अभिकल्पकांचे काम फक्त रूप देणे किंवा वस्तू सुंदर बनविणे एवढेच नाही. त्या वस्तूत संकेत कसे दडवावे हेसुद्धा आहे.  दडलेल्या संकेतांवर व सौंदर्यावर किती व केव्हा भर द्यायचा व त्यांच्यात समतोल कसा गाठायचा हे ते वस्तू अभिकल्पित करताना ठरवितात. मग येतो कला व कौशल्याचा भाग..

इंग्लंडमधील एका प्रयोगाची गोष्ट. काही संशोधक कुठल्या खुच्र्या जास्त आरामशीर आहेत याचा अभ्यास करत होते. त्यांनी देशातल्या दहा लोकप्रिय खुच्र्या विकत घेतल्या. एका मोठय़ा खोलीत त्या ओळीने लावल्या व ४० लोकांना प्रयोगात भाग घेण्यासाठी आमंत्रित केले. सगळ्यांना प्रत्येक खुर्चीवर बसून ती किती आरामशीर आहे हे ठरवायचे होते व त्यांचा क्रम लावायचा होता. सगळ्यात आरामशीर खुर्चीचा क्रमांक पहिला, मग दुसरा, मग तिसरा वगरे. तसे हे कार्य साधे वाटते, पण या प्रयोगाच्या रचनेत एक गुगली टाकली होती. सगळ्या लोकांना एका आठवडय़ानंतर पुन्हा बोलावले होते. पहिल्या पाळीत खुच्र्याच्या आरामाचे मूल्यमापन करण्यासाठी बसताना त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली होती. दुसऱ्या पाळीत ते खुर्ची पाहू शकत होते व त्यावर बसूही शकत होते. दोन्ही वेळा त्यांना खुर्चीच्या आरामशीरपणाचेच मूल्यमापन करून त्यांचा क्रम लावायचा होता.

आलेल्या उत्तरांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, डोळ्यावर पट्टी असताना ज्या खुर्चीने आरामशीरपणात प्रथम क्रमांक पटकावला, तीच खुर्ची नंतरच्या फेरीत सातव्या क्रमांकावर आली. खुर्चीवर बसल्यानंतर मिळणारा आराम हा एक शारीरिक अनुभव आहे, मग खुर्ची पाहिल्याने लोकांच्या निर्णयात एवढा फरक का पडला? खुर्ची आरामशीर असणे व आरामशीर दिसणे यात फरक आहे का? या प्रयोगातल्या दहाही खुच्र्या आपापल्या परीने सुंदर होत्या. त्यांच्या रूपात अनेक सुप्त संदेशपण होते. जणू काही त्या खुच्र्या सांगत होत्या- ‘या बसा, मी तुम्हाला आराम देईन’. दहाही अभिकल्पकांनी खुच्र्या अभिकल्पित करताना जाणीवपूर्वक हा संदेश सांकेतिक रूपात खुर्चीच्या अभिकल्पनेत दडवला होता. म्हणूनच दुसऱ्यांदा लोकांनी खुच्र्या पाहिल्या तेव्हा, त्यांना ज्या खुर्चीत हा संदेश प्रभावी जाणवला त्यास त्यांनी अग्रक्रमांक दिला. उदाहरणार्थ, बाजूच्या  चित्रात अमेरिकन अभिकल्पकाने बनविलेली खुर्ची असेच संदेश देते आहे.

पंचेंद्रियांमार्फत मिळणाऱ्या माहितीत, डोळ्यांद्वारे मिळणाऱ्या माहितीला प्राधान्य असते असे दिसते. बहुतांश लोक आपले निर्णय घेण्यासाठी दृश्य-माध्यमावर अवलंबून असतात. बऱ्याच वस्तूंचा प्रथम संपर्क याच माध्यमातून होतो. म्हणूनच या वास्तूबद्दलच्या विचारांवर व निर्णयावर दृश्यमाध्यमाचा प्रभाव असणे नसíगक आहे आणि ही प्रक्रिया लहानपणापासून सुरू होते. लहान मुलेसुद्धा आपल्या रूपाविषयक आवडीनिवडी स्पष्टपणे सांगत असतात. याचे एक उदाहरण पाहू. एकदा मी एका मुलीला तिच्या तिसऱ्या वाढदिवसासाठी तीनचाकी सायकल विकत घेण्यास नेले होते. दुकानात अनेक सायकली मांडून ठेवल्या होत्या. एका सायकलला, कारसारखे गोल हॅन्डल (स्टीअिरग) होते. इतर सायकलींकडे दुर्लक्ष करून, तिने चटकन गोल हॅन्डलची सायकल निवडली. कदाचित त्यात तिला कार चालवण्याचे समाधान मिळणार असे वाटले असावे. एवढय़ा लहान वयात वस्तूंच्या रूपामुळे व त्यात दडलेल्या संकेतांमुळे एवढा फरक होऊ शकतो याची खात्री पटली.

काही वस्तू घेताना आपण मुख्यत: त्यांच्या दृश्यरूपावरच भर देतो. उदा. आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहाच्या कप-बशीचा संच विकत घेताना, हा संच आपल्या काचेच्या कपाटात ठेवल्यावर पाहुण्यांना कसा दिसेल? त्या संचाची किंमत त्यांना कळेल का? असे अनेक विचार मनात येतात ना? त्या संचाचे रूप बरेच काही सांगून जाते. तसेच कपडे विकत घेताना आपल्यापेक्षा ते इतरांना आवडतील का, असा विचार चाचणीच्या खोलीतील आरशात बघताना येतोच. काही लोक असे विचार स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत एवढेच; पण सगळ्याच वस्तू अभिकल्पित करताना सौंदर्य व त्याच्याशी निगडित संकेत महत्त्वाचे असतातच असे नाही. काही वस्तू लोकांना दिसू नये म्हणून अभिकल्पक खास प्रयत्न करत असतात. उदाहरणार्थ, श्रवणयंत्र. अशी यंत्रं आता खूप लहान आकारात मिळतात. ही यंत्रं अभिकल्पित करताना ती कानामागे लपवता यावी व लोकांना ती दिसू नये याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. चष्म्याचे उद्धरण या उलट आहे. जेव्हा चष्म्यासारखी वस्तू लपविणे (अदृश्य करणे) अवघड जाते तेव्हा अभिकल्पक त्याच वस्तूला ठळक व अनन्य रूप देऊन ‘फॅशनेबल’ करतात.

आपण वस्तू बघतो तेव्हा ती आपल्याला कुठला ना कुठला संदेश देत असते. काही वस्तू बघताना जाणवते की, ही वस्तू मजबूत असणार, ही नाजूक दिसते, ही महाग असेल वगरे. आपण वस्तू बघूनच बरेच अंदाज बांधत असतो. साधी गोष्ट, फळे विकत घेताना ती पिकलेली आहेत का, हे आपण बघूनच ठरवतो व नंतर त्यांना स्पर्श करून जोखतो. भजी तळताना ती तयार झाली आहेत का, हेसुद्धा त्यांच्या रंगावरून ओळखतो. आपण जेव्हा एखादी वस्तू बघतो, तेव्हा दृश्यसंकेतांच्या आधारावर आपण आपले अंदाज बांधतो. फळे व भजी ही प्रथमत: अशाच दृश्यसंकेतांच्या आधारावर जोखली जातात. अशा निर्णयांवर रूपविषयक रूढ झालेल्या प्रथांचा प्रचंड प्रभाव असतो.

काही वस्तूंची रूपमीमांसा करताना आपण त्यांच्या सौंदर्यावर जास्त भर देतो. लोकांना वस्तू आवडण्यात, त्या वस्तूंच्या सौंदर्याचा मोठा वाटा असतो, पण संकेतमीमांसा केल्याशिवाय सौंदर्याचा विचार करणे कितपत बरोबर आहे? वस्तूंचे रूप म्हणजेच अंतíहत संकेत व सौंदर्य यांचे मिश्रण. म्हणूनच अभिकल्पक लग्नात घालण्याचे कपडे व रोज घालण्याच्या कपडय़ांमध्ये संकेतांच्या व सौंदर्याच्या प्रमाणात फरक करतात. आपले बहुतांश निर्णय वस्तूंच्या रूपावर अवलंबून असतात हे तत्त्व विक्रेत्यांना माहीत असते. म्हणूनच ते दुकानात वस्तूंची सुंदर मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. या मांडणीत ते सुप्त संदेश दडविण्याचा प्रयत्न करतात, ज्याने ग्राहक आकर्षति होतो. जाहिरातींमध्येसुद्धा हेच तत्त्व वापरतात. उदाहरणार्थ, टूथपेस्टच्या जाहिरातीत नेहमी प्रयोगशाळेसारखी दिसणारी स्वच्छ खोली व त्यांत असलेली अत्याधुनिक सामग्री, झालंच तर इस्त्री केलेला स्वच्छ पांढरे कोट घातलेला डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ. हे कशासाठी दाखवतात? लोकांनी ती टूथपेस्ट अत्याधुनिक, स्वच्छ, र्निजतुक आणि म्हणून वैद्यकीय वस्तू आहे असे सांगण्यासाठी. हे सगळे साध्य होते ते सहेतू मांडलेल्या नेपथ्यातील संकेतांमुळे.

अभिकल्पकांचे काम फक्त रूप देणे किंवा वस्तू सुंदर बनविणे एवढेच नाही. त्या वस्तूत संकेत कसे दडवावे हेसुद्धा आहे. यामागील अभ्यास आणि विचारपद्धतीचा अभिकल्प शिक्षणात मोठा भाग आहे. लोकांना कुठले संकेत समजतील व कुठले समजणार नाहीत याची जाण त्यांना असते. दडलेल्या संकेतांवर व सौंदर्यावर किती व केव्हा भर द्यायचा व त्यांच्यात समतोल कसा गाठायचा हे ते वस्तू अभिकल्पित करताना ठरवितात. मग आला कला व कौशल्याचा भाग. या प्रक्रियेत संकेत दडवताना सौंदर्याचे प्राधान्य कमी झाले असले तर अशी वस्तू लोक विकत घेत नाहीत. हे सर्व संदेश जुळवून सुंदर रूप, आकार व रंगसंगतीच्या साहाय्याने बनविले जाते. त्यासाठी अभिकल्पक आपल्या कार्यशाळेत बरीचशी प्रात्यक्षिके करून बघतो व अंतिम निर्णय घेतो. मग आता वस्तू घेताना आपणसुद्धा या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्याल, हीच अपेक्षा.

 

 

उदय आठवणकर, गिरीश दळवी

uday.athavankar@gmail.com

लेखकद्वय आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे  प्राध्यापक आहेत.