स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील २६व्या ओवीकडे आता वळू. ही ओवी अशी:
आणि हें कर्म मी कर्ता। कां आचरेन या अर्था। ऐसा अभिमान झणें चित्ता। रिगों देसी।।२६।। (अ. ३ / १८७)
प्रचलितार्थ :  हे विहित कर्म, मी त्याचा कर्ता अथवा अमुक कारणाकरिता मी त्या कर्माचे आचरण करीन, असा अभिमान तुझ्या चित्तात कदाचित येईल, तर तो येऊ देऊ नकोस.
विशेषार्थ विवरण: गेल्या आपल्यात कर्तेपणाचा जसा भ्रम असतो तसाच कर्माचाही भ्रम असतो! मी खरं काय केलं पाहिजे, हे माहीत नसतानाही हेच खरं माझ्या वाटय़ाला आलेलं कर्म आहे, ते मलाच केलं पाहिजे, माझ्याशिवाय हे दुसरं कोण करणार, असा अभिमान मनाला चिकटू देऊ नकोस, असं प्रभू सांगत आहेत. अनेकदा काय होतं की आपल्या वाटय़ाचं खरं कर्म कोणतं, आपण खरं काय केलं पाहिजे, हे कळत नसल्यानं किंवा चुकीचं आकलन असल्यानं आपली दिशाभूल होते. जर वाट चुकली  तर मग कितीही चाललं तरी मुक्कामाला काही पोहोचता येत नाही. चालून चालून दमलो तरी मुक्काम गाठता येणार नाही. अध्यात्माच्या मार्गावर तर वाट चुकण्याचे प्रसंग अनेकदा येतात. दुसऱ्यासाठी काही तरी करण्याची उबळ इतकी येते की दुसऱ्याला आधार देता देता आपण त्याला कायमचं परावलंबी करून टाकतो. जडभरताची कथा आहे ना? तपस्येसाठी राज्यवैभवाचाही त्याग केला आणि जंगलात गेला. विरक्तपणे साधनारत असताना एके दिवशी हरणाचं पाडस दिसलं. कावऱ्याबावऱ्या नजरेनं वावरत असलेलं ते पाडस पाहून याला सांभाळणं माझंच कर्तव्य आहे, असं राजाला वाटलं. मग ते पाडस त्याच्या कुटीत आलं. अख्खा दिवस पाडसाच्या देखभालीत जाऊ लागला. जपाला बसलं, ध्यानाला बसलं तरी पाडसाची काळजी मनात येई. एक दिवशी मृत्यूनं गाठलं तेव्हा या पाडसाचं कसं होणार, या विचारानंच पिळवटून शेवटचा श्वास घेतला गेला. पुढचा जन्म मग हरणाचाच आला. तेव्हा आपल्या वाटय़ाचं खरं कर्म कोणतं, आपण खरं काय केलं पाहिजे, आपलं खरं कर्तव्य कोणतं, याचं भान साधकाला आलंच पाहिजे. त्यामुळे वेळ, शक्ती आणि हो, पैसादेखील नाहक वाया जात नाही. आधीच आयुष्य मोजकं त्यात ते नको त्या गोष्टींतच संपलं तर खरा लाभ कसा साधता येणार? त्यामुळे मनातल्या कर्माच्या ओढीकडे आणि कर्माच्या निवडीकडे साधकानं अंतर्मुख होऊन लक्ष दिलं पाहिजे. कर्म केल्यावर त्याचा ठसा मनावर उमटू नये, यासाठीही अभ्यास केला पाहिजे. आपण तास-दोन तास उपासना करतो आणि उपासना झाली, असं सहजपणानं म्हणतो आणि मानतो, पण चोवीस तास प्रपंचाची कामं करूनही आपला प्रपंच पूर्ण होत नाही!  तो अपूर्णच राहातो आणि अनेक अपूर्ण कर्माकडे खेचत राहातो. बरं, जे खरंखुरं विहित, वाटय़ाला आलेलं अटळ कर्म आहे, त्यातही कर्तेपणाचा भाव नकोच, असंही भगवंतांना सांगायचं आहे. स्वामींच्याही चरित्रात असा एक प्रसंग आहे.