अज्ञान आणि भ्रम जाळून टाकणारा बोधरूपी अग्नि अंतरंगात धगधगत आहे तोवर त्या अंतरंगात भगवंताच्या विस्मरणाचं पाप शिरकावच करू शकणार नाही. हा निजधर्म मात्र जर सुटला तर काय होईल? आपल्याला अनुभव आहे, मनातून बोध अथवा सद्विचार जर दुरावला तर लगेच मन सांसारिक विषयांनी व्यापून जातं. मग पुन्हा देहबुद्धी उसळी मारते आणि त्या देहबुद्धीच्या ओढीनं काळ, वेळ, श्रम आणि पैसा वाया घालवणाऱ्या गोष्टींतही आपण सहजपणे रमून जातो. हा निजधर्म जैं सांडे। आणि कुकर्मी रति घडे। तैं चि बंध पडे। सांसारिक।।  त्यासाठी स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तली पुढील ओवी सांगते की,
म्हणौनि स्वधर्मानुष्ठान। तें अखंड यज्ञ याजन। जो करी तया बंधन। कहीं चि न घडे।।२१।।  (अ. ३/ ८३)
प्रचलितार्थ : म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञयाजन करण्यासारखे आहे. जो असे स्वधर्माचरण करतो, तो केव्हाच बंधात पडत नाही.
विशेषार्थ विवरण : स्वरूपी राहाणे हाच स्वधर्म आणि त्याचं आता नुसतं आचरण सांगितलेलं नाही तर अनुष्ठान सांगितलेलं आहे! इथपासून मुमुक्षु आणि साधकासाठीचा बोध सुरू होतो. अनुष्ठान म्हणजे एखादी गोष्ट पक्की करणे. आपल्या बाह्य़ आचरणाला स्वरूपस्थ राहण्याच्या आंतरिक वृत्तीची जोड देणे अर्थात जगण्याला स्वरूपभानाचं अनुष्ठान देणं, हा साधकाचा अभ्यास आहे. तो इतका सोपा मात्र नाही. बद्धावस्थेत प्रपंचातच माणूस जखडला असतो. त्यापलीकडे त्याला कशाचीही जाणीव नसते. मुमुक्षु अवस्थेपासून ते साधकावस्थेपर्यंत प्रपंचाचा प्रभाव नष्ट झाला नसला तरी कमी होऊ लागला असतो. तरीही प्रपंचमोह कधी उफाळेल, याची भीती मनातून गेली नसते. अशा अवस्थेतील साधकांसाठी स्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रातील बोध फार उपयुक्त आहे. पटवर्धनमास्तर हे स्वामींचे शाळेपासूनचे मित्र. त्यांचा आईवर फार जीव होता. त्यांनी वयाची विशी पार केली तेव्हा तिला देवाज्ञा झाली. या आघातानं मास्तर पार खचून गेले. कोणाशी बोलू नये, कामाशिवाय कुठे जाऊ नये, एकांतात भगवंताला आळवत राहावं आणि आईच्या आठवणींनी एकांतात रडावं, हाच त्यांचा दिनक्रम झाला होता. परमार्थाची ओढ मनात उत्पन्न झाली होती पण अंतरंगातलं वैराग्य खोलवर गेलं नव्हतं. परमार्थात सद््गुरुशिवाय तरणोपाय नाही, या जाणिवेनं त्यांनी आपल्या मामांनाच सद्गुरू होण्यासाठी विचारलं. त्यांचे मामाही मोठे अधिकारी सत्पुरुष होते. त्यांनी बजावलं, परमार्थात उडी घ्यायला मनाची तयारी लागते. सद्गुरू सांगेल ते नि:शंकपणे करावं लागतं. ती तयारी आहे का? मास्तरांनाही पटलं, आपल्या मनाची तेवढी समर्पित वृत्ती नाही. तेव्हा मनाची तशी वृत्ती घडेपर्यंत भजन-पूजन, पारायण करावं, या विचारानं ते त्यातच रमू लागले. मास्तरांना या भावनेच्या भरातल्या एकांतप्रेमातून बाहेर काढून खऱ्या परमार्थाकडे वळवण्यासाठी स्वामींनी त्यांच्याशी मैत्री पुन्हा वाढवली. मास्तर कीर्तन करीत, त्यामुळे कीर्तन शिकायचं निमित्त स्वामींनी साधलं.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…