चक्रधरस्वामींच्या जीवनातील एक नितांत सुंदर कथा ‘लीळाचरित्रा’मध्ये शब्दबद्ध झालेली आहे. मराठी भाषेच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्येही एके काळी तिचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. निसर्गरम्य वनात एका झाडाखाली स्वामी निवांत बसलेले होते. एवढ्यात भीतीने थरकापलेला एक ससा कोठूनसा धावत धावत अवचितच तिथे आला आणि स्वामींच्या मांडीखाली जाऊन दडला. जिवाच्या आकांताने पळत आलेल्या त्या सशाच्या पाठलागावर दोन कुत्रेही भुंकत तिथे आले. कुत्र्यांना पाहून सशाने आपले अंग अधिकच चोरून घेतले. कुत्र्यांचा कालवा चालू असतानाच हातामध्ये तीरकमठा आणि वाघुरे घेतलेले दोन अरण्यवासीही येऊन ठेपले. आपल्या मालकांना पाहताच त्या दोन कुत्र्यांना अधिकच जोर चढला. आश्रयाला आलेल्या त्या सशाला आमच्या हवाली करा, असा तगादा पाठलागावर आलेल्या शिकाऱ्यांनी लावला. ‘‘शरण आलेल्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही,’’ असे उत्तर चक्रधरस्वामींनी त्यावर दिले. ‘‘या सशाला धरण्यास चढाओढ लागलेली आहे, त्याला आपण सोडले नाहीत तर पैज लावलेल्या संबंधितांमध्ये मारामाऱ्या होतील, अगदी रक्तही सांडेल,’’ असा युक्तिवाद करत दोन्ही शिकाऱ्यांनी त्यांचा हेका चालूच ठेवला. ‘‘या सशाचा जीव घेऊन तुम्हाला काय साध्य होणार आहे?’’ असा प्रश्न स्निग्ध वाणीने व प्रशांत मुद्रेने स्वामींनी त्या दोघांनाही मग विचारला. ‘‘हा ससा सर्वत्र मुक्तपणे संचारतो, कोणाच्या अध्यातमध्यात तो नाही, त्याच्यापासून कोणालाही धोका नाही की अपाय नाही, हा झऱ्याचे निर्मळ पाणी पितो, रानावनात बागडतो… तेव्हा त्याचा जीव घेण्याचे कारणच काय…’’ असा संवाद चालू राखत चक्रधरस्वामींनी हळूहळू शिकाऱ्यांचे मनपरिवर्तन घडवून आणले. ‘‘स्वामी, यापुढे असे कोणाच्याही जिवावर आम्ही उठणार नाही,’’ अशी हमी देत वृत्तिपालट झालेले ते दोघेही तिथून निघून गेले. शिकारी गेल्यानंतर मांडीच्या खालून बाहेर आलेल्या सशाकडे वात्सल्यपूर्ण नजरेने पाहात चक्रधरस्वामी त्याला म्हणाले, ‘‘महात्मेहो, आता जाए गा…’’ भयमुक्त झालेला तो ससा टुणटुण उड्या मारत रानात पसार झाला… सशाला उद्देशून स्वामींनी वापरलेल्या ‘महात्मेहो’ या उद्बोधनामध्ये फार मोठे सार दडलेले नाही का! जगातील प्रत्येक जीव हा ‘महात्मा’ होय, हेच गाभातत्त्व चक्रधरस्वामी इथे मांडतात. स्वामींची ही वृत्ती व जगातील प्रत्येक जीवमात्राकडे बघण्याची त्यांची दृष्टी अद्वयाचे सूचन करणारीच आहे. परमशिव महादेवच यच्चयावत वस्तुमात्रांच्या रूपाने नटलेला-प्रगटलेला असल्याने या विश्वातील प्रत्येक लहानथोर जीवजंतू हे वस्तुत: महात्मेच होत, ही जीवनदृष्टीच स्वामींच्या या लीलेद्वारे प्रगटते. पोळ्या लांबवणाऱ्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणारे नामदेवराय व तहानेने व्याकूळ होऊन तापलेल्या वाळवंटात तळमळणाऱ्या गाढवाच्या मुखामध्ये काशीहून भरून आणलेली गंगाजळाची घागर रिती करणारे नाथराय, नेमक्या याच जीवनदृष्टीचा प्रत्यय आपल्याला घडवतात. ‘‘भूतीं देव ह्मणोनि। भेटतों या जना। नाहीं हे भावना। नरनारी।’’ हे तुकोबांचे वचन हीच जीवनदृष्टी प्रतिबिंबित करते. परमादराने नजराणा अर्पण करणाऱ्या छत्रपती शिवरायांना प्रबोधन करतेवेळी- ‘‘मुंगी आणि राव। आह्मां सारखाची जीव।’’ हे तुकोबांनी उच्चारलेले शब्द, प्रत्येक भूतमात्राच्या ठायी वसणाऱ्या त्याच महात्मापणाकडे निर्देश करतात. प्रत्येक क्षणी आपला व्यवहार ‘महात्मा’ तत्त्वाशी घडतो आहे, ही जाणीव सतत जागृत राखणे याचेच नाव साधना!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article advaya bodh lilacharitra akp
First published on: 22-02-2021 at 00:15 IST