प्रा. मंजिरी घरत

औषध आहे पण ‘ओळख’ नाही, अशी अ‍ॅलर्जीची गत! अ‍ॅलर्जी कशाकशाची असू शकते, याचे आडाखे नक्कीच आहेत. आपली प्रतिकारशक्ती नेमकी कशानं अतिसंवेदनशील होते, हे स्वत:देखील ओळखलं तर डॉक्टरांचं काम अधिक सोपं..

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

त्याने खिशातून एक छोटीशी पेनासारखी दिसणारी वस्तू काढली. त्यावरील बटण दाबले. त्यातून सूचना ऐकू येऊ लागल्या. त्यानुसार कृती करत त्याने पेनाने स्वत:ला टोचल्यासारखे केले. आणि त्वरित त्याला होणारा श्वासाचा त्रास, घुसमट, घशात येऊ लागलेली सूज कमी झाली. आणि त्याला हायसे वाटले.

– हा रुग्ण अर्थात अमेरिकेतील होता, ऑफिसच्या कामानिमित्ताने प्रवास करत असताना चुकून त्याच्या खाण्यात शेंगदाणे असलेला पदार्थ आला आणि त्याला त्रास झाला. पण वैद्यकीय सल्ल्यानुसार तो ते पेन स्वत:जवळ बाळगत होता आणि त्याचा योग्य वापर त्याने केला. हे पेन म्हणजे ‘बोलणारे’ इंजेक्शन कशासाठी होते? जगातील हे पहिलेच बोलके इंजेक्शन विकसित केले गेले अ‍ॅलर्जीवरील उपचारांसाठी. अ‍ॅलर्जी ही अचानक उद्भवते. अ‍ॅनाफिलॅक्सिस या गंभीर, जीवघेण्या प्रकारच्या अ‍ॅलर्जीसाठी स्वत:च्या स्वत: करण्याजोगा झटपट उपाय म्हणजे हे ऑटो-इंजेक्टर इंजेक्शन, त्यात एपिनेफ्रिन (अ‍ॅड्रिनालीन) नावाचे औषध असते. परदेशात फूड अ‍ॅलर्जी, ऋतुमानाप्रमाणे हवेतील घटकांची अ‍ॅलर्जी ही नित्याची, सामान्य बाब आहे.

अ‍ॅलर्जी म्हणजे नेमके काय? साधारण १९१०च्या सुमारास ऑस्ट्रियन बालरोगतज्ज्ञ क्लेमेन्स पाक्र्वेट याने प्रथम ‘अ‍ॅलर्जी’ ही संज्ञा वापरली. आपली रोगप्रतिकार यंत्रणाच काही निरुपद्रवी घटकांना परकीय शत्रू समजते, अतिसंवेदनशील होते आणि अनपेक्षितरीत्या वेगळ्या तऱ्हेने प्रतिक्रिया (रिअ‍ॅक्शन) देते; त्यामुळे जे विकार होतात ते म्हणजे अ‍ॅलर्जी अशी संकल्पना त्याने मांडली. रोगप्रतिकार यंत्रणा ही तर आपली संरक्षण यंत्रणा, तारणहार आहे, ती असे भलतेसलते वागेल, हा विचार त्या काळी वैज्ञानिक जगताला रुचला नाही. पण यथावकाश हे पटत गेले आणि, अ‍ॅलर्जी ही वैद्यकीय शाखा विकसित होत गेली. आज जागतिक स्तरावर अनेक संघटना, परिषदा केवळ अ‍ॅलर्जीला वाहिलेल्या आहेत. अधिकाधिक संशोधन होत आहे. तरीही अ‍ॅलर्जी विषय हा तसा गुंतागुंतीचाच; तो पुरता समजलेला नाही.

ज्या घटकांमुळे अ‍ॅलर्जी येते त्यांना ‘अ‍ॅलर्जेन’ म्हणतात. अ‍ॅलर्जी हे प्रत्येकासाठी निराळे ‘सरप्राईझ पॅकेज’ असते. कुणाला आणि कशाची अ‍ॅलर्जी येईल याचा अंदाज करणे कठीण असते, जनुकीय घटक आणि सभोवताल हे दोन्ही यात भूमिका बजावतात. अतिसंवेदनशीलता किंवा हायपरसेन्सिटिव्हिटी असे अ‍ॅलर्जीला ढोबळमानाने म्हणता येईल. काही व्यक्तींमध्ये एखादा खाद्यपदार्थ किंवा सभोवतालचे घटक यांना रोगप्रतिकार यंत्रणा ओळखत नाही, त्यांना शत्रू (अँटिजेन) समजते आणि त्याविरुद्ध जरा जास्तच प्रमाणात अँटिबॉडीज (कॠए प्रकारातील इम्म्युनोग्लोबुलीन) बनवते. अँटिजेन अँटिबॉडीची लठ्ठालठ्ठी होऊ लागते, ‘मास्ट’ पेशी- ज्या त्वचा, श्वसनमार्ग, रक्तवाहिन्या इथे मोठय़ा प्रमाणात असतात- त्या अस्थिर होतात. या पेशींमधून ‘हिस्टामीन’ नावाचे रसायन बाहेर येते. हिस्टामीनच्या वाढलेल्या प्रमाणामुळे त्वचेवर पुरळ येणे, लाल चट्टे येणे, सूज, श्वसनास त्रास, शिंका, सर्दी, अ‍ॅसिडिटी, उलटय़ा, ताप, डोळे लाल होणे अशी कोणतीही लक्षणे दिसतात. अ‍ॅलर्जिक ऱ्हायनायटिस, दमा, शीतपित्त (उर्टिकॅरिआ)/ इसब (एग्झिमा) आदी त्वचाविकार हे अ‍ॅलर्जीमुळे सहसा होणारे आजार. अ‍ॅलर्जिक ऱ्हायनायटिसमध्ये सारख्या शिंका, नाक-डोळ्यांतून पाणी येणे, ताप असा त्रास होतो. याचा अनुभव अनेकांना असेल. अ‍ॅलर्जीचे सगळ्यात गंभीर स्वरूप म्हणजे अ‍ॅनाफिलॅक्सिस, ज्यात श्वसनमार्ग आकुंचित होतो, रक्तदाब कमी होतो. (लेखाच्या सुरुवातीस दिलेल्या उदाहरणात रुग्णाला अशा तीव्र अ‍ॅलर्जीचा इतिहास होता. आपल्या इथे असे इंजेक्शन सहजपणे उपलब्ध नाही). काही फूड अ‍ॅलर्जीमध्ये ‘इम्म्युनोग्लोबुलीन ई’ (आयजीई) अँटिबॉडीजचा सहभाग नसतो, वेगळी प्रक्रिया त्यामागे असते. अशी अ‍ॅलर्जी अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर त्वरित न होता विलंबाने दिसते; गॅस, अतिसाराचा त्रास होतो. एखाद्या आजारामागचे कारण नक्की अ‍ॅलर्जीच आहे का, नेमकी कशामुळे होते या निष्कर्षांप्रत येणे सरळसोपे नाही. काही आजार हे जंतुसंसर्ग, अ‍ॅलर्जी किंवा इतर काही कारणांमुळे किंवा एकत्रित कारणांनी असू शकतात. आवश्यक वाटल्यास अ‍ॅलर्जी टेस्टिंग करता येते. ‘स्किन प्रिक टेस्ट’मध्ये विविध अलर्जेनचे थेंब मनगटापुढच्या त्वचेवर टोचतात, पुरळ येते का पाहतात. नवीन पद्धतीत रक्त तपासणी करून कोणत्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असावी याचा शोध घेता येतो. पण अशा टेस्टिंगला बऱ्याच मर्यादा आहेत.

फूड अ‍ॅलर्जी हा नेहमी आढळणारा प्रकार आहे. अन्नातील अ‍ॅलर्जी ही मुख्यत: त्यात असलेल्या प्रथिनांमुळे येते. अंडी, मासे, काजू/ पिस्ता/ शेंगदाणेसारखे ‘नट्स’, चणाडाळ, गहू (ग्लूटेन), वांगी, टोमॅटो, दूध यांची अ‍ॅलर्जी अनेकांमध्ये दिसते. दुधाची अ‍ॅलर्जी त्यातील प्रथिनांमुळे येते. काहींच्या शरीरात दुधातील साखरेचे (लॅक्टोजचे) पचन होत नाही. काही फळांची, भाज्यांचीसुद्धा (त्यात प्रथिने नसतील तरी) अ‍ॅलर्जी येते. हवेतील धूळ, परागकण, बुरशी याची अ‍ॅलर्जीही अनेकांत दिसते. हवेतील प्रदूषणामुळे अशा अ‍ॅलर्जीची तीव्रता वाढते. घरात झाडझूड केली, बरेच दिवस कपाटात ठेवलेले कपडे, चादरी पुस्तके बाहेर काढली की अनेकांना शिंका, सर्दीचा त्रास होतो. ती मुख्यत: डस्टमाइट (कोळ्यासारखे छोटे डोळ्यांना न दिसणारे जीव) मुळे होते. कीटक, प्राण्यांची विष्ठा, लॅटेक्स (रबर), साबण यांमुळेही अनेकांना अ‍ॅलर्जी होते. पेनिसिलीन, सल्फा, इतर काही अँटिबायोटिक्स, वेदनाशामके अशा औषधांची अ‍ॅलर्जी येऊ शकते.

लहानपणी असणारा अ‍ॅलर्जीचा त्रास मोठेपणी सहसा कमी होतो. प्रौढ वयात चालू झालेली अ‍ॅलर्जी सहसा वाढत जाते. ज्यांना अ‍ॅलर्जिक ऱ्हायनाईटिस (हा त्रास किरकोळ वाटतो) सारखा त्रास आहे त्यांना पुढे अ‍ॅलर्जिक दमाही होऊ शकतो. जनुकीय घडणीमुळे जन्मत: अ‍ॅलर्जी असल्यास ती कमी होत नाही. अशा वेळी तो खाद्यपदार्थ/ घटक टाळणे हाच उपाय उरतो. बहुतांश लोकांमध्ये अ‍ॅलर्जी निर्माण करणारा घटक जेव्हा पहिल्यांदा खाण्यात येतो तेव्हा अ‍ॅलर्जी येते, त्यामुळे सावध होता येते. पण तो घटक आधी बऱ्याचदा खाल्लाय आणि अचानक एखाद् दिवशी अ‍ॅलर्जी चालू होते, असेही होऊ शकते. त्यामुळे ती अ‍ॅलर्जी आहे असे लक्षातही येणे कठीण असते. औषधांच्या बाबतही असे होऊ शकते.

हिस्टामीनचे प्रमाण कमी करणारी म्हणजे अँटी-हिस्टॅमिनिक औषधे अ‍ॅलर्जीसाठी उपयुक्त ठरतात. डायफिनहायड्रामाईन (उदा. बेनाड्रिल सिरप), फेनिरमाईन (उदा. एविलच्या गोळ्या) ही जुनी औषधे, यांचा साइडइफेक्ट म्हणजे झोप येणे. पण नवीन अँटी-हिस्टॅमिनिक औषधांनी झोप कमी येते किंवा येत नाही. उदा. सेटिरीझिन, फेक्सोफिनाडाईन आणि बिलास्टाईन. हुंगण्याची (नेसल) स्टिरॉइड्स अ‍ॅलर्जीसाठी खूप उपयुक्त ठरतात. सर्दी, नाक चोंदणे यासाठी ‘नेसल स्प्रे’ उपयुक्त असतात पण ते सतत वापरले तर त्याचा उपयोग होत नाही. इम्युनोथेरपी उपचार पद्धतीत ज्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे त्याचाच डोस (अ‍ॅलर्जी शॉट्स) थोडय़ा प्रमाणात देत त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकार यंत्रणेची सहनशीलता वाढवायची, अतिसंवेदनशीलता कमी करायची. उगाच स्वमनाने अँटी-अ‍ॅलर्जी औषधांचा भडिमार करत न राहता सतर्क राहून स्वत:चे निरीक्षण करणे, अ‍ॅलर्जीकारक घटक टाळणे, जीवनशैली चांगली ठेवणे, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे जरुरीचे आहे. कोणत्याही औषधाची अ‍ॅलर्जी असल्यास डॉक्टरांना सांगणे, ओळखपत्रावर तसे नमूद करणे महत्त्वाचे आहे.

अ‍ॅलर्जी हा प्रकार युरोपमध्ये दिसू लागला १९१० नंतर. सार्वजनिक स्वच्छता, शेतीच्या नवीन पद्धती प्रचलित होऊ लागल्यावर. हायजीन हायपोथेसिस (अतिस्वच्छतेच्या पद्धतीमुळे अ‍ॅलर्जीला चालना मिळाली असे मानणे) प्रसिद्ध आहे पण सर्वमान्य झाला नाही. पण बदलती जीवनशैली, निसर्गाशी नाते कमी होणे याचा संबंध अ‍ॅलर्जीशी आहे. आपली रोगप्रतिकार यंत्रणा जन्माच्या वेळी एखाद्या नवीन कॉम्पुटरसारखी असते, त्यात डेटा (विदा) कमी असतो, तो डेटा कसा, कोणता भरला जातो हे महत्त्वाचे असते, असे मानले जाते. जन्मानंतरच्या काही वर्षांत ‘अति जपणे’पेक्षा, या यंत्रणेची जगाशी ओळख करून देणे, योग्य प्रमाणात विविध फूडपासून निसर्गापर्यंत सगळ्याचे ‘एक्सपोजर’ देणे गरजेचे; अन्यथा मोठेपणी हीच यंत्रणा अनेक घटकांना ‘परकीय’ मानते, अ‍ॅलर्जीची शक्यता वाढते असा विचारप्रवाह आहे. तसेच रोगप्रतिकार यंत्रणेचा जवळचा संबंध आतडय़ातील ‘उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहतीं’शी (मायकोबायोटा) आहे. ताजा, संतुलित, घरगुती आहार घेऊन या सूक्ष्मजीवांची बडदास्त ठेवल्यास हे मित्रजंतू यंत्रणा सक्षम ठेवतात; अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन्स वा इतरही आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात.

पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे अ‍ॅलर्जीचे प्रमाण कमी आहे. पण ते झपाटय़ाने वाढतेय असे चित्र आहे. याबाबतचे संशोधन कमी आहे. ३० टक्के लोकांना अगदी किरकोळ वा गंभीर अ‍ॅलर्जीचा त्रास असावा असा अंदाज आहे. अमेरिकेत ‘फूड अ‍ॅलर्जेन लेबल’ सक्तीचे करणारा ग्राहक संरक्षण कायदा २००४ मध्येच अस्तित्वात आला. आपल्याकडे आता कुठे हालचाल सुरू झाली आहे. स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट, अचूक टेस्टिंग, अधिक संशोधन, जनमानसात याविषयी योग्य माहिती, फूड लेबलवर अ‍ॅलर्जेनविषयी सूचना हे सर्व होणे आवश्यक आहे.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com