अद्वय‘नामयोगी’ ही पदवी ज्यांना यथार्थपणे शोभते त्या गोंदवल्याच्या महाराजांकडे एक साधक एके दिवशी दर्शनासाठी आला. रामाच्या कृपेने घरी सगळे कसे गडगंज आहे, याचे सांगोपांग कथन त्याच्या मुखातून ऐकल्यानंतर महाराजांनी त्याला प्रश्न केला की, ‘‘बुवा तुमचा एवढा बारदाना घरी आहे आणि इथे मठात तर तुम्ही सहकुटुंब आलेले दिसता. मग, आता तिकडे गावी घरात मागे कोण कोण आहेत?’’. घरी शेतीवाडी, गुरेढोरे, घरदार, एकत्र कुटुंबातील बाकीचे नातेवाईक, चिरपरिचित, पै-पाहुणे अशी सगळी यादी साधकाने महाराजांपुढे सादर केली. महाराज पुढे म्हणाले, ‘‘बघा बरं. नीट आठवा. आणखी कोणी राहिले आहे का घरी ते पुरता विचार करून सांगा’’. विचार करकरून बिचाऱ्या त्या साधकाचे डोके शिणले. म्हणाला, ‘‘महाराज नाही हो. आता कोणी म्हणजे कोणी राहिले नाही बघा’’. महाराज हसले. क्षणभर स्तब्ध झाले आणि म्हणाले, ‘‘अहो, देवघरातील देवांना कसे विसरलात? तो नाही का घरी? किंबहुना, तुमचेच केवळ घर नाही तर संसारातील प्रत्येक अणुरेणू व्यापून उरलेल्या भगवंताला तुम्ही घरी ठेवून इथे आलेले आहात आणि त्यालाच नेमके विसरलात?’’… संपली कथा! तुमची-आमची जगाकडे बघण्याची दृष्टी आणि संतांची विश्वाकडे बघण्याची नजर या दोहोंतील मुख्य फरक हाच. हा फरक असल्यामुळेच, दिवाळीचा सण उगवल्यानंतर आमच्या नामदेवरायांना प्रथम आठवण झाली ती राउळात भक्तांसाठी तिष्ठत विटेवर उभ्या ठाकलेल्या सांवळ्या विठ्ठलाची. नरक चतुर्दशीच्या दिवशी, म्हणूनच, पहाटेच्या मंगल स्नानासाठी पांडुरंगाला आवर्जून घरी आणण्याकरिता नामदेवराय देवळात गेले असा दाखलाच आहे दस्तुरखुद्द जनाबाई माउलींचा. सण दिवाळीचा आला । नामा राउळासी गेला । हातीं धरूनी देवासी । चला आमुच्या घरासी अशा कमालीच्या प्रत्ययकारी शब्दांत जनाबाई तो रम्य प्रसंग तितक्याच उत्कट शब्दकळेने मंडित करतात. हाताला धरून घरी आणलेल्या देवाला चंदनाच्या पाटावर बसवून नामदेवरायांच्या आईने, म्हणजे, गोणाईंनी छान उटणे लावले. नामदेवरायांच्या तीर्थरूपांनी, म्हणजे, दामाशेटींनी देवाला सचैल स्नान घातले. माथ्यावरचा पदर काढून गोणाईंनी नंदाच्या बाळाचे अंग पुसले. देव आणि भक्त यांचे अद्वय नेमके कशाला म्हणायचे याचा हा अवघा घटनाक्रम म्हणजे निर्मळ वस्तुपाठच. नामदेव आणि विठ्ठलदेव या उभयतांत गोणाईंच्या लेखी अणुमात्रही फरकच नाही. अद्वयाच्या प्रांगणातील भक्तीचा व्यवहार हा असा असतो. अशा अद्वयाधिष्ठित भक्तीशास्त्राची अनुभूती चाखणाऱ्या विभूतींना भागवतधर्म ‘संत’ असे संबोधतो. त्यांची भेट घडल्यानेच त्या भक्तीची प्राप्ती होत असल्यामुळे दसरा दिवाळी तो चि आम्हां सण । सखे संतजन भेटतील असे उद्गार उमटतात मुखातून तुकोबांच्या. अद्वयभक्तीचा असा आनंदसोहळाच तुकोबांचा दिवाळसण! दिवाळी प्रीत्यर्थ मंदिरामधून नामदेवरायांनी घरी आणलेला परमात्मा आपल्या हृदयमंदिरात अक्षय ठाण मांडून राहतो त्या वेळी दसरा-दिवाळीचा सण बनतो चिरंतन. तो सुखानंद होतो चिरस्थायी. ती अवस्था अनुभवली सांवतामहाराजांनी. सुखाचा सोहळा करूनि दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्ती धरूं  हे त्यांचे उद्गार म्हणजे शब्दरूप त्याच अनुभूतीचे. – अभय टिळक

agtilak@gmail.com