नव्या वर्षांच्या सुरुवातीला कर्नाटकातील कारवार येथे बहुप्रतीक्षित ‘विक्रमादित्य’ विमानवाहू नौकेचे दिमाखात आगमन होईल. स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाच्या भात्यात समाविष्ट झालेली ही तिसरी विमानवाहू नौका. या नौकेमुळे नेमके काय साध्य होणार याबद्दल उत्सुकता असणे स्वाभाविकच. कारण, रामाला जितका वनवास सोसावा लागला त्याहून अधिक काळ तिची प्रतीक्षा व चर्चा सुरू होती. हिंदी महासागरावर प्रभुत्व राखणाऱ्या भारतीय नौदलाची क्षमता आणि पल्ला आयएनएस विक्रमादित्यमुळे विस्तारला आहे. या नौकेवरील मिग २९ के विमाने आणि कामोव्ह ३१ हेलिकॉप्टर्सने नौदलाच्या कारवायांना नवीन परिमाण लाभणार आहे. नौदलाच्या सामर्थ्यांत होणारी वाढ सागरी सीमांच्या संरक्षणाबरोबर देशाच्या आर्थिक प्रगतीत प्रमुख घटक असलेले दळणवळणाचे सागरी मार्ग आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. काही वर्षांत देशाचे संरक्षणविषयक प्रश्न कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहेत. या परिस्थितीत सागरी सीमांचे संरक्षण आणि चाचेगिरीला आळा घालण्याची जबाबदारी नौदलाला नेटाने पार पाडावयाची आहे. भारताच्या अवतीभवती नाविकतळ निर्माण करण्यात गुंतलेल्या चीनचा अरबी समुद्र अथवा हिंदी महासागरात हस्तक्षेप होऊ शकतो. यामुळे नौदलाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारीत प्रत्येकी एक अशा एकूण तीन विमानवाहू नौका ठेवण्याची भारताची योजना आहे. या योजनेचा पहिला टप्पा रशियाकडून खरेदी केलेल्या विक्रमादित्यमुळे पूर्णत्वास गेला. नौदलाकडे आधीपासून आयएनएस विराट ही एकमेव विमानवाहू नौका आहे. परंतु, तिचे आयुर्मान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. विराट निवृत्त होईपर्यंत आणि बांधणी प्रक्रियेत असणारी भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत नौदलात समाविष्ट होईपर्यंत निर्माण झालेली दरी भरून काढण्याची मुख्य धुरा आयएनएस विक्रमादित्यवर राहणार आहे. आता शक्य तितक्या लवकर आयएनएस विक्रांतही समाविष्ट करण्याचा नौदलाचा प्रयत्न आहे. जवळपास १४ हजार कोटींची गुंतवणूक करून पुन्हा बांधणी केलेली विक्रमादित्य पुढील तीन दशके नौदलाच्या सेवेत राहणार आहे. हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करणारी यंत्रणा सध्या तिच्यात नाही. भारतात दाखल झाल्यावर ती यंत्रणा बसविली जाईल. त्यामुळे रशियाहून तिचा प्रवास युद्धनौकांच्या कडेकोट बंदोबस्तात होत आहे. या विमानवाहू नौकेची क्षमता ३० विमाने पेलण्याची आहे. तिच्यावर तैनात केलेल्या मिग २९ के विमानांमुळे ७०० सागरी मैलांपर्यंत हल्ला चढविण्याचे सामथ्र्य प्राप्त झाले. तसेच या विमानांमध्ये हवेतच इंधन भरल्यास ती १९०० सागरी मैलापर्यंत धडक मारू शकतात. याशिवाय, अत्याधुनिक कामोव्ह हेलिकॉप्टर, टेहळणी व बचावात्मक कामांसाठी चिता, रात्रीही कारवाईची क्षमता राखणारे ध्रुव हे हेलिकॉप्टर या नौकेवर तैनात राहतील, असे नियोजन आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख बहुतांशी समुद्रावर अवलंबून आहे. भारताचा ८० टक्के व्यापार या मार्गे होतो. या बाबी लक्षात घेतल्यास सागरी सामथ्र्य वाढविण्याकडे निरंतरपणे प्रयत्न होणे अनिवार्य ठरते. विक्रमादित्यचे आगमन ही त्याची नांदी म्हणता येईल.