शब्दाच्या अर्थगाभ्यापर्यंत पोहोचण्याची हुकमी हातोटी ज्ञानदेवांनी विशद  केलेली आहे त्यांच्या गीताभाष्याच्या सहाव्या अध्यायात. आहाच बोलाची वालीफ फेडिजे। आणि ब्रह्माचेया चि आंगा घडिजे। मग सुखेंसीं सुखाडिगे। तेया माझि   अशा शब्दांत ती प्रक्रिया उलगडून सांगतात ज्ञानदेव. ‘वालीफ’ म्हणजे ‘वलय’ कोणत्याही मूळ शब्दाला प्रत्यय अथवा उपसर्गाची जी वलये भिडलेली असतात ती दूर करणे, हा यातील अगदी सुरुवातीचा भाग. ही वलये एकदा का  फेडली, की त्या बोलाचे अंग, म्हणजेच त्याचा पाया दृग्गोचर बनतो. त्या अर्थगाभ्याचे एकदा का सम्यक आकलन झाले की, ज्ञानाने जणू परिपूर्ण सचैल स्नान घडल्यासारखा आनंदानुभव प्राप्त होतो, असा आहे ज्ञानदेवांचा सांगावा. प्रत्यय व उपसर्गादी वलयांप्रमाणेच कोणत्याही शब्दाला लगडलेले असतात अर्थांतराचे अनंत तलम असे पदर-उपपदर. या पदर-उपपदरांचादेखील धांडोळा घ्यावा लागतो साक्षेपाने. एखाद्या शब्दाच्या प्रस्थापित अर्थाचीच काय ती तोंडओळख करून घेतली तर त्याच्या अंतरंगातील सखोल अर्थगाभा आकलनाच्या चिमटीतून सुटण्याचाच धोका अधिक. ‘ईश्वरप्रणिधान’ हा शब्द नेमका असा. ईश्वरभक्ती हा या संज्ञेचा प्रस्थापित अर्थच असतो परिचित बहुतेकांच्या. ईश्वरभक्ती वा ईश्वरोपासना हाच स्थायिभाव बनावयास हवा साधकाचा हेच आहे ‘ईश्वरप्रणिधान’ या संज्ञा संकल्पनेला अभिप्रेत. इथे या शब्दाच्या ‘ईश्’ आणि ‘प्रणिधान’ या दोन पदांच्या अर्थांतराकडे लक्ष पुरविणे अगत्याचे ठरते. भक्ती  सोपी होय अथवा असते ही आपली एक लाडकी धारणा मुळापासून नव्याने तपासून बघण्याची निकड आपल्याला प्रकर्षाने भासेल त्या नंतरच! ‘नियमन करणे’, ‘सत्ता चालविणे ’आणि ‘व्यापून राहणे’ या होत तीन मुख्य अर्थच्छटा ‘ईश्’ या धातूपदाच्या. तर अर्थांचे अनंत पदर लाभलेले आहेत प्रणिधान या संज्ञेला. ‘ध्यान’, ‘समाधी’, ‘भक्ती’, ‘समाधान’ हे झाले त्यांतील काही अर्थपदर वानगीदाखल. ‘ईश्वर’या एकमात्र वस्तूने अखिल चराचर व्यापलेले असून तोच सर्वसामर्थ्यवान आहे, या वास्तवाचे अनुसंधान अखंड टिकणे, हा ‘ईश्वरप्रणिधान’ या संज्ञेचा सरळ अर्थ यातून सहजपणे उमलतो. हा अर्थ तर काय अगदी सोपा आहे, अशी धारणा पक्की होते ती त्यामुळेच. परंतु, प्रणिधान या शब्दाला लाभलेल्या अन्य दोन छटा विलक्षण अर्थगर्भ आहेत. त्यांचा परिचय करून घेतला की ‘ईश्वरप्रणिधान’ या संकल्पनेच्या अर्थाचा पैस बनून जातो चांगला औरसचौरस.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दीर्घाद्योग’ आणि प्रयत्न हे आहेत ‘प्रणिधान’ या शब्दाचे आणखी दोन अर्थ. परतत्त्वाने चराचर व्यापल्याची धारणा. (म्हणजेच ईश्वर प्रणिधान) स्थिर करणे कष्टप्रद का शाबीत होते याचा उलगडा आता व्हावा. ‘ईश’ तत्त्वाचे सर्वांतरत्व अनुभूतीच्या आवाक्यात येण्यासाठी आवश्यक असणारी अंत:करणाची तरलताच आपण बसलेले असतो पार गमावून. तपाचरणाद्वारे अंत:करण निर्मळ करण्यासाठी करावा लागतो दीर्घोद्योग. त्या नंतरच साध्य होते ईश्वरप्रणिधान!  महामळें मन होतें जें गांदलें। शुद्ध चोखांळवे स्पटिक जैसें, अशा शब्दांत तुकोबाराय वर्णन करतात आंतरिक स्थित्यंतराच्या त्या प्रक्रियेचे. ‘अहं’ ची हकालपट्टी ही ठरते त्या स्थित्यंतराची पूर्व अट! ‘सर्वाभूतीं पाहें एक वासुदेव। पुसोनियां ठाव अहंतेचा’ असा रोकडा सल्ला नामदेवराय देतात तो त्याचसाठी. – अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishwar pranidhan nouns straightforward meaning pranidhan akp
First published on: 13-08-2021 at 00:11 IST