scorecardresearch

मुक्तपेठ

‘पुंडलीक’नामक गावपाटलाने वसवलेले नगर म्हणजे पंढरपूर, या तुकोबारायांच्या प्रतिपादनाचा अर्थ उमगण्यास आता अडचण पडू नये.

‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी’ अशी पहिल्या चरणाची सुरुवात असणारा अवीट गोड असा एक अभंग आहे चोखोबारायांचा. पंढरीनगरीच्या दिशेने करावयाच्या वाटचालीचे आणि पंढरीक्षेत्राचे महिमान अतीव ओलाव्याने गातात चोखोबाराय या अभंगात. चौथ्या चरणामध्ये पंढरीचे वर्णन करताना ‘पंढरीचा हाट कउलाची पेठ’ अशी विलक्षण मार्मिक आणि तितकीच हृद्य शब्दकळा योजलेली आहे चोखोबांनी. कौल देऊन पंढरी नगरीत वसविलेल्या पेठेमध्ये गजबजलेला बाजार शोभून दिसतो आहे, असा आहे सांगावा चोखोबारायांचा. पंढरीक्षेत्रात पेठ वसविण्यासाठी कौल कोणी दिला, त्या पेठेमधील हाटामध्ये काय काय जिनसा मिळतात अशांसारख्या कोणाच्याही मनात सहजच उद्भवणाऱ्या आनुषंगिक प्रश्नांचा उलगडा करतात तुकोबाराय. ‘‘बळियां आगळा पाळी लोकपाळां। रीघ नाहीं कळिकाळा रे। पुंडलीक पाटील केली कुळवाडी। तो जाला भवदु:खा वेगळा रे।’’ हे तुकोबारायांचे स्पष्टीकरण नीट समजावून घ्यावयास हवे त्यासाठीच. हे अवघे संदर्भ आहेत आमच्या प्राचीन गावगाड्याचे. पांढरीची वसाहत करून गाव स्थापन करण्याची हिंमतबाज जबाबदारी निभावणाऱ्या भारदस्त असामीस त्या गावाची पाटीलकी बहाल होत असे. वसवलेल्या गावाचे रक्षण करणे, गावातील पेठ सजविण्यासाठी वाणी-उदम्यांना कौल देऊन पाचारण करणे, गावगाड्यात त्यांचा व्यापार सुरक्षित व सुरळीत चालेल याची हमी देऊन त्यांना आश्वस्त करणे ही सारी अंगभूत जबाबदारी असे गावच्या वतनदार गावपाटलावर. ‘पुंडलीक’नामक गावपाटलाने वसवलेले नगर म्हणजे पंढरपूर, या तुकोबारायांच्या प्रतिपादनाचा अर्थ उमगण्यास आता अडचण पडू नये. अशा पंढरीनगरीचा मोकासा ज्याच्याकडे आहे तो लोकदेव म्हणजे पांडुरंग. तो आहे आगळा बळिवंत. त्याच्या परगण्यामध्ये भक्तराज पुंडलीकराय पाटलाने वसविलेल्या पंढरीनगरीमध्ये भरलेल्या बाजाराचे कमालीचे मनोहर वर्णन- ‘‘संतसज्जनीं मांडिलीं दुकानें। जया जें पाहिजे तें आहे रे।’’ अशा शब्दांत करतात तुकोबाराय. पंढरीनगरीमध्ये निरुपाधिक असे उघडे रूप धारण करून थेट चौकात उभ्या ठाकलेल्या उघड्या विठ्ठलदेवाचा लोकमंत्र नगरीतील खुल्या बाजारात सहज उपलब्ध व्हावा, हे तर मग ओघानेच आले. ‘‘सुखाचिया पेठें घातला दुकान। मांडियेले वान रामनाम।’’ हे तुकोबांचे उद्गार म्हणजे त्या वास्तवाची रोकडी साक्षच जणू. दुकानांमध्ये विक्रीस मांडलेला रामनामरूपी हा वाण असा लोकविलक्षण आहे की, त्याच्या खरेदीसाठी रुकामोल अणुमात्रही वेचावे लागत नाही. ज्याला लागेल त्याने हवा तेवढा हा माल उधार उचलावा, असे खुले आवाहन करतात तुकोबाराय- ‘‘उधार घ्या रे उधार घ्या रे। अवघे या रे जातीचे।’’ अशा पुकाऱ्याद्वारे. भीमेच्या तीरावर थेट तेराव्या शतकापासून भरत आलेला आहे असा खुला बाजार. ‘मुक्त बाजारपेठ’ ही संकल्पना निदान भक्तीच्या क्षेत्रात तरी मुळीच अपरिचित नाही वैष्णवांना. नामरूपी मालाच्या थप्प्या लागलेल्या आहेत या हाटातील दुकानांमध्ये. वानवा असेल तर ती जातिवंत ग्राहकांचीच! ‘‘भरणी आली मुक्त पेठा। करा लाटा व्यापार।’’ असे खुले आवतण देत आहेत तुकोबाराय सगळ्यांना. सर्व स्तरांतील गिऱ्हाइकांना विनाअट प्रवेश आहे या बाजारात. ‘‘येथे पंक्तिभेद नाहीं। मोठें कांहीं लहान।’’ अशी नि:संदिग्ध ग्वाहीच आहे मुळी तुकोबांची. भागवत धर्माचा गाभा असणाऱ्या लोकतत्त्वाशी सुसंगत अशीच ही मुक्तपेठ नव्हे का! – अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article abhang strangely touching akp

Next Story
लोकदेव
ताज्या बातम्या