चिं. स. तथा अण्णासाहेब लाटकर यांच्यावरील ‘व्यक्तिवेध’ने (८ जाने.) त्यांच्या साहित्यविषयक कार्याची उचित दखल घेतली आहे. लाटकर पुस्तके नुसतीच छापत नसत तर त्यावर संस्कारदेखील करीत असत. मला अगदी लख्खपणे आठवते आहे. आमच्या प्रकाशनातर्फे नटसम्राट दत्ता भट यांचे आत्मचरित्र ‘झाले मृगजळ आता जलमय’ (१९८३) प्रकाशित होणार होते. पुस्तक ४३६ पानांचे, त्यातही अनेक फोटो. प्रकाशनाची तारीख ठरली होती आणि स्क्रिप्ट हातात आले तेव्हा जेमतेम २५/२६ दिवसच उरले होते. एवढे छापायची जबाबदारी कोण घेऊ शकेल, असा प्रश्न होता. लाटकर यांच्या कल्पना मुद्रणालयाचे नाव ऐकले होते. ओळख नव्हती, पण त्यांच्याकडे गेलो. ते प्रचंड बाड त्यांनी पाहिले, वेळेची मर्यादा ऐकली आणि म्हणाले, ‘घाबरू नका, मी हे काम करतो’. अण्णासाहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे अक्षरश: २०/२२ दिवसांत अतिशय उत्तम प्रकारे पुस्तक छापून दिले. त्यातील मुद्रित तपासाची जबाबदारी, पुस्तकाची मांडणी, लागणारा कागद सगळे सगळे अण्णासाहेबांनी पाहिले आणि प्रकाशनाच्या दिवशी रेशमी कापडात बांधलेल्या प्रती घेऊन त्यांचा खास माणूस डोंबिवलीला आला.  पण प्रसिद्धीपासून अण्णासाहेब नेहमीच दूर राहिले. पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारे अण्णासाहेब केवळ मुद्रक नव्हते तर उत्तम साहित्यकृती निर्माण करणारे  साहित्यिकच होते असेच म्हणावे लागेल.   
-अनघा देशपांडे (आरती प्रकाशन, डोंबिवली)

समताधिष्ठित समाजनिर्मिती हे बुद्धाच्या शिकवणुकीचे ध्येय
‘बौद्ध संस्कृती हा जागतिक ठेवाच’ हे डॉ. प्राची मोघे यांचे पत्र (लोकमानस, ८ जानेवारी) वाचले. ते माझ्या पत्राशी (लोकमानस, २८ डिसेंबर) संबंधित असल्याने हे विवेचन.
डॉ. प्राची मोघे यांचे विचार स्वागतार्ह आहेत. बुद्धिस्ट स्टडीजचे महत्त्व त्यांनी उत्तम प्रकारे विशद केले आहे. म्हणूनच याविषयी शिक्षण क्षेत्रात व प्रस्तुत संदर्भात मुंबई विद्यापीठाची अनास्था ही मन विषण्ण करणारी आहे.
डॉ. मोघे म्हणतात त्याप्रमाणे बौद्ध संस्कृती हा जागतिक ठेवा आहेच, पण तो लॉकरमध्ये बंद ठेवण्यासाठी नाही तर समाजहितासाठी त्याचा वापर करण्यासाठी आहे. म्हणूनच बुद्धिस्ट स्टडी विभाग बंद पाडून मुंबई विद्यापीठाने कोणते समाजहिताचे कार्य केले आहे, एवढाच माझा प्रश्न आहे. याचे उत्तर मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने दिले असते तर बरे झाले असते. कारण हा विषय मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यानेच (संजय वैराळ) उपस्थित केला आहे. (बातमी : लोकसत्ता, २० डिसेंबर) मात्र मुंबई विद्यापीठाने याबाबत मौन पाळले आहे. या मौनातूनच खरा अर्थ स्पष्ट होतो.
‘ज्ञानाधिष्ठित समाजउभारणी हेच आपले कार्य असले पाहिजे’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देऊन जे डॉ. मोघेंनी सांगितले ते योग्यच आहे, मात्र त्याबरोबरच ‘समताधिष्ठित समाजनिर्मिती हे बुद्धाच्या शिकवणुकीचे ध्येय आहे’ हे जाणून त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती-जातीत विभागलेला धर्म त्यागून बुद्धाचा धम्म स्वीकारला हे विसरून चालत नाही. समताधिष्ठित समाज निर्मितीलाच डॉ. आंबेडकरांनी सर्वाधिक महत्त्व दिले. समताधिष्ठित समाजनिर्मिती या ध्येयाप्रति विद्यापीठांचे महत्त्वाचे योगदान असले पाहिजे. बुद्धिस्ट स्टडी तसेच पाली विषयांसंदर्भात मुंबई विद्यापीठाची कृती (लोकसत्ता, २० डिसेंबर) या विपरीत विषमतेने ग्रासलेली आहे व म्हणूनच निषेधार्ह आहे.  
-सुनील कांबळे, मुंबई

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

बेधडक विधाने, मग सारवासारव
‘‘आप’लाचि वाद ‘आप’णासी’ हा अन्वयार्थ  (८ जानेवारी) वाचला आणि पटला. वस्तुत: आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेले यश हे केजरीवाल आणि अन्य धुरीणांच्या कदाचित स्वप्नातही नसेल. त्याचमुळे सत्ता मिळाल्यानंतर आपले आíथक, सामाजिक, राजकीय इ. धोरण ठरवण्याची संधी व गरज दोन्ही आप पक्षाला नव्हती. साधे आमदारही नसलेल्या लोकांना एकदम सत्ताच मिळाली. सत्ता डोक्यात जाऊ न देता नीट राबवून लोककल्याण करणे हे फार कठीण असते. त्यामुळेच आता झालेले प्रकार घडत आहेत.
एका  राज्यात मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे आता हा पक्ष इतर राज्यांच्या व लोकसभेच्या निवडणुका लढवण्याच्या गोष्टी करीत आहे. मात्र केंद्रात सत्तेवर आल्यास आíथक, संरक्षणविषयक तसेच परराष्ट्र धोरण काय असेल, काय ठेवावे, याचा जराही विचार या पक्षाने केलेला दिसत नाही. त्याचमुळे मग प्रशांत भूषण यांच्यासारख्यांकडूनही बेधडक विधाने केली जातात आणि केजरीवाल यांच्यासारख्यांना सारवासारव करावी लागते.
राम ना. गोगटे, वांद्रे पूर्व

खरा अडथळा वृथा अभिमानाचा
‘स्वाभिमानीमुळे मनसेची वाट बिकट’ हे वृत्त (लोकसत्ता, ९ जाने.) वाचले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीतील सहभागामुळे मनसेची वाट बिकट होईल हे तर खरेच; परंतु मनसेच्या वाटचालीत खरा अडथळा हा राज ठाकरे आणि एकूणच मनसे या पक्षाच्या वृथा अभिमानाचा अधिक आहे असे वाटते. एक तर कोणत्याही पक्षाशी जमवून घेण्याची मनसेची तयारी नाही; दुसऱ्या बाजूला गेल्या निवडणुकीत मिळवलेले यश टिकवून धरण्याएवढे भरीव कार्यही नाही.   त्यामुळे जिंकणाऱ्या घोडय़ाला निवडणुकीनंतर साथ देण्याशिवाय पर्याय नाही. परंतु जिंकलेला घोडा जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित लाथ मारेल हीच शक्यता! अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वगुणांची कसोटी पाहणारी निवडणूक पुढे आ वासून उभी आहे, एवढे खरे.                                    
-राजीव मुळ्ये,  न्यू जर्सी

ब्रह्म हा ‘अहंलोपा’चा कल्पनाविस्तार
प्रा. श्रीनिवास हेमाडे यांनी त्यांच्या ‘तत्त्वभान’ या सदरातील दुसऱ्या लेखात (९ जाने.) ‘जाणीव म्हणजे काय?’ हा तत्त्ववैचारिक मुद्दा मांडला आहे. पण या लेखाच्या मांडणीत काही अपसंज्ञा व अपसमज दिसून येतात.
जाणीव हा ‘पदार्थ’ एक प्राथमिक अधिदत्त (प्रायमॉíडयल गिव्हन) आहे. म्हणजेच आपण स्वत:ला आढळतो, तेच मुळी मासा पाण्यात आढळावा, तसे अगोदरच जाणिवेत पोहताना आढळतो. यामुळेच चिद्वाद शक्य होतो. पण हेमाडे हे मांडतच नाहीत. अवेअरनेससाठी हेमाडे ज्ञानशास्त्रीय (एपिस्टेमॉलॉजिकल) जाणीव हा चुकीचा शब्द वापरत आहेत. त्यांना बोधात्मक-अंग (कॉग्निटिव आस्पेक्ट) म्हणायचे असावे. क्रिकेटच्या वर्णनात येणारी ‘मनोवैज्ञानिक दबाव’ ही चुकीची संज्ञा असून मानसिक दबावच म्हटले पाहिजे. कारण मनोविज्ञान नसते तरीही ‘दबाव’ असताच! तसे हे होते आहे.
‘चेतन’साठी वेदनशीलता (सेन्टीयन्स) असा शब्द आहे. तिला जाणीव म्हणणे चूक आहे. खासकरून मानवाची अशी ‘दुसरी’ जाणीव म्हणून जी सांगितली आहे तिचे नेमके वर्णन, जाणिवेतील विषयीत्वा (सब्जेक्टहुड)ला सुद्धा जाणिवेचा विषय (ऑब्जेक्ट ऑफ कॉन्शसनेस) बनविण्याची (आणि मग घडविण्याची) विशेष मानवी क्षमता, असे असायला हवे होते. आतापावेतो धारण केलेल्या विषयीत्वांचे स्मृतीत जे भांडवली खाते जमा होते, त्याच्याशी लिप्त होण्याने स्व(सेल्फ) बनत राहतो, मुद्दा ‘स्व’बाबत मांडलाच गेला नाहीये. ‘मी’, ‘माझे’ अशा शब्दांमुळे व्यक्तीसापेक्ष हा सब्जेक्टिवचा चुकीचा अर्थ ध्वनित होऊन, आत्मगत/ वस्तुगत ही सार्वकि कोटी उभी राहत नाही. तसेच ब्रह्म हा ‘स्व’भानाचा (इथे मात्र ‘आत्म’ हे पूर्वपद येते!) कल्पनाविस्तार नसून ‘अहंलोपा’चा कल्पनाविस्तार आहे.
राजीव साने, पुणे</strong>

शब्दांचा कीस काढून काय होणार?
‘दहशतवादाशी लढणे हाच खरा जिहाद’ हे पत्र वाचले. नौशाद उस्मान यांचा हेतू स्तुत्य आहे, पण त्यांनी दिलेल्या कुराणातील वचनांचा जिहादी मंडळी त्यांना सोयीचा असा अर्थ लावू शकतात. त्यांचा लढा ‘सतानाविरुद्ध आहे’ असे ते म्हणतातच; कारण अमेरिकी सत्ता ही त्यांच्या दृष्टीने सैतानच आहे. दुसरे म्हणजे, जिहाद जर उपासना असेल तर उपासनेत संघर्षांचा अंतर्भाव असतो का?
खरे तर दहशतवाद हा एक मार्ग आहे आणि त्याचे वेगळेच तत्त्वज्ञान आहे. ते तत्त्वज्ञान कधी धर्माचा, कधी राष्ट्रवादाचा, तर कधी वर्णद्वेषाचा वापर आपल्या सोयीप्रमाणे करते हे लक्षात घेऊन दहशतवादाशी लढले पाहिजे. नुसत्या शब्दांचा कीस काढीत बसण्यात काही अर्थ नाही.
-रघुनाथ बोराडकर, पुणे.