कोणत्याही प्रकारच्या बाह्य धाकामुळे होणारा बदल चिरस्थायी असू शकत नाही. पक्वावस्थेपूर्वीच बळाने झाडावरून उतरवून गोदामामध्ये कृत्रिम प्रक्रियांद्वारे आंबे पिकवण्यासारखाच तो प्रकार ठरतो. आंतरिक उत्क्रांतीद्वारे साकारणारे परिवर्तन चिरकालिक ठरते. त्यामुळे, राजाने त्याचा राजदंड उंच उभारून न्यायनीतीची पाठराखण करण्याचा राजधर्म जोपासत असतानाच, प्रत्येक व्यक्तीने विवेकाची कास धरून अंतरंगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहावयास हवे, यांवर संतविचाराचा प्रमुख भर राहिलेला आहे. सद्वर्तन आणि संतसंगती यांबाबत संतपरंपरेने कटाक्ष जपलेला दिसतो तो नेमका त्याचसाठी. इथेही पुन्हा, भागवतधर्मप्रणीत मूल्यविचार संतत्वाचा गाभा जोडतो तो विवेकाच्या अधिष्ठानाशी; कर्मकांडाशी नव्हे, हे वास्तव आपल्या मनाच्या तळाशी निरंतर जागते हवे. सज्जनाशी विटूं नये । नीचासवें बाटूं नये । तस्कराशी पुसू नये । कोणी एक असे नाथराय जे बजावतात त्यांतील केंद्रवर्ती सूत्र कोणते असेल तर ते नेमके हेच. संतविभूतींच्या साहचर्याद्वारे परावस्तूची प्राप्ती होते, संतसंग हाच आत्मज्ञान हस्तगत करण्याचा हुकमी मार्ग होय… हे सारे प्रतिपादन वास्तवात उतरायचे, तर त्यासाठी प्रथम लौकिकाचरणाचा पाया विशुद्ध हवा, ही संतविचाराची अतिशय मूलभूत भूमिका आहे. संतसंगतीचे काय सांगू सुख। आपण पारिखे नाहीं तेथें असा संतसंगतीचा जो महिमा नामदेवराय वर्णन करतात तो प्रवासातील फार पुढचा टप्पा होय, ही बाब बहुतेकदा ध्यानातच येत नाही आपल्यापैकी बहुतेकांच्या. विवेकी सत्पुरुषांच्या सान्निध्यात राहिल्याने वृत्तीमधील ‘आप-पर’ भावाचे निर्मूलन होते हे नामदेवरायांचे कथन आपल्याही अनुभूतीच्या कसोटीस उतरायचे तर सुरुवात करावयास हवी ती आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या सर्वंकष शुद्धीची. ती प्रक्रियाही काही सोपी नाही. तो प्रवास आहे दूरचा. मुळात, आपल्या रोजच्या वागण्यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवे या अगदी प्रारंभीच्या टप्प्याची जाणीव नाथराय करून देतात असत्य नाद करूं नये। खोटा संग धरूं नये। भोचकाशी मैत्री करूं नये। कोणी एक अशा थेट आणि नितळ शब्दशैलीत. आपले लौकिक जीवन आणि पारलौकिक साध्यप्राप्ती या दोहोंत असे आणि इतके जैविक नाते असते, या वास्तवाचा गंधही नसतो आपल्याला. इथे मूळ व जटिल आव्हान आहे ते जगण्याचा पोतच अंतर्बाह्य बदलण्याचे. या प्रक्रियेचा आतड्याचा संबंध पोहोचतो तो वृत्तीचा पालट घडविण्याशी. निव्वळ शारीरिक पातळीवरील कर्मकांडे यथासांग आचरून तसे आंतरिक स्थित्यंतर घडून येईलच याची हमी देता येत नाही. कारण, शरीराच्या पातळीवर साकारणाऱ्या कर्मसाधनेचे अपेक्षित पडसाद अंत:करणावर उमटतात अथवा नाही, हे बघण्यासाठीदेखील विवेकाचे अधिष्ठान मनोविश्वात दृढ असावे लागते. विरागी संत हे विवेकाचे मूर्त रूप असल्यामुळेच त्यांच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा तो आपल्या विवेकदीपाची ज्योत अखंड तेवती राहावी म्हणून. आंतरिक शुद्धीची प्रक्रिया अविरत जारी राखणे, हे त्यासाठीच अनिवार्य ठरते. त्या साऱ्या मार्गक्रमणाचा तपशील मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं। रूप सर्वत्र देखोनि नमस्कारी। लघुत्व सर्वभावें अंगीकारी। सांडीमांडी मी तूंपण ऐसी थोरी रे अशा अनुभवसंपन्न शब्दकळेद्वारे आपल्या पुढ्यात साकारतात तुकोबाराय. हा प्रवास धिमेपणे आणि तितिक्षेनेच करावा लागतो. – अभय टिळक

agtilak@gmail.com