गजाननाच्या शुंडादंडाला ज्ञानदेवांनी विवेकाचे निदर्शक मानावे, हे अन्वर्थक ठरते दोन अर्थांनी. ग्राह्याग्राह्यतेचा निवाडा करण्यासाठी गजराज वापर करतो त्याच्या सोंडेचाच. अगदी त्याच न्यायाने, इष्ट-अनिष्ट, सत्य-असत्य, उचित-अनुचित, नैतिक-अनैतिक या द्वंद्वांची उकल ज्ञानी व्यक्तीने विवेकाच्या आधारेच करायची असते. हेच सूत्र शब्दगणेशाच्या विवेकरूपी शुंडादंडाच्या रूपकाद्वारे सुचवितात ज्ञानदेव. गजराजाच्या सोंडेचे आणखीही एक वैशिष्ट्य अभिप्रेत आहे ज्ञानदेवांना या ठिकाणी. अवगाहन करण्याचा विषय स्थूल असो अथवा सूक्ष्म, विश्लेषणाच्या त्या दोनही स्तरांवर विवेकशुद्धी समतुल्य क्षमतेने कार्यान्वित असावी लागते, हे ज्ञानदेवांना या माध्यमातून सुचवायचे आहे. औरसचौरस विस्तारलेल्या अजस्रा वृक्षांच्या बलदंड फांद्या लीलया मोडणारी महाकाय हत्तीची सोंड भुईवर पडलेली सूक्ष्मशी सुईदेखील तितक्याच सहजतेने उचलते, हे वास्तव अंतर्मनाला जागते ठेवूनच ज्ञानदेव विवेकबुद्धीला सोंडेचे रूपक देतात. तर्क आणि सूक्ष्म विवेक ही आपला रोजचा व्यवहार पायाशुद्ध आणि निरामय बनविणारी दोन प्रधान साधने होत. गणरायाच्या हातातील परशू आणि अंकुश या दोन आयुधांचे लोकव्यवहारातील प्रयोजन नेमके तेच होय, हे तत्त्वसार तरी तुर्कु तोचि फरशु। नीतिभेदू अंकुशु। वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे। अशा शब्दांत विदित करतात ज्ञानदेव. तर्कशुद्ध विचार करणे आणि तर्कट असणे या दोहोंत महदंतर आहे. तीच बाब नीतीची. ज्ञानदेवांनी अंकुशाची उपमा दिलेली आहे नीतितत्त्वाला. ‘नीती’ या संकल्पनेला जोडलेले आहेत अर्थांतराचे अनंत पदर. आपले व्यक्तिमत्त्व तसेच सार्वजनिक जीवनातील व्यवहार नीतीला अनुसरून आहे अथवा नाही, या विवेकाचा अंकुश दक्षपणे सतत रोखलेला असावा, हेच सांगायचे आहे ज्ञानदेवांना. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। नित्य नवा दिस जागृतीचा। अशा शब्दात नेमके हेच सूचित करत आहेत तुकोबाराय तुम्हा-आम्हाला. भागवत धर्माला अभिप्रेत असणारी भक्ती करणे हे सुळावरील पोळी  खाण्याइतपत दुष्कर होय, असे तुकोबा जे म्हणतात त्याचे रहस्य सामावलेले आहे ते इथेच. भक्तीची इमारत नीतीच्या पायावर उभारलेली असावी हेच अपेक्षित आहे ज्ञानोबा- चोखोबा- तुकोबांना. विशुद्ध नैतिकतेची पायाभरणी नसलेल्या दिखावू व झटपट साधनेची जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत। पायाविण भिंत तातडीची। अशा शब्दात उपेक्षाच करतात तुकोबाराय. ‘नीती’ या संकल्पनेचा ‘सूक्ष्म दृष्टी’ हादेखील अर्थ याच संदर्भात अभिप्रेत आहे ज्ञानदेवांना. नीतीच्या या अर्थांतराचा संबंध थेट जुळलेला आहे तो महाभारतामधील कृष्णनीतीशी. समाज व्यवहारात अनेकदा बाह्यत: धर्म भासतो अधर्मस्वरूप, तर काही वेळा अधर्मच वरकरणी धर्माचे रंगरूप घेऊन पुढ्यात अवतरतो. अशा वेळी, सूक्ष्म दृष्टीचा अवलंब करून ज्ञानी लोकधुरीण दोहोंतील भेद अचूक हेरून त्या त्या प्रसंगी उचित अशी कृती करतो, हेच कृष्णप्रणीत नीतितत्त्व महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला ‘शांतिपर्वा’मध्ये विशद करतात. ज्ञानोबा-तुकोबांनी शब्दपूजा बांधलेल्या श्रीगणेशाने नीती-अंकुश धारण करण्यामागील गमक हेच! – अभय टिळक

agtilak@115240784754990754962