22 February 2018

News Flash

कर्मफलसिद्धान्त

कर्मफलसिद्धान्त किंवा कर्मविपाक’ नावाचा सिद्धान्त, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात (एवढेच नव्हे, तर भारतात निर्माण झालेल्या सर्वच धर्मामध्ये)...

शरद बेडेकर | Updated: August 31, 2015 12:42 PM

भगवद्गीतेने उचलून धरलेली व आधुनिक काळात बदनाम ठरलेली ‘चातुर्वण्र्य व्यवस्था’ ही ‘आत्मा’ या संकल्पनेला व ‘कर्मफलसिद्धान्ता’ला एकत्र करून ताणून ताणून रचलेल्या ‘पूर्वजन्म व पुनर्जन्म’ या सिद्धान्तावर उभारलेली कल्पनांची भरारी आहे..
‘कर्मफलसिद्धान्त किंवा कर्मविपाक’ नावाचा सिद्धान्त, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात (एवढेच नव्हे, तर भारतात निर्माण झालेल्या सर्वच धर्मामध्ये) सुप्रसिद्ध व मान्यताप्राप्त आहे. माणूस जी बरीवाईट कर्मे करतो, त्याचे बरेवाईट फळ, त्याला ‘या जन्मात’ किंवा त्याच्या आत्म्याला ‘पुढील जन्मात भोगावेच लागते’ असे हा सिद्धान्त सांगतो. तसा स्पष्ट उल्लेख मुंडक, छांदोग्य व बृहदारण्यक या उपनिषदांमध्ये आहे, तसेच ‘पुनर्जन्म’ ही वैशिष्टय़पूर्ण उपनिषदीय कल्पनासुद्धा मूलत: त्यावर म्हणजे कर्मफलसिद्धान्तावर आधारलेली आहे. ईशावास्य उपनिषदात मात्र याच्या उलट म्हणजे ‘कर्मे करीत शंभर वर्षे जगण्याची इच्छा ठेवावी, कर्मे माणसाला मुळीच चिकटत नाहीत’ असे स्पष्ट म्हटलेले आहे. काही परंपरानिष्ठ लोक, या श्लोकाचा अर्थ लावताना ‘फलाशा न ठेवता कर्मे केली तर ती आत्म्याला चिकटत नाहीत’ असा सोयीस्कर अर्थ, चलाखी करून लावतात; परंतु या उपनिषदात एवढेच नव्हे, तर दशोपनिषदांपैकी कोणत्याही उपनिषदात असा सिद्धान्त किंवा असा साधा उल्लेखही नाही. पुढे हजार किंवा त्याहूनही जास्त वर्षांनी, कुणा तरी अत्यंत हुशार माणसाने रचलेल्या गीता (म्हणजे भगवद्गीता) या ग्रंथात मात्र ही युक्ती सिद्धान्त म्हणून सांगितलेली आहे आणि तरीही गीता ही उपनिषदरूपी गायीचे दूध आहे, असे म्हटले जाते. ते राहो.
बऱ्यावाईट कर्माची फळे माणसाला ‘भोगावीच’ लागतात, असे सांगणारा मूळ कर्मफलसिद्धान्त हा कडक न्यायाचा रास्त सिद्धान्त वाटतो. उपनिषदकाळी स्वत:ला आर्य म्हणविणाऱ्या तत्त्वचिंतकांना आत्मा, ब्रह्म, पुनर्जन्म, मोक्ष इत्यादी कल्पना सुचण्यापूर्वीच्या दीड हजार वर्षांच्या ऋग्वेद रचनाकाळातही अशा ‘अटळ कर्मफल न्यायाला’ एक आधार होता, तो म्हणजे वरुण या देवतेचा. त्या काळी वरुण ही देवता, मूळ कर्मफलसिद्धान्तासारखेच काटेकोर कर्मफल देण्याचे काम करीत असे (असे मानले गेले होते). पुढे उपनिषदकाळ आला आणि त्याच्याही नंतर आलेल्या स्मृतिपुराणकाळात, जेव्हा पुरोहितांची एक जात बनून, धर्माचरण सांगण्याची मक्तेदारी त्या जन्माधारित जातीकडे आल्यावर त्यांनी वाईट कर्माचे (पापाचे) ‘फळ भोगावे लागू नये’ म्हणून आचरण्याची अगणित व्रतवैकल्ये, मंत्रजप, तीर्थयात्रा असे पापविमोचनाचे (प्रायश्चित्ते) अनेक उपाय सांगितले, ज्यातून त्या पुरोहितांना अर्थप्राप्ती होत होती. तेही राहो, पण मुळांतील कर्मफलसिद्धान्ताप्रमाणे ‘वाईट कर्माची वाईट फळे भोगावी लागतात व लागतातच’ हा नियम तसा चांगलाच म्हटला पाहिजे. ‘पेराल तसे उगवेल’, ‘करावे तसे भरावे’ अशा अर्थाचे उल्लेख, पश्चिम आशियात निर्माण झालेल्या धर्मामध्येही आहेतच; पण पुनर्जन्म घेऊन फळे भोगावी लागतात, हे अर्थातच त्यांना मान्य नाही, कारण माणसाला पुनर्जन्म असतो हेच मुळात त्यांना मान्य नाही किंवा ठाऊक नाही म्हणा हवे तर.
माणसाच्या सर्व ऐहिक दु:खाची मूलभूत कारणे ढोबळमानाने फक्त तीनच असू शकतात. एक- आपण स्वत:च (म्हणजे आपली कर्मे) कारण असणे. दोन- सैतानासारखी एखादी ईश्वरविरोधक दुष्ट शक्ती कारण असणे व तीन- स्वत: दयाळू ईश्वरच (आपल्याला सुधारण्यासाठी वगैरे) कारण असणे. या तीन मूलभूत कारणांपैकी आपण स्वत: म्हणजे आपली कर्मेच कारण असणे हे कारण व्यावहारिक म्हणजे ‘प्रॅक्टिकल’ म्हणता येईल व सैतान किंवा ईश्वर ही दोन कारणे व्यवहारबाहय़ म्हणून ‘स्पेक्युलेटिव्ह’ म्हणता येतील. ती ‘सैतान आणि ईश्वर’ ही दोन कारणे व्यवहारबाहय़ म्हणून बाजूस सारली, तर स्वत:ची बरीवाईट कर्मे आणि आजूबाजूची परिस्थिती ही दोनच माणसाच्या दु:खाची ढोबळ कारणे उरतात. त्यापैकी आजूबाजूच्या परिस्थितीवर व्यक्तीचा ताबा काही असू शकत नाही. म्हणजे राहता राहिली स्वत:ची कर्मे. तेव्हा मूळ कर्मफलसिद्धान्तामुळे, जगात काही तरी नैसर्गिक (आपोआप मिळणारा) न्याय आहे, असे जे वाटते, ते उपयुक्तच म्हणावे लागेल. ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम व पारशी या पश्चिम आशियातील उगमाच्या धर्मामध्ये मात्र, कमीअधिक फरकाने सैतान, ईश्वर व त्यांच्या इच्छा हीच मूळ कारणे दिलेली आहेत. ते राहो.
याउलट हिंदू, बौद्ध, जैन व शीख धर्मात मात्र माणसाची स्वत:ची कर्मेच त्याच्या दु:खाला कारणीभूत आहेत असे मानले जाते व हा दृष्टिकोन जास्त व्यवहार्य वाटतो. मनुष्य त्याच्या अविद्येमुळे, अज्ञानामुळे, सकाम म्हणजे लोभमोहयुक्त कर्म करतो व कर्मफलसिद्धान्तानुसार कर्माचे फळ मिळून दु:खी होतो. अविद्या म्हणजे ‘आत्मा व परमात्माविषयक’ किंवा ‘योग्य मार्गविषयक’ अज्ञान होय. बौद्ध व जैन धर्मामध्ये ईश्वर नाही व हिंदू आणि शीख धर्मात तो आहे. मात्र या भारतात निर्माण झालेल्या चारही धर्मात साधारण सारखा कर्मफलसिद्धान्त आहे. म्हणजे या धर्माप्रमाणे ईश्वर किंवा सैतान ही माणसाच्या दु:खाची कारणे नसून त्याची स्वत:ची कर्मेच त्याच्या दु:खाची कारणे होत.
दुसऱ्या एका दृष्टीने पाहिले, तर ऋग्वेद रचनाकाळात जे देव-दानव युद्ध घडले, त्यातील दानव हे सैतानासारखे देवांचे विरोधक, दुष्ट कर्मे करणारे व दु:ख देणारे होतेच की. शिवाय वेदकालीन माणूस देवतांची उपासना करण्यासाठी यज्ञ आणि काही जपतप करीतच होता. म्हणजे देव आणि त्यांचे विरोधक दैत्य, माणसाच्या सुखदु:खांना कारण नव्हते असेच काही म्हणता येत नाही. अगदी आजचे हिंदूसुद्धा ज्या अनेक देवदेवतांच्या प्रार्थना करतात, देवाकडे काही मागतात, नवस करतात, ते सर्व ‘देव आपल्याला सुख देतो आणि आपले दु:ख कमी करू शकतो’ या गृहीतावरच आधारलेले आहे.
वेदकालीन वरुण ही अत्यंत महत्त्वाची देवता जे न्याय आणि रास्त कर्मफल देण्याचे काम करीत असे ते आणि उपनिषदकाळी सांगितलेला ‘कर्मफळ भोगावेच लागते’ सांगणारा मूळ कर्मफलसिद्धान्त हे ‘निसर्गत:च पूर्णत: स्वतंत्रपणे कार्यरत आहेत’ असे त्या प्राचीन काळी मानले जात असावे असे वाटते. ते जर खरेच असेल, तर एक मोठी अडचण उद्भवते. ती अशी : ‘कर्मफलसिद्धान्त जर पूर्णत: व स्वतंत्रपणेच कार्यरत असला तर कुणा ईश्वराची (किंवा कुणा सैतानाची) पूजा-प्रार्थना करण्याची जरूरच काय? कारण ईश्वर किंवा सैतान अस्तित्वात असले तरी, माणसाच्या पापाला माफी देण्याचा किंवा माणसाचे दु:ख रद्द किंवा सौम्य करण्याचा त्याला काही अधिकारच राहात नाही. सिद्धान्तानुसार कर्मफल भोगावेच लागणार. होय ना?’
फार प्राचीन काळी पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती केलेल्या विविध मानवसमूहांची ईश्वरविषयक (म्हणजे चैतन्यविषयक) कल्पना साधारण सारखीच असावी व ती अशी असावी की, ‘सर्व चराचर वस्तूंत काही ‘जीवशक्ती’ म्हणजे ‘संकलनशक्ती’ किंवा ‘चैतन्य’ असून ती शक्ती माणसाच्या ऐहिक जीवनात हस्तक्षेप करते, कधी शुभ फल देते, तर कधी अशुभ. त्या शक्तीला पूजा, प्रार्थना, बलिदान इत्यादी मार्गानी खूश ठेवावे लागते. या समजुतीप्रमाणे मृतांनाही पूज्य मानण्यात येत असे. असे दिसते की, आदिमानवाचा सर्वत्र अशा कल्पनांवर विश्वास होता व त्यातूनच डोंगर, टेकडी, प्रचंड दगड, नदी, वृक्ष, सर्प इत्यादींच्या पूजा फार प्राचीन काळी चालू होत्या. त्यानंतरच्या हजारो वर्षांमध्ये आधी निसर्गदेवता (चंद्र, सूर्य, पाऊस इत्यादींना देवत्व), पुढे देवतांचे मानुषीकरण (व्यक्तीसारख्या देवता), त्यापुढे ‘एकेश्वरवाद’, त्यानंतर ‘धर्मस्थापना’ इत्यादी आणि त्याही पुढील पायरी म्हणून सांगितला जाणारा भारतात हिंदू धर्मात, ‘ईश्वर सृष्टीच्या कणाकणांत आहे, असे सांगणारा ‘सर्वेश्वरवाद’ (‘सर्व काही’ म्हणजे ‘विश्व’च ईश्वर आहे) म्हणजे ‘ईश्वर सृष्टीहून वेगळा नाही’ असे मत म्हणजे ‘अद्वैतवाद’ मान्य झाला. ते सर्व राहो.
प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत, माणूस मृत झाला तरी त्याची जीवशक्ती, त्याच्या मृत शरीराच्या आसपास राहते असे मानीत असत व तिला संतुष्ट ठेवण्यासाठी, मृत शरीराबरोबर व त्या जीवशक्तीला उपयोगी पडाव्यात म्हणून ‘खाण्यापिण्याच्या वस्तू’ पुरण्यात येत असत. तसेच भारतात (शरीर दहन केलेल्या) मृताच्या आत्म्याला, खायला-प्यायला मिळावे म्हणून दसपिंड व श्राद्ध घालून, मृतात्म्याला जेवण दिले जात असे व ते कावळ्याने खाल्ले म्हणजे मृताच्या आत्म्याला मिळाले असे मानीत असत. मात्र अशा प्रकारची चराचरांत वास करणाऱ्या जीवशक्तीच्या अस्तित्वाची आदिम समजूत, आजही हिंदू धर्मीयांत मानली जाते असे दिसते. मृतात्म्याला कावळ्यामार्फत दरसाल जेवण देण्याची वार्षिक श्राद्ध ही ती पद्धत, हिंदू धर्म तत्त्वज्ञानांतील कर्मफलसिद्धान्ताधारित ‘पुनर्जन्माच्या तत्त्वज्ञानाशी चक्क‘विसंगत’ आहे, कारण शरीर मृत झाल्यावर त्याच्या आत्म्याला जर मुक्ती मिळालेली असेल, तर तो आत्मा ईश्वराला जाऊन मिळालेला असतो आणि जर त्या आत्म्याला मुक्ती मिळालेली नसेल, तर तो कर्माची फळे भोगण्यासाठी कदाचित स्वर्ग-नरकात किंवा दुसऱ्या पुनर्जन्मात गेलेला असतो. तर मग श्राद्धाचे ते जेवण कावळ्यामार्फत घेण्यासाठी कुठला आत्मा शिल्लकराहतो? कदाचित काकबली देण्याची अशी पद्धत ही वेदान्त तत्त्वज्ञान सुचण्यापूर्वी प्रचलित असलेली पारंपरिक पद्धत असावी आणि वेदान्त तत्त्वज्ञानाला मान्यता मिळाल्यावर जुनी परंपरा सोडून देण्याचे राहून गेले असावे असे वाटते.
भगवद्गीतेने उचलून धरलेली व आधुनिक काळात बदनाम ठरलेली ‘चातुर्वण्र्य व्यवस्था’ ही ‘आत्मा’ या संकल्पनेला व ‘कर्मफलसिद्धान्ता’ला एकत्र करून ताणून ताणून रचलेल्या ‘पूर्वजन्म व पुनर्जन्म’ या सिद्धान्तावर उभारलेली कल्पनांची भरारी आहे. दरिद्री व अन्यायग्रस्त ऐहिक जीवन जगणाऱ्या दुर्दैवी जनतेने त्याविरुद्ध बंड करून उठू नये यासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने त्या कल्पनारंजनाला धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे.

 

First Published on August 31, 2015 12:42 pm

Web Title: work philosophy theorem
टॅग Philosophy,Theorem,Work
 1. A
  anil
  Sep 5, 2015 at 12:10 pm
  ईशावास्य उपनिषदात मात्र याच्या उलट म्हणजे ‘कर्मे करीत शंभर वर्षे जगण्याची इच्छा ठेवावी, कर्मे माण मुळीच चिकटत नाहीत’ असे स्पष्ट म्हटलेले आहे. -- इशोप्निषद चा अर्थ एका वाक्यात सांगणे बरोबर नाही . जगात कोणताही सिद्धांत perfect नाही . अगदी physics चा quatum mechanics देखील . पण आपल्या वाटेला आलेली duty केली तर सरकार व न्यायालय देखील शिक्षा करत नाही या मताच्या जवळ चा हा कर्म सिद्धांत आहे .
  Reply
  1. S
   sandip
   Aug 31, 2015 at 4:01 am
   अर्धवट माहितिला ज्ञान समजून पूर्वग्रह दुषित विचारांनी िष्णू हिंदू चर्म परंपरांवर सतत आत टीका करत राहणे हा एक प्रसिध्धीचा आणि अर्थार्जनाचा सोपा मार्ग आपण निवडला आहे असे दिसते त्यासाठी आभिनंदन
   Reply
   1. Dinesh Joshi
    Aug 31, 2015 at 10:00 pm
    १: "चातुर्वण्य" हा अश्लाघ्य प्रकार कुठल्याही संदर्भात घृणास्पद आहे आणि कुठल्याही पद्धतीने किंवा स्पष्टीकरणाने समर्थनीय नाही. जुन्या पुराण, वेद इत्यादीत त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन असेल तर तो भाग पूर्णपणे त्याज्य आहे. भले तो ब्राह्मणांनी लिहो किंवा कोणीही लिहो! अर्थात ते वाईट याचा अर्थ त्या लिखाणातील इतर सर्व गोष्टी वाईट असा होत नाही.
    Reply
    1. Dinesh Joshi
     Aug 31, 2015 at 10:03 pm
     २: कुठल्याही धर्मात आचरणाचे कर्मकांड आले की तो विकृत बनतो. ख्रिश्चनात पावावर वाईनचा प्रसाद आणि मुस्लिमांनी विशिष्ठ दिशेला तोंड करून नमाज पढणे किंवा पढताना ठिक्करचकती वापरणे या तसल्याच कर्मकांडाच्या गोष्टी आहेत. पुनर्जन्म जितका भोंदू असेल तितकेच जन्नतमध्ये ७० स्त्रिया आणि येशूचे पुनरुत्थान भोंदू आहे. अशावेळी एकच धर्म घेऊन बडबडण्याला काय अर्थ आहे?
     Reply