संयुक्त राष्ट्रांनी देशोदेशींचे नागरिक कितपत आनंदी आहेत याचेही मोजमाप करण्यास गेल्या चार वर्षांपासून सुरुवात केली, त्या मालिकेतील ताजा अहवाल आला आहे.. या अहवालात कोणाचे स्थान कितवे, त्याची कारणे कोणती, याबरोबरच भारतीयांसाठी आनंद आणि समाधान म्हणजे काय याचाही विचार व्हायला हवा..
सीने में जलन, आँखो में तूफान सा क्यूं है.. या शहरयार यांच्या सवालाचे उत्तर आम्लपित्त असे खचितच नाही. विकास नामक क्षितिजसम संकल्पनेमागे धावत सुटलेला माणूस, त्यातून वाढलेले नागरीकरण आणि त्यामागून येणाऱ्या व्यथा, वेदना यांच्यात त्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. हा प्रश्नही असा विनाकारण आलेला नाही. त्याला आस आहे ती सुखाच्या शोधाची. आनंदाची, सुखाची सुवर्णखाण शोधण्याचा माणसाचा प्रयत्न आजचा नाही. भीमबेटकातील गुहांमध्ये चित्रे रंगविणाऱ्या हजारो वर्षांपूर्वीच्या माणसाचाही तो होता आणि आज तर अधिकच आहे. समस्या हीच आहे की सुख, समाधान कशाला मानावे हेच आपले नीट ठरलेले नाही. आपला देश भौतिकवादी नसल्याचे आपल्याला कोण कौतुक. आम्ही म्हणजे अध्यात्मवादी हे आपण जगाला गर्वाने वगैरे नेहमीच सांगत असतो. सामान्यत: सर्वसामान्यांची धाव चित्ती असू द्यावे समाधान एवढय़ा अध्यात्मापर्यंतच जाते. पण असे नुसते म्हटल्याने काही समाधान मिळत नसते. सर्व जग ही माया आहे असे म्हटल्याने प्रश्न सुटत नसतात. कारण ते प्रश्न या जगातलेच असतात आणि त्यांची उत्तरेही याच जगात शोधायची असतात. तेव्हा मनात समाधान असू द्यावे म्हटले तरी मुळातच त्यासाठी काही तरी कार्यकारण लागतेच. पण नेमके ते ‘काही तरी’ म्हणजे काय? बरे जे एका माणसाचे तेच समाजाचे असते का? एकाचा आनंद दुसऱ्याच्या वेदनांना कारण ठरू शकतो का? माणसाचे समाधान, व्यक्तीचा आनंद आणि समाजाचे, पर्यायाने देशाचे समाधान यात काही फरक असतो का? की ते काही भिन्नच असते? प्रश्न अनेक आहेत. गेल्या पाचेक हजार वर्षांपासून त्यांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्नही सुरूच आहेत. त्यातलाच एक ताजा, छोटासा आणि अत्यंत भौतिकवादी प्रयत्न आहे तो संयुक्त राष्ट्रांचा.
गेल्या चार वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांनी याबाबतचा एक उद्योग सुरू केला आहे. आनंदी, सुखी, समाधानी देशांचा शोध घेण्याचा. आता जेथे एक आनंदी माणूस सापडणे कठीण तेथे देशच्या देश शोधणे म्हणजे अवघड आणि अगडबंब काम. परंतु संयुक्त राष्ट्रांनी ते अंगावर घेतले. गॅलप पोलसारख्या सर्वेक्षण क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांची मदत घेतली. जगभरातील विविध देशांत जाऊन तेथील नागरिकांशी बोलून त्यांच्या सुख-समाधानाला अभ्यासपूर्ण फुटपट्टी लावली. त्यातून २०१२ साली पहिली आनंदी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात पहिल्याच स्थानी नाव होते आपल्या शेजाऱ्याचे. भूतानचे. हिमालयाच्या कुशीतला, दोन महासत्तापदाभिलाषी राष्ट्रांच्या सावलीत अंग चोरून जगणारा हा इवलासा देश. त्याचे इवलेसे राजकीय महत्त्व. त्याची इवलीशी अर्थव्यवस्था. आणि या अशा देशातील नागरिक हे जगातील सर्वात आनंदी लोक असावेत हाच अनेकांसाठी मोठा धक्का होता. त्या धक्क्याने एक झाले, की जगभरात हा आनंद निर्देशांक म्हणजे काय याची चर्चा सुरू झाली. अनेकांच्या मते हा म्हणजे काही तरी भंपकपणा होता. परंतु मुळात त्यामागे एक गंभीर विचार होता. विकासाच्या प्रतिमानाचा. जगातील विचारांची लढाई एव्हाना संपुष्टात आलेली आहे. सोव्हिएत संघराज्याच्या पतनाने सुरू झालेली साम्यवादी विचारांची पीछेहाट संगणकासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक गतिमान केली आहे. मात्र त्यातून आहे रे आणि नाही रे हे सनातन वर्ग काही संपलेले नाहीत. पूर्वी त्यांत आर्थिक दरी तर होती. आज त्यात अंकीय दरीची भर पडली आहे. संपत्तीची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होत आहे. परंतु त्याचे वाटप मात्र विषम आहे. दुसरीकडे पर्यावरणाचा विनयभंग हे तर रोजचे वास्तव आहे. अशा काळात, नग्न भांडवलशाहीच्या समोर उभा राहू शकेल असा विचार पुढे येणे क्रमप्राप्तच होते. आनंदाचा निर्देशांक हा त्या विचाराचा एक भाग आहे. हे सांगून झाल्यानंतर आता प्रश्न असा उभा राहतो की हा आनंद मोजला कसा जातो? हे सुख-समाधान मापले कसे जाते? त्यासाठी सहा मुद्दे विचारात घेतले जातात. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, आरोग्यमय जीवनमान, सामाजिक साहय़, स्वातंत्र्य, दानशूरता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण. सहसा देशांचा भर असतो तो सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) दरवाढीकडे. थोडक्यात आर्थिक समृद्धीकडे. त्यात एक गोष्ट हमखास विसरली जाते ती ही की समृद्धी, पण कोणाची? विकास, पण कोणाचा? यंदा संयुक्त राष्ट्रांनी आनंदी देशांची निवड करताना या मुद्दय़ावर अधिक भर दिल्याचे दिसते. देशाचा विकास महत्त्वाचा खरा, पण विकासाचा ताजमहाल कोणाच्या थडग्यावर उभा राहता कामा नये. तो शाश्वत असला पाहिजे. याचा अर्थ त्यात पर्यावरणस्नेह असला पाहिजे. तो तसा नसेल तर कदाचित माणसांच्या खिशात पैसा जरूर खुळखुळेल, पण त्या आर्थिक समृद्धीत सौख्य सामावलेले असतेच असे नव्हे. हे सर्व समजून घेतल्यानंतर यंदाच्या आनंदी देशांच्या यादीकडे पाहता येईल. या यादीमध्ये यंदा स्वित्र्झलडने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल आईसलँड, डेन्मार्क, नॉर्वे या स्कँडेनेव्हियन देशांचा क्रमांक लागतो. या यादीत भारत कुठे आहे?
भारतात चांगले दिवस अवतरल्याची द्वाही जगभर दिली जात आहे. पण येथील माणसांच्या मनांतील आनंदाचे डोहच आटल्यासारखे झाले आहे. १५८ आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताला स्थान मिळाले आहे ११७वे. आणि त्यात वेदनादायी गोष्ट ही की पाकिस्तान आणि बांगलादेश ही राष्ट्रेही भारताच्या वर आहेत. पाकिस्तानचा क्रमांक ८१वा, तर बांगलादेशचा १०९वा आहे. हे कमी की काय म्हणून गोळीबार आणि बॉम्बस्फोट हा जेथील जगण्याचा भाग आहे त्या पॅलेस्टिन, युक्रेन आणि इराकमधील नागरिकही भारतीय नागरिकांहून अधिक आनंदी आहेत. भारतीय नागरिकांच्या मनात आता कशानेच आनंदाचे तरंग उमटत नाही असा तर याचा अर्थ नाही? की आपण कशानेच समाधानी होत नाही? पण असे म्हणणे हा आपल्याच आध्यात्मिक वारशाशी आपण केलेला द्रोह ठरू शकतो. मग भारतासारख्या खंडप्राय देशातील अवघ्या हजार माणसांशी बोलून केलेले हे सर्वेक्षणच चूक आहे? तर तसेही म्हणता येणार नाही. या आक्षेपाला गॅलप आणि हे सर्वेक्षण प्रसिद्ध करणारी यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट सोल्यूशन्स नेटवर्क ही संस्था यांनी आधीच उत्तर देऊन ठेवले आहे. त्यानुसार हजार ही संख्या अशा सर्वेक्षणासाठी आवश्यकतेइतकी आहे. तेव्हा याचे उत्तर आपणास आपल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीतच शोधावे लागेल. आपल्याकडे हे सर्वेक्षण झाले ते लोकसभा निवडणुकीनंतर साधारणत: सहा महिन्यांनी. निवडणुकीच्या आधी राष्ट्र ज्या नकारात्मक मानसिकतेत गेले होते ती बदलण्यास एवढा वेळ पुरेसा होता असेही नव्हे. मतदानातून नागरिकांचे विरेचन झाले असेल असे म्हणावे तर या सहा महिन्यांतील परिस्थितीत भाषणबाजीखेरीज कोणताही दृश्य परिणाम दिसत नव्हता. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. कोणी म्हणत नव्हते, परंतु सर्वानाच जादूची प्रतीक्षा होती. हा काळ अशा सर्वेक्षणासाठी अवकाळच म्हणावा लागेल. त्या काळाचेच प्रतिबिंब या निष्कर्षांमध्ये उमटले असे म्हणता येईल.
एक मात्र खरे, की हे सर्वेक्षण काहीही सांगत असले तरी भारत हा अगदीच कुढत बसलेल्या दु:खीकष्टी लोकांचा देश आहे असे म्हणता येणार नाही. पण तो आनंदाच्या डोहात आकंठ बुडालेल्यांचाही देश नाही. या देशात पुन्हा एकदा फील गुडचे वारे घुमविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी त्या सर्वेक्षण निष्कर्षांचा ‘चित्ती नसू द्यावे समाधान’ एवढा अर्थ पुरेसा आहे.