आधी शक्ती मग भोग येतो म्हणूनच सहन होते. असह्य़ होते तेव्हा ते सांगायला माणूस शिल्लक राहतच नाही! श्रीमहाराज हे आपल्याला सांगत आहेत कारण संकट आलं की, आपण स्वत:ला असाहाय्य मानून खचून जातो. त्या संकटाला तोंड देण्याची आपली शक्ती नाही, असं आपण मानतो. आपणही आपल्या आयुष्यात आलेले संकटांचे प्रसंग आठवून पाहा. त्या वेळी, त्या प्रसंगाला तोंड देत असताना आपण किती गांगरून गेलो होतो, किती घाबरलो होतो हे आज आठवताना हसूसुद्धा येईल. पण प्रत्यक्ष प्रसंगाला तोंड देताना मनाची उभारी टिकत नाही. त्यामुळेच महाराज सांगतात, आधी शक्ती येते मग भोग येतो. आता इथे जो भोग आहे तो दु:खभोग आहे. आपल्या वाटय़ाला दु:ख येतं पण ते सोसण्याची शक्तीही आधीपासूनच मिळाली असते. तिची जाणीव आपल्याला नसते एवढंच. पण बरेचदा होतं असं की दु:खभोग लहान असला तरी आपल्या भीतीने आपण त्याला अजस्र रूप देतो. आता हे जे दु:ख-दु:ख म्हणतात ते आहे तरी कसे? श्रीगोंदवलेकर महाराजांच्या सांगण्यानुसार दु:ख तीन प्रकारचे आहे. श्रीमहाराज सांगतात, ‘‘दु:ख तीन प्रकारचे असते. एक जन्मजात. ते इतके त्रासदायक नसते. दोन परिस्थितीचे दु:ख. परिस्थितीची दु:खे परिस्थितीने दूर होतात. तीन कल्पनेचे दु:ख. काळजीचे दु:ख म्हणजे कल्पनेचे दु:ख. काळजी फार भयंकर आहे व ती भगवंताच्या विस्मरणात म्हणजे नसणेपणातच आहे. मायेचा पडदा इतका जोरदार आहे की, भगवंत आहे असे वाटत असून काळजी लागते हे खरे. कल्पनेचे दु:ख कल्पनेने नाहीसे करता येत नाही. जग भगवंताने दु:खमय केले नाही. ते आम्ही केले. भगवंत आनंदमय आहे. त्याला सोडल्यावर दु:खच आहे. भगवंताची निष्ठा दाखवणारे काळजी हे थर्मामीटर आहे. काळजी जायला ‘भगवंताशिवाय दुसरे माझे कोणी नाही’ हे वाटले पाहिजे. तळमळ लागली पाहिजे. कल्पनाच करायची तर ‘तो पाठीराखा आहे’ अशी का करू नये?’’ (बोधवचने, क्र. ५९९). या बोधातील प्रत्येक वाक्याचा आपण आता विचार करू. श्रीमहाराजांनी तीन प्रकारची दु:खे सांगितली. पहिलं दु:ख आहे ते जन्मजात. दुसरं दु:ख आहे ते परिस्थितीजन्य आणि तिसरं दु:ख आहे ते कल्पनाजन्य. आता जन्मजात दु:ख जे असतं ते इतकं त्रासदायक नसतं, असं श्रीमहाराज सांगून टाकतात आणि लगेच दुसऱ्या दु:खाकडे वळतात. जन्मजात दु:ख म्हणजे नेमकं कोणतं दु:ख हो? जन्मत:च एखादं शारीरिक व्यंग्य असणं, जन्मत:च अगदी जवळचा आधार गमावला असणं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म होणं अशी काही जन्मजात दु:खं सांगता येतील. आता ती इतकी त्रासदायक नसतात, असं श्रीमहाराज सांगतात याचा अर्थ ते त्या दु:खांचं समर्थन करीत नाहीत तर जन्मापासूनच त्या दु:खाची सवय झाली असल्याकारणे त्या दु:खाकडे पाहण्याची वृत्ती बदलली असते, असं ते सुचवितात. त्या दु:खाची तीव्रता आणि व्याप्ती दुसऱ्या व्यक्तीला कमालीची जाणवत असली तरी ज्याच्या वाटय़ाला ते दु:ख आहे त्याची स्थिती वेगळी असते. कशी?