डॅन ब्राऊन आजघडीला जगातील सर्वात ‘बेस्टसेलर’ लेखक आहे. त्याची ‘द दा विंची कोड’(२००३) ही थरार कादंबरी आजही अमेरिका-ब्रिटनच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकांच्या यादीत आहे. ख्यातनाम इटालियन चित्रकार, लेखक, शिल्पकार लिओनार्दो दा विंची यांच्या चित्रांतील खाणाखुणा, चिन्हांत दडलेली सांकेतिक भाषा उलगडत शतकानुशतकांचे ‘गूढ’ उकलणाऱ्या हॉर्वर्ड विद्यापीठाचा चिन्हतज्ज्ञ प्राध्यापक रॉबर्ट लँगडनची ही कादंबरी वाचकांनी इतकी डोक्यावर घेतली की तिच्या जोरावर ब्राऊनच्या आधीच्या न खपलेल्या तीन कादंबऱ्याही ‘बेस्टसेलर’ यादीत जमा झाल्या. प्राचीन काळातील ख्यातनाम कलाकारांच्या जगप्रसिद्ध कलाकृतींमधील ‘गुप्त’ कोडय़ांची साखळी उलगडत कथासूत्राचा शेवट गाठणाऱ्या लँगडन मालिकेतील ‘एंजल्स अ‍ॅण्ड डेमन्स’ आणि ‘द लॉस्ट सिम्बॉल’ या त्याच्या आधीच्या थरार कादंबऱ्यांनीही सर्वाधिक वाचकपसंती मिळवली. अलीकडेच याच मालिकेत ‘इन्फनरे’ची भर पडली आहे. अमेरिका-ब्रिटनमधील सर्वाधिक वाचकपसंती असलेल्या पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक जमा झालं आहे.

इटलीतील मध्यकालीन कवी दांते एलीगियरी यांनी १३०८ ते १३२१ या कालखंडात लिहिलेल्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ या महाकाव्यातील ‘इन्फनरे’ या खंडात दांते यांनी नरकातील रूपकात्मक प्रवासाविषयी लिहिलंय. त्यात त्यांनी पृथ्वीच्या पोटात असलेल्या नरकाचे नऊ स्तरांत वर्गीकरण केलं आहे. याच नरकाच्या वर्णनाचा आधार घेत युरोपीय प्रबोधन पर्वातील इटालियन चित्रकार सँद्रो बोत्तीचेली यांनी काढलेलं ‘मॅप ऑफ हेल’ हे चित्र ‘इन्फनरे’तील रहस्याचं दार आहे. 

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यामुळे अल्पकाळ स्मृतिभ्रंश झालेल्या अवस्थेतील रॉबर्ट लँगडन इटलीतील फ्लोरेन्समधील एका रुग्णालयात शुद्धीवर येतो, तेथून कथानक पुढे सरकतं. आपल्याला गोळी कुणी मारली असावी, आपण फ्लोरेन्समध्ये कसे आलो, या सतावणाऱ्या प्रश्नांवर विचार करत असतानाच रुग्णालयात लँगडनवर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो. त्या वेळी रुग्णालयातील एक डॉक्टर सिएन्ना ब्रोक्स त्याला वाचवते व आपल्या घरी नेते. तिच्याशी चर्चा करत असतानाच लँगडनला आपल्या कोटाच्या शिवणीमध्ये दडवलेली एक कुपी सापडते. त्यातल्या स्लाइड प्रोजेक्टरवर त्यांना बोत्तीचेलीचा ‘मॅप ऑफ हेल’ दिसतो. त्यात केलेले बदल लँगडनला कोडय़ात पाडतात. ‘सुधारित’ नकाशातील सांकेतिक शब्द त्याला इटलीच्या प्रसिद्ध टाऊनहॉलवजा वस्तुसंग्रहालयात घेऊन जातात आणि त्याच दरम्यान लँगडनला या संपूर्ण कारस्थानाचा सुगावा लागतो.
अत्यंत झपाटय़ानं वाढत असलेली जागतिक लोकसंख्या पृथ्वीवरील नसíगक साधनसंपत्तीला धोका आहे आणि त्यामुळे भविष्यात संपूर्ण मानवजात नष्ट होईल, या सिद्धान्तानं झपाटलेला बट्र्राड झोब्रिस्ट हा शास्त्रज्ञ या कारस्थानाचा सूत्रधार असतो. झोब्रिस्टनं एका अज्ञात ठिकाणी पाण्याच्या खाली प्लेगचे विषाणू भरलेली पिशवी ठेवलेली असते. हा कट अमलात येण्यापूर्वीच तो आत्महत्या करतो. मात्र, अमुक एका तारखेला ती पिशवी फुटून प्लेगचे विषाणू जगभर पसरतील, अशी व्यवस्था त्यानं केलेली असते. त्याचं हे कारस्थान मोडून काढण्यासाठी लँगडननं चिन्हं, सांकेतिक चित्रं, कविता यांचा माग काढत सुरू केलेला थरारक प्रवास फ्लोरेन्स आणि व्हेनिस या शहरांच्या माग्रे टर्कीतील इस्तंबूल या शहरात पोहोचून संपतो.
या कादंबरीत थरार आहे, अकस्मात वळणं आहेत, वेग आहे, गूढता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्राऊनची खासियत असलेली प्राचीन कलाकृतींमधील सांकेतिक चिन्हांची कोडीही आहेत, पण तरीही ‘इन्फनरे’ लँगडन मालिकेतील आधीच्या कादंबऱ्यांच्या मानानं खूपच यथातथा आहे. दांतेचं ‘इन्फनरे’ काव्य, इटालियन चित्रकार जॉर्जओि वसारी आणि बोत्तीचेली यांची जगप्रसिद्ध चित्रं, इटलीतील ‘पालासो वेक्जो’ या टाऊनहॉलमधील गुप्त मार्ग, इटलीतील काही प्रसिद्ध इतिहासस्थळं, व्हेनिस-इस्तंबूलमधील प्राचीन वास्तू यांना एका धाग्यात ओवून ब्राऊननं ‘इन्फनरे’चं कथानक रहस्यमय आणि रंजक केलं आहे. पण मध्यावर आल्यानंतर कादंबरी इतकी रटाळ आणि पूर्वानुमेय होते की, पुढची पानं भराभर पलटली जातात. ब्राऊनची अघळपघळ शैली आणि कथानकाशी फारसा संबंध नसतानाही काही इतिहासस्थळांच्या वर्णनावर खर्च केलेली अनावश्यक पानं याला जबाबदार म्हणता येईल. ब्राऊनच्या दृष्टीनं त्याला वाचकाला गुंगवून ठेवायचं असतं, कथानकाच्या ‘क्लायमॅक्स’बद्दल वाचकाचं कुतूहल पेटतं ठेवायचं असतं. त्यामुळे कदाचित त्यानं हा पसारा अधिक वाढवलेला असू शकतो. मात्र, नेमकं हेच कारण वाचकांचं कुतूहल विझवण्यास जबाबदार ठरतं. कथानकातील खलनायक सुरुवातीलाच प्रकट होऊन अध्र्यातच मरण पावतो. याच दरम्यान त्याने केलेलं कारस्थान आणि त्यामागचं कारण या दोन्ही गोष्टी (कथेचा नायक त्यासाठी चाचपडत असताना!) वाचकांना कळतात. मग उरतं ते कारस्थानाचं ठिकाण आणि कथानकाचा शेवट कसा होणार ते. यासाठीही फार पुढे जावं लागत नाही वा जावंसंही वाटत नाही. ‘इन्फनरे’ची ही सर्वात मोठी उणीव आहे.
इटली आणि टर्कीतील प्राचीन स्थळं, प्रसिद्ध व्यक्तींची चित्रं, ऐतिहासिक संदर्भ, संस्कृती यांचा परिचय कादंबरीतून ओघवता येतो. ते अतिशय रंजक आणि जिज्ञासा चाळवणारं आहे, पण ती माहिती विकिपीडियावरही सापडते (ब्राऊनही त्यासाठी विकिपीडियाचाच आधार घेतो, अशी ओरड मध्ये झाली होतीच!). एकुणात काय तर ‘द दा िवची कोड’ किंवा ‘एंजल्स अ‍ॅण्ड डेमन्स’सारखा वेग गाठणं ‘इन्फनरे’ला जमलेलं नाही.
रॉबर्ट लँगडन हेचं पात्र घेऊन ब्राऊननं आपली पहिली कादंबरी लिहिली. यात व्हॅटिकन, पोप आणि चर्चमधील मंडळींना निशाणा करत कथानकाची रचना केली. त्यानंतर आलेली ‘द दा िवची कोड’ ख्रिश्चन धर्मातील समजुतींना छाट देऊन नवा खुलासा करणाऱ्या कथानकावर आधारित होती. त्यानंतरची ‘द लॉस्ट सिम्बॉल’ अमेरिकेतील सरकारी यंत्रणा आणि ‘फ्रीमेसनरी’ पंथातील संबंधांवर आधारित होती, तर ‘इन्फनरे जैवदहशतवाद, अतिलोकसंख्या आणि ट्रान्सह्युमनायझेशन अर्थात मानवाची बौद्धिक, शारीरिक व मानसिक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना लक्ष्य करून लिहिली आहे. आधीच्या तिन्ही कादंबऱ्यांप्रमाणे ‘इन्फनरे’ला प्रतिसाद चांगला मिळत आहे. याचं कारणही आधीच्या तीन कादंबऱ्याच आहेत. तुम्ही रॉबर्ट लँगडन आणि डॅन ब्राऊन या दोघांचेही चाहते असाल किंवा मेंदूला अतिताण देणारं कथानक आणि वर्णन पचवायची तुमची तयारी असल्यास ‘इन्फनरे’ वाचायला हरकत नाही.
इन्फनरे – डॅन ब्राऊन,
बँटम प्रेस,
पाने : ४६३, किंमत : ७५० रुपये.
asif.bagwan@expressindia.com