शिक्षण फक्त विद्यार्थ्यांनी माहिती ग्रहण करून परीक्षांत उत्तीर्ण व्हावे यासाठी नसते, तर विद्यार्थ्यांनी स्वत:साठी विचार कसा करावा, नवीन कल्पना कशा निर्माण कराव्यात, अवघड निर्णय कसे घ्यावे यासाठी असते.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शारीरिक कुपोषणाचे भयानक अहवाल समोर आले. या आजाराची लक्षणे स्पष्ट व निश्चित असतात. किडकिडीत शरीरयष्टी, खोल डोळे, फुगलेले पोट या लक्षणांनी शारीरिकरीत्या कुपोषित व्यक्ती आपल्याला लगेच ओळखता येतात. शारीरिक कुपोषणासोबतच आपल्या राज्यात बौद्धिक कुपोषणाची साथपण सुरू आहे. बौद्धिक कुपोषणाची लक्षणे ओळखणे मात्र अवघड असते, अनेक लोकांना हा आजार आहे हेसुद्धा माहीत नसते. या आजाराचे एक प्रकट उदाहरण पाहू.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप
नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मला मुंबईच्या एका शाळेत चित्रकला स्पध्रेचा परीक्षक म्हणून बोलवले होते. त्यात प्राध्यापकांना, मी थोडेफार लिहितो हे कळले, म्हणून शाळेच्या निबंधस्पध्रेचा परीक्षकपण नेमला गेलो. चित्रकला स्पर्धा लहान आणि निबंध स्पर्धा थोडय़ा मोठय़ा मुलांसाठी होती. चित्रकला स्पध्रेचा विषय होता ‘माझे घर’ आणि निबंध स्पध्रेचा विषय होता ‘माझे आवडते स्वातंत्र्यसेनानी’. खरे सांगतो, मुलांनी दोन्ही स्पर्धामध्ये केलेले काम बघून मी खिन्न झालो. सगळ्या चित्रांमध्ये आणि निबंधांमध्ये असहनीय एकसारखेपणा आढळला. ‘माझे घर’ या विषयात बहुतांश मुलांनी, दोन त्रिकोणी डोंगरांमध्ये उगवणारा सूर्य, त्या डोंगरांमधून वाहणारी निळी नदी, बाजूला नारळाची दोन झाडे व त्याखाली लाल त्रिकोणी छपराचे घर व पिवळ्या चौकोनी भिंती काढल्या होत्या. विचार करा, मुंबईसारख्या शहरात अशी घरे असतात का?

निबंधातपण, सगळ्या मुलांचे आवडते स्वातंत्र्यसेनानी महात्मा गांधीच. शक्य आहे, पण सगळे निबंध बेचव होते. कुठल्याही निबंधात नवीन विचार नाही, स्वतंत्र मत नाही, भाव नाही आणि तर्कही नाही, होती ती फक्त विखुरलेली तथ्ये. तसे पाहिले तर मुळात शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये विलक्षण विविधता होती. मुले वेगवेगळ्या सामाजिक व आíथक स्तरांतून आली होती, कोणी गरीब, कोणी श्रीमंत, काहींची मातृभाषा मराठी, काहींची हिंदी इत्यादी. इतकी विविधता असतानाही सगळ्यांची विचारप्रक्रिया एकसारखीच कशी? खरे सांगायचे तर, ते विचारच करत नव्हते! कारण त्यांना विचार करायला शिकवलेले नव्हते. त्यातून स्पध्रेचे विषय इतके रटाळ होते, गेली अनेक वष्रे हे असेच विषय मुलांना दिले जात असल्यामुळे मुलांना स्वतंत्र विचार करायला, सर्जनशील कल्पना करायला कधी प्रोत्साहनच दिले जात नव्हते. शाळेत एकमार्गी वर्गव्यवस्था असल्यामुळे ते विद्यार्थी स्वत:साठी विचार करण्याऐवजी, निष्क्रियपणे माहिती ग्रहण करत होते. शिक्षणाच्या नावाखाली त्यांच्यात तयार मते रुजवली होती आणि ज्या गोष्टींसाठी त्यांचे अवलंबीकरण केले होते, म्हणजे- विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट तऱ्हेचाच प्रतिसाद देण्याची सवय लावली होती, त्यामुळे बहुतांश मुले त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करत होते.

मुलांना वेगवेगळ्या आणि जास्तीतजास्त कल्पना उत्पन्न करता येणे हा अभिकल्प शिक्षणातला महत्त्वाचा भाग आहे. शालेय शिक्षणात मुलांना एकसारखे करण्याचा प्रयत्न केला जातो, अभिकल्प शिक्षणात याच्या उलट भूमिका घेतली जाते, प्रत्येक विद्यार्थ्यांत वेगळे काय आहे? आणि हे वेगळेपण त्याचे वैशिष्टय़ कसे बनू शकेल याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे सर्जनशील विद्यार्थी नाहीत असे कधीच म्हणता येणार नाही. काही तरी वेगळे करायचे असेल तर मुलांमध्ये असामान्य धर्य लागते. हे धर्य एकाएकीच निर्माण होत नाही, ते वर्षांनुवर्षे जोपासावे लागते. पण आपल्या येथील बहुतांश पालक आणि आपला समाज अशा जोखीम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी, परावृत्त करतात, त्यामाग्रे आलेल्या अपयशाला अपराध समजतात.

शिक्षण कसे असावे? काय व कसे शिकवावे? हे अगदी आदिम प्रश्न आहेत आणि आपल्या वैचारिक परंपरेच्या आरंभापर्यंत या प्रश्नांचा माग घेता येतो. यांची उत्तरे वादग्रस्त असणार हे सहाजिकच आहे. पण आपल्या देशातील सर्वसाधारण शालेय शिक्षणाची परिस्थिती फार उत्साहवर्धक नाही यात वाद नाही. या परिस्थितीसाठी आपण सगळेच जबाबदार आहोत आणि सगळ्यात मोठा दोष हा शिक्षकांचा आहे. प्रा. वासुदेव पटवर्धन यांनी १९०६ साली, मुंबईच्या हेमंत व्याख्यानमालेत, ‘शिक्षण’ या विषयावर दिलेली व्याख्याने ‘शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम’ या पुस्तकात प्रकाशित झाली. या पुस्तकात नमूद केलेले शिक्षकांचे दोष मला वारंवार आठवतात, ते इथे विचित्र जरी वाटले तरीही पुन्हा नमूद करावेसे वाटतात. १. शिक्षक आपल्या व्यवसायासाठी तयार झालेले नसतात. २. त्यांना आपल्या कामाची आवड नसते. ३. ते स्वत: विचार करणारे नसतात. ४. ते कर्तव्यदक्ष नसतात. ५. मुलांच्या हिताकडेच त्यांची दृष्टी नसते. ६. त्यांचा स्वत:च्या जिभेवर आणि विकारांवर ताबा नसतो. ७. त्यांना पुरेसा पगार मिळत नसल्यामुळे ते आपल्या कामास वाहिलेले नसतात. ८. इतर देशांतील शिक्षणविषयक चळवळींची आणि आमच्या येथीलही शिक्षणविषयक प्रश्नांची त्यांना माहिती नसते. ९. मुलांशी त्यांची सहानुभूती नसते. १०. न्याय-सत्य आणि पथ्यापथ्य यांची त्यांना असावी तितकी चाड नसते. ११. त्यांची शिकविण्याची पद्धती शास्त्रशुद्ध नसते. १२. शिक्षणशास्त्राची त्यांस माहिती नसते. प्रा. पटवर्धन यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेले हे शब्द आपल्याला कठोर वाटत असतील, तरीही आज बहुतांश शिक्षकांमध्ये यातील काही दोष नक्कीच आढळतात. आपले शिक्षक खूप कष्ट करतात, पण बऱ्याचदा त्यांच्यावर शिक्षणाव्यतिरिक्त, हिरमोड करणारे प्रशासनिक आणि इतर तापदायक काम लादले जाते, ज्यामुळे ते मुलांना आणि आत्मविकसनाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.

सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या संस्कृतिसापेक्ष शिक्षणपद्धती उदा. गांधींची नई तालीम, टागोरांचे शांतिनिकेतन, कृष्णमूर्तीच्या शाळा इत्यादी आज सर्वसामान्य मुलांना उपलब्ध नाहीत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत, भारतातील सर्वसाधारणपणे मिळणारे शिक्षण हे कारखान्याच्या प्रतिमानावर आणि कारखान्यासाठी किंवा कार्यालयांकरिता मजूर व नोकर तयार करण्यासाठी बनलेले आहे. शाळेत मुलांनी त्यांची प्राकृतावस्था सोडून, ‘सुसंस्कृत सवयी’, जसे की वक्तशीरपणा, आज्ञाधारकपणा, शिस्तबद्धता इत्यादी शिकवल्या जातात. या सवयी मुलांना एका विशिष्ट प्रकारे काम करण्यासाठी तयार करतात, पण त्यासोबतच त्यांची नसíगक सर्जनशीलता खुंटवतात.

आधुनिक इतिहास पाहिला तर जगातील सगळा तांत्रिक विकास हा भारताबाहेर झाला. वाफेचे इंजिन, रेल्वे, तारायंत्र (टेलिग्राफ), रेडिओ, मोटारगाडी, विमान, टीव्ही, संगणक, रॉकेट, इंटरनेट आणि आता मोबाइल फोन या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानांचा शोध आणि विकास भारताबाहेर झाला. असे शोध लावण्यासाठी विलक्षण कल्पनाशक्तीची गरज असते, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती आहे का? आणि नसेल तर आपण त्यांच्यात अशी कल्पनाशक्ती विकसित करू शकतो का? त्याहूनही या तंत्रशास्त्रविषयक बदलांमुळे आपल्या सगळ्यांचे आयुष्य बदलले आहे. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यांमुळे आपल्या कामाचे स्वरूप आणि काम करण्याची पद्धतही बदलली आहे. वाफेवर आणि विजेवर चालणारे यंत्र जेव्हा भारतात आणण्यात आले तेव्हा लोकांचे शारीरिक श्रम कमी झाले, पण याबरोबरच असंख्य कामगार तंत्रजन्य बेकारीमुळे बेरोजगार झाले. फक्त यंत्र आल्यामुळेच लोक बेरोजगार झाले असे म्हणता येत नाही, त्यांना नवीन तंत्रज्ञान शिकता आले नाही म्हणूनसुद्धा ते बेरोजगार झाले. यामागचे एक मोठे कारण त्यांचे शिक्षण होते. भविष्यकाळात जग बदलणारे तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित होईल का? त्याकरिता आपण आपल्या मुलांना तयार करत आहोत का? आणि समजा, असे तंत्रज्ञान परदेशातून भारतात आयात झाले तर आपली मुले त्यांचे व्यवसाय वाचवू शकतील का? हे प्रश्न विचार करण्यायोग्य आहेत.

मुलांना फक्त आज्ञापालन शिकविले तर अनिश्चिततेच्या काळात त्यांना निर्णय घेता येत नाही. त्यांना स्वयंअध्ययन कसे करावे, नवीन गोष्टी कशा शिकाव्यात, उद्यमवृत्ती कशी निर्माण करावी या सगळ्यांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जर आपण विद्यार्थ्यांना स्वत:साठी विचार करायला शिकवले तरच ते विद्यार्थी भविष्यातील अनिश्चिततांना सामोरे जायला सुसज्ज बनतात.

शिक्षण फक्त विद्यार्थ्यांनी माहिती ग्रहण करून परीक्षांत उत्तीर्ण व्हावे यासाठी नसते, तर विद्यार्थ्यांनी स्वत:साठी विचार कसा करावा, नवीन कल्पना कशा निर्माण कराव्यात, अवघड निर्णय कसे घ्यावे यासाठी असते. आपण विद्यार्थ्यांना हे शिकवले तर आपल्या शाळा नक्कीच अधिक आनंददायी आणि जास्त प्रभावी होऊ शकतात.

लेखक आयआयटी, मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी – इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत.

गिरीश दळवी
girish.dalvi@iitb.ac.in