प्रारब्ध म्हणजे सुरू झालेले. हीराभाई ठक्कर ‘कर्माचा सिद्धान्त’मध्ये म्हणतात की, ‘‘अनादि काळापासून, जन्म-जन्मांतरातील संचित कर्माचे असंख्य हिमालयसदृश पर्वतच्या पर्वत जीवात्म्याच्या खात्यात जमा झालेले असतात. त्या पैकी जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यास योग्य होतात, तेवढी ‘प्रारब्ध कर्मे’ भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते आणि त्या जीवनकाळात भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच त्याचे शरीर सुटते. प्रारब्ध भोगण्यास अनुरूप असा देह, आरोग्य, स्त्री-पुत्रादिक नातलग, सुख-दु:ख वगैरे त्या जीवनकाळादरम्यान जीवाला प्राप्त होतात आणि सर्व प्रारब्ध कर्मे पुरेपूर भोगल्यानंतरच त्याचा देह सुटतो- म्हणजे तो जीवात्मा त्या देहातून सुटतो’’ (पृष्ठ ७). याचाच अर्थ आपला देह धडधाकट असेल की नसेल इथपासून ते आपण जन्म कोणत्या घरात घ्यायचा, आपले आप्तस्वकीय कोण, त्यांच्याशी आपले संबंध कसे राहतील, आदी साऱ्या गोष्टी या प्रारब्धानुरूपच आपल्या वाटय़ाला येतात. सुखाचे प्रसंग जसे या प्रारब्धानुसारच वाटय़ाला येतात त्याचप्रमाणे दु:खाचे प्रसंगही प्रारब्धानुसारच वाटय़ाला येतात. प्रारब्धानुसार जे वाटय़ाला आलं ते प्रारब्धाचा भोग संपताच दूरही होतं. त्यामुळे सुख जसं चिरकाल टिकत नाही, तसंच दु:खंही कायमचं टिकत नाही. म्हणूनच तर ‘सुखीं संतोषा न यावें। दु:खी विषादा न भजावें। आणि लाभालाभ न धरावे। मनामाजीं।।’ असं माउली सांगतात. सुखाच्या प्रसंगाचा, दु:खाच्या प्रसंगाचा, यशाच्या प्रसंगाचा अथवा अपयशाच्या प्रसंगाचा ठसा मनावर उमटू देऊ नये. तो ठसा उमटला तर त्यानुसारच्या इच्छांचा तरंग उमटणार. इच्छेचा इवलासाही तरंग उमटला तर तो संकल्पच पुन्हा जन्माचं बीज ठरणार! शारदामाता म्हणत की, बर्फीचा तुकडा खायची इच्छा जरी उरली तरी पुन्हा जन्मावं लागतं! मग आपल्या किती अनंत इच्छा अपूर्ण राहातात, याचा विचार केला तरी छाती दडपेल. तेव्हा या जन्माचं प्रारब्ध ठरलं आहे आणि कर्तव्य, विहित कर्म, ‘अवसरेकरूनि प्राप्त’ असलेलं कर्म केलं तरच ते संपणार आहे. आपल्याला मात्र काय करावं, हे नेमकं कळत नाही. याचं कारण प्रारब्धानुसार आपल्या वाटय़ाला आलेलं कर्म कोणतं आणि आपण आपल्या ओढीतून करू इच्छित असलेलं कर्म कोणतं, हे आपल्याला उमगत नाही. त्यामुळे देहबुद्धीनुरूपच कर्म करण्याकडे आपला ओढा असतो. अगदी सत्त्वगुणी माणूस जरी झाला तरी तोदेखील त्याच्या सत्त्वगुणप्रेरित देहबुद्धीनुसारच निर्णय करीत असतो. त्या गुरूबंधूला सर्व काही सोडून गुरुगृही जाऊन राहावेसे वाटले, ही गोष्टही हेच वास्तव सूचित करते. ही अज्ञानातून उसळलेली ऊर्मी आहे का, भावनेच्या भरात मनानं केलेला निर्णय आहे का, हे केवळ सद्गुरूच जाणतात. प्रारब्धर्कम टाळून मी प्रारब्ध नष्ट करू शकत नाही. केवळ ‘हरिकृपे त्याचा नाश झाला’ या नाथांच्या उक्तीनुसार सद्गुरूशी ऐक्य झालं तरच त्याच्याच कृपेनं त्या प्रारब्धाच्या नाशाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे र्कम करतानाच चित्त परमात्म्याकडे वळवण्याचा अभ्यास करायला ते प्रथम सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 79 destiny deeds
First published on: 23-04-2014 at 01:01 IST