अगदी खाली, मूलाधाराशी असलेली कुंडलिनी जागी होत उध्र्वगामी होते. कावळाही वर उडतो ना? तशी! मग एक-एक चक्र भेदत ती आणखी वर.. आणखी वर झेपावत जाते.. योगेंद्रच्या या शब्दांवर ‘उडरे उडरे काऊ’चा अर्थ सर्वाच्याच डोळ्यासमोर चित्ररूपानं उभा  राहिला.
योगेंद्र – हे जे मूलाधार आहे ना त्याचा रंग पिवळा आहे.. पिवळा धम्मक.. सोन्यासारखा! ‘तुझे सोन्यानं मढीन पाऊ’ !! लहान मुलाला आपण गोळी देतो आणि काय म्हणतो? ‘असंच चांगलं वागलास ना तर आणखी गोळ्या देईन,’’ हो ना? प्रत्यक्षात पुढे आणखीही बरंच काही देणार असतो, पण आता ज्याची गोडी तो चाखतोय तेच त्याला आवडतं आणि समजतं.. म्हणून जसजसं प्रत्येक चक्राचं भेदन होईल तसतशी नवनवी आंतरिक शक्ती जागी होईल.. नवनवे अनुभव येतील.. पण या घडीला जो अनुभव आलाय, त्याचंच आमिष म्हणजे ‘तुझे सोन्यानं मढवीन पाऊ’! आता आणखी वर उड.. आणखी वर उड..
ज्ञानेंद्र – व्वा! डॉक्टरसाहेब या चक्रांबद्दल तुमचं शरीरशास्त्र काय सांगतं?
डॉ. नरेंद्र – एकदम चक्रांपर्यंत मी आधी जात नाही.. पण पाठीच्या कण्याचा जो उल्लेख यांनी केला आणि एकावर एक असे इंग्रजी आठचे अंक आडवे रचले तर जसा दिसेल तसाच तो कणा असतो. हिलाच आपण ‘स्पायनल कॉड’ म्हणतो..
कर्मेद्र – डॉक्टरसाहेब, या गप्पांपुरते दोन नियम ठरलेत..
डॉ. नरेंद्र – (प्रश्नार्थक मुद्रेनं) कोणते?
कर्मेद्र – राजकारणावर बोलायचं नाही आणि शक्यतो इंग्रजी शब्द येऊच द्यायचे नाहीत..
ज्ञानेंद्र – चर्चेत मोडता घालायला हा काय-काय शक्कल शोधेल! बाबा रे नियमाला अपवादही असतोच!
डॉ. नरेंद्र – (हसून) पण मला हा नियम आवडला.. खरंच शुद्ध मराठी ऐकायलाच मिळत नाही हल्ली.. ‘तुला नंतर फोन करतो’ ऐवजी ‘तुला नंतर दूरध्वनी करतो’ असं एखादा म्हणाला तर समोरचा हसेल.. आणि समोरचा हसेल, ही भीती आम्ही इतकी वाढवलीय की मराठीतल्या अनेक डौलदार शब्दांना आम्हीच नाहीसं करून टाकत आहोत.. बरं एकाच शब्दालादेखील मराठीत कितीतरी प्रतिशब्द आहेत, पण आम्ही एकच शब्द वापरून गुळगुळीत करतो आणि इतर प्रतिशब्द विसरूनही जातो.. पण मला क्षमा करा.. शरीरशास्त्राबद्दल बोलताना हे इंग्रजी शब्द येतीलच.. अन्य इंग्रजी शब्दं मात्र मी कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करीन..
ज्ञानेंद्र – नाही हो, तुम्ही याला पूर्णपणे ओळखलेलं नाहीत ना, म्हणून! सांगा तुम्ही.. मराठीचा हा नियम आमच्या चौघांच्या गप्पांपुरता आम्ही ठरवला आहे..
डॉ. नरेंद्र – पण हा नियम मी माझ्या मित्रांच्या गटातही सांगीन, नुसतं बोलून काही होत नाही म्हणतात, पण नुसतं बोलून बोलूनच भाषा जिवंत राहाते ना? नीट, शुद्ध, चांगलं, अर्थपूर्ण, अर्थवाही, समर्पक, डौलदार मराठी बोलून बोलूनही मराठी अधिक बहरेल! पण ठीक माझ्या सहपांथस्थानो मला अंमळ क्षमा करा..
डॉक्टरांच्या या वाक्यावर सर्वचजण मोकळेपणानं हसले. ‘अनाहूत’पणामुळे सुरुवातीला असलेल्या किंचित परकेपणाच्या भावनेची उरलीसुरली पुटंही झडून गेली आणि सर्वाच्या चेहऱ्यावर नितळ मैत्रभाव प्रतिबिंबित झाला.. डॉक्टरसाहेब बोलू लागले..
डॉ. नरेंद्र – तर हा स्पायनल कॉड आहे ना, त्यात पोकळ खांब म्हणा हवं तर.. असतो, पण त्यात पाणीही असतं बरं का. हा थेट मेंदूपर्यंत जातो.. यालाच सुषुम्ना मार्ग म्हणत असावेत.. बाकीच्या स्पायनल कॉडमध्ये असंख्य ज्ञानतंतू असतात आणि ते सर्व अवयवांशी आणि मेंदूशी जोडले असतात. राजधानीतून राज्याचा कारभार कसा चालतो, हे थोडं डोळ्यासमोर आणा. राज्याचा प्रमुख राजधानीतून आदेश सोडतो.. अमुक ठिकाणी अमुक करा.. मग ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागते. त्यासाठी आवश्यक ते पाठबळही राजधानीतूनच मिळतं. तसं या ज्ञानतंतूंमार्फत देहाच्या प्रत्येक कणाकणाची नोंद मेंदूकडे पोहोचवली जात असते आणि कुठे काय कमी आहे, कुठल्या अवयवानं कोणती कृती करावी, हे मेंदू ठरवतो आणि तशी प्रेरणा, तशी शक्ती त्या अवयवापर्यंत पोहोचवतो.. ही सारी प्रक्रिया जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड चालते ती या ज्ञानतंतूमुळेच!
चैतन्य प्रेम