जीवसृष्टीच्या नानाविध पातळींवरचे घटक सतत स्वतचे अस्तित्व सांभाळण्यासाठी आणि स्वत:ची संतती वाढवण्यासाठी झटत असतात. यातून जसा पराकोटीचा अप्पलपोटेपणा उपजतो तसाच निस्सीम स्वार्थत्यागही.
उत्क्रान्तीला दिशा मिळते, गती दिली जाते ती प्रामुख्याने निसर्गनिवडीच्या- नॅचरल सिलेक्शनच्या- प्रक्रियेतून. ही प्रक्रिया कुठे कुठे अपेक्षित आहे? जिथे पुनरुत्पादन घडते व नव्याने उपजलेल्या प्रती बहुतांश मुळासारख्याच, तरी अधूनमधून थोडय़ा बदललेल्या असतात तिथे, आणि अशा बदललेल्या प्रतींच्यात जे वेगळे गुणधर्म निर्माण होतात, त्यांचा त्या प्रती तगण्यावर, फळण्यावर परिणाम होऊ शकतो, तिथे तिथे. एवंच प्रजनन, आनुवंशिकता आणि वैविध्यनिर्मिती यांच्या त्रिवेणी संगमातून निसर्गनिवडीची प्रक्रिया राबवतो, सृष्टीला अफाट वैविध्याने नटवतो. ही प्रजननशील सृष्टी त्रिविध आहे : प्रथम अस्तित्वात आलेली जीवसृष्टी आणि तिच्या जोडीलाच क्रमेण अवतरलेली मानवनिर्मित कल्पसृष्टी व कृत्रिम वस्तुसृष्टी.
अर्थात या लेखमालेत आपला रोख आहे जीवसृष्टीवर. जीवन अखेर काय आहे? निवडक शे-दीडशे प्रकारच्या रेणूंचा सहकारी संघ. या रेणूंच्यात ज्येष्ठतम आहेत, आरएनएचे रेणू. जीवनारंभी आरएनएचे रेणू पुनरुत्पादनासाठी जरूर असलेली माहिती पुरवत होते, आणि पुनरुत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरणाही देत होते. उत्क्रान्तीच्या पुढच्या टप्प्यात या दोन भूमिकांची श्रमविभागणी होऊन माहिती सांभाळण्याची, सूचकाची भूमिका आरएनएच्या दादांनी, ‘डीएनए’ने स्वीकारली, तर रासायनिक प्रक्रियांचा वेग वाढवायचे, प्रेरकाचे काम प्रोटीन्स बजावायला लागले. प्रत्येक जीवात बोधवाहक डीएनएचे अनेक अंश असतात, हे आहेत सर्व जीवांच्या आनुवंशिकतेचा मूलाधार. या अंशांना जनुक म्हणतात. उदाहरणार्थ, मानवाच्या प्रत्येक पेशीत असे ३० हजार वेगवेगळ्या रचनांचे जनुक असतात. जीवांच्या व्यापारात या जनुकांच्या नवनव्या प्रती बनवल्या जातात. तेव्हा जनुक हेच प्राथमिक प्रजनक, पायाभूत पुनरुत्पादक आहेत. सगळा जीवनव्यापार हा जनुकांची टिकण्याची व अधिकाधिक प्रती बनवण्याची एक स्वार्थी शिकस्त आहे.
म्हणतात की अंडय़ाची अधिक अंडी बनवण्याचे साधन आहे कोंबडी. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत प्राणिमात्र हे जनुकांचे, म्हणजेच डीएनए रेणूंचे अधिक डीएनए रेणू बनवण्याचे साधन आहेत. तेव्हा जीवसृष्टीत पदोपदी नजरेस पडणारी स्वार्थपरायणता जनुकांच्या पातळीवर सुरू होते. याचाच एक आविष्कार म्हणजे अनेक जनुकांचा कामचुकारपणा. गेल्या काही वर्षांत मानवाच्या आणि इतर अनेक जीवजातींच्या साऱ्या जनुकसंघांचा अणू-रेणूंच्या पातळीवरचा अभ्यास बऱ्याच अंशी पुरा झाला आहे, आणि उमगले आहे की, या पातळीवरही संघांतले थोडेच सदस्य सगळे कष्ट उपसतात. इतर सारे फुकटे, ऐदी आहेत. सर्व प्रगत जीवांचा व्यापार चालवतात. पाच-दहा, फार तर २०-३० टक्के जनुके; बाकीचे सारे खुशालचेंडू आहेत. मूठभर कष्टाळू जनुकांच्या जोरावर हे आयतोबा स्वत:च्या नव्या प्रती बनवून पुढच्या पिढीत दाखल होतात. जीवसृष्टीतला हा अप्पलपोटेपणा वेगवेगळ्या पातळींवर व्यक्त होतो. कोटय़वधी पेशींनी आपले शरीर बनलेले आहे. ह्या प्रत्येक पेशी स्वत:च्या प्रती बनवू शकतात. सामान्यत: ही पेशींच्या दुणावण्याची प्रक्रिया संपूर्ण जीवाच्या नियंत्रणात असते. पण अधूनमधून कीटकनाशकांसारखे जहर पिऊन काही पेशी उत्तेजित होतात आणि त्यांच्या अर्निबध उपजेतून कर्करोग उफाळतो.
पण जीवसृष्टीतल्या स्वार्थपरायणतेचे आविष्कार प्रकर्षांने व्यक्त होतात वैयक्तिक जीवांच्या पातळीवर. परोपकारी वृक्ष स्वत: ऊन सोसत दुसऱ्यांना सावली देतात ही केवळ कविकल्पना आहे. वृक्ष सावली पाडतात, स्वत:ला सूर्यप्रकाश हवा या स्वार्थासाठी आणि जोडीने प्रतिस्पर्धी वनस्पतींवर कुरघोडी करण्यासाठी. पण अप्पलपोटेपणाची खाशी उदाहरणे भेटतात प्राणिजगतात, अगदी चितळासारख्या  ‘देखा किती रम्य डोळे, कसा रंग। दावी कसे पादलालित्य सारंग!’ अशा मोहक मृगातसुद्धा. चितळ हा एक समाजप्रिय पशू आहे, आणि म्हणून त्याचे सौंदर्य आपल्या डोळ्यात आणखीच भरते. त्यांचे मोठमोठे कळप हमखास रोज संध्याकाळी मनुष्यवस्तीच्या आसमंतातल्या माळरानांवर जमतात आणि रात्रभर िहस्र श्वापदांपासून जरा कमी धास्ती असलेल्या अशा या मनुष्यवस्तीच्या परिघावर तळ ठोकतात. रात्रभर साद देत राहतात.
हे कळप जसे माणसांचे लक्ष वेधून घेतात, तसे त्यांच्या भक्षकांचे- वाघ, बिबटे, रानकुत्र्यांचेही. हा धोका रात्रंदिन भेडसावत असतो, आणि म्हणून ही हरणे सतत सावध असतात. जरा संशय आला की ‘कुक-कुक’ आवाज काढत धोक्याचा इशारा देतात, पुढच्या पायाचा खूर आपटतात, शेपटी वर करून पुठ्ठय़ावरचे पांढरे निशाण फडफडवतात. वाटेल की िहस्र पशूंची अशी चाहूल लागली की सगळे मिळून आपल्या िशगा-खुरांच्या बळावर प्रतिकार करायला पाहतील, किंवा सूंबाल्या तरी करतील. चिंकारा, काळविटांसारख्या इतर काही हरणांच्या जाती असा पळ काढतात, पण चितळांचे कळप यातले काहीच करत नाहीत. रानकुत्र्यांची शिकारीला सज्ज अशी एखादी टोळी आपल्या रोखाने येते आहे असे दिसले की सगळी हरणे एकमेकांकडे धावत येऊन एक घोळका बनवतात, आणि मग प्रत्येक हरीण इतरांना ढुशा मारत त्या घोळक्याच्या आत घुसायला बघते. या घुसा-घुशीत दाक्षिण्य, वात्सल्य अशांचा काहीही सवाल नसतो. प्रत्येक हरीण केवळ स्वत:ची चामडी कशी वाचवायची याचा विचार करत दुसऱ्यांना ढकलून आत शिरायला बघते. हेतू एकच; आपल्या सभोवती दुसरी हरणे असली पाहिजेत, जेणेकरून आपल्या आधी दुसऱ्यांचा बळी जाईल. या दंगलीत मोठे सशक्त नर पार आत शिरतात, माद्या, पिल्ले बाहेर रेटली जातात, शिकारीला बळी पडतात. शेवटी ‘का मारिती श्वान पिल्लांस निष्पाप? हो दुर्बलांनाच मोठा जगी ताप।’ अशी गती येते.
हरणांसारखीच अप्पलपोटी आहेत काळतोंडी वांदरं. अशा वांदरांच्या कळपात एखादा बलदंड हुप्प्या आपली हुकमत गाजवतो. साऱ्या माद्या असतात त्याच्याच अंत:पुरात, इतर नर सक्तीने ब्रह्मचारी. पण हे ब्रह्मचारी काही मुकाटय़ाने ऐकून घेत नाहीत. हुप्प्याशी संधी मिळेल तसे भांडत राहतात. कालक्रमेण एक दिवस तो हुप्प्या कमकुवत होतो, झगडय़ात हरतो, आपले स्थान गमावतो. त्याची जागा पटकावणाऱ्या नव्या नराला आपली पिल्लावळ वाढवायची महाघाई असते. जोवर माद्यांजवळ लहान पिल्ले असतात, त्यांना त्या पाजत असतात, तोवर त्या पुन्हा माजावर येत नाहीत. तेव्हा अशा सत्तांतरानंतर प्राणिजगतातल्या क्रौर्याची परिसीमा आपल्याला पाहायला मिळते. नव्याने वरचढ बनलेला हुप्प्या अशा माद्यांमागे लागतो, त्यांची पिल्ले हिसकावून घेऊन त्या पिल्लांना ठार मारतो. मग त्या बिचाऱ्या आया लवकर माजावर येतात, नव्या हुप्प्याची पिल्ले आपल्या पोटात वाढवायला लागतात. अशा स्वार्थी नराच्या अशा क्रूर वागण्याच्या आनुवंशिक प्रवृत्ती निसर्गाच्या निवडीत पुढच्या पिढीत व्यवस्थित उतरतात, फैलावत राहतात.
पण आपली अजब दुनिया एकरंगी, एकसुरी बिलकूलच नाही. निसर्गनिवडीच्या प्रक्रियेतून तिच्यात एकाच वेळी पराकोटीच्या अप्पलपोटेपणाबरोबरच निस्सीम स्वार्थत्याग, निर्दयतेच्या, निर्घृणतेच्या जोडीलाच माया आणि वात्सल्य अशा विभिन्न प्रवृत्ती उपजल्या आहेत. हे कसे घडले हे समजावून घेणे हा उत्क्रान्तिशास्त्रातला एक मोठा रोचक पाठ आहे. यथावकाश आपण त्याकडे अवश्य वळू या.
लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.