शांति-शेवंती फुलली। प्रेम जाई-जुई व्याली।

भगवान शंकरांनी आपली अर्धांगिनी आदिशक्ती भवानीपाशी उघड केलेला अद्वयबोध स्थिरावला त्याच परिसरातील मच्छिंद्रनाथांच्या ठायी.

वारकरी नित्यपाठातील ‘गुरू परंपरेच्या अभंगां’त पहिलाच अभंग आहे निवृत्तिनाथांचा. आदिनाथ भगवान शंकरांपासून उगम पावलेला बोधपरंपरेचा प्रवाह आपल्यापर्यंत कसकसा येऊन पोहोचला, याचा जणू आलेखच रेखाटलेला दिसतो निवृत्तिनाथांनी तिथे. भगवान शंकरांनी आपली अर्धांगिनी आदिशक्ती भवानीपाशी उघड केलेला अद्वयबोध स्थिरावला त्याच परिसरातील मच्छिंद्रनाथांच्या ठायी. तोच बोधठेवा मच्छिंद्रनाथांकडून पुढे गोरक्षनाथांकडे व त्यांच्याद्वारे यथावकाश गहिनीनाथांकडे हस्तांतरित झाला, हे कथन करतेवेळी- ‘तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधलीं। पूर्ण कृपा केली गयनिनाथा।’ हे निवृत्तिनाथांच्या मुखातून उमटलेले उद्गार मननीय होत. शंकरांपासून प्रवर्तित झालेला नाथसंप्रदाय हा स्वरूपत: योगप्रधान. अष्टांगयोगासारखी खडतर साधना हा तर नाथसंप्रदायाच्या उपासनासामग्रीचा गाभा अंश. परंतु शिवशक्तीच्या संभाषणादरम्यान शब्दरूप ल्यालेल्या बोधसंचिताची मच्छिंद्रनाथांच्या अंत:करणावर मुद्रा उमटली ती मात्र प्रेमयोगाची! हे खरोखरच विलक्षण व तितकेच चिंतनीय नव्हे काय? त्या प्रेमयोगाचीच मुद्रा मच्छिंद्रनाथांनी सुपूर्द केली गोरक्षनाथांकडे अन् त्यांनी गहिनीनाथांकडे. विस्मयचकित करणारी बाब सामोरी येते ती नेमक्या याच बिंदूवर. कडकडीत योगसाधनेद्वारे प्रज्ज्वलित तीव्र वैराग्याने अंतर्बाह्य मंडित गहिनीनाथांची, ती प्रेममुद्रा हस्तगत झाल्याने परिवर्तित झालेली अवस्था- ‘वैराग्यें तापला सप्रेमें निवाला। ठेवा जो लाधला शांतिंसुख।’ या शब्दांत वर्णन करतात निवृत्तिनाथ. प्रेमयोगाद्वारे प्रसवलेल्या प्रेममुद्रेची परिणती अंतिमत: प्रेम आणि शांती या, मानवी जीवनव्यवहार सुभग बनविणाऱ्या दोन गुणांमध्ये घडून येते, हा आहे निवृत्तिनाथांच्या या साऱ्या कथनाचा इत्यर्थ. या अवघ्या प्रक्रियेचा उगम ज्यांच्यापासून झालेला आहे त्या शिवशंभूला मस्तकी धारण करून पंढरीक्षेत्रात विटेवर विराजमान असणारा श्रीविठ्ठल निखळ प्रेममूर्ती ठरावा, यात नवलाव तो कोणता! ‘अवघा प्रेमाचा पुतळा। विठ्ठल पाहा उघडा डोळा।’ हे चोखोबारायांचे उद्गार ग्वाही देतात ती नेमक्या त्याच अनुभूतीची. प्रेमाचा पुतळा असणाऱ्या विठ्ठलाचे साम्राज्य असणारी पंढरीनगरीही प्रेमाचे आगर असावी, हे ओघानेच येते. ‘तुका म्हणे आम्हां ब्रह्मांड पंढरी। प्रेमाची जे थोरी सांठवण।’ हे तुकोबांचे उद्गार त्याच जाणिवेची रोकडी साक्ष पुरवितात. प्रेमाचे भांडार असणारा असा हा विठ्ठलदेव व त्याचे नामधारक भक्त यांच्यादरम्यान प्रेमाखेरीज अन्य कशाचीच देवघेव होत नसते, याचा दाखला म्हणजे- ‘आम्ही घ्यावें तुझें नाम। तुम्ही आम्हां द्यावें प्रेम।’ हे देवभक्तांदरम्यानच्या व्यावसायिक नात्याचे सूचन करणारे तुकोबांचे वचन. मनोभूमिकेत प्रेमाचे अधिष्ठान स्थिर झालेले विठ्ठलाचे प्रेमिक, मग लौकिक जीवनाच्या धारणेसाठी जो काही उद्योग-व्यवसाय करतात त्यांद्वारेही प्रेम व शांती यांसारख्या, लोकव्यवहाराच्या सात्त्विक धारणेसाठी अत्यावश्यक मूल्यांचीच पैदास व्हावी, हे तर्कनिष्ठ ठरते. मळ्याच्या मशागतीलाच विठ्ठलोपासना मानणाऱ्या सांवतामहाराजांचे- ‘आमुची माळियाची जात। शेत लावूं बागाईत। शांति-शेवंती फुलली। प्रेम जाई-जुई व्याली।’ हे उद्गार त्याचेच द्योतक नव्हेत काय? विशुद्ध अंत:करणातून उमललेल्या चळवळीची परिणती प्रेम व शांतीमध्येच होत असते, हे विद्रोहाची परिभाषा उच्चारणाऱ्या परिवर्तनवादी चळवळींना आता तरी पटेल का?

– अभय टिळक

agtilak@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abhangas of the guru tradition akp

Next Story
नित्य-नूतन
ताज्या बातम्या