‘गुरू’ या अधिष्ठानाची व्याख्या काय?- तसा हा प्रश्न वाटतो अतिशय सोपा आणि सरळ. अर्थांतराचे अक्षरश: अनंत पदर आहेत ‘गुरू’ या पदाच्या व्याख्येला. मात्र, ‘गुरू’ या संकल्पनेची

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानदेवांनी केलेली उकल केवळ अद्वितीयच! ‘अनुभवामृता’च्या दुसऱ्या प्रकरणातील पहिलीच ओवी या संदर्भात कमालीची मननीय ठरते. ‘‘आतां उपायवनवसंतु। जो आज्ञेचा आहेवतंतु। अमूर्तचि परी मूर्तु। कारुण्याचा।’’ अशा विलक्षण बहारदार शब्दांमध्ये वर्णन करतात ज्ञानदेव ‘गुरू’ या अधिष्ठानाचे. गुरू तत्त्वाचे अनन्यसाधारणत्व विशद करण्यासाठी इथे ज्ञानदेवांनी योजिलेली ‘आज्ञेचा आहेवतंतू’ ही शब्दकळा आहे मोठी लाघवी आणि तितकीच आशयगर्भ. ‘आहेवतंतू’ म्हणजे मंगळसूत्र. तर, ‘सर्वंकष ज्ञान’ हा होय अर्थ ‘आज्ञा’ या शब्दाचा. खुद्द आत्मविद्येने ज्यांच्या नावाने गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र धारण केलेले आहे, म्हणजेच पयार्याने आत्मविद्येशी ज्यांचा परिणय झालेला आहे असे आत्मविद्येचे नाथ म्हणजे ‘गुरू’, हे होय ‘गुरू’ या पदाचे ज्ञानदेवकृत विवरण. आहे की नाही हे सगळेच अलौकिक! ‘ज्ञान’ हा तर भगवंताच्या षड्गुणांपैकी एक गुण. किंबहुना, षड्गुणैश्वर्यसंपन्न ईश्वरतत्त्वालाच म्हणतात ‘भगवंत’. ऐश्वर्य हा होय ‘भग’ या शब्दाच्या अनेक अर्थांतील एक अर्थ. ‘‘यश श्री वैराग्य ज्ञान। ऐश्वर्य औदार्य हे षड्गुण। नित्य वसती परिपूर्ण। तो मी नारायण भगवंत।’’ असे नाथरायांनी नारायणाच्या मुखातून ‘एकनाथी भागवता’च्या पंधराव्या अध्यायात घडविलेले कथन ‘भगवंत’ या संकल्पनेची निखळ स्पष्टता घडविते. विश्वोत्तीर्ण परमतत्त्वाची साकार अशी नामरूपधारक मूर्ती म्हणजेच सद्गुरू! शैवागमाचे अवघे तत्त्वदर्शन एकवटलेले आहे ते नेमके याच ठिकाणी. विश्वोत्तीर्ण अवस्थेत केवळ स्पंदरूपाने नांदणाऱ्या परमवस्तूला मुदलात विश्वात्मक बनावेसे का वाटते, हा मुख्य मुद्दा आहे इथे. एकविध असणारे शिवतत्त्व एकटेपणाचा कंटाळा आल्यामुळे बहुविध रूपांनी नटते-बहरते, हे झाले मूळ प्रश्नाचे उत्तर. पाण्याने स्वत:च्या लाटांशी क्रीडा करावी तोच व तसाच हा प्रकार. ‘गुरू’ आणि ‘शिष्य’ या दोन अधिष्ठानांदरम्यान फुलणाऱ्या मधुर, पवित्र आणि मंगल नातेसंबंधांचा आस्वाद घेण्यासाठी एकल असणारे परमतत्त्व प्रथम ‘गुरू’ या रूपाने प्रतिष्ठित झाले आणि तेच तत्त्व ‘शिष्य’ असे नामाभिधान धारण करून पुन्हा प्रगटले, असे विश्लेषण आहे ज्ञानदेवांचे या संदर्भात. या सगळ्या खटाटोपाचा एकमात्र हेतू काय, तर गुरू आणि शिष्य यांच्यादरम्यानच्या प्रेममय अनुबंधाची लज्जत चाखणे, हा व एवढाच. ‘‘एकपणे नव्हे सुसास। म्हणौनि गुरु शिष्याचे करौनि मिस। पाहणे चि आपुली वास। पाहातसे।’’ हे ज्ञानदेवांचे वचन पुरविते साक्ष त्याच वास्तवाची. ‘गुरू आणि ‘शिष्य’ ही केवळ दोन नावे एकाच अस्तित्वाची. रूपे दोन, वस्तू मात्र एकच. अणुमात्रही द्वैत अथवा भेद नाहीच कोठे. सोने आणि सोन्याचे दागिने यांच्या परस्परनात्यासारखाच हा नातेसंबंध. एकच तत्त्व दिसते नांदताना दोन्ही ठायी. ‘‘तैसा गुरु शिष्य मिसे। हाचि एकु उल्हासे। जऱ्ही  काही दिसे। दोन्ही पण।’’ हा होय सारभूत गाभा ज्ञानदेवांनी अनुभवलेल्या गुरुदर्शनाचा. असे गुरुदर्शन ज्या दिवशी घडेल ती खरी गुरुपौर्णिमा! – अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article adhvybodh gyandev definition guru abode akp
First published on: 23-07-2021 at 00:08 IST