नागपूरला गुरुवारी या हंगामातील उच्चांकी अशा ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि या वेळचा उकाडा किती त्रास देणार आहे याची एक झलकच पाहायला मिळाली. यापूर्वी चंद्रपुरात पाऱ्याने ४७ अंशांचा टप्पा ओलांडलाच होता. तापमानाच्या बाबतीत विदर्भातील इतरही ठिकाणे मागे नाहीत. गुरुवारचाच विचार केला तर ब्रह्मगिरी (४५.९ अंश), वर्धा (४५.८) येथेही तापमानाने ४६ अंशांकडे झेप घेतली. बाकी विदर्भातील जवळजवळ सर्वच ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या पुढे-मागे असतेच, ते आतासुद्धा आहे. विदर्भाबरोबरच पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसाचा काही भागसुद्धा सध्या उष्णतेच्या लाटेच्या छायेत आहे. आणखी काही किमान तीन-चार दिवस तरी ही स्थिती बदलण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे तापमानात अजूनही थोडीफार वाढ झाली तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हवामानशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर सध्या विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. सरासरीच्या तुलनेत तापमान ४-५ अंशांनी अधिक असेल किंवा एकूणच तापमान ४५ अंशांच्या पुढे असेल तर उष्णतेची लाट जाहीर केली जाते. तशी ती विदर्भासाठी आतासुद्धा जाहीर करण्यात आली आहे. पण अलीकडच्या काळात धग जाणवण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळेच तापमान ४५ अंशांपर्यंत सरकू लागले की हवामानात काहीतरी बदल झाल्याची चर्चा सुरू होते. मात्र, वास्तव आणि जाणवणे यात तफावत असते. तेच सध्या पाहायला मिळत आहे. विदर्भाच्या हवामानाचा इतिहास पाहता चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ (अन् जळगावसुद्धा!) अशा सर्वच भागासाठी तापमान ४६-४७ अंशांपर्यंत पोहोचणे नवे नाही. किंबहुना, तसे घडले नाही तरच आश्चर्य. कारण हा सारा भाग उष्ण अशा कर्कवृत्ताच्या पट्टय़ात मोडतो. त्यामुळे इतके तापमान तिथे कायमच असले तरी आता ते अधिक त्रासदायक ठरू लागले आहे. याचे कारण तापमान तितकेच असले तरी भोवतालची परिस्थिती कमालीची बदलली आहे. वृक्षावरण, मोकळी मैदाने, ओढे-नाले असे नैसर्गिक जलप्रवाह, जलसाठे, मैदाने, दलदलीच्या जागा अशा नैसर्गिक जागा आता पूर्वीसारख्या उरलेल्या नाहीत. त्याच्या पलीकडची बाब म्हणजे बहुतांश शहरांमध्ये घरे म्हणजे एकावर एक मजले रचले जात असल्याने नैसर्गिक वारा, वगैरे बाबींबद्दल ‘आनंद’च असतो. या बदलांचा वेग आता वाढल्यामुळे पूर्वीइतक्याच तापमानात तुलनेने अधिक धग जाणवते. त्याचे खापर मात्र बदलत्या हवामानावर फोडले जाते. बदलते जागतिक हवामान हे वास्तव आहेच, पण हवामानबदल आपल्याला वाटते तितक्या वेगाने घडत नसतात. शहरांत जाणवणाऱ्या उकाडय़ाला, तलखीला जास्त कारणीभूत आहेत ते  आपण परिसरात घडवून आणलेले बदल! त्याची सर्वस्वी जबाबदारी थेट आपल्यावर येते. त्यापेक्षा हवामानबदलाला दोषी ठरवणे सोयीचे जाते. पण त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही. उन्हाळ्यातील तापमान रोखणे आपल्या हातात नाही, पण त्याचे जाणवणे काही प्रमाणात कमी करणे निश्चितच आहे, पण त्यासाठी परिसरातील निसर्गाचा आदर करावा लागतो आणि तो जपावासुद्धा लागतो. अन्यथा आहे त्याच तापमानात पुढे धग आणखी वाढली तरी ते स्वाभाविकच असेल.