आपल्यातले अवगुण तर समजू लागतात पण त्यांच्यावर मातही करता येत नाही. अगदी खोलवर मुळं रुजलेलं झाड तोडणं काय सोपी गोष्ट आहे? ते तोडलं तरी नव्यानं तरारून येऊ शकतं. या अवगुणांवर मातही करता येत नाही. आपल्यातील क्रोध, लोभ, मोह, दंभ हे सारे अवगुण जाणवत असतात. आपल्या वागण्यात ते नसावेत, असंही प्रामाणिकपणे वाटत असतं, पण मनाचा निश्चय वेळ येताच टिकत नाही. पूर्वीच्याच चालीप्रमाणे आपण वागून मोकळे होतो आणि नंतर वाईट वाटतं. साधकाच्या या स्थितीला धरून श्रीतुकाराममहाराज यांचे दोन अभंग आहेत. त्यातला पहिला अभंग सर्वपरिचित आहे. तो असा-
माझे मज कळों येती अवगुण। काय करूं मन अनावर ।।१।।
आतां आड उभा राहें नारायणा। दयासिंधुपणा साच करीं ।।२।।
वाचा वदे परी करणें कठीण। इंद्रियां आधीन झालों देवा ।।३।।
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास। न धरीं उदास मायबापा ।।४।।
माझे मज कळो येती अवगुण! मला स्वतलाच स्वतचे अवगुण कळू लागले आहेत. श्रीमहाराजांना एकानं विचारलं, महाराज माणसातला सर्वात मोठा गुण कोणता? श्रीमहाराज म्हणाले, आपले अवगुण ओळखता येणं, हाच सर्वात मोठा गुण आहे! तेव्हा हा गुणही साधनेनंच आला आहे. हे भगवंता मी वाईट आहे, पापी आहे, हे जाणवत आहे. पण काय करू. मन अनावर आहे. मनाला आवर घालता येत नाही. प्रसंग उद्भवताच हे मन अनावर होऊन जे बोलू नये ते बोलून जाते, करू नये ते करून जाते. माझी वाचा तुझे नाम घेते खरी, तोंडाने मी उच्च तत्त्वज्ञान बोलतो खरा पण त्यानुसार जगणं मला साधत नाही. मी तुझा नव्हे तर इंद्रियांचा दास आहे, हेच मला पदोपदी उमगतं. तरीही कसा का असेना, मी स्वतला तुझा दास म्हणवतोच आहे ना? मग हे मायबापा मला दूर करू नकोस. हे नारायणा तूच आता आड उभा राहा आणि दयासिंधूपणा सार्थ कर. इथे जो आड शब्द आहे तो कशासाठी आला आहे? या आड शब्दाला दोन छटा आहेत. आपण एखाद्याच्या आड लपतो तेव्हा आड शब्द मागे या अर्थानं येतो आणि आपल्यात आणि एखाद्या गोष्टीत आडपडदा येतो तेव्हा आड हा मध्ये येतो! इथे ‘नारायणा’ला आड उभं राहायला सांगितलं आहे. म्हणजे या दुनियेच्या प्रत्येक गोष्टीच्या आड तू लपला आहेस, याची जाणीव मला करून दे. ते आकलन मला शक्य नसेल तर माझ्या मनावर प्रभाव पाडणाऱ्या, माझ्या मनाला अधिकच अनावर करून इंद्रियांच्या गळानं मला खेचणाऱ्या दुनियेच्या आणि माझ्या मध्ये तू उभा राहा, अशी ही विनवणी आहे. ही विनवणी कुणाला आहे? ती ‘नारायणा’ला आहे. नररूपात आलेल्या परमात्म्याला अर्थात श्रीसद्गुरूंना ही विनवणी आहे. कारण दयासिंधु हे विशेषण त्यांनाच तर लागू आहे. शब्द फार तोकडे असतात. दयासिंधु या चार अक्षरांतूनही त्यांच्या दयेची कल्पनाही येत नाही. तेव्हा महाराज, या दुनियेत तुम्हीच आहात, हे जाणण्याची दिव्य शक्ती तरी द्या नाही तर या दुनियेचा प्रभाव माझ्यावर पडू नये यासाठी तिच्या व माझ्यामध्ये उभे राहा!
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2013 रोजी प्रकाशित
३३. आड
आपल्यातले अवगुण तर समजू लागतात पण त्यांच्यावर मातही करता येत नाही. अगदी खोलवर मुळं रुजलेलं झाड तोडणं काय सोपी गोष्ट आहे? ते तोडलं तरी नव्यानं तरारून येऊ शकतं. या अवगुणांवर मातही करता येत नाही.
First published on: 14-02-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 33 hinder