घरातील तिजोरीमध्ये कुलूपबंद असलेल्या सोन्याच्या लडींचे वैभव शतगुणी बहरते त्यांना अलंकाराचे रूप बहाल झाले की. अगदी त्याच न्यायाने, एखादे तत्त्वज्ञान स्वरूपत: कितीही श्रीमंत आणि समृद्ध असले तरी ते जोवर या ना त्या माध्यमातून आस्वाद्य बनत नाही तोवर त्याचे अंगभूत वैभव अव्यक्तच राहते. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी। ब्रह्मानंदलहरी प्रगट केली या नामदेवरायांच्या वचनात व्यक्त होतो हाच भाव. श्रीमद्भगवद्गीता हा म्हणूनच परमार्थशास्त्राचा केवळ एक अमूल्य ग्रंथ नव्हे. लोकोद्धाराची बावनकशी प्रेरणा कार्यान्वित करणाऱ्या लोकाभिमुख संतत्वाचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. या प्रेरणेचा उगम होतो श्रीव्यासांच्या लोकोपकारक कार्यशीलतेमध्ये. हतवीर्य बनून कर्तव्यच्युत होऊ पाहणाऱ्या व्यक्तीला कर्तव्यसन्मुख बनविणारे जे जीवनप्रेरक तत्त्वकथन श्रीकृष्णमुखातून कुरुक्षेत्रावर प्रगटले ते वाक्वैभव व्यासांनी महाभारताच्या भीष्मपर्वामध्ये साक्षेपाने शब्दबद्ध करून ठेवले नसते तर कुरुक्षेत्रावरील हवेत विरून गेले असते. मात्र, व्यासांच्या ठायी वसणाऱ्या कृतिशील समाजमनस्कतेमुळे समाजपुरुषाच्या धारणेस पूरक-उपकारक ठरणारे ते विचारधन चिरंजीव बनले. आणि कृष्णार्जुनीं मोकळी। गोठी चावळिली जे निराळीं। ते श्रीव्यासें केली करतळीं। घेवों ये ऐसी अशा शब्दांत व्यासांचे ते अक्षय ऋण ज्ञानदेव व्यक्त करतात ते उगीच नाही. परंतु, एवढ्यानेच भागत नसते, याचीही पुरेपूर जाण ज्ञानदेवांना आहे. एखादे दिव्य तत्त्वदर्शन केवळ प्राचीन आहे आणि परंपरेने ते प्रवाहित राहिलेले आहे म्हणून त्याचे उपयोजन बदललेल्या काळात व पालटलेल्या परिस्थितीत तसेच्या तसे घडवता येईल, याची शाश्वती नसते. त्यासाठी, पारंपरिक ज्ञाननिधीचीदेखील डोळस आणि जबाबदार चिकित्सा करणे अगत्याचे ठरते. समाजव्यवस्थेतील जबाबदार विद्वानांचे ते आद्यकर्तव्यच ठरते. किंबहुना, ज्ञानवंतांच्या समाजाभिमुखतेचा जणू तो एक निकषच गणावा लागतो. वेदसाहित्याची नेमकी तशीच घुसळण करून श्रीगीतारूपी नवनीत अलगद वेचून घेणे ही व्यासांची दक्ष क्रियाशीलता त्याच लोकाभिमुख ज्ञातेपणाची ग्वाही देते, असे नितळ प्रतिपादन ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि। निवडिलें निरवधि। नवनीत अशा अचूक शब्दांत करतात ज्ञानदेव. मात्र, व्यासांच्या कार्यकर्तृत्वाचे आगळेपण इथेच आटत नाही. शब्दब्रह्माचा निधी असणाऱ्या वेदराशीचे मंथन करून त्यांद्वारे वेचून घेतलेल्या सत्त्वांशांचा मेळ प्रचलित लोकव्यवहाराशी घालायचा तर समकालीन वास्तवाच्या चौकटीत त्याची विवेकशील, निवडक मांडणी करणे भाग पडते. व्यासांचे ते जागृत कर्तेपण मग ज्ञानाग्निसंपर्के। कडसिलें विवेकें। पद आलें परिपाकें। आमोदासी अशा शब्दांत अधोरेखित करतात ज्ञानदेव. ज्ञान हे सक्षमीकरणाचे साधन होय, असा केवळ घोष करून भागत नसते. समाजमनाची धारणा करण्यासाठी उपलब्ध ज्ञानसाठ्याची डोळस चिकित्सा करत लोकव्यवहाराच्या प्रचलित गरजांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने त्याची कसून मांडणी-फेरमांडणी करणे ही लोकमनस्क विद्यावंतांची अनिवार्य जबाबदारी ठरते, हाच ज्ञानदेवांच्या कथनाचा सारांश. व्यासांना अभिप्रेत गीता-धर्म  हाच. आजच्या ज्ञानविश्वातील धुरीणांनी तो जोपासला तरच गीताजयंतीचा उत्सव सार्थ ठरेल. – अभय टिळक

agtilak@gmail.com

hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा