साक्षी महाराजांच्या योजनेत आरोग्य धोरणाचा अडथळा!

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी प्रत्येक िहदूने चार मुलांना जन्म द्यावा अशी इच्छा व्यक्त केली असली तरी मनसुब्यांवर पाणी फेकले जाईल अशीच शक्यता दिसते.

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी प्रत्येक िहदूने चार मुलांना जन्म द्यावा अशी इच्छा व्यक्त केली असली तरी मनसुब्यांवर पाणी फेकले जाईल अशीच शक्यता दिसते. नरेंद्र मोदी सरकारने प्रसृत केलेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरण (नॅशनल हेल्थ पॉलिसी) २०१५ चा मसुदा हा साक्षी महाराज यांच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्यापेक्षा घातक हल्ला ठरेल.
मसुद्याच्या मुद्दा क्र. ३.२ मध्ये मुख्य धोरणात्मक तत्त्वांचा उल्लेख आहे. त्यात समानता आणि विश्वात्मकता- सर्व प्रकारचे भेदभाव नाहीसे करणे, संपूर्ण समाजाच्या गरजा पुरविण्याचे धोरण आहे. (आता िहदुत्वावर विश्वास नसणाऱ्यांना देशाबाहेर पाठविण्याची मनीषा असताना, तसल्या अहिंदूंच्या गरजा पूर्ण करण्याचे खूळ कसे चालवून घेता येईल?) तीच बाब मुद्दा क्र ४.२.१ ची.   
लहान वयात मुले झाल्यामुळे आणि अपत्यांची संख्या अधिक असेल, मुलांमधील अंतर कमी असेल तर माता आणि प्रसूती आसपासच्या मृत्यूंचे प्रमाण वाढते असा भयगंड मुद्दा ४.३.६ जननक्षमता आणि बाल आरोग्य (रिप्रॉडक्टिव्ह अ‍ॅन्ड चाइल्ड हेल्थ) मधील क्र. ४.३.६.१ मध्ये नमूद केलेला आहे.
मुद्दा क्र. ४.३.६.२ मध्ये मातांच्या मृत्यूचा दर कमी करण्याची चर्चा आहे. (पण बायकांचे असे चोचले पुरवीत बसले तर मुले निर्माण करण्याची फॅक्टरी कशी चालू ठेवावयाची? याला मसुद्यात कोणतेच उत्तर नाही.)
मुद्दा क्र. ४.३.६.४ मध्ये नवजात अर्भक मृत्युदर आणि मृतक जन्मदर कमी करण्याचे योजले आहे. (परंतु बालमृत्यूच कमी झाले तर अधिक मुले जन्म देण्यासाठी इन्सेन्टिव्हच उरणार नाही, याचे भान या मसुद्यात नाही.)
मुद्दा क्र. ४.३.६.७ मध्ये लोकसंख्येच्या स्थिरीकरणाचा मुद्दा आहे. (असे झाले तर िहदूंची पीछेहाट दूर करण्याचा मार्गच बंद होतो याकडे मसुदा करताना दुर्लक्ष झाले आहे.)
मुद्दा क्र १२.२ मध्ये तर आरोग्याचा मूलभूत हक्क देणे अशी सर्वावर कडी करण्यात आलेली आहे. (आरोग्य हा सर्वासाठीच मूलभूत हक्क झाला तर गीता, पुराणे इत्यादींना पवित्र न मानणाऱ्यांना आपले पाय भक्कम करण्यास मोकळे रानच मिळेल, मग संभवामी युगे युगे असे होऊनसुद्धा काहीच हाती उरणार नाही.)
खासदार महोदयांना जनतेच्या भल्याचे कार्यक्रम राबविण्यात अडचणी येत असतील तर पीठासीन अधिकाऱ्यांना विनंती की, खासदार महोदयांपुढील अडथळे त्वरित आणि प्रभावीपणे दूर करावेत.
– राजीव जोशी, नेरळ.

‘स्वायत्तते’चा जालीम उपाय!
बँकांना स्वायत्तता द्यावी, सरकारी हस्तक्षेप थांबावा ही अपेक्षा केवळ बँकांपुरतीच का?  सरकार (बँकांसह) सर्वच क्षेत्रांमध्ये करत असलेल्या हस्तक्षेपांमुळे त्या-त्या क्षेत्रांवर नेमके काय परिणाम झाले आहेत याचा संयुक्त विचार केल्याशिवाय (केवळ) बँकांना स्वायत्तता देऊन एकूण (समग्र) अर्थव्यवस्थेवर सुपरिणाम साधला जाऊ शकतो काय? या प्रश्नांची उत्तरे, ‘नाही’ अशीच असणार आहेत. विविध दुर्धर आजारांनी पिडलेल्या, अतिदक्षता कक्षात दाखल ‘अर्थव्यवस्था’नामक या रुग्णावर केवळ सर्दी, पडसे, खोकल्यापुरता इलाज करण्यासारखा हा प्रकार आहे.
‘स्वायत्त’ बँकांनी शुद्ध व्यावसायिक तत्त्वांवर, ‘प्राप्त परिस्थितीत, शेतकऱ्यांना कर्ज देणे व्यवहार्य ठरत नाही’ या कारणाखाली कर्ज पुरवठा नाकारल्यानंतर तरी शेती आणि शेतकऱ्यांबाबत एक व्यवसाय आणि व्यावसायिक या निकषांवर विचार होण्यास सुरुवात होईल. (अनेकांना पटणार नाही, पण) अप्रत्यक्षरीत्या  शेतकऱ्यांच्या ते फायद्याचे आहे.  आज सरकारी दबावाखाली होणारा कर्ज पुरवठा, कर्जमाफी (कर्जमुक्ती नव्हे) वगरे प्रकार, सलाइन देऊन रुग्ण मरू नये याची पुरेपूर काळजी घेणारी किमान उपाय योजना आहे, अन्यथा शेतीत कष्ट कोण करेल?
 – गोिवद जोशी, सेलू (जि.परभणी)

महागाई ठीक आहे, पण ‘धर्माई’ रोखा!
सहा महिन्यांपूर्वी भारतात निवडणुका होत्या. त्यावेळी संबंधित बातम्या वाचताना विकासविषयक गप्पा जास्त दिसायच्या आणि धर्म सायिडगला असायचे. सत्तांतर होऊन सातच महिने झालेले असताना, सर्वत्र धर्माची साथ आलेली आहे. आज धर्म व धर्मातराच्या गप्पा जास्त ऐकू येत आहेत आणि विकासाचा मुद्दा सायिडगला आहे. सत्तेमध्ये येत असताना विकासाचा धर्म सांगण्यात आला, पण सत्तारोहण झाल्यापासून धर्माचाच विकास होताना दिसत आहे. समाजात धर्माच्या नावाने आधीच खूप धग-धग असताना ‘लव्हजिहाद’नंतर आता ‘घरवापसी’ नावाचे धर्मनाटय़ उभे राहिले आहे. मते मागताना धर्म सांगणे राहून गेले म्हणून आता बळ-जबरीने धर्म सांगणाऱ्या धर्मोपदेशकांना सांगावेसे वाटते, की लोकांनी विकासाला मते दिली होती; धर्माला नव्हे.
आणि याउपरही सत्ता-संघातल्या लोकांना धर्मच सांगायचा असेल तर त्यांनी राजधर्म सांगावा देवधर्म नको. कारण भारतीयांकडे देवाधर्माचे पुष्कळ आहे आणि ते खूप आधीपासून आहे. गरज आहे तर ती राजधर्माची आणि त्याच्या पालनाची. आज धर्म सांगत असतानाच धर्म सोडला जातोय आणि माणूस तोडला जातोय म्हणून धर्म सांगण्याला आक्षेप आहे. ‘ते पूर्वाश्रमीचे िहदूच होते मग त्यांना पुन्हा िहदू केले तर यात गर ते काय?’ किंवा ‘जन्माला येणारं प्रत्येक मूल हे मुसलमान असतं त्याचे आई-वडील नंतर त्याचा धर्म बदलतात’ या वाक्यांनिशी आज जे काही केले जाते आहे, तो केवळ धर्मोद्योग आहे, धर्मकार्य बिलकुल नव्हे. वेद-काळापासूनच धर्मसंपन्न असणाऱ्या भारत देशाला, आजच्या वेब-काळातही धर्मप्रसाराची आवश्यकता आहे का? अर्थधर्म, ज्ञानधर्म, विकासधर्म, कर्माची ही इतकी कार्यक्षेत्रं खुली असताना आम्ही अजूनही देवा-धर्मातच का अडकून आहोत? आसाराम- नारायणसाई- रामपाल आदी धर्म-मरतडांचा प्रकांड-तांडव पाहून व भोगून झाला तो पुरेसा नाही का?  आजच्या दिवसाला आव्हान म्हणून उद्याचा दिवस आ वासून उभा असताना, आज धर्मप्रसाराची नव्हे तर धनप्रसाराची आवश्यकता आहे. धर्माला धरून आज जे काही चालू आहे ते उद्याच्या भारताला पोषक नाही. उद्याच्या या तरुण भारताला रोजगार संधीची गरज आहे, धर्मोपसुंदीची नव्हे.
चालू असलेल्या धर्मगोंधळाची गाथा स्वतलादेखील पटत नसल्याची भावना बोलून दाखवणाऱ्या देशाच्या प्रधानसेवकांना विनंती करावीशी वाटते की, एकवेळेस त्यांनी महागाई नियंत्रणात नाही आणली तरी चालेल; पण ही धर्माई त्वरित नियंत्रणात आणावी. कारण धर्म जर हावी झाला तर देशाचे कसे हाल होतात, हे शेजारच्या देशावरून दिसतच आहे. म्हणून वेळीच सावध झालेले बरे.
-उमेश स्वामी, अल्जेरिया.

हे वैज्ञानिकही ‘कुडमुडे’?
‘अ. भा. विज्ञान परिषदे’तील एका चर्चासत्रावर आधारित ‘दाव्यांचे विज्ञान व वादाचे विमान’ अशा शीर्षकाची बातमी (५ जाने.) व तदनुषंगिक ‘सांगे वडिलांची कीर्ती’ हा अग्रलेखही (६ जाने.) वाचला. विज्ञानातील आपल्याला मान्य नसलेले दावे मांडणारे विज्ञानवादी म्हणजे ‘कुडमुडे विज्ञानवादी’ हे समीकरण ‘लोकसत्ता’कडून अपेक्षित नव्हते.
मी स्वत विज्ञान भारती (विभा) या विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अ.भा.संघटनेच्या मुंबई शाखेचा कार्यवाह म्हणून ८ वष्रे (१९९७-२००५) कार्यरत होतो. इ.स. २००० मध्ये ‘प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या विषयावर १०० पोस्टर्सचे सचित्र रंगीत प्रदर्शन विभाने आयोजित केले होते. त्यात कृषी, खगोल, गणित, जलवाहतूक व नौकानयन, धातू, नाणेशास्त्र, भौतिकी, रसायनशास्त्र, वस्त्रोद्योग, वास्तुकला व वैद्यकशास्त्र या सर्व विषयांवर प्राचीन भारतीयांचे योगदान उचित संदर्भासहित उद्धृत केले होते. या प्रदर्शनावर आधारित पुस्तकांचीही निर्मिती विभाने विविध भाषांत केली होती. यांपैकी मराठी भाषेतील पुस्तकाला डॉ. वसंत गोवारीकर यांची प्रस्तावना होती. हे मराठी पुस्तक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे हस्ते प्रकाशित झाले होते व त्या कार्यक्रमाला डॉ. प्रभाकर देवधर, भारत सरकारचे एके काळचे विज्ञान सल्लागार उपस्थित होते. डॉ. गोवारीकर आपल्या प्रस्तावनेत लिहितात-  ‘विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील प्राचीन भारतीयांच्या कुशलतेची व नपुण्याची, हे पुस्तक म्हणजे एक गौरवगाथा आहे. विज्ञान भारतीच्या या पुस्तकाने तीन-चार हजार वर्षांपूर्वीचे चित्र चितारले आहे आणि हे चित्र आपल्याला अभिमान वाटणारे आहे. भारताच्या पर्वतप्राय क्षमतेचे ते द्योतक आहे. प्राचीन भारतीयांच्या विज्ञान तंत्रज्ञानातील समृद्ध वारशाची जनमानसात अस्मिता जागवण्याचे राष्ट्रीय स्वरूपाचे काम या पुस्तकाने केले आहे, या दृष्टीने हे पुस्तक मला फार आवडले.’ डॉ माशेलकर व डॉ. देवधरांनीही भाषणात पुस्तकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. विभाच्या इंग्लिश पुस्तकाला रसायनशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. सुब्रायाप्पा यांची प्रस्तावना होती. डॉ. सुब्रायाप्पा हे ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सायन्स’ या संस्थेच्या इतिहास शाखेचे तत्कालीन अध्यक्ष होते. त्यांनी तर ‘प्राचीन भारतीय विज्ञान’ऐवजी ‘िहदू विज्ञान’ असाच शब्दप्रयोग केला आहे. प्राचीन भारतीय विज्ञानाचे हे सर्व अभ्यासक व प्रशंसक वैज्ञानिकही ‘कुडमुडे वैज्ञानिक’ याच संज्ञेत मोडतात का?
-सुभाष भागवत, ठाणे

भाषेशिवाय विचार आहेच, प्रश्न फक्त ‘विचाराच्या पातळी’चा!
‘भाषा नव्हती, तेव्हा विचार कसा होता?’ या पत्रात (लोकमानस, ७ जानेवारी) उपस्थित झालेला प्रश्न रोचक आहे.  
प्रत्येक कृतीचा उगम विचार आहे. परंतु विचाराचा उगम भाषाच आहे असं मात्र नाही. कारण प्रत्येकच विचार स्वयंभू नसतो. ‘रिफ्लेक्सेस’ (प्रतिक्षिप्त) वा विनाविलंब दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया, ज्यात दचकणे, अंग आकसून घेणे, झटकून टाकणे अशा अनेक क्रियांचा समावेश होतो त्या क्रियाही मेंदूत ‘ट्रिगर’ होतात. दुसरीकडे एखाद्या मुलीने अवघड विषयावर शोधनिबंध लिहिला तर ते करताना ती जो ‘विचार’ करते त्यात भाषेचा अंतर्भाव होतो. पण ‘अंतर्भाव’ होतो. या मुलीला काही वेळेला जे ‘सुचतं’ किंवा ती कार्यकारणभाव शोधते तेव्हा ती एक बौद्धिक प्रक्रिया असते; त्यात भाषा असेलच असं नाही. तिसरीकडे तीच मुलगी कुणा मुलाकडे आकर्षति झाली आणि प्रेमात पडली तर ‘मी प्रेमात पडले आहे’ हा विचार तिच्या मनात भाषेच्या रूपात येत नाही. तीही बौद्धिक प्रक्रियाच आहे. तिला आपण संवेदना म्हणतो. ‘जाणीव’ म्हणतो.
 या अर्थाने जाणीव आणि विचार यात फरक आहे का? मला वाटतं नाही. तो आपण केला आहे कारण ‘विचार’ लिहावा किंवा बोलावा लागतो. विद्यानंद नंजुंदय्या या ज्येष्ठ संशोधकांचा एक लेख ‘डार्वनि आणि जीवसृष्टीचे रहस्य’ या पुस्तकात आहे. त्यात त्यांनी जाणिवेचा अर्थ ‘चेतापेशींचे सामूहिक वर्तन’ असा केला आहे. मेंदूतील चेतापेशींमध्ये जो व्यवहार घडतो त्यातून स्नायूंची हालचाल घडत नाही, पण ती पेशींची वर्तणूक असते. ते लिहितात, ‘आपण साधारण चच्रेत आपल्या मज्जासंस्थेतल्या बदलांमुळे घडणाऱ्या विरचित हालचालींना ‘वर्तणूक’ म्हणतो. ज्ञानेंद्रियांच्या संदेशामुळे घडणारा कर्मेद्रियांचा प्रतिसाद म्हणजे वर्तणूक, ही या व्यवहाराची सर्वात सरळसोट व्याख्या. एका चेतापेशीतून दुसरीला विद्युत-भार दिला जाणे किंवा एका चेतापेशीच्या संचातील विद्युत-व्यवहाराने दुसऱ्या एखाद्या संचात विद्युत-व्यवहार घडणे, हीदेखील त्या चेतापेशींची वर्तणूक मानता येईल – जरी त्यातून स्नायूंची हालचाल घडली नाही, तरी.’ जाणिवेत जशी चेतापेशींमध्ये देवघेव होते तशीच विचारातही होते. फक्त विचार सांगता येतो. जाणीव सांगता येईलच असं नाही.     
‘विचार’ किंवा ‘जाणीव’ या दोहोंच्याही अनेकविध पातळ्या आहेत. म्हणजे शोधनिबंध लिहिण्याच्या ऊर्मीपासून प्रेमात पडण्याच्या, सुखी वा दु:खी होण्याच्या, राग-द्वेष-मत्सर वाटण्यापर्यंतच्या अनेक पातळ्या. नंजुंदय्या यांच्या विवेचनानुसार प्रत्येक पातळीत चेतापेशी एकमेकींशी व्यवहार करीतच असतात. आणि जर प्रत्येक पातळीसाठी भाषेची गरज पडत असती तर भाषिक विचार न करणारे प्राणी कुठलीच कृती करू शकले नसते. आपण काठी आपटत कुत्र्याला हाकललं की तो पळ काढतो. त्या वेळी कुत्र्याच्या मेंदूत जे घडतं त्याला विचार किंवा जाणीवच म्हटलं पाहिजे.
दुसरं म्हणजे ‘कुत्र्याचा मेंदू विकसित नाही’ असं आपण म्हणतो. कुत्रा काहीच म्हणत नाही! किंवा निसर्गात ‘तू अधिक प्रगत, तू कमी प्रगत’ असं ‘ठरवणारी’ कुठलीच व्यवस्था नाही. निसर्ग फक्त ‘असतो’. म्हणजे झालं काय? आपण जसजसे पुढे आलो आणि भाषा विकसित झाली तसतसे आपण आपली ‘जाणीव’ ठसवायला लागलो. भाषेच्या माध्यमातून मेंदूला आपण वळण देऊ लागलो. म्हणजेच चेतापेशींच्या व्यवहारांवर प्रभाव टाकू लागलो.  
मानवानेदेखील आधी ‘विचार’ वरील उदाहरणातल्या कुत्र्याच्याच पद्धतीने केला आहे. पत्रलेखक म्हणतात त्याप्रमाणे आज भाषेशिवाय विचार अशक्य वाटतो, कारण आज आपण आपल्याभोवती प्रचंड गुंतागुंत निर्माण केली आहे. ती ‘सांगायला’ भाषाच लागते. आदिम मानव खुणा वापरून अनेक गोष्टी सांगत असणार. पण आज फक्त खुणा वापरून इमारत बांधता येणार नाही किंवा अवकाशयान डिझाइन करता येणार नाही. अर्थात एवढय़ा प्रचंड गुंतागुंतीतही आहार, निद्रा, भय, मथुन या मूळक्रिया आदिम काळी होत्या त्याच स्वरूपात शाबूत आहेत हेही खरं. पण शेवटी आपण कायमच उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर आहोत, हे लक्षात आलं की ‘हे अजून शाबूत कसं?’ याचंही अप्रूप वाटेनासं होतं. मथुनाच्या क्रियेतून पुनरुत्पादन (आणि आनंद) हे उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर सुरू झालं. आधी ते नव्हतं. आणि अजूनही ते कायम असलं तरी अजून पाच लाख वर्षांनी कायमच राहील, अशी खात्री देता येणार नाही.
कळीचा मुद्दा ‘भाषा आणि मेंदू एकमेकांना साह्य करू लागले’ हाच आहे. तिथून पुढची वाटचाल वेगाने झाली आहे. पण म्हणून भाषा नव्हती, तेव्हा मेंदू काम करत नव्हता असं नाही. कारण विचार भाषेशिवायही करता येतो. प्रश्न फक्त ‘कुठल्या पातळीवरचा विचार’ इतकाच आहे.
उत्पल वनिता बाबुराव, पुणे.      

गर्दी खाण्याकडे.. तरी ‘गाणे अप्रतिम’?
यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त काही कलाकारांचे गायन-वादन फारच अप्रतिम झाले. उदा. आनंद भाटे, गुंदेचा बंधू, पंडित अजय पोहनकर, रमाकांत गायकवाड, अंबी सुब्रमण्यम, पं उल्हास कशाळकर, सुचेता भिडे-चाफेकर, अजय पोहनकर यांना ठुमरीवर साथ करताना हार्मोनियम साथ केली ती उल्लेखनीय होती. शास्त्रीय गाण्याची साथ आणि ठुमरीची साथ यामधील फरक श्री. जोगळेकर यांनी दाखवून दिला, तर काही कलाकारांचे सादरीकरण फारच सुमार झाले की, यांची निवड सवाईसारख्या व्यासपीठाकरिता कोणी केली अशी शंका यावी.
  पंडित भीमसेन जोशी यांनी सवाई गंधर्व महोत्सव सुरू केला, तो सर्वसामान्य श्रोत्यांना भारतीय संगीताची ओळख व्हावी आणि संगीताचा प्रसार व्हावा या उद्देशाने. महोत्सवामध्ये त्यांनी कधी कुणाला बढावा दिला नाही, स्वतला तर नाहीच नाही. गायनाच्या निमित्ताने ते भारतभर फिरत तेव्हा जे जे कलाकार त्यांनी ऐकले आणि चांगले वाटले त्यांना ते विनंती करत या महोत्सवामध्ये गाण्याची. पण आता अशी पद्धत नसावी अशी शंका येते. सवाई गंधर्व महोत्सवामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी रसिकांचे कान तयार केले आहेत. त्यामुळे कोण चांगला, कोण वाईट हे लोक लगेच पारखतात. कलाकार बेसूर झाला की लगेच खाण्याच्या स्टॉलवर गर्दी करतात. पण दुसऱ्या दिवशी ‘लोकसत्ता’तील वृत्तान्त वाचताना तो कलाकार ‘अप्रतिम गायला’ हे वाचावे लागते हीच खंत आहे.
सुहास किर्लोस्कर, पुणे

‘पुरोगामी’ हिंदूद्वेषापुढे नाइलाज!
‘सांगे वडिलांची कीर्ती’ या अग्रलेखात शशी थरूर यांचा उल्लेख झाला आहे, पण प्रगत प्राचीन भारतीय संस्कृती, ग्रंथांचा विचार मांडणारे आनंद बोडस, डॉ. विजय भटकर आणि संशोधक डॉ. प. वि. वर्तक यांचा उल्लेख का नाही केला? कारण वरील क्षेत्रात शशी थरूर यांचे काही काम नसून या महनीय व्यक्तींचे आहे आणि ती-ती तज्ज्ञ मंडळी जर पूर्वजांचे मोठेपण मान्य करतात तर ते चुकीचे असू नये.
जिज्ञासूंनी डॉ. प. वि. वर्तक यांचा ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ हा एक ग्रंथ तरी नक्की वाचावा म्हणजे आपल्या पूर्वजांचा, आपल्या ग्रंथांबाबतचा खरेपणा, त्यातील विज्ञान, सत्यता कळून येईल आणि आपल्या पूर्वजांविषयी, आपल्या धर्मग्रथांविषयी आदर वाढेल. म्हणजे काही लोकांना त्याविषयी वाटणारा अविश्वास, अनास्था, न्यूनगंड दूर होईल. आता काही स्वतला पुरोगामी म्हणवणारे आणि पुरोगामीपणा म्हणजे िहदू संस्कृती, ग्रंथ, चालीरीती यांचा विरोध करणे, द्वेष करणे असे मानणाऱ्या पुरोगामी मंडळींना हे पटणार नाहीच, त्याला इलाजही नाही.
मनमोहन रो. रोगे, ठाणे

योगेंद्र यादव यांनी अध्यादेशाबद्दल केलेले दोन उल्लेख चुकीचे
‘देशकाल’ या योगेंद्र यादव यांच्या सदरातील ‘शेतकरी-आदिवासींना सरकारी शुभेच्छा’ या पहिल्याच लेखात (७ जाने.) दोन महत्त्वाचे उल्लेख चुकीचे आहेत किंवा खोटेच आहेत.
१) ‘जमीन पाच वष्रे वापराविना तशीच पडून राहिली तर ती मूळ मालकाला परत द्यावी लागेल, असे बंधन कायद्याने घातले होते, तेही अध्यादेशाने सोडवून टाकले,’ असा उल्लेख यादव यांनी केला आहे. मुळात असा कुठलाही बदल केला गेलेला नाही.
जो बदल झाला आहे तो असा- ‘जमीन अधिग्रहण करताना, पाच वर्षांचा कालावधी मोजताना एखाद्या वेळी जर कोर्टाने स्टे ऑर्डर दिली असेल, अथवा जमीन मालकापकी एखाद्याने स्टे ऑर्डर आणली असेल अथवा तत्सम अडचणी असल्याने वेळ लागत असेल तर तो कालावधी पाच वर्षांत पकडला जाणार नाही.’
सद्य परिस्थिती : आज परिस्थिती अशी आहे की, एखादी कंपनी जर जमीन अधिग्रहण करीत असेल तर गावातील शेतकरी कंपनीकडून टोकन म्हणून भक्कम पसे घेतात आणि मग त्यातील काही मालक अवास्तव मागणी करून कोर्ट केस करतात. या केसचा निकाल वर्षोनुवष्रे लागत नाही आणि कोर्टाकडेही संपूर्ण प्रकल्पावर स्टे ऑर्डर आणण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी उद्योजक काहीही करू शकत नाही. त्यामुळे ठरलेल्या कालावधीमधील असा काळ वगळणे इष्ट आहे. परंतु योगेंद्र यादव यांनी एकच बाजू लोकांसमोर मांडली आहे. अर्थात आम आदमी पार्टीचे कार्यकत्रे असल्याने त्यांच्याकडून दुसऱ्या बाजूचा विचार करण्याची अपेक्षा ठेवणे हेच मूर्खपणाचे ठरेल.
२) ‘भूसंपादन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकाभिमुखता न सांभाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षेची जी तरतूद कायद्यामध्ये होती तीसुद्धा अध्यादेशाने नाहीशी केली आहे’ असेही यादव म्हणतात.
हा मुद्दा सपशेल खोटा आणि लोकांची दिशाभूल करणारा आहे. मुळात पूर्वीच्या कायद्यामध्ये अशी तरतूद होती; परंतु नवीन कलमान्वये अशा प्रकारची फसवेगिरी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना फौजदारी कायद्याच्या कलम १९७ अन्वये कारवाई करून शिक्षा करण्यात येईल. त्याबरोबरीने ‘मुद्दाम आरोप करून सरकारी कर्मचाऱ्यांना अडकविणाऱ्यांपासून संरक्षण’देखील नव्या कायद्याने कर्मचाऱ्यांना दिले असल्याने समतोल साधला गेला आहे.  
सदर अध्यादेश आणि त्यामधील मुद्दय़ांचे संदर्भ http://dolr.nic.in या वेबसाइटवर शोधल्यास वाचावयास मिळतील.
अक्षय फाटक, डोंबिवली

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ab ki baar bacche char sakshi maharaj policy of children