लॉग-नांेदीमध्येच स्थान मिळतं. हे संपादनकार्य थत्ते स्वत: करतात. त्यांचे किमान ५० तरी विज्ञार्थी आज ‘तज्ज्ञ’ म्हणून ओळखले जातात. तेव्हा ज्ञानाचे अद्ययावतीकरण ही सर्वच तज्ज्ञांची जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन हा ब्लॉग चालतो.
ब्लॉगवरल्या बऱ्याच नोंदी सामान्य माणसाच्या रोजच्या वाचनानुभवाशी फटकून असणारा अनुभवच देतात. पण काही प्रकरणांच्या सुरुवातीचे परिच्छेद वाचनीय आहेत. उदाहरणार्थ, २९व्या प्रकरणाची सुरुवात प्लेटो, मायकल फॅरेडे, आइनस्टाइन अशा विचारवंतांची आणि भगवद्गीता, क्षेत्र-क्षेत्रज्ञ न्याय मांडणारे कपिल मुनी यांची साक्ष काढत झालेली आहे. विषय प्रवेशाची पद्धत म्हणून अवतरणं दिली जातात, पण इथं ही अवतरणं पुढे ‘वाचका’च्या आकलनाला मदत करणारी ठरतात.  हे प्रकरण आहे, अगदी जन्मत:च नाकपुडी आणि ओठ जोडलेले असणाऱ्या मुलांमध्ये असा जो दोष उद्भवतो, त्याबद्दल. हे व्यंग कोणकोणत्या प्रकारचं असू शकतं, याबद्दलची चर्चा या प्रकरणात पुढे आहे. त्या चर्चेच्या अगोदर, ‘मॅटर’ किंवा भौतिकद्रव्य आणि शरीर यांचा एकमेकांशी संबंध आहे, याचा विचार कसकसा प्रगत झाला, हे त्या अवतरणांमधून कळतं.
पण अशी उदाहरणं विरळाच आहेत. एरवी, विषयात खरोखरच रस असल्याखेरीज हा ब्लॉग वाचणं कठीण वाटेल. आपल्या ओळखीतल्या वा नात्यातल्या कुणाला प्लास्टिक सर्जरीची गरज असेल, तर शल्यक्रियेआधी माहिती मिळवण्यासाठी जरूर वाचावा, असा हा ब्लॉग आहे. एकंदरीत ‘वाचनीयता’ सापेक्षच असते, याचं हा ब्लॉग म्हणजे उत्तम उदाहरण ठरेल. तरीही तो केवळ डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी चालवलेला उपक्रम नाही, हे लक्षात घ्या. हे एक उघडं, सतत बदलत जाणारं, वाढणारं आणि कमीसुद्धा होऊ शकणारं, म्हणजेच झाडासारखं जितंजागतं पुस्तक आहे. या पुस्तकाला जगायचंय, वाढायचंय, मोकळा श्वासच घ्यायचाय, म्हणून त्याचा ब्लॉग होणं आवश्यक होतं आणि ते तसं झालेलं आहे.
ब्लॉग वाचणाऱ्यांचे कंपूच अखेर उरत जातात, याबद्दल या सदरातून गेल्या ११ महिन्यांत अनेकदा खंत व्यक्त झाली. शिवाय अनेकदा, मराठी ब्लॉग म्हटलं की बहुतेक  ज्या प्रकारांच्या ब्लॉगांची यादी समोर येते, त्या प्रकारांचे आणि त्यापेक्षा निराळेसुद्धा ब्लॉग या सदरातून चर्चेसाठी समोर आले. या ब्लॉगना ‘प्रसिद्धी मिळाली’ हे बायप्रॉडक्ट होतं. कदाचित आणखी अनेक ब्लॉगांना प्रसिद्धी हवीच असेल, पण या सदरात प्रसिद्धीपेक्षाही काही पटींनी महत्त्वाची होती ती साधकबाधक चर्चा. यापैकी काही ब्लॉग खरोखर पुन्हापुन्हा वळून पाहावं असे असल्याचं वाचकांच्याही लक्षात आलं असेल. यापैकी एक ब्लॉग होता पाणीपुरवठा क्षेत्रातले तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांचा. त्याकडे आजच्या चर्चेदरम्यान पुन्हा पाहणं यासाठी महत्त्वाचं आहे की, तज्ज्ञांचे ब्लॉग समजायला कठीणच असतात असं नाही, आपल्या एरवीच्या जगण्याशी तज्ज्ञ काय सांगू पाहताहेत याचा संबंधच नसतो असंही नाही हा मुद्दा स्पष्ट व्हावा.
प्रदीप पुरंदरे यांच्या ब्लॉगवरल्या ताज्या- ८ डिसेंबरच्या दोन नोंदी १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाआधी महत्त्वाच्या ठराव्यात. विधिमंडळाच्या या हिवाळी अधिवेशनात तथाकथित ‘सिंचन श्वेतपत्रिके’ची चर्चा होईल, तेव्हा या श्वेतपत्रिकेने सिंचनक्षेत्रात किती टक्के वाढ झाल्याचा दावा केला आहे, हाही एक मुद्दा असेल. पण मुळात ही सिंचनवाढ नीट मोजताच येत नाही, असं १९९९ साली सरकारच्या जल आणि सिंचन आयोगानंच म्हणून ठेवलंय त्याचं काय, असा सवाल या दोन नोंदी मिळून विचारतात. ‘खोटे .. धादांत खोटे..’ ही नोंद पुरंदरे यांनी स्वत: लिहिलेली, तर दुसऱ्या नोंदीत त्या आयोगाच्या निष्कर्षांमधले संबंधित उतारे निवडून दिलेले आहेत.
त्या-त्या विषयातल्या तज्ज्ञांनी ब्लॉगसारख्या माध्यमाचा वापर करणं, तो वाढवणं हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचं लक्षण आहे. ते का, हे असे ब्लॉग पाहून पटू लागावं.
उल्लेख झालेल्या ब्लॉगचे पत्ते :
http://shortnotesinplasticsurgery.wordpress.com , http://jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in
सूचना वा प्रतिक्रियांसाठी :  wachawe.netake@expressindia.com