सिंहराजाचे सिंहासन कसे असेल? देवमाशांचे घर कसे असेल? यासारखे- कल्पनाशक्तीला आवाहन करणारे- विषय मुलांना देण्यावर न थांबता, या अभिकल्पाचे पर्याय तयार करणे, त्यापैकी कोणता चांगला ठरेल याचा विचार करायला लावणे, असे सारे शाळाशाळांत घडू शकते..

मागील लेखात शालेय शिक्षण, बौद्धिक कुपोषण व कल्पनांचे दारिद्रय़ याबद्दल लिहिले होते. त्या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काही लोक म्हणाले : हे नेहमीचे रडगाणे आहे, काही म्हणाले : चुका काढणे सोपे आहे, उपाय सांगा! यावर दोन प्रतिक्रिया देता येतात. प्रथम, नेहमीचे रडणे जरी असले तरी ते करावे, कारण काही लोकांना ही समस्या आहे हेसुद्धा माहीत नसते. दुसरे, उपाय मागणे सोपे असते, स्वत:च्या समस्येला स्वत: उपाय काढण्याची सवय लागावी आणि पालकांनी व शिक्षकांनी अभ्यास करून आणि विचार करून काही उपाय शोधावे अशीसुद्धा इच्छा होती. कारण प्रत्येक शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी हे वेगळे असतात आणि म्हणूनच प्रस्तावित उपाय हे संदर्भसापेक्ष असणे गरजेचे आहे. तरीही आजच्या लेखात अभिकल्प विचारपद्धतीचा शिक्षकांना व शाळेतील मुलांना काय फायदा होऊ  शकेल याची चर्चा केली आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

आधी आपण अभिकल्प प्रक्रियेची रूपरेषा पाहू. कुठल्याच समस्येवर फक्त एकच उपाय नसतो, त्या समस्येला अनेक पर्यायी उपाय असतात असा दृढविश्वास आपल्या विचारधारेत रुजायला हवा. म्हणूनच कुठल्याही समस्येसाठी नेहमीच पर्यायी उपाय शोधत राहणे हे आपले कर्तव्य असावे. मनात आलेले पर्याय पटकन आपल्या वहीत चित्र किंवा लिखित स्वरूपात मांडून हातावेगळे करण्याची सवय लावावी. असे केल्याने मनात नवे पर्यायी विचार येणे शक्य होते. काही कालावधीनंतर वहीतील विचारांना पुन्हा भेट द्यावी, पण याच विचारांना वेगळ्या दृष्टिकोनातून बघावे. आपल्या कल्पना वेगवेगळ्या संदर्भात योग्य ठरतील का? या कल्पना वापरकर्त्यांना आवडतील का? आवडणार नाहीत तर का? यावर चिंतन करावे व त्या कल्पना सुधारण्याचा प्रयत्न करावा. या प्रक्रियेतून परत नव्या कल्पना येत राहतील.

कमीत कमी वेळात अनेक उपाय सुचण्यासाठी काही तंत्रांचा उपयोगसुद्धा करता येतो. या मालिकेतील आधीच्या लेखात अशा काही तंत्राची (विचारमंथन इ.) चर्चा केली आहे. हे सर्व करताना, ‘इतर लोकांना सुचणार नाहीत असे पर्याय आपण शोधू शकतो का?’ हा एक विचार असावा. आपल्याला आवडेल ते इतरांना आवडेलच असे नाही व तसा हट्ट धरणेच चुकीचे आहे. म्हणूनच इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करून पाहावा. त्यांना काय आवडेल याला महत्त्व द्यावे. दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून कल्पनेचा आढावा घेणे सोपे नसते. त्यासाठी आपल्या वापरकर्त्यांना भेटून व मोकळ्या मनाने त्यांच्या आकांक्षा समजून घ्याव्या लागतात. हे करताना काही प्रयोग करून बघावेत, आपल्या कल्पनांच्या चाचण्या घ्याव्यात. या सगळ्या क्रियांमधून नव्या कल्पना येऊ  शकतात.

अशी अभिकल्प विचारपद्धती पालकांच्या व शिक्षकांच्या मदतीस येऊ  शकते का? मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, मुलांमध्ये सृजनशीलता कशी विकसित करता येईल? शिक्षकांसाठी व पालकांसाठी शास्त्रशुद्ध व नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीवर अनेक पुस्तकांत व इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे. आपल्या व इतर देशांतील शिक्षकांनी केलेले प्रयोग पाहून बरेच काही शिकता येते. अशा प्रयत्नांस पूरक म्हणून या लेखात शाळेतील मुलांना चाकोरीबाहेरील विचार करण्यास कसे प्रोत्साहन देता येईल याबद्दल काही विचार मांडत आहोत. खरे तर, हा विषय खूप खोल आहे, तरीही शिक्षकांनी छोटय़ा छोटय़ा प्रयत्नांनी सुरुवात करावी ही इच्छा आहे.

शालेय अभ्यासक्रमाच्या व्याप्तीपलीकडे जाऊन नवीन प्रयोग केल्याशिवाय पुढे जाणे कठीण आहे. कारण जग झपाटय़ाने बदलत असते, आणि शाळेचा अभ्यासक्रम मात्र हळूहळू बदलत असतो. चित्रकलेच्या वर्गाचे उदाहरण घेतले तर, या वर्गाचा वापर करून काही गोष्टी साध्य करता येतील. जेव्हा चित्र काढण्यास ‘माझे घर’ अथवा ‘एखादा देखावा’ यांसारखे विषय दिले जातात तेव्हा मुले साचेबद्ध चित्र सादर करतात. देखाव्यात दोन डोंगर, मध्ये सूर्य, त्यामधून वाहणारी नदी, एखादे झाड आणि एक झोपडी आलीच. हे चित्र मुलांनी कुठल्या तरी पुस्तकात पाहिले असावे. मग तोच तोपणा येणारच. म्हणूनच कार्य देण्यापूर्वी, या विषयाची व अभ्यासक्रमाची उद्दिष्टे लिहून काढावीत. जर मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी हे उद्दिष्ट असेल तर साचेबद्ध चित्र काढणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.

आजूबाजूच्या जगात किंवा पुस्तकात नसतील असे विषय मुलांना द्यावेत. मग अशी चित्रे नव्याने विचार केल्याशिवाय काढता येणार नाहीत. उदाहरणार्थ, सिंहांनी रानात आपला राजवाडा बांधायचे ठरवले तर तो कसा असेल? सिंहराजाचे सिंहासन कसे असेल? देवमाशांचे घर कसे असेल? पर्याय तयार झाल्यावर मग सिंहाला व देवमाशाला या कल्पना का आवडतील? हे त्या मुलांनी आपल्या वर्गाला पटवून देणे आलेच. यापुढे, मुलांना मजेदार वाटतील असे प्रकल्प देता येतील. चंद्रावर, जेथे गुरुत्वाकर्षण कमी आहे, तेथे मुलांनी घर बांधले तर ते कसे असेल? त्यातील स्वयंपाकघर कसे असेल? पोळ्या तव्यावर पडतील का? यासाठी विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांनी वर्गात येऊन चर्चा केली तर उत्तमच. अशा प्रकल्पांसाठी इतर शिक्षकांचे सहकार्यही अपेक्षित आहे.

मुलांना छोटा आरसा अथवा चुंबकासारख्या गोष्टी देऊन त्याचे नावीन्यपूर्ण उपयोग शोधायला लावता येतील. अशा छोटय़ा छोटय़ा प्रकल्पांतसुद्धा मुलांनी कमीत कमी पाच पर्याय काढण्यावर भर द्यावा. त्यातले काही पर्याय पुढील हस्तकलेच्या तासात केले तरी हरकत नाही. नंतर या पर्यायांतील चांगले गुण एकत्र करून त्यातून नवी कल्पना तयार करणे मुलांना शिकता येईल. या प्रकारच्या अनुभवात्मक शिक्षणातून बरेच काही साध्य होऊ  शकते.

विज्ञानासारखा विषय आपल्या आजूबाजूच्या गोष्टींतून शिकवता येतो हे आपल्याला माहीत असेलच. हस्तकलेच्या वर्गात दोन चाकीचा ब्रेक अथवा कपाटाचे कुलूप कसे काम करतात हे दाखवणारे एखादे पुठ्ठय़ाचे मॉडेल तयार करता येत. यात मुलांना वस्तूंच्या निरीक्षणाची सवय लागते व त्यांचे ज्ञानदेखील वाढते. असे विषय देताना विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्या विषयावर आधी चर्चा केली तर मुलांची मने भरारी घेण्यास तयार होतील. त्यांचे कुतूहलपण वाढेल व कल्पनाविलासास भर मिळेल. या सगळ्यांमागे एकच तत्त्व आहे, जर चाकोरीबाहेरची उत्तरे पाहिजे असतील तर शिक्षकांनी चाकोरीबाहेरचे प्रश्न विचारायला हवेत आणि मुलांना असामान्य प्रकल्प करायला प्रोत्साहन दिले पाहिजे.

अशा विचारधारेचा उपयोग शाळेतील इतर समस्यांवर उपाय शोधण्यासाठीही करता येतो. उदा. शिक्षकांना हजेरी व शुल्क घेण्यासाठी लागणारा वेळ कसा वाचवता येईल? मुलांना आवडतील अशा शारीरिक प्रशिक्षणाचे कोणते नवीन प्रकार असू शकतील? मुलांच्या गटाने मिळून एकत्र काही व्यायाम प्रकार करणे शक्य आहे का? मुलांनी कल्पनाविलास करणे हा एक भाग, पण त्यांचे मूल्यमापन करताना मुलांना शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले पाहिजे याची खात्री करणे हे महत्त्वाचे आहे. मूल्यमापन करण्यासाठी कोणते निकष विचारात घेणे आवश्यक आहे? मुलांनी दिलेल्या पर्यायांची संख्या व त्या पर्यायांची विविधता या दोघांच्या आधारावर मुलांच्या सृजनशीलतेचे मूल्यांकन करता येते. जर मुलांनी काल्पनिक वस्तूंची कल्पना चित्राद्वारे मांडली किंवा प्रतिकृती तयार केली असेल तर त्या कल्पनेचा प्रभावही मूल्यमापनात घेता येतो. हे झाल्यावर मुलांच्या अशा कल्पनांचे प्रदर्शन करून शिक्षकांनी त्या विषयांवर मुलांशी चर्चा करणे आवश्यक आहे. प्रदर्शनामुळे पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाला तर मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल.

असे उपाय प्रभावी होण्यासाठी शिक्षकांनी सामुदायिक पद्धतींनी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आंतरशालेय स्पर्धा आयोजित केल्या तर अशा प्रयत्नांतून मुलांच्या सर्जनशीलतेत व ज्ञानात भर पडेल. जवळच्या शाळांनी पुढाकार घेऊन अशा स्पर्धा आयोजित करणे शक्य आहे. त्यासाठी तज्ज्ञांची किंवा अधिकाऱ्यांची वाट पाहण्याची गरज नाही. विसरू नका, विचारपरिवर्तनाची पहिली पायरी नेहमीच स्वत:च्या घरातून सुरू होत असते.

 

उदय आठवणकर, गिरीश दळवी, विजय बापट

uday.athavankar@gmail.com

लेखक आयआयटी, मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी – इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.