21 January 2018

News Flash

म्हाळगी प्रबोधिनी : कार्यकर्ता घडविण्याचा संस्थात्मक प्रयत्न

लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थाचालकांसाठी प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन या माध्यमांतून काम करीत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा त्रिदशकपूर्ती सोहळा २२ जानेवारी रोजी साजरा होत आहे.

Updated: January 20, 2013 12:08 PM

लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थाचालकांसाठी प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन या माध्यमांतून काम करीत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा त्रिदशकपूर्ती सोहळा २२ जानेवारी रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संस्थेच्या संचालकांनी घेतलेला आढावा..
१९८२ मध्ये स्थापन झालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कामाची १९८८ च्या फेब्रुवारी महिन्यात वडाळ्याच्या चंचल स्मृती कार्यालयातून सुरुवात झाली तेव्हा संकल्पनात्मक पातळीवर असलेल्या या संस्थेचा व्यावहारिक रोड मॅप खूपसा ठरायचाच होता. राजकीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण, हे सर्व संकल्पनात्मक पातळीवर खूप आकर्षक होते. (आजही आहेच!), पण व्यवहारात प्रशिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याचे काय? अशा प्रशिक्षण संस्थेकडे कितपत गांभीर्याने बघितले जाईल? प्रशिक्षण आणि प्रबोधन याबरोबरच संशोधनाला महत्त्व द्यायला हवे असे तेव्हापासून प्रबोधिनीबरोबर असलेल्या प्रा. बाळ आपटय़ांचे आग्रही मत होते, पण हे संशोधन कसे घडून येईल? कोणाकडून? समाज त्याकडे कसे पाहील? प्रश्न तर खूपच होते. कार्यकर्त्यांचा व कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र समूह नव्हता, त्यामुळे मनात धाकधूक होती. म्हाळगींचे नाव, त्यापुढे ‘प्रबोधिनी’ हा भारदस्त शब्द. त्याचेही दडपण होते, पण वसंतराव पटवर्धन आधार द्यायला होते. त्यांनी सल्ले दिले, मदत केली आणि नेहमी स्वागतशील दृष्टिकोन बाळगला. त्यांच्या या खुलेपणातूनच आणखी बळ मिळत गेले.
प्रबोधिनीचे आद्य आणि त्या वेळचे एकमेव कार्यकर्ते म्हणजे गोपाळराव महाडिक. १९८८ च्या मे महिन्यात सामाजिक कार्यकर्त्यांसाठी भाषणकला आणि संवाद कौशल्यांवर आम्ही पहिला प्रशिक्षण वर्ग योजला तो शिवाजी पार्कवर नागरिक-संघाच्या सभागृहात. कार्यकर्त्यांसाठी अशा स्वतंत्र, विशिष्ट कौशल्यांना वाहिलेल्या प्रशिक्षणाची संकल्पना तशी नवीनच होती. मोठय़ा मेहनतीचे आम्ही प्रशिक्षार्थी जमा केले. वर्षां पवार (तावडे), शरदमणी मराठे असे काही आमचे प्रशिक्षार्थी. अशोक मोडक एक-दोन विषय मांडायला आले होते. बॅनर, माइक, नोंदणीचे फॉम्र्स असा सगळा जामानिमा गोळा करणारे कार्यकर्ते म्हणजे मी आणि मदतीला गोपाळराव महाडिक! पुढे याच विषयात, विशेषत: व्हाइस कल्चर हे मुख्य सूत्र धरून आम्ही डॉ. अशोक रानडय़ांच्या मदतीने बऱ्याच कार्यशाळा केल्या. एका कार्यशाळेच्या समारोपाला मधुकर तोरडमल जातीने हजर होते. जनसंघ काळापासून सक्रिय असलेले सुधीर नांदगावकर सुरुवातीपासून प्रबोधिनीच्या कामाबद्दल आस्था बाळगणारे! त्यांचे कार्यालय चंचल स्मृतीच्या वाटेवरच. त्यामुळे बरेचदा भेटी व्हायच्या. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधूनच पुढे सामाजिक कार्यकर्त्यांसाठीच्या (बहुधा एक्सक्लूझिव अशा पहिल्या) चित्रपट महोत्सवाची कल्पना पुढे आली. मग आम्ही ‘स्पंदन १९८९’ या नावाने तीन चित्रपटांचे स्क्रीनिंग आणि नंतर चर्चा असा ‘आदिवासी-वनवासींचा जीवनसंघर्ष’ अशा विषयसूत्रावरचा छोटेखानी महोत्सव दादरला ब्रॉडवे मिनी थिएटरमध्ये घडवून आणला. ‘मृगया’, ‘जैत रे जैत’ इत्यादी सिनेमे त्यात दाखविण्यात आले. श्रीराम लागू, राजदत्त ही मंडळी उद्घाटनाला आली होती. पुढे असाच महोत्सव २००४-०५ च्या सुमारास आम्ही उत्तन, भाइंदरला उभ्या राहिलेल्या प्रबोधिनीच्या संकुलात केला. त्या वेळी सत्यजित राय यांची ‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ ही तीन चित्रपटांची मालिका दाखवून त्यावर चर्चा घडवून आणण्यात आली. अशा चित्रपट महोत्सवांच्या आयोजनामागे कार्यकर्त्यांची कला-जाणीव प्रगल्भ व्हावी आणि त्या विश्वाच्या ताकदीचे व मर्यादांचेही भान त्याला यावे अशी भूमिका होती.
संशोधनपर काही उपक्रम करायला हवे हे पहिल्यापासून मनात होतेच, पण ते घडून यायला निमित्त झाले ते पत्रकार म्हणून स्थान मिळविलेल्या, पण आपल्या मनस्वी आणि काहीशा चक्रम स्वभावासाठी प्रसिद्ध पावलेल्या आणि अकाली दिवंगत झालेल्या प्रकाश कोळवणकर याच्या महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त भागात जाऊन पाहणी करण्याच्या इच्छेचे! महाराष्ट्रात जम बसवू पाहणाऱ्या नक्षलवादी चळवळी संदर्भात प्रकाशकडे इच्छा होती, आम्हाला नक्षलवादी चळवळी संदर्भात असा मन:पूर्वकतेने काम करणारा अभ्यासक हवा होता. त्या काळात प्रबोधिनीचं ‘नाव’ वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता, पण रामभाऊ म्हाळगी लोकांच्या स्मरणात अजून ताजे होते. त्यामुळे त्या दबदब्याचा लाभ घेऊन, प्रबोधिनीच्या लेटरहेडवरचे पत्र घेऊन प्रकाश कोळवणकरचे एकसदस्यीय अभ्यास पथक गडचिरोली-चंद्रपूरला रवाना झाले. महिनाभर भटकंती करून प्रकाश परतला आणि त्याने एक अहवालही तयार केला. स. ह. देशपांडे, मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागात त्या वेळी शिकविणारे, पण चिंतन-मंथनात पुढाकार घेणारे व्ही.जी. देशपांडे अशांच्या मदतीने तो अहवाल आम्ही आणखी नेटका केला आणि मी आणि प्रकाशने स्वत:च वृत्तपत्रात जाऊन प्रेस-नोटसह तो वितरित केला. त्या अहवालात गडचिरोली-चंद्रपूर परिसरात नक्षलवाद्यांशी मुकाबला करणाऱ्या पोलिसांना अरुंद आणि पुरेशी देखभाल न केलेल्या खराब रस्त्यांमुळे किती समस्यांना सामोरे जावे लागते त्याचा तपशीलवार उल्लेख होता. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आमच्या या अहवालाची बातमी वाचली आणि ‘तुमच्यामुळे आमच्या अडचणी वेशीवर टांगल्या गेल्या, त्याबद्दल धन्यवाद!’ असं म्हणत समाधान व्यक्त केलं!
पुढे १९९० मध्ये प्रमोद महाजन प्रबोधिनीचे अध्यक्ष झाले आणि प्रबोधिनीला एक समर्थ पालक मिळाला. १९९३ मध्ये त्यांच्या उपस्थितीत आम्ही चंचल-स्मृतीमध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची सुरुवात केली. दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे त्या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून हजर होते. लिंबाळे यांना आमच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल बऱ्यापैकी टीका सहन करावी लागली. वैचारिक अस्पृश्यता त्या काळात शिखरावर होती, पण सुरुवातीपासून प्रबोधिनीतील आम्हा सर्वाचा दृष्टिकोन या अस्पृश्यतेवर मात करून पुढे जाण्याचाच राहिला. त्यामुळेच प्रा. राम शेवाळकर, श्री. ग. मांजगावकर, प्राचार्य राम जोशी, बानी देशपांडे, विजय तेंडुलकर, अशोक रानडे, अरुण टिकेकर, दिनकर गांगल, कुमार केतकर, निखिल वागळे, विलासराव साळुंखे असे विविध विचारधारांचे किती तरी विचारवंत, प्रवक्ते प्रबोधिनीच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी प्रबोधिनीच्या कार्याची नोंदही घेतली. ९४-९५ च्या आसपास मुस्लीम सत्यशोधक समाजाची २५ वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात आम्ही सैयदभाईंचा विशेष सत्कार घडवून आणला. २००२-०३ मध्ये चेन्नईच्या एका ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संस्थेने ‘कम्युनिटी कॉलेज’ संकल्पना यशस्वीपणे राबविल्याची सर्वदूर चर्चा होती. या प्रयोगामुळे बेरोजगारांची रोजगार क्षमता किती तरी पटीने वाढल्याचे ही समजले होते. आम्ही या मिशनरी संस्थेच्या सहकार्याने या संकल्पनेवरच दोन दिवसांचे चर्चासत्र योजले. जळगावच्या राजेंद्र नन्नवरे या कार्यकर्त्यांने पुढाकार घेतला आणि  केशवसृष्टीत १५-२० जोगिणी आणि ख्रिस्ती धर्मगुरूंसह ५०-६० शिक्षणसंस्था चालकांचा सहभाग असलेले चर्चासत्र नेटकेपणाने पार पडले. त्यातून पुढे महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षणसंस्थांनी कम्युनिटी कॉलेजेस सुरू केली.
प्रमोद महाजन संस्थेचे अध्यक्ष आणि गोपीनाथ मुंडे, (सध्याचे अध्यक्ष) बाळ आपटे, वसंतराव पटवर्धन इ. मुख्य पदाधिकारी! अशी सगळी मातबर, पण संस्था संचालनाची समज बाळगणारी माणसे विश्वस्त मंडळावर असल्यामुळेच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, संस्थेची कार्यात्मक स्वायत्तता अबाधित राखली गेली. विषय, व्यक्ती, उपक्रम, प्रचार प्रसिद्धीतील ‘प्रोजेक्शन’ इ. कोणत्याच विषयात यापैकी कोणीही कधीही अमुकच करा, तमुकच नको अशा भूमिका घेतल्याची उदाहरणे जवळजवळ नाहीतच. त्यामुळेच कामातला आनंद अबाधित राखून प्रयोगशीलतेला वाव मिळत गेला. प. बंगालमधील साम्यवादी सत्तेचा अभ्यास, शालेय पाठय़पुस्तकांच्या शिक्षणमूल्यावर क्ष-किरण टाकण्याचा प्रकल्प, अफगाणिस्तानात भारतीय स्वयंसेवी संस्थांचे सदिच्छा मंडळ घेऊन जाण्याचा उपक्रम, दंगलग्रस्त भागातील पोलिसांच्या मानवाधिकारांची चिकित्सा, बीअरबारमध्ये काम करणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास, मतदान न करणाऱ्या मतदारांची मानसिकता जाणून घेण्यासाठी केलेले ‘मौन मतदार सर्वेक्षण’, महाराष्ट्रातील युद्धविधवांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करणारा ‘कृतज्ञता’ प्रकल्प अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांची मालिका प्रबोधिनी राबवू शकली ती या स्वायत्ततेमुळेच! त्यातूनच पुढे संयुक्त राष्ट्र संघाची ‘सल्लागार स्वयंसेवी संस्था’ म्हणून मान्यता मिळाली आणि नंतर युनोच्या सामाजिक-आर्थिक परिषदेच्या अधिवेशनात ‘लिंगभाव समानतेसाठी पुरुष प्रबोधन’ हा विषय मांडण्याची संधीही मिळाली.
गेल्या तीस वर्षांत प्रबोधिनीने दरवर्षी सरासरी २० प्रशिक्षण वर्ग योजले आणि १०००-१५०० सहभागींना प्रशिक्षित केले. विद्यापीठ अधिसभा सदस्यांपासून ते ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री अशा सर्वासाठी प्रबोधिनीने प्रशिक्षण वर्ग योजले आहेत. शिक्षण क्षेत्रातील संस्थाचालक, शिक्षक-प्राध्यापक आणि मुख्य म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रबोधिनी नित्य काम करीत आली आहे. सहकार क्षेत्रासाठीही प्रबोधिनी प्रशिक्षणाच्या विषयात सक्रिय आहे. युवक, महिला, वनवासी युवक, ईशान्य भारतातील युवक, मुस्लीम समाजातील कार्यकर्ते, पत्रकार अशा अनेकांपर्यंत प्रबोधिनीने त्यांच्या क्षमता विकासासाठीचा आपला प्रयत्न पोहोचविला आहे. सन २००० मध्ये भाइंदरच्या केशवसृष्टीत प्रबोधिनीचे प्रशिक्षण संकुल उभे राहिले, त्यामुळे प्रबोधिनीच्या संस्थात्मक व्यापाला एक देखणे व्यक्तिमत्त्वही मिळाले.
लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण आणि लोकशाहीचे शिक्षण या संकल्पनांवर लेस्ली सॉनी सेंटरने सुरुवातीला खूप काही करून पाहण्याचा प्रयत्न केला. प्रबोधिनीने या संकल्पनेला व्यापक आधार दिला. प्रबोधिनीचा स्वाभाविक संबंध भारतीय जनता पक्षाशी असला तरी शिवसेना, म.न.से., शे.का.प. इत्यादी अनेकांचे कार्यकर्ते प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी येऊन गेले आहेत. ‘राजारामबापू पाटील प्रबोधिनी’ उभारण्याची कल्पना उरी बाळगणाऱ्यांनाही प्रबोधिनीचा अभ्यास करावासा वाटला. एका अर्थाने डॉ. वि. म. दांडेकरांनी पाहिलेले असे लोकशाही नेतृत्वशिक्षणाचे स्वप्न मर्यादित स्वरूपात का होईना, सत्यात उतरविण्याचा प्रयत्न प्रबोधिनीमुळे घडून आला आहे.
स्वयंसेवी संस्था आणि शिक्षणसंस्थांसह इतर सर्व संस्थांसाठी संचालक, कर्मचारी, कार्यकर्ते अशा सर्वाची क्षमता विकासाची, प्रेरणा संवर्धनाची आणि भवतालाबाबत त्यांची समजूत वाढविण्याची गरज खूप व्यापक आहे, सततची आहे. प्रबोधिनीने ती हेरून विविधांगी उपक्रमांची एक शंृखला उभारली. त्या अर्थाने, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचे कार्य संस्थात्मक स्वरूपात आणि प्रदीर्घ काळ करीत असलेली प्रबोधिनी ही एकमेव संस्था म्हणायला हवी. एका मर्यादित संदर्भात का होईना, पण हा धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ‘मेंटरिंग’ला संस्थात्मक रूप देण्याचा एक प्रयत्न म्हणता येईल.
तीस वर्षांत प्रबोधिनीने नेमके काय साधले? हा विचारण्याजोगा प्रश्न आहे. संस्था संचालनाच्या विविध टप्प्यांवर या प्रश्नाची उत्तरे शोधायलाच हवीत. प्रगतीला अर्थातच खूप वाव आहे; पण प्रबोधिनीने आपल्या मर्यादित ताकदीच्या जोरावर चांगल्या कार्यकर्त्यांला ‘स्मार्ट’ होण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला असे नक्की म्हणता येईल. स्वयंसेवी कार्य, समाजकारण, संघटना बांधणी अशा घरचे खाऊन लष्कराच्या भाक ऱ्या भाजणाऱ्या सर्वच क्षेत्रांत ‘चांगली माणसे सक्षम नाहीत आणि सक्षम माणसे अनेकदा जेवढी असायला हवीत तेवढी चांगली नाहीत’ असा सार्वत्रिक अनुभव आहे. चांगली माणसे अनेकदा यशाच्या मार्गावर अडखळण्यामागेही तेच महत्त्वाचे कारण आहे. अशा स्थितीत चांगल्यांचा चांगुलपणा टिकवून त्यांची क्षमता वाढविणे हे सार्वत्रिक आव्हान आहे. प्रबोधिनी आपल्या परीने ते पेलण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच अनुषंगाने हेही म्हणता येईल, की सर्वदूर एक विस्कळीतपणा आलेला असताना, संस्था आणि संघटना ‘आजारी’ पडत असताना, सक्षम नेतृत्वाची उणीव सर्वव्यापी होत असताना संघटन शास्त्र, नेतृत्व शास्त्र आणि संस्थाबांधणी शास्त्राला रूढ कॉर्पोरेट व्यवस्थापन शास्त्राच्या चौकटीबाहेर काढून सामाजिक-सांस्कृतिक संघटनांच्या संदर्भात विचारात घेण्याची गरज आहे. या दिशेने प्रबोधिनीने थोडे फार काम केले आहे, पण अजून खूप काही करण्याचे बाकी आहे. भविष्यात हे सर्व करण्याची ताकद प्रबोधिनीला मिळावी हीच त्रिदशकपूर्तीच्या टप्प्यावरची अपेक्षा.

First Published on January 20, 2013 12:08 pm

Web Title: worker making organizational try
  1. No Comments.