परमेश्वरप्राप्तीची इच्छा मनी बाळगणाऱ्या मुमुक्षू साधकांना तुकोबा एका अभंगात हुकमी उपाय सांगतात. भावें गावें गीत। शुद्ध करू नियां चित्त हा तो उपाय. या अभंगाच्या ध्रुवपदामध्ये महाराजांनी एक विलक्षण मौज करून ठेवलेली आहे. परतत्त्वाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर हा सोपा उपाय उपलब्ध आहे असे तुकोबाराय तिथे तुज व्हावा आहे देव। तरी हा सुलभ उपाव अशा शब्दांत विदित करतात. भगवंताच्या रूपगुणांचे महिमान वर्णन करणारे भक्ती-गायन भावपूर्ण पद्धतीने केले की देवत्वाची प्रचीती येईल, असा दिलासा उपासकांना देत असतानाच तुकोबारायांनी इथे एक मार्मिक मेख मारून ठेवलेली आहे. ‘गीतगायन शुद्ध चित्ताने तेवढे काय ते कर’, ही महाराजांनी मारलेली ती मेख. आहे की नाही गंमत! चित्तशुद्धी इतकी सोपी असती तर सगळेच प्रश्न एका झटक्यात निकाली निघाले असते. केवळ परतत्त्वाची प्राप्तीच नव्हे तर, आपला सगळा लौकिक लोकव्यवहारही निकोप निरामय बनण्याचा राजमार्गच मग खुला झाला नसता का! हा उपाय ‘सुलभ’ आहे हे म्हणणे केवळ आणि केवळ तुकोबांनाच शोभावे आणि त्यांनीच ते पेलवून न्यावे. प्रज्ञा, शील आणि करुणा या तीन मूल्यांना जीवनसरणीमध्ये भगवान बुद्ध सर्वोच्च पद बहाल करतात ते नेमके या कारणापायीच. या तीन जीवनमूल्यांमध्ये एक विलक्षण तार्किक अशी सुसंगती नांदते. समत्वाचा परीसस्पर्श होऊन बुद्धीचे अवस्थांतर प्रज्ञेमध्ये घडून येणे हे ठरते अतिशय मूलभूत स्वरूपाचे असे आंतरिक परिवर्तन. समत्व चित्तामध्ये स्थिर झाले की व्यवहारात साकारते द्वैत-द्वंद्वांचे समूळ उच्चाटन. देहस्वभावामध्ये असा पालट घडून येणे हेच तर अपेक्षित आहे शीलसंवर्धनामध्ये. ‘शील’ या शब्दाला अर्थांतराच्या अनेक छटा लाभलेल्या आहेत. ‘चारित्र्य’ हे झाले त्या शब्दाच्या अर्थाचे केवळ एक परिमाण. ‘सुवृत्ती’, ‘सद्वर्तन’, ‘सोज्ज्वळता’ हे अर्थपदरही लाभलेले आहेत ‘शील’ या संज्ञेला. वर्तणुकीमध्ये अंतर्बाह्य नेमस्तपणा हाच या सगळ्याचा गाभा. अंत:करणात विराजमान असणारा विवेकरूपी गुरू आणि शारीरिक पातळीवरून घडणाऱ्या क्रियांना शास्त्रपूत धर्मनीतीचे अस्तर या दोहोंच्या समन्वयातून घडत राहते शीलसंवर्धन. अंतर क्षाळिलें गुरू प्रतीतीं। बाह्य क्षाळिलें शास्त्रयुक्तीं। ऐसे शुचित्व निजनिश्चितीं। अद्वैत स्थिती तेथें नांदे अशा शब्दांत नाथराय उलगडतात शीलसंपादनाची मनोकायिक साधनप्रक्रिया आणि तिची निष्पत्ती. व्यवहारातील आपले वर्तन सुधारणे, उन्नत बनवणे ही ठरते या सगळ्यांतील प्रथम पायरी. रोजच्या कामकाजादरम्यान आणि वागणुकीमध्ये तारतम्यपूर्ण नैतिकतेचे पालन यांबाबत कटाक्ष राखणे, हे या संदर्भात कळीचे शाबीत होते. सांडावरून जाऊं नये। लांच खाऊं नये। चोहट्यांत राहूं नये। कोणी एक या नाथोक्तीमध्ये स्पष्ट निर्देश आहे दैनंदिन व्यवहारात प्रत्येकानेच जपण्याच्या शुचित्वाकडे. सांडव्यावरून पाणी वाहत असताना त्यांवरून चालण्याचा आततायीपणा करू नये इथपासून ते चव्हाट्यावर बाष्कळ गप्पा हाणत गावभरच्या उचापती करण्यात कालापव्यय करू नये इथपर्यंत साक्षेपाने नाथ कथन करतात शीलसंवर्धनाच्या शारीर तपस्येचा तपशील. शीलसंवर्धनाच्या प्रयत्नांचा हा सारा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे या क्रमानेच होत राहतो. सर्वांभूती करुणा ही मग ठरते अशा सर्वंकष आंतरिक शुद्धीची सहज-स्वाभाविक परिणती. – अभय टिळक

agtilak@gmail.com