आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक पंडित रविशंकर यांच्या वादनावर गेली साठ वर्षे लुब्ध असलेल्या शिष्योत्तमाने उलगडून दाखवलेले त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनोखे पैलू..
माझे मानसगुरू पं. रविशंकर यांचे नुकतेच निधन झाले आणि गेली साठ वर्षे मी ऐकलेल्या त्यांच्या मैफली आणि त्यांच्या सहवासातील क्षणांची एकदम आठवण झाली.
मला आठवणारी पहिली बैठक ५२ साली रात्री सांताक्रुज येथे कोपीकर हॉलमध्ये  झाली होती. त्यावेळी त्यांनी वाजवलेला ‘जयजयवंती’ अजून लक्षात आहे. देखणे तर इतके की साक्षात इंद्रच सतार घेऊन बसला आहे असे वाटावे. त्यांचे कुरळे केस, भावूक डोळे व पावलांचे गुलाबी तळवे सारेच आकर्षक होते. या देखणेपणाला शोभेल इतके देखणे वादनही चालले होते.
पुढे मुंबईला जितक्या मैफली झाल्या, त्या सर्व मी ऐकल्या. कोपीकर हॉलमध्ये झालेल्या मैफलीची बिदागी २५० रु. घेतल्याचे ऐकले होते आणि पाच-सात वर्षांपूर्वी पुण्याला झालेल्या कार्यक्रमाची बिदागी १४ लाख रु. ठरल्याचे आठवले. त्याचबरोबर देवधरांच्या शाळेत पं. विष्णू दिगंबर पलुस्करांच्या पुण्यतिथीला स्वत: काखेत सतार घेऊन येणारे रविशंकरही आठवतात. तिथे बिदागी तर नव्हतीच. पण टॅक्सीचे भाडेसुद्धा नव्हते. त्यावेळी षण्मुखानंदमध्ये चार, तीन, दोन आणि एक हजार अशी तिकिटेही दोन तासांत संपत होती.
त्यांच्या संपूर्ण मैफलीमध्ये सुंदर, बांधेसूदपणा असे. पहिला राग एक तास, मग धृपद-धमार, मग धून आणि मध्यंतर. त्यानंतर अशाच वेगळ्या क्रमाने रात्री सुरू झालेली बैठक सकाळी चारला संपायची. कलाकार व श्रोत्यांना कसलीच घाई नसे. सबर्बन् म्युझिक सर्कलचा कार्यक्रम पहाटे ३.३० ला संपला. लोकांनी विनंती केली की पहिली लोकल ५ वाजता आहे. तेव्हा त्यांनी आणखी एक तास ‘भटियार’ वाजवला. त्यांच्या मैफलींतूनच मला विद्या मिळत गेली.
एअर इंडियाने ठेवलेली पं. रविशंकरांची मैफल अविस्मरणीय होती. आमंत्रण पत्रिकेत असे लिहिले होते की, ‘पहिल्या जेट् विमानाचे उद्घाटन, आमच्या विमानातून सर्वात जास्त प्रवास करणारे पं. रविशंकर यांच्या हस्ते व नंतर त्यांचे सतार-वादन.’
समोर जेट् विमान, मध्ये श्रोते व विमानाच्या समोर रंगमंच. उद्घाटनानंतर पंडितजी म्हणाले, ‘विज्ञानाचे प्रतीक आपल्यासमोर आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी संगीतासारखे मनाला शांती देणारे जगात दुसरे काही नाही.’
पंडितजी व उस्ताद अल्लारखाँ स्टेजवर बसले व रविशंकरांनी मध्यलयीत रूपक वाजवायला सुरुवात केली. त्यांनी निरनिराळ्या लयीचे तिहाई असे काढले आणि अल्लारखांनी प्रत्येक सवालाला असा जबाब दिला की, प्रत्येक लयकारीला प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या दिल्या. अर्धा-पाऊण तास हे झाल्यावर त्यांनी एक तास ‘दरबारी’चे नुसते आलाप केले. सर्वजण शांतपणे ऐकत होते. पुढे त्यांनी ‘धून’मध्ये अनेक प्रकार करून, सर्वाना चकित करून द्रुत लयीतील गत घेतली व अर्धा तास ती इतक्या जलद लयीत नेली की सर्व श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. मध्यंतरानंतर पुन्हा असाच क्रम ठेवून पहाटे चारला कार्यक्रम संपला.
पंडितजींबरोबर बोलण्याचा अगदी पहिला प्रसंग १९६० साली आला. मी हाफकिन् इन्स्टिटय़ूटचे डायरेक्टर हजरा यांच्या मुलीला सतार शिकवायला जायचो. एकदा रात्री पंडितजींनी क्रॉस मैदानावर महाराष्ट्र संगीत महोत्सवात ‘जोग’ फारच छान वाजवला होता. दुसऱ्या दिवशी मी हजरांच्या घरी गेलो असता, त्यांना त्याबद्दल सांगितले, तेव्हा ते म्हणाले, ‘रवी बंबई में है क्या?’- ते ऐकून मला आश्चर्य वाटले. हे रविशंकरांना ‘अरे-तुरे’ करताहेत, मी सांगतोय त्याच पंडितजींच्या बद्दल बोलताहेत ना अशी मला शंका आली. पण ते बंगाली आणि रविशंकरही बंगाली, म्हणून म्हटलं ओळख असेल आणि त्यांनी राजेंद्र शंकरना (रविशंकरांचे बंधू) फोन लावला व रविशंकरांना फोनवर बोलावले.
हजरा- ‘क्या रवी, बंबई में आते हो और हमको पता भी नहीं? कल सुबह दस बजे मेरे घर आना!’- आणि नवल म्हणजे पंडितजी ‘हो’ म्हणाले. हजरा म्हणाले, ‘अभ्यंकरजी, तुम भी सुबह आना!’ मी साडेनऊलाच पोचलो. पंडितजी १० म्हणजे १० वाजता आले. मी त्यांच्या पाया पडलो. ते हजरांच्या पाया पडले. सौ. हजरा व त्यांची मुलगी अशा दोघी पंडितजींच्या पाया पडल्या आणि पंडितजींना आवडणारे मासळीचे अतिउत्तम पदार्थ समोर आले. पदार्थ पाहूनच सर्वाच्या तोंडाला पाणी सुटले. मी हे खात नाही म्हटल्यावर त्यांनी मला बशीतून दोन रसगुल्ले दिले. सगळे खाणे व गप्पा झाल्यावर हजरा त्यांना म्हणाले, ‘अरे रवी, कल तुमने ‘जोग’ बहुत अच्छा बजाया, अभ्यंकरजीने बताया!’ असे म्हणून त्यांनी मुलीला सतार आणायला सांगितली. ती सतार शिकण्यापुरतीच, बिनतरफेची होती. पण वाजायला खूप छान होती. ती सतार हातात देऊन त्यांनी पंडितजींना ‘जोग’ वाजवायला सांगितला. सतार मिळवून, पंडितजींनी दहा-पंधरा मिनिटे छान ‘जोग’ वाजवला व ते जायला निघाले. मला दादरला जायचे होते. तेव्हा हजरांनी ‘अभ्यंकरजी को दादर छोड देना’ असे त्यांना सांगितले. तेव्हा मी त्यांना ‘मी पं. नारायणराव व्यासांचा शिष्य आणि तुमचा पण शिष्य आहे. तुमचा बाज ऐकून वाजवतो’ असे सांगितले. ही त्यांची नि माझी पहिली भेट.
पुढे एकदा रवींद्र नाटय़मंदिरमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. तेव्हा ग्रीनरूममध्ये त्यांना भेटण्याकरिता मी दार उघडले तर आत बरेच शिष्य, चाहते बसले होते. म्हणून मी नुसता लांबूनच नमस्कार केला व निघालो. तेव्हा ते म्हणाले, ‘अरे, क्यो जाते हो, यहाँ आओ’ असे म्हणून मला त्यांनी जवळ बसविले व म्हणाले, ‘ये देखो, मैं एक लाइन बजाता हूँ, तुम्हारे समझ में आएगा, इसलिये दिखाता हँू’ असे म्हणून त्यांनी ‘नंद’ रागातली द्रुत एकतालातली एक ओळ १५-२० वेळा वाजवली. प्रत्येक वेळी निरनिराळ्या प्रकाराने ते समेवर येत. मी त्या लयकारीच्या अफाट ज्ञानाने थक्क झालो आणि पंडितजींनी मला बोलावून ती गत वाजवून दाखवली. याचा इतका आनंद झाला की मी त्यांच्या कार्यक्रमाला थांबलो नाही, तर त्यांनी दाखवलेले प्रकार विसरतील म्हणून घरी जाऊन ते लिहून काढले.
त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतरची गोष्ट. २००५ साली पंडितजींचा भाभा ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांचे वय ८७ होते. पण कार्यक्रम फारच रंगला. त्या वयातसुद्धा त्यांनी वरच्या लयीत तबलजीचा घाम काढला. सतार संपल्यावर मी त्यांच्या पाया पडलो व म्हटले, ‘पंडितजी, तुम्ही कमाल केलीत. पंडितजींनी माझ्याकडे पाहात आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले, ‘ये सितार अच्छी बजाते हैं, बंदिश भी बनाते है, और जोक्स बहुत अच्छे सुनाते हैं!’- ही सर्व नोंद पंडितजींनी कशी काय ठेवली याचे मला आश्चर्यच वाटले. पुढे ते मला म्हणाले, ‘तुझ्या बंदिशींबद्दल मी ऐकलं आहे. मला पुस्तक पाठवून दे.’
मी म्हटले, ‘तुम्ही, ‘ताजमहाल’मध्ये उतरला आहात. तिथे उद्या संध्याकाळी ६ वाजता शशी व्यासना घेऊन येतो.’ ‘सहा वाजता नक्की ये’ असे त्यांनी म्हटले.
मी शशी व्यासना म्हणालो, ‘आपण ५।। लाच खाली उभे राहू. बरोबर सहाला वर जाऊ, आम्ही खाली मोटारीत असताना पंडितजींचा फोन आला.
‘मी खाली जातोय, तुम्ही ६.२०ला वर या.’ एवढय़ा  जगज्जेत्या माणसाने आमचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून केलेला फोन म्हणजे मला कमालच वाटली.
मी बरोबर कॅमेरा नेला होता, मी शशीला म्हणालो, ‘त्यांच्याबरोबर माझा एक फोटो काढ.’ मी जवळ गेल्यावर त्यांनी मला मिठी मारली. मी माझी इच्छा बोलून दाखवल्यावर त्यांनी मला जवळ घेऊन फोटो काढू दिला. त्यांनी त्यांच्या शिष्यांना व तबलजीला बोलावले व म्हणाले, ‘ये बहुत गुणी आदमी है, उनके पाँव छूना!’- मी चटकन म्हटले, ‘छे! छे!  पंडितजींच्या समोर माझ्या पाया पडू नका.’ त्यांच्या सांगण्यावरून मी पंडितजींच्या मी ऐकलेल्या कार्यक्रमांची वर्णने त्यांना ऐकवली.
पंडितजींनी माझ्या बंदिशींचा संग्रह- ‘आराधना’ पाहिला व विचारले,
‘बंदिश बनाना बहुत कठिन है ना?’
मी म्हणालो,
‘आप के लिये तो कुछ भी कठीन नहीं!’
त्या दिवशी रात्रभर मी आनंदात नुसता तरंगत होतो!
हिंदुस्थानी सर्व रागांवर व सर्व तालांवर इतके हुकमी प्रभुत्व असलेला दुसरा कलाकार नाही. त्यांच्या वादनात बीन अंग, वीणेचे अंग, धृपद-धमार गायकीचे अंग या गोष्टी प्रमुख होत्या. त्यांनी सतारवादनाबरोबरची साथ पूर्णपणे बदलून टाकली. पूर्वीचे तबलजी वादकाबरोबर लयकारी करत. परंतु पंडितजींनी सतारीत केलेली लयकारी संपली की पुढच्या आवर्तनात तबलजींनी लयकारी करण्याची पद्धत सुरू केली. पूर्वी समेवर तिहाई संपायची, पंडितजींनी तिहाई संपल्यावर मुखडा पकडण्याची पद्धत सुरू केली.
मैफलीत येताना पंडितजी उत्तम मेक -अप करून येत. सर्व सुंदर दिसले पाहिजे असे त्यांना वाटे. त्यामुळे श्रोत्यांवरसुद्धा त्याचा अपेक्षित परिणाम व्हायचा. मोठमोठे डॉक्टर, वकील, न्यायमूर्ती, पोलीस ऑफिसर्स हे सर्व लेंगा-झब्बा घालून कार्यक्रमात येऊ लागले. कार्यक्रम वेळेवर सुरू करण्याच्या दृष्टीने श्रोत्यांना शिस्त लागावी म्हणून स्वत: वेळेवर येण्याचे बंधन त्यांनी घालून घेतले.
अमेरिकेत त्यांचा पहिला कार्यक्रम ज्या हॉटेलमध्ये होता तेथील हॉलमध्ये पडदा उघडल्यावर त्यांनी श्रोत्यांकडे पाहिले, तर सर्वजण दारूचे ग्लास घेऊन, बायकांच्या गळ्यात हात टाकून ऐकायला बसलेले! ते पाहून पंडितजींनी माइकवरून ‘आमच्या संगीताला हे वातावरण चालत नाही. तेव्हा हे सर्व बाजूला ठेवा, तरच सतार वाजवीन,’ असे सांगितल्यावर १० मिनिटांत चित्र बदलले. त्यांच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की, पुढे सर्व मैफलींत श्रोते व्यवस्थित बसू लागले.
सुरुवातीला अमेरिकेत जे जे कार्यक्रम झाले, त्यावेळी तिथल्या लोकांना झेपेल इतकेच ते वाजवीत. रागाची माहिती, तबल्याची माहिती, त्रितालच्या १६ मात्रा, झपतालच्या १० व द्रुत एकतालच्या १२ मात्रा असतात इ. सर्व समजावून देत. त्यामुळे सर्व श्रोते लक्ष देऊन ऐकत.
तेथील एका कार्यक्रमात त्यांचे आलाप चालू असताना अल्लारखाँ नुसत्या माना हलवत होते. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये परीक्षणात छापून आले होते की, अल्लारखाँ सुरुवातीला कितीतरी वेळ तबला वाजवायला ‘नाही, नाही’ म्हणत होते. पण पुढे त्यांनी तबला वाजवायला सुरुवात केली आणि कार्यक्रम खूप रंगला. या ‘नाही, नाही’चा उलगडा पंडितजींना पुढच्या मैफलीत करावा लागला.
बाहेरच्या जगाला ज्या ज्या गोष्टी नवीन होत्या, त्या सर्व गोष्टी त्यांनी श्रोत्यांना समजावून सांगितल्या. त्यांच्या भाषेत! त्यामुळे ते श्रोत्यांच्या फार जवळ गेले. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या तिन्ही भाषांत ते उत्तम समजावून देत.
पंडितजींचे अमेरिकेमध्ये हळूहळू नाव होत होते. एका रविवारी त्यांचा सकाळचा कार्यक्रम होता. जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक यहुदी मेनुहीन यांना रविशंकरांना भेटण्याची व त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची फार इच्छा होती. म्हणून त्यांनी पंडितजींना फोन केला. फोनवर पंडितजींनी त्यांना सांगितले की, ‘रविवारी मी जे वाजवणार आहे, ते उद्या-शनिवारी सकाळी घरी वाजवणार आहे. पाहिजे तर तुम्ही घरी या,’- त्याप्रमाणे ते घरी आले. रविशंकरांनी ‘भटियार’ राग वाजवायला घेतला होता. दोन छोटे तानपुरे, त्यांत मिळालेली सतार, जीव ओतून भटियारच्या स्वरांतून काढलेले आलाप आणि समोर व्हायोलिनचा बादशहा यहुदी मेनुहीन! आलाप चालू असताना पंडितजी जेव्हा जेव्हा कोमल रिषभ लावायचे, तेव्हा यहुदींच्या डोळ्यांत पाणी यायचे. ‘भटियार’ संपल्यावर त्यांनी विचारले, ‘पंडितजी, तुमच्या वादनाने मला रडू येतंय. इतर संगीत ऐकताना कधी रडू आल्याचं मला आठवत नाही!’ तेव्हा पंडितजींनी हिंदुस्थानी संगीतातील श्रुतींबद्दल त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर ते रविशंकरांचे भक्त झाले. काही कार्यक्रमात त्यांनी स्वत:हून निवेदन केले.
लिंडन जॉन्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना जागतिक कीर्तीच्या कलावंताला एक तास प्रेसिडेंटसमोर वाजवण्याची संधी मिळायची, त्यात रविशंकरांना त्यावर्षी बोलावले होते. पंडितजी सतार काढून लावत असताना प्रेसिडेंटच्या सेक्रेटरी त्यांना प्रेसिडेंट आल्यावर त्यांच्यापर्यंत कसे जायचे व हात मिळवायचा ते सांगत होता. रविशंकर त्याला म्हणाले, ‘मी अनेक पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष यांच्यासमोर सतार वाजवली आहे. तेव्हा नियम मला माहीत आहेत’
परंतु रविशंकरांना जॉन्सनपर्यंत जाण्याची वेळच आली नाही. स्वत: प्रेसिडेंट जॉन्सन त्यांच्यापाशी आले व त्यांनी हात मिळवला. खरे तर एक तास वादन करायचे होते. पण जॉन्सनना सतार इतकी आवडली की त्यांनी आणखी अर्धा तास वाजवण्याची विनंती केली. आणि कार्यक्रम संपल्यावर पुन्हा त्यांच्यापाशी जाऊन ‘पुन्हा याल तेव्हा मला फोन करा व जेवायला या’ असे आमंत्रणही दिले.
पं. रविशंकरांची अनेक थोर कलाकारांबरोबर झालेली जुगलबंदी ऐकण्याचे भाग्य मला लाभले आहे. पं. रविशंकर व उ.अलिअकबर यांची जुगलबंदी म्हणजे मेजवानीच असायची. दोघेही एकाच गुरूचे शिष्य. एकमेकांचे वादन पूर्णपणे माहीत. दुसऱ्याची कशी जिरवू असा भाव मुळीच नसे. एकमेकांना पूरक असे वादन असल्यामुळे त्यांचे खूप रंगलेले कार्यक्रम मी पाहिलेत, ऐकलेत, त्यांच्या जुगलबंदीत जो एकसंधपणा असे तसा मी कुणाच्यातच ऐकला नाही.
दुसरी एक जुगलबंदी पं. श्रीधर पार्सेकर आणि पं. रविशंकर यांची. पार्सेकरांचे नाव खूप गाजले होते. त्यामुळे या वेगळ्या प्रकारच्या जुगलबंदीला दोघांचे चाहते मोठय़ा संख्येने आले होते. पंडितजींनी सकाळी पार्सेकरांना फोन करून, ‘अमूक ठिकाणी या, रात्री काय वाजवायचंय हे ठरवू. आराखडा तयार केला की गडबड होत नाही’ असे सांगितले. परंतु पार्सेकरांनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, ‘रात्री स्टेजवरच बघू.’
रात्री दोघांनी वाद्ये मिळवून ‘मियाँ मल्हार’ सुरू केला. पार्सेकरांनी आलाप वाजवायला सुरुवात केली. त्यांच्या जलद लयीमुळे ते आलाप चंचल वाटत होते. नंतर रविशंकरांनी नुसत्या मंद्र सप्तकातील दोन्ही निषादांवर असे खेचकाम केले की, त्यातील गंभीरता सगळ्यांच्या लक्षात आली. १५-२० मिनिटे अशीच गेली. पंडितजींच्या पुढे आपले वादन पोरकट वाटत असल्याची जाणीव झाल्यामुळे पार्सेकरांनी व्हायोलिन खाली ठेवले व ते श्रोत्यांमध्ये येऊन बसले. मग पुढे पंडितजींनीच संपूर्ण वादन केले.
त्यानंतर बऱ्याच दिवसांनी मारवाडी विद्यालयात पं. रविशंकर, पं. गजाननबुवा जोशी व उ. अली अकबर यांचा एकत्र कार्यक्रम होता. दोन तबलजी पं. किसनमहाराज व उस्ताद अल्लारखाँ. गच्च भरलेला हॉल. जाणकार श्रोते. पुढे बसलेल्यांमध्ये पं. बी. आर. देवधर व अनेक तज्ज्ञ मंडळी होती. पार्सेकरांच्या जुगलबंदीच्या वेळचे पुष्कळ लोक आज काय होतंय म्हणून आले होते. काही झाले तरी पं. गजाननबुवा हे पार्सेकरांचे गुरू! सर्वानी वाद्ये मिळवली. सगळेच तपस्वी सुरेल असल्यामुळे वाद्ये अशी सुरेख मिळाली होती की नुसती ती ऐकतानासुद्धा आनंद होत होता.
मग ‘हमीर’ रागाने सुरुवात झाली. पंडितजींचा व गजाननबुवांचा पेटंट राग. आलापांपासूनच श्रोते वाहवा देत होते. ‘हमीर’ असा काही जमला की २ तास कसे गेले ते कळले नाही. ‘हमीर’ संपल्यावर एक बंगाली माणूस रविशंकरांच्या कानात काहीतरी सांगून गेला. गजाननबुवांना वाटले की, मला जो ताल येत नाही, तो वाजवायला सांगतोय. म्हणून बुवांनी तिथल्या तिथे पंडितजींना विचारले की, ‘मला जो ताल येत नाही, तो वाजवायचा विचार आहे का? तसे असेल तर आज मला तो ताल सांगा. दोन महिन्यांनी पुन्हा बसू.’ तेव्हा रविशंकर हसले व म्हणाले, ‘बुवा, ऐसी बात नहीं है। आप इतने ग्यानी, मैं ऐसा करूंगा क्या?’

मग खेळीमेळीच्या वातावरणात ‘पिलू’ सुरू झाला. रविशंकरांनी ‘पिलू’तल्या सुंदर जागा काढल्यावर बुवांनी बालगंधर्वाच्या अशा काही गोड जागा काढल्या की, पंडितजींनीसुद्धा दाद दिली. अशी ही सगळ्यांनीच कमाल केलेली ‘तिगलबंदी’ पहाटे ४ वाजता भैरवीने संपली. श्रोतेमंडळी तृप्त झाली.
खरोखर पं. रविशंकरांचे भारतीय संगीतातले योगदान फारच मोठे आहे. भारतीय व परदेशी रसिकांना शिस्त लावण्याचे फार मोठे काम त्यांनी केले. संध्याकाळी ७ चा कार्यक्रम असेल तर पंडितजी स्वत: ५ वाजता येऊन सर्व पाहणी करीत व बरोबर सातला पडदा वर गेलेला असे. एकदा कार्यक्रम सुरू झाला की पहिला राग पूर्ण होईतो कोणालाही आत प्रवेश नसे. सतारीवर तर इतके प्रेम की जगात कुठेही कार्यक्रम असला तरी विमानाची दोन तिकिटे- एक स्वत:साठी व दुसरे सतारीसाठी!
भारतीय संगीताविषयी देश-विदेशामध्ये गोडी उत्पन्न करून हिंदुस्थानातील सर्व गायक-वादकांना परदेशात आपली कला सादर करण्यासाठी त्यांनी जो मार्ग तयार केला व तो तयार करताना त्यांनी जे परिश्रम घेतले, त्याला तोड नाही. संगीतातील सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला, ‘भारतरत्न’च काय ‘विश्वरत्न’ असलेला असा हा महान कलाकार आज आपल्यात नाही. तरीही सीडी, व्हीसीडी आणि नवनवीन माध्यमांतून चित्रित झालेले त्यांचे देखणे रूप आणि स्वर्गीय संगीत म्हणजे पुढच्या पिढय़ांसाठी केवळ आनंदच नाही; तर संगीताचे पाथेयच म्हणावे लागेल. अशा या माझ्या थोर गुरूंना साश्रू आदरांजली!

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप