वयाच्या हिशेबाने भागवतधर्मी संतमंडळात सर्वांत ज्येष्ठ ठरतात सांवतामहाराज. इ. स. १२५० हे होय सांवतामहाराजांचे जन्मसाल. म्हणजे,गोरोबाकाकांपेक्षा ते १७ वर्षांनी मोठे तर नामदेवरायांपेक्षा २० वर्षांनी वडील. वारकरी संप्रदायाची परंपरा सांवतामहाराजांच्या घरात नांदत आली त्यांचे आजोबा दैवू माळी यांच्यापासून. प्रपंच सांभाळून परमार्थसाधन करण्याचे व्रत आणि वारसा सांवतामहाराजांना मिळाला तो आजोबांकडूनच. शेतमळ्याचा व्यवसाय निगुतीने करत असतानाच पंढरीच्या वारीचा नियम जपण्याची दैवू माळी यांची शिकवण सांवतामहाराजांचे वडील परसोबा यांनीही मनोभावे जपली व आचरणात आणली. भागवत धर्मविचाराच्या संस्कारांची शिंपण होत आलेल्या अशा कुटुंबात परसोबा आणि नांगिताबाई यांच्या पोटी सांवतामहाराजांचा जन्म झाला. अरण हे त्यांचे जन्मगाव. धन्य ते अरण रत्नाची खाण । जन्मला निधान सांवता तों अशा शब्दांत नामदेवरायांनी टिपून ठेवलेला आहे सांवतामहाराजांच्या जन्मठिकाणाचा तपशील. नामदेवरायांपेक्षा २० वर्षांनी वडील असणारे सांवतामहाराज समाधिस्थ झाले नामदेवराय ऐन पंचविशीत असताना. समाधिस्थ होण्याच्या दोघांच्या तिथींमध्ये फरक काय तो एकाच दिवसाचा. १२९५ सालातील आषाढ वद्य चतुर्दशीस समाधिस्थ झाले सांवतामहाराज तर, १३५० सालातील आषाढ वद्य त्रयोदशीस पांडुरंगाशी एकरूप  झाले नामदेवराय.  उण्यापुऱ्या ४५ वर्षांचाच काय तो लौकिक जीवनकाल सांवतामहाराजांचा. मात्र, प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा, भागवत धर्माला अभिप्रेत असणारा, समघात संगम साधणाऱ्या अशा जीवनदृष्टीचा वस्तुपाठ म्हणावा असाच सांवतामहाराजांचा जीवनक्रम. मोक्षप्रद असणाऱ्या भागवत धर्मविचाराची निकोप प्रवृत्तिपरता अचूक उमगलेल्या साधकाची जीवननिष्ठा मुखीं नाम हाती मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी अशा विलक्षण सूचक शब्दांत विदित करतात तुकोबाराय. लौकिक कर्मांशी नामचिंतनाचा असणारा अविरोध अधोरेखित करतात तुकोबा इथे. प्रपंच तर निरामय चालावयास हवा आणि त्याच वेळी पारलौकिक नि:श्रेयसाचीही हमी मिळावयास हवी, याची सोय नामजपाच्या साधनेद्वारा समूर्त साकार बनते याची साक्ष पुरवते सांवतामहाराजांची जीवनशैली. मुखाने नाम जपत नित्यनैमित्तिक कर्मे विशुद्ध दृष्टीने पार पाडत राहिले तर मोक्षसाधनेसाठी वेगळे काही तपसायास करावे लागत नाहीत, यांबाबतची ग्वाही भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण इतक्या सडेतोड शब्दांत पुरवितात तुकोबाराय. प्रवृत्तीकडून प्रथम निवृत्तीकडे आणि त्या नंतर निवृत्तीच्याही पलीकडे असणाऱ्या वृत्तीरहित अवस्थेकडे यथावकाश जाण्यासाठी त्याग हा प्रापंचिक कर्मांचा नव्हे तर कर्मांमागील प्रदूषित भावनेचा, अहंभारित दृष्टीचा करावयाचा असतो, हा आहे सांगावा तुकोबांचा. कर्मे करण्यामागील प्रेरणा कर्तेपणाच्या काजळीने काळवंडलेली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठीच आसरा घ्यावयाचा असतो नामजपाचा. एकार्णव झाला तरंगु बुडाला । तैसा देह झाला एकरूप या ज्ञानदेवांच्या स्वानुभवानुसार अवस्था बनते अखंड नामसाधनेद्वारे साधकाच्या देहामनाची. मनाचे मनपणच देहासवे विरून गेले तर कर्तेपणाच्या जाणिवेला स्थिर होण्यासाठी टेकू लाभावा तरी कोठून व कसा ? अस्तित्वाच्या त्या अवस्थेमध्ये हातून घडणारे प्रत्येक कर्मच बनते पूजासाधन. यापेक्षा वेगळा मोक्ष तो कोणता ? स्वकर्मात व्हावें रत । मोक्ष मिळे हातोहात हे सांवतामहाराजांचे उद्गार म्हणजे निरपवाद दाखलाच जणू अद्वयबोधरत कर्मयोग्याच्या जीवनराहाटीचा – अभय टिळक

agtilak@gmail.com