भजन-कीर्तन, जपजाप्य, यज्ञयाग, पूजापाठ, तप-तीर्थाटने, व्रतवैकल्ये, उपासतापास, पठण-पारायण या व यांसारख्या अन्य बाबींचा समावेश आपण ‘आध्यात्मिक’ अथवा ‘पारमार्थिक’ अशा शीर्षकाखालील कर्माचरणामध्ये करतो. या सगळ्याचा खरोखरच नेमका आणि सखोल हेतू काय, असा प्रश्न आपण स्वत:ला कधी तरी प्रांजळ गांभीर्याने विचारतो का? ‘साधक’ या कोटीमध्ये प्रवेशणे, मन:शांती प्राप्त करू न घेणे, चिरसमाधान हस्तगत करणे, मोक्ष मिळवणे, जिज्ञासा शमविणे…असा अथवा यांपैकी एखादा हेतू मनात ठेवून आपण परमार्थाला लागतो का? जी काही पारमार्थिक साधना आपण जशी काही करतो त्यांपायी आपल्या जगण्यात, जीवनविषयक दृष्टिकोनात, अंत:वृत्तींमध्ये काही परिवर्तन घडत येत असल्याचे आपल्याला जाणवते का? किंबहुना, तसे मूलगामी स्थित्यंतर आपल्या आंतरिक विश्वात घडून यावे, अशी आपली खरोखरच प्रामाणिक इच्छा असते का? त्या दृष्टीने आपण आपल्या अंत:करणाचा शोध कसोशीने घेतो का? तशा नितळ अंतर्शोधासाठी आपण झडझडून प्रयत्नशील बनतो का?… हे प्रश्न उपस्थित करण्याचे एक निश्चित प्रयोजन आहे. आपल्या लोकव्यवहाराचा पोत हिणकस बनत चालल्याबद्दल आपण सगळेच वारंवार खंत व चिंता व्यक्त करत असतो. ‘माणूस बदलत नाही तोवर हे चित्र बदलणार नाही’, या भरतवाक्याने सांगता होणाऱ्या आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद-शिबिरे यांची तर झड लागलेली आपण सर्वत्र अनुभवतो. त्याचसाठी आध्यात्मिक मूल्यांची कास प्रत्येकाने धरायला हवी, असा घोष आणि धोशा तर जवळपास सगळीच व्यासपीठे करताना दिसतात. संतांच्या आणि संतविचाराच्या उज्ज्वल परंपरेचा दाटलेल्या कंठाने उल्लेख त्या संदर्भातच केला जातो. पण, संत जे सांगतात अथवा त्यांना जे सांगायचे आहे त्यांकडे आपण खरोखरच संवेदनशीलतेने लक्ष पुरवतो का, हाच खरा प्रश्न आहे. भजनानंदाची गोडी सगळ्यांनाच असते, परंतु संतांना अभिप्रेत असलेले भजन नेमके कसे आहे अथवा कसे असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही-आम्ही करतो का? नामा म्हणे तुम्ही विठ्ठल होऊन। अभंग भजन करीतसां हे नामदेवरायांचे आपल्याला याच संदर्भात परोपरीने जे सांगणे आहे त्याच्या गाभ्याकडे तर आपले ध्यानही साधे जात नाही! तो हां रे श्रीहरी पाहिला डोळेभरीं। पाहतां पाहणें दूरी सारोनियां असे ज्ञानदेवांच्या नजरेतून परतत्त्वाचे दर्शन घेणे तर मग दूरच राहिले. भगवत्प्राप्तीसाठी नामचिंतन करा, हे आपण सगळेच सतत ऐकतो आणि ऐकत आलेलो आहोत. जमेल तसे व शक्य तितके नामचिंतन अनेक जण आजही करतात, परंतु जगाचा जनक रामकृष्ण एक। न करितां अविवेक स्मरें नाम हे नामदेवरायांचे नामजपासंदर्भातील कळकळीचे आवाहन भिडते का आपल्याला? विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान। रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें असे ज्ञानदेव त्यांच्या ‘हरिपाठा’मध्ये जे म्हणतात त्याचा इत्यर्थही हाच. सर्वव्यापक विष्णुतत्त्वाच्या जाणिवेचे अधिष्ठान अंतरात दृढ राखून, प्रत्येक क्षणी आपला व्यवहार परतत्त्वाशी घडतो आहे या जागृतीद्वारे आपले वर्तन जबाबदार व नैतिक बनत नसेल तर सारेच जप-तप-ज्ञान व्यर्थ होय, हेच सांगत आहेत इथे ज्ञानदेव. ते उमजण्यासाठी नितांत गरज असते प्रगाढ अंतर्मुखतेची. ‘आध्यात्मिक’ या गटात गणल्या जाणाऱ्या यच्चयावत कर्माचरणांती आपण बनतो का खरोखर अंतर्मुख? – अभय टिळक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhajan kirtan matters include spiritual or transcendental akp
First published on: 23-12-2021 at 00:02 IST